आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन बारामती:‘A फॉर अमेठी, नंतर B फॉर बारामती’; गांधी कुटुंबीयांनंतर आता भाजपच्या निशाण्यावर शरद पवार का?

नीलेश भगवानराव जोशी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यात सर्वात महत्त्वाचे आहे ‘मिशन बारामती’. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात मात देण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलाय. त्यासाठी ‘मिशन बारामती’ची रणनीती तयार केली जात आहे. या अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कन्हेरीच्या हनुमान मंदिरात दर्शन घेऊन ‘मिशन बारामती’साठी बजरंगबलीचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणत्याही निवडणुकीपूर्वी याच मंदिरात प्रचाराचा नारळ फोडतात. गेल्या 55 वर्षापासून कन्हेरीचे हनुमान मंदिर आणि शरद पवार यांची निवडणूक असे समीकरण महाराष्ट्राने पाहिले आहे. आता भाजपच्या या मिशन बारामतीला कन्हेरीचे बजरंगबली आशीर्वाद देतील का? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

बारामती लोकसभा मतदार संघातील याच कन्हेरीच्या मारुती मंदिरात शरद पवार प्रत्येक निवडणुकीच्या आधी प्रचाराचा नाराळ फोडतात.
बारामती लोकसभा मतदार संघातील याच कन्हेरीच्या मारुती मंदिरात शरद पवार प्रत्येक निवडणुकीच्या आधी प्रचाराचा नाराळ फोडतात.

मिशन बारामती भाजपसाठी महत्त्वाचे का?

देशभरातील प्रमुख राजकीय पक्षाला शह देत एक हाती सत्ता मिळवण्याचा भाजपने कायमच प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस मधून गांधी घराण्याचा प्रभाव कमी झालेला दिसून येतो. त्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून भाजप समोर शरद पवार, ममता बॅनर्जी केवळ याच मंडळींचे आव्हान दिसून येते. यात पश्चिम बंगाल राज्य ताब्यात घेण्यात भाजप अपयशी ठरले असले तरी, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पश्चिम बंगाल मध्येच मर्यादित ठेवण्यात भाजपला यश आले आहे.

महाराष्ट्रातही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पत्ता कट केला होता. मात्र, शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी मिळाली. त्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. राष्ट्रीय पातळीवर देखील विरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याच मतदारसंघात मात देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतो.

2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी बारामती लोकसभा मतदार संघातून प्रचाराचा शुभारंभ सुप्रिया सुळे यांनी याच कन्हेरीच्या मारुती मंदिरातून केला होता.
2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी बारामती लोकसभा मतदार संघातून प्रचाराचा शुभारंभ सुप्रिया सुळे यांनी याच कन्हेरीच्या मारुती मंदिरातून केला होता.

कसा आहे बारामती मतदारसंघ

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. तर इतर दोन विधानसभा क्षेत्रावर भाजपचे आमदार आहेत. सध्या बारामती लोकसभेच्या खासदार शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या आहेत. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला आहे. तर त्याआधी 1996, 1998, 1999 आणि 2004 अशा सलग चार निवडणुकांमध्ये शरद पवार हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्या आधी देखील 1984 आणि 1991 या लोकसभा निवडणुकीत शरद पवार याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

बारामती मतदारसंघातील विधानसभेचे गणित पाहा खालील ग्राफिक्समध्ये

सुप्रिया सुळे यांचा विक्रम विजय

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून विक्रमी विजय मिळवला होता. त्या एक लाख 55 हजार 774 मताधिक्यांनी विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांना एकूण 6 लाख 86 हजार 714 मते मिळाली म्हणजेच एकूण मतदानाच्या 52.63% मतदान त्यांनी घेतले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये त्यांच्या मतदानाच्या टक्केवारीत 3.72 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या कांचन राहुल कुल यांना 5 लाख 30 हजार 914 मध्ये मिळाली. त्यांचा मतदानाचा वाटा होता 40.69 टक्के. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये त्यांच्या मतदानामध्ये देखील 40.10 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. मात्र, ही वाढ असूनही त्यांना सुप्रिया सुळे यांची बरोबरी करता आली नाही.

