आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Abhinandan Varthaman Pakistan Story; Balakot Air Strike | Indian Air Force | Wing Commander Abhinandan

अभिनंदन यांची पाकमधील 60 तासांची कहाणी:पिस्तूल काढले, कागद गिळत म्हणाले ‘जय हिंद’; अणुयुद्धाच्या सावटात देशात परतला शूर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पंतप्रधान इम्रान खान यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आले. त्यांचे पाय थरथर कापत होते, कपाळाला घाम आला होता. आम्हाला शाह मेहमूद साहब (तत्कालीन पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री) यांनी सांगितले की, देवाची शपथ आहे, यांना परत जाऊ द्या, कारण भारत रात्री 9 वाजता आपल्यावर हल्ला करणार आहे.'

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे खासदार अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या संसदेत ही माहिती दिली होती. ज्या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या थरकापाचा उल्लेख अयाज सादिक करत होते ती बैठक विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेशी संबंधित होती. बालाकोट हल्ल्यानंतर आपले विंग कमांडर अभिनंदन डॉग फाईट म्हणजेच लढाऊ विमानांच्या युद्धादरम्यान चुकून पाकिस्तानात घुसले होते. मात्र, पाकिस्तानने 60 तासांच्या आत त्यांची सुटका केली.

विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्या मिग-21 विमानाने पाकिस्तानचे F-16 विमान पाडले होते.

चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 1 मार्च 2019 रोजी अभिनंदन पाकिस्तानमध्ये 60 तास कैदेत राहिल्यानंतर भारतात आले होते. चला जाणून घेऊया त्या 60 तासांची कहाणी काय आहे आणि पाकिस्तान त्यांना इतक्या लवकर सोडण्यास कसा राजी झाला होता?

27 फेब्रुवारी 2019 ची गोष्ट आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दल सतर्क होते. हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर पाकिस्तानी विमानांवर नजर ठेवण्याची जबाबदारी होती. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमाने काश्मीरमध्ये घुसखोरी करतील, अशी माहिती समोर आली होती.

ही गोष्ट खरी ठरली आणि सकाळी दहा वाजता पाकिस्तानची दहा F-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली. यानंतर भारतीय हवाई दलाने पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देत F-16 निशाण्यावर घेतले. भारताचे प्रत्युत्तर पाहून पाकिस्तानी हवाई दलाची नऊ F-16 विमाने परतली.

एक F-16 हे विमान भारतीय हद्दीत खूप खालून उडत होते. त्याने भारताचे तेल डेपो, लष्करी दारूगोळ्याचा एक पॉइंट आणि लष्करी ब्रिगेडचे मुख्यालय यांना लक्ष्य केले.

भारताचे सुखोई SU-30 आणि मिग-21 पाकिस्तानी जेट F-16 ला भिडले. याला हवाई दलाच्या भाषेत डॉग फाईट म्हणतात. दोन भारतीय विमानांनी F-16 ला आपल्या जाळ्यात अडकवले. मिग-21 पुढे उड्डाण करत होते. मध्ये F-16 होते आणि सुखोई त्याचा पाठलाग करत होते. गोळीबार सुरू होता. त्यानंतर F-16 ने दोघांमधून निसटण्याचा प्रयत्न केला. याला विंग ओव्हर म्हटले जाते.

डॉग फाईट दरम्यान दोन लढाऊ विमाने. प्रतीकात्मक फोटो.
डॉग फाईट दरम्यान दोन लढाऊ विमाने. प्रतीकात्मक फोटो.

आता सुखोईने F-16 चा पाठलाग थांबवला आणि ऑईल फील्ड वाचवण्यासाठी त्यावरून उड्डाण करायला सुरुवात केली. मिग-21 मध्ये बसून विंग कमांडर अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग सुरूच ठेवला. F-16 भारतीय सीमेच्या बाहेर गेले होते. त्यानंतर मिग-21 ने F-16 वर R-73 क्षेपणास्त्र डागले.

10:08 वाजता विंग कमांडर अभिनंदन यांचे R-73 क्षेपणास्त्र थेट F-16 जेटला धडकले. यावेळी अभिनंदन अतिशय धोकादायक कलाबाजी करत होते, ज्याला हाय-जी-बॅरल रोल म्हणतात. यादरम्यान तेही पाकिस्तानच्या भागात आले होते आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनले होते.

मिग-21 क्रॅश होत असताना अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडले. पॅराशूटने ते उतरले तेव्हा ते पाकव्याप्त काश्मीरमधील होरान गावात होते. येथे स्थानिक लोकांनी त्यांना प्रथम हा भारत असल्याचे सांगितले आणि नंतर फसवणूकीने पकडले. अभिनंदन यांना बेदम मारहाणीचा आणि नदीत घेरल्याचा व्हिडिओही समोर आला होता.

अभिनंदन यांच्यासोबत पाकिस्तानात काय झाले, ते नंतर समजून घेऊ, आधी पाहू या डॉग फाईटची वेळ का आली होती.

हे सर्व का घडले?

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. आपले 40 हून अधिक जवान शहीद झाले. भारतीय वायुदलाच्या वीरांनी दोन आठवड्यांतच 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले. ऑपरेशन बंदर नावाच्या या लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावरील सुमारे 200 दहशतवादी मारले गेले.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच काढलेले छायाचित्र. ANI
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच काढलेले छायाचित्र. ANI

यामुळे पाकिस्तान चिडला होता. अशा स्थितीत 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत घुसली.

