आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्रंथार्थ:नाटक आणि रंगभूमीच्या इतिहासाची नवमांडणी

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदार काळवणे

मराठी वाड्मयाच्या सर्व वृत्ती-प्रवृत्तींना सामावून घेणारा परिपूर्ण असा वाड्मयेतिहास आजपावेतो सिध्द झालेला नाही. जो इतिहास लिहिला गेला त्यावर अभिजनी इतिहास लेखनदृष्टीचा प्रभाव आहे. अलिकडच्या काळात असे इतिहास लेखनाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे प्रा.दत्ता भगत यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला ‘मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास’हा होय.

मराठी वाड्मयाच्या सर्व वृत्ती-प्रवृत्तींना सामावून घेणारा परिपूर्ण असा वाड्मयेतिहास आजपावेतो सिध्द झालेला नाही. जो इतिहास लिहिला गेला त्यावर अभिजनी इतिहास लेखनदृष्टीचा प्रभाव आहे. त्या प्रभावामुळे बहुजन लेखन परंपरा दुर्लक्षित राहिली. वाड्मयेतिहास लेखकांचा पक्षपातीपणा आणि सदोष विश्लेषण पध्दतीमुळेही मराठी वाड्मयेतिहास लेखन एकांगी-एकसुरी बनलेले आहेत. मराठीत इतिहास लेखनाची परंपराही फार दीर्घ नाही. ब्रिटीश उत्तरकाळापासून मराठी वाड्मयेतिहास लेखनाचे काही प्रयत्न झालेले दिसतात. त्यावरही वसाहतिक इतिहास लेखनाची छाप आहे. वाड्मयेतिहास लेखन कसे करावे, याविषयीही मराठीत वाद आहेत. त्यामुळे मराठी वाड्मयेतिहास लेखनाचे पध्दतीशास्र सैध्दांतिक पातळीवर विकसित होऊ शकलेले नाही. म्हणूनच समग्र मराठी साहित्याची एकसंधपणे समतोल दृष्टी ठेवून यथोचित नोंद घेऊ शकेल असे इतिहासग्रंथ सिध्द होऊ शकलेले नाहीत.

अलिकडच्या काळात असे इतिहास लेखनाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे प्रा.दत्ता भगत यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला ‘मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास’हा होय. ६४२ पृष्ठांच्या या ग्रंथातून आरंभापासून ते इ.स.१९९० पर्यंतच्या मराठी नाटक आणि रंगभूमीचा विवेचक आढावा घेतलेला आहे. नाटक (संहिता)आणि रंगभूमी(प्रयोग) यांच्या एकत्रित इतिहास लेखनाचा हा मराठीतील पहिलाच प्रयत्न असल्याने या ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. नाट्यसंहिता लेखक, प्रत्यक्ष प्रयोगात व अभिनय-दिग्दर्शनात सहभाग, नाटकाचे अभ्यासक आणि नाट्यशिक्षक म्हणून प्रा.दत्ता भगत गेल्या अर्धशतकापासून नाट्यव्यवहाराशी संबंधीत आहेत. त्यामुळेच या ग्रंथातील त्यांची निरीक्षणे मोलाची ठरणारी आहे.

प्रस्तुत ग्रंथाची मांडणी सर्वस्वी नव्या संशोधनावर अाधारित नसली तरी उपलब्ध माहिती आणि नव्या संदर्भांच्या संयोजनातून समग्र मराठी नाट्यव्यवहार कवेत घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या लेखनातून झालेला आहे. सम्यक दृष्टी ठेवून ऐतिहासिक संदर्भांची फेरतपासणी करत केलेली मूल्यमापनात्मक मांडणी हाही या इतिहासलेखनाचा मूलभूत विशेष आहे. नाट्यनिर्मिती-नाट्यचळवळ