बारामती लोकसभा मतदार संघातून सहा वेळा लोकसभेवर गेलेल्या शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळेंसाठी हा मतदार संघ सोडला होता. त्या नंतर या मतदार संघातून सुळे सलग तीन वेळा खासदार झाल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघातून सहा वेळा लोकसभेवर गेलेल्या शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळेंसाठी हा मतदार संघ सोडला होता. त्या नंतर या मतदार संघातून सुळे सलग तीन वेळा खासदार झाल्या आहेत.

2014 च्या मोदी लाटेत सुप्रिया सुळेंची लोकप्रियता घसरली

2014 मध्ये देशात मोदी लाट दिसून आली होती. त्यामुळे देशातील सर्वच मतदारसंघात त्याचा परिणाम दिसून आला. बारामती लोकसभा मतदारसंघात देखील सुप्रिया सुळे यांच्या मतदानाच्या टक्केवारीत 17.58% ची घट नोंदवण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांना 48.88% मते मिळाली म्हणजेच 5 लाख 21 हजार 565 मते घेऊन त्या विजयी झाल्या होत्या. त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मध्ये मिळाली होती. सुप्रिया सुळे यांचा 69 हजार 719 मताधिक्याने विजयी झाला होता.

सुप्रिया सुळे यांनी पहिल्याच निवडणुकीत रचला होता विक्रम

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपचे कांता नलावडे यांचे आव्हान होते. मात्र सुप्रिया सुळे यांनी विक्रमी 3 लाख 36 हजार 831 मताधिक्याने भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 4 लाख 87 हजार 827 तर भाजपचे नलावडे यांना 1 लाख 50 हजार 996 मते मिळाली होती. म्हणजेच तब्बल 45.88% मताधिक्यांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

शरद पवार यांचं विक्रमी मताधिक्य आजही कायम

2004 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून भाजपचे पृथ्वीराज जाचक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शरद पवार यांना 6 लाख 34 हजार 555 म्हणजेच एकूण मतदानाच्या 63.8% मताधिक्य मिळाले होते. शरद पवार यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे जाचक यांना 2 लाख 11 हजार 580 मते मिळाली. म्हणजेच शरद पवार यांचा 4 लाख 22 हजार 975 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता.

शरद पवार यांना आवाहन देण्याचे कारण

राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधातील इतर सर्व पक्ष यांनी एकत्रित मूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी या आधी देखील अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यात कोणालाही फारसे यश आलेले दिसत नाही. मात्र, यावेळी शरद पवार यांनी देखील अशा पद्धतीने भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या पाठीशी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी भाजपला धोका संभवतो. त्यामुळे शरद पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्याचा डाव भाजपच्या वतीने आखण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला यशवंत सिन्हा, माजी मंत्री अरुण शौरी यांच्यासह विविध पक्षांचे 15 नेते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला यशवंत सिन्हा, माजी मंत्री अरुण शौरी यांच्यासह विविध पक्षांचे 15 नेते उपस्थित होते.

वास्तविक बारामती मतदारसंघात शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवत नाही. तर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. असे असले तरी बारामती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव हा शरद पवार यांच्या जिव्हारी लागू शकतो. या पार्श्वभूमीवर ही खेळी भाजपच्या वतीने खेळली जात आहे.

काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे प्रचारादरम्यानचे छायाचित्र.
काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे प्रचारादरम्यानचे छायाचित्र.

आधी गांधी घराने नंतर पवार भाजपच्या निशाण्यावर

काँग्रेस पक्षातील गांधी घराण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी गांधी घराण्याचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या अमेठी मतदारसंघात भाजपने 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अमेठी मतदारसंघावर सुरुवातीपासूनच गांधी घराण्याचा प्रभाव राहिला आहे. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी 1980 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर 1981 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी यांचा मोठा मुलगा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता.

त्यानंतर झालेल्या 1984, 1989 आणि 1991 या लोकसभा मतदारसंघात राजीव गांधी येथून निवडून आले होते. 1999 च्या निवडणुकीत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवून लोकसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2004 च्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून विजय मिळवला. 2004, 2009 आणि 2014 अशा सलग तीन निवडणुकीत राहुल गांधींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा याच मतदारसंघातून पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...