आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकनाथ पाठक
मनात इच्छाशक्ती असली की आवड आणि छंद जोपासण्यासाठीचे बळ मिळते. त्याला कोणत्याही वयाची किंवा वेळेची मर्यादा नसते, याचाच प्रत्यय पडेगावातील साडे तीन वर्षांचा योगपटू साई वैद्य आणून देत आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सगळे काही ठप्प झाले आहे. त्यामुळे त्याची बालवाडीही बंद आहे. अशात तो या लाखमोलाच्या वेळेत रोज नियमित योगासने करतो. याशिवाय बुद्धिबळाच्या पटावरही आपली चमक दाखवत आहे. हे करत असताना तो स्वत: टीव्हीवरील कार्टून आणि मोबाइलवरच्या गेम्सपासून दूर आहे. याशिवाय तो कुटुंबियांना मोबाईलचा वापर टाळण्याचा सल्ला देतो.
औरंगाबादच्या पडेगाव येथे राहणारा साई आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील हेअर कटिंग सलून चालवायचे. साधारण 3 वर्षांचा असतानाच त्याला आपल्या घराच्या शेजारी राहणारे बाप्पू सोनवणे योगा क्लास घेत असल्याचे दिसून आले. बाप्पू सोनवणे आणि त्यांचे विद्यार्थी योगा कसे करतात हे पाहून त्याला कुतुहल निर्माण झाले. तो रोज घराच्या शेजारी जाऊन योगाभ्यास पाहायला लागला. काही दिवसांतच योग गुरू बाप्पू सोनवणे यांनी त्याला देखील काही आसने शिकवण्यास सुरुवात केली. एक-एक करून त्याने अनेक आसने आत्मसाद केली. हळू-हळू त्याला योगाभ्यास करणे आणि योग गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचा छंद लागला.
वडील ईश्वर वैद्य सांगतात, की योगाभ्यास करताना साईची एकाग्रता वाढली. ज्या वयात लहान मुले मोबाईलचा नाद सोडण्यास तयार नसतात, त्या वयात साई मोबाईलला हातही लावण्यास तयार नव्हता. आपल्या दिनचर्येतून तो अनेकांना प्रेरणा देत आहे. साई ईश्वर वैद्य हा साडे तीन वर्षांचा चिमुकला नियमितपणे सर्व प्रकारची आसने आत्मसाद करण्याचा प्रयत्न करत असतो. एकाग्रतेचा फायदा त्याला बुद्धीबळात मिळत आहे. त्याने बुद्धीबळ शिकण्यास सुरुवात केली आणि त्यात प्रगती देखील करत आहे. योग आणि एकाग्रतेने तो केवळ खेळच नव्हे, तर कुठलीही गोष्ट लवकर शिकतो असे त्याच्या कुटुंबियांना जाणवले आहे. फावल्या वेळात जास्त वेळ मोबाईल वापरू नये असा सल्ला तो आपल्या कुटुंबियांना देखील देत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.