ही सामाजिक-सांस्कृतिक घटितांच्या पार्श्वभूमीवर आकारला येत असते,ही दृष्टी या संबंध इतिहास लेखनात प्रा.भगत यांनी स्वीकारलेली दिसते. घटना,माहिती आणि संदर्भांच्या नोंदी म्हणजे इतिहास नसतो. तर त्यापाठीमागील प्रेरणा आणि कार्यकारणभावाचा शोधही महत्त्वाचा असतो. असा शोध घेत प्रा.भगत यांनी या इतिहासाची मांडणी केलेली आहे.प्रामुख्याने पदवी-पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी आणि नाट्यव्यवहाराचे अभ्यासक डोळ्यासमोर ठेवून हा इतिहास लिहिला असल्याने त्याची भाषा आणि विवेचन पध्दती अधिक सुबोध ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. हा ग्रंथ संशोधकांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे.त्याला संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. प्रा.भगत यांची स्वतंत्र इतिहास लेखन दृष्टी आहे.तिचा प्रत्यय सदर ग्रंथातून येतो. ती दृष्टी नरहर कुरुंदकर आणि वा.ल.कुलकर्णी संस्कारित आहे. मराठी नाटक आणि रंगभूमीच्या इतिहासाची मांडणी करताना प्रा.भगत यांनी ग्रंथाची विभागणी चार खंडात (प्रकरणात) केलेली आहे. हेच खंड सदरील इतिहासाचे कालखंड मानलेले आहेत. पूर्वसूरींनी केलेल्या कालखंडाच्या प्रचलित रचनेचीही काहीअंशी पुनर्मांडणी त्यांनी समर्पक कारणमीमांसेसह केलेली आहे. खंड एक-प्रारंभपर्व (इ.स.१८०० ते इ.स.१८८०), खंड दोन- वैभवपर्व(इ.स.१८८० ते इ.स.१९२०),खंड तीन-आव्हानपर्व(इ.स.१९२०ते इ.स.१९५०) आणि खंड चार-विकासपर्व (इ.स.१९५०ते इ.स.१९९०) अशी प्रस्तुत इतिहास मांडणीतील खंड रचना आहे. ती आवश्यक विश्लेषणासह प्रा.भगत यांनी सिध्द केलेली आहे. या इतिहास लेखनात त्यांनी केलेली कालसीमांची रचना सर्वस्वीकार्य अशीच आहे. मराठी नाट्येतिहास परंपरेची ही चौखंडात्मक कालिक विभागणी अधिक यथोचित आणि वास्तवाला धरून आहे, म्हणूनच ती महत्त्वाची आहे. आरंभापासून ते इ.स.१९९० पर्यंतच्या सर्व नाट्यप्रवाहांचा समावेश या इतिहासग्रंथात झालेला आहे. मराठी रंगभूमीचा उदय प्रा.भगत यांनी मागील दोन हजार वर्षातील लोकरंगभूमीत शोधला आहे. यानिमित्ताने जागतिक आणि संस्कृत रंगभूमीचाही आढावा घेतलेला आहे.गोंधळ, जागर, जातककथा,तमाशा,लळीत,फार्स, जलसा, वगनाट्य,नाट्यछटा,बाॅक्स थिएटर,नाट्यसंहिता, सादरीकरण, नेमथ्य, प्रकाशयोजना, संगीत,नाट्यसंगीत, लेखक, दिग्दर्शक, नट,प्रेक्षक आदी घटक या इतिहासाच्या कक्षेत आलेले आहेत. तागडथोम, रूपकात्मक, भाषांतरित,सामाजिक, ऐतिहासिक, व्यावसायिक, प्रायोगिक आणि जातजाणिवेचे नाटके असे विविध नाट्यप्रवाह या इतिहासात सामावलेले आहेत. अनेक नाटककार,नाट्यसंस्था, नाट्यसंहिता यांचे समर्पक मूल्यमापन आणि उपेक्षित नाटककारांचे स्थान नव्यानेच या इतिहासाने अधोरेखित केले आहे. कामगार रंगभूमी आणि बालरंगभूमीचा अंतर्भाव करत त्याचा इतिहास या ग्रंथातून प्रथमच समग्रपणाने सिध्द होतोय. मराठीतील पहिल्या आधुनिक नाटकासंबंधीची चर्चा सहा नाटकांच्या आधारे त्यांनी केलेली आहे. सहा नाटकांचे "पहिलेपण’ नेमकेपणाने विशद करत पहिलेपणाचा वादही प्रा.भगत यांनी निकाली काढला आहे. पहिलेपणसंबंधीची त्यांनी केलेली मांडणी वस्तुस्थितीला धरून आहे.म्हणून ती सर्वमान्य होण्याची शक्यता आहे. दोन शतकातील सर्व नाट्यप्रवाहांचा अंतर्भाव, प्रचलित कालखंडाची पुनर्मांडणी आणि कालखंड शीर्षकाचे आशयसूचक नवे नामकरण यामुळेही हा ग्रंथ वेगळा ठरतो.पूर्व इतिहासग्रंथापेक्षा अद्यावत इतिहास या ग्रंथात उपलब्ध झालेला आहे. विष्णुदास भावे हे व्यावसायिक रंगभूमीचे

