आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:5 वर्षांत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’वर 683 कोेटी खर्च; तरीही मुलीपेक्षा 5 पट अधिक मुलालाच पसंती

महेश जोशी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेवर केंद्राने ७ वर्षांत ६८३ कोटी रुपये खर्च केला. यानंतरही स्त्री-पुरुष समानतेेबाबत समाजाच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही. यामुळेच होणारे बाळ हे मुलीऐवजी मुलगाच असावा असे वाटणाऱ्या पालकांची संख्या पाचपट अधिक आहे. बाळाच्या आईचीही मुलालाच अधिक पसंती आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मुलगाच हवा, असा अट्टहास आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्रकाशित केलेल्या “राष्ट्रीय कुटंुब आरोग्य सर्वेक्षण - ५’ अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशभरातील ७०७ जिल्ह्यांतील १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ६.१० लाख नागरिकांकडून ही माहिती संकलित करण्यात आली. यात होणाऱ्या बाळाचे लिंग, मुलगा वा मुलीला पसंती याबाबत सविस्तर आकडेवारी आहे.

बेटी बचाओ योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च पंतप्रधान मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला पानिपत येथे सुरुवात केली. स्त्रीजन्माचे स्वागत करतानाच स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. २०१४-१५ ते २०२०-२१ दरम्यान अभियानासाठी ६८३.०५ कोटी रुपयांचा खर्च झाला. एवढा खर्च करूनही मुलीऐवजी मुलालाच पसंती दिली जात आहे.

1 देशात १५ ते ४९ वयोगटातल्या शहरी भागातील ११.४%, तर ग्रामीण भागातील १७.४% महिलांची मुलाला पसंती आहे. शहरी ३.८% तर ग्रामीणच्या ३.१% महिलांनी मुलीला पसंती दर्शवली. शहरी १४% आणि ग्रामीणच्या १७.१% पुरुषांची मुलाला, तर शहर व ग्रामीणमध्ये ४.१% पुरुषांची मुलीला पसंती आहे.

2 महाराष्ट्रात शहरी भागातील ८% व ग्रामीणच्या ९.४% महिला, तर शहरी ९.५% व ग्रामीणच्या १३.३% पुरुषांची पहिली पसंती मुलांनाच आहे. मुलगी हवी असणाऱ्या शहरातील महिलांचे प्रमाण ४.६% तर ग्रामीणमध्ये ३.५% आहे. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण शहरांत ३.६% व ग्रामीणमध्ये ५.९% आहे.

3 शिक्षणाचे कमी प्रमाण लिंगभेदामागील महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. निरक्षर १६.१%, ५ वीपर्यंत शिकलेल्या १४.३%, ५वी ते ९वी ८.९%, १० वी ते ११वी ६.७% तर १२ वीच्या पुढे शिक्षण घेतलेल्या ५.९% महिलांना मुलेच हवे आहेत. पुरुषात हे प्रमाण अनुक्रमे २०.७%, २३.८%,११.६%, ११.९% आणि ८.७% इतके आहे.

आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे
^सरकारी पातळीवर महिला सबलीकरणाच्या कितीही योजना राबवल्या तरी आपण कमकुवत, दुर्बल आहोत ही महिलांची मानसिकता दूर होत नाहीये. जी आपली स्थिती झाली ती आपल्या मुलीची होऊ नये या विचाराने महिलाही मुलांनाच पसंती देतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महिलांच्या आर्थिक नाड्या पुरुषांच्या हातात असतात. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-डॉ.मथुरा मेवाड, स्त्रीवादी अभ्यासक

पसंतीक्रम राष्ट्र महाराष्ट्र राष्ट्र महाराष्ट्र मुलाला पसंती 15.17% 8.6% 15.95% 11.3% मुलीला पसंती 3.37 % 4.2% 4.05% 4.8% किमान १ मुलगा 80.72% 73.45% 80.37% 75.52% किमान १ मुलगी 78.47% 72.17 % 7.76% 7.77%

बातम्या आणखी आहेत...