उद्गगाते; परंतु महात्मा जोतीराव फुले हे आद्य आधुनिक नाटककार आहेत. जीवनदर्शन आणि आजच्या आधुनिक रंगभूमीचे आशयात्मक वेगळेपण म.फुले यांच्यापासून सुरू होते, ही प्रा.भगत यांची या इतिहासातून ध्वनित झालेली भूमिकाही या इतिहासाला वेगळेपण प्राप्त करून देते. जातजाणीवेची नाटके या शीर्षकाखाली प्रथमच नवी मांडणी येथे करण्यात आली आहे. "विजय तेंडुलकर: युगधर्माचे लेखक’याप्रकारे नाटककारांच्या योगदानाचे प्रवृत्तीसूचक शीर्षकातून वेगळेपणाचे अधोरेखन केले आहे. प्रयोगाच्या दृष्टीने येणाऱ्या तांत्रिक बाजूंचा वेगळा आढावा घेतला आहे. नाट्यस्पर्धा आणि एकांकिका स्पर्धांचे योगदान विशद केले आहे. आपली भूमिका विशद करत नाट्यसंहितांची तटस्थपणे समीक्षा केली आहे. प्रत्येक खंडाच्या शेवटी परिशिष्टात त्या-त्या कालखंडातील नाटकांची कालानुक्रमे यादी दिलेली आहे. हेही या इतिहासग्रंथाचे निराळेपण आहे.याशिवाय परिशिष्टात त्या-त्या खंडाच्या शेवटी आवश्यक संदर्भसूची जोडलेली आहे. त्यामुळे या ग्रंथाला संदर्भता प्राप्त झालेली आहे.प्रस्तुत इतिहासलेखनाला वैचारिकता आणि वक्तृत्त्वशीलतेचा स्पर्श झाल्याने ग्रंथ वाचनीय झालेला आहे. प्रा.दत्ता भगत हे फुले-आंबेडकरी विचारधारेचे लेखक असले तरी त्यांच्या विचारधारेचे पडसाद या इतिहास लेखनावर पडलेले नाहीत. ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या परिप्रेक्षात त्यांनी समतोल इतिहास मांडणी केलेली दिसते. त्यामुळेच हा इतिहास मराठी नाटक आणि रंगभूमीच्या सर्वधारांना सामावून घेऊ शकलेला आहे. ऐतिहासिक अन्वयार्थाची अनेक निरिक्षणे या ग्रंथातून व्यक्त झाली आहे. ही निरिक्षणे गेल्या दोन शतकातील एकूणच मराठी समाज,संस्कृती,साहित्य आणि नाटक याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी आहे. ही निरिक्षणे वाचकांच्या आकलनाला दुरूस्त करणारी आणि नव्या संशोधकांना विषय पुरवणारी आहे. मराठीतील सांस्कृतिक इतिहास ग्रंथात प्रस्तुत ग्रंथाचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे.तरीही या ग्रंथाच्या मर्यादाही लक्षात घेणे गरजेचे आहे. दोनशे वर्षातील मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास हा केवळ ६४२ पृष्ठांत बसवल्याने इतिहासाचे संक्षेपीकरण येथे झालेले दिसते.त्याचा अधिक विस्तार होण्याची अवश्यकता होती.कदाचित महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा हा प्रकल्प असल्याने ही मर्यादा या ग्रंथाला पडलेली आसावी. या इतिहासाने सर्व नाट्यप्रवाहांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी स्री नाटककारांची वेगळी नोंद या इतिहासात अपेक्षित होती.पण येथे अशी वेगळी नोंद घेतलेली दिसत नाही. तांत्रिकदृष्टीनेही काही दोष या ग्रंथात राहिलेले आहेत.ग थाची मांडणी नेटकी झालेली नाही.ग्रंथाच्या प्रारंभी सामायिक अणुक्रमाणिका असायला हवी होती;पण ती दिलेली नाही.लेखनविषयक दोष आणि मुद्रणदोषही राहिलेले आहेत. या मर्यादा लक्षात घेऊनही या ग्रंथाचे महत्त्व अबाधित राहते.वाड्मयेतिहासलेखनाचा एक नवा आदर्श या ग्रंथाने प्रस्थापित केलेला आहे.या ग्रंथासंबंधी बाबा भांड म्हणतात,“अभिरुचीचे भिन्न भिन्न स्तर, लेखनप्रकारातली विविधता आणि दोनशे वर्षातील नाट्यवाड्मयाची विकसनशीलता या तिन्ही घटकांचा समन्वय करीत नाट्यवाड्मयाचे इतिहासलेखन करण्याचा हा एकल प्रयत्न आहे. या दृष्टीनेही या लेखनाचे वेगळे महत्त्व आहे. दत्ता भगत हे साक्षेपी अभ्यासक असल्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रवाहाचे विवेचन करताना हेतुत:एकांगी भूमिका घेतली नाही. पूर्वग्रहाने हे लेखन सदोष नाही.” यादृष्टीने या ग्रंथाचे ऐतिहासिकत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे.मराठी नाटक आणि रंगभूमीच्या

इतिहासाची नवमांडणी-पुनर्मांडणी करण्याचा मूलभूत प्रयत्न या ग्रंथाने केलेला आहे.मराठी‘नाटक आणि रंगभूमी’ समग्रपणाने समजून घेण्याच्यादृष्टीने प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे.

Kedar.kalwane.28@gmail.com संपर्क - ७०२०६३४५०२