अभिनंदन यांनी हायटेक F-16 विमान कसे पाडले?

अभिनंदन यांनी अमेरिकेचे आधुनिक हायटेक F-16 विमान साठच्या दशकातील मिग-21 च्या सहाय्याने पाडले. या गोष्टीची जगभर चर्चा झाली. खरे तर मिग-21 हे सोव्हिएत युनियनच्या काळातील आहे, तर एफ-16 फायटर जेट जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमान म्हटले जाते. याच कारणामुळे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये या दोन विमानांची तुलना मर्सिडीज आणि मारुती 800 शी करण्यात आली होती.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार या दोन विमानांची लढत 90 सेकंदांची होती.

ते 90 सेकंद कसे होते?

बालाकोट हल्ल्यानंतर सीमेवर तणाव निर्माण झाला होता. पहाट उजाडण्यापूर्वीच काश्मीरमधील भारत-पाक सीमेवर 12 पाकिस्तानी लढाऊ विमाने दिसली. यामध्ये अमेरिकन एफ-16, फ्रान्सचे मिराज आणि जेएफ-17 या लढाऊ विमानांचा समावेश होता. ही विमाने नियंत्रण रेषेवर (एलओसी) होती, पण भारताची हवाई संरक्षण यंत्रणा हाय अलर्टवर असल्याची त्यांना कल्पना नव्हती. भारताच्या एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टमने (AWAC) त्या विमानांची माहिती दिली.

यानंतर, आपल्या विमानांनी भारतातील अवंतीपोरा, श्रीनगर आणि जवळपासच्या एअरफील्डवरून उड्डाण केले. यादरम्यान आपले मिग-21 हे पाकिस्तानी लष्कराच्या 12 विमानांच्या सर्वात जवळ होते. तिथूनच 90 सेकंदांची कहाणी सुरू झाली. मिग-21 पाहताच पाकिस्तानी विमानातून अमराम क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

ही क्षेपणास्त्रे F-16 विमानातूनच डागली जातात. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पत्रकार परिषदेत या क्षेपणास्त्रांचे भागही दाखवले.

हवाई दलाचे अधिकारी भारताने पाडलेल्या F-16 चे काही भाग दाखवताना.
हवाई दलाचे अधिकारी भारताने पाडलेल्या F-16 चे काही भाग दाखवताना.

हे सगळे हवेतच होत होते. तेव्हा पाकिस्तानचे F-16 विमान 9000 फूट उंचीवर होते आणि आपले मिग-21 15,000 फूट उंचीवर होते. भारताच्या बाजूकडून विमानाने बाजूने लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त F-16 वरच्या दिशेने जाऊ लागले. काही सेकंदात F-16 आपपल्या मिग-21 च्या सुमारे 10,000 फूट वर पोहोचले.

रिपोर्ट सूचित करतात की ही सर्वात आव्हानात्मक वेळ होती. या दरम्यान एक चुकीचा निर्णय संपूर्ण बाजी पलटू शकत होता. F-16 आपल्या वर पाहून मिग-21 ने 60 अंशाच्या कोनातून गोळीबार करण्याची तयारी केली. F-16 पायलटला काही समजेल तोपर्यंत मिग-21 वरून सोडलेल्या Vympel R-73 या रशियन क्षेपणास्त्राने त्यांच्या विमानाला लक्ष्य केले, पण तोपर्यंत मिग-21 हे दुसऱ्या F-16 चे लक्ष्य बनले. एक क्षेपणास्त्र डागल्यानंतर मिग-21 शी संपर्क झाला नाही.

अभिनंदन यांच्या मिग-21 चा एक भाग.
अभिनंदन यांच्या मिग-21 चा एक भाग.

मिग-21 ची रेंज फक्त 1210 किमी आहे तर एफ-16 ची रेंज 4220 किमी आहे. F-16 विमान हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि हवेतून जहाजावर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच विविध प्रकारच्या वारहेड्सने सज्ज असतात. यात रडार ऑन-बोर्ड देखील असतो. मिग-21 निश्चितपणे अपग्रेड केले गेले होते, परंतु त्याची रचना अद्याप जुनी होती. मिग-21 सर्व बाबतीत F-16 च्या मागे असल्याचे सिद्ध होऊ शकत होते.

अभिनंदन यांच्या मिग-21 विमानाचा क्रॅश झालेला भाग.
अभिनंदन यांच्या मिग-21 विमानाचा क्रॅश झालेला भाग.

F-16 विमान मिग-21 ने पाडले असे आजपर्यंत घडले नाही असे म्हटले जात होते, पण शूर विंग कमांडर अभिनंदन यांनी ते केले. यानंतर अभिनंदन पॅराशूटने खाली उतरले तेव्हा ते पीओकेमध्ये होते.

अभिनंदन यांना प्रथम कोणी पाहिले?

मिग-21 चे सुमारे 15,000 फूट उंचीवर नुकसान झाल्यानंतर अभिनंदन पॅराशूटने खाली उतरले. ते जिथे उतरले ते होरान गाव होते. हे गाव पाकव्याप्त काश्मीरमधील भिंबर जिल्ह्यात येते. येथून पुढे असलेल्या हुंडा गावचे सरपंच मोहम्मद रजाक यांना प्रथम विमाने धडकल्याचा आणि नंतर पडल्याचा आवाज आला. बीबीसीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'मी बाजेवर बसलो होतो आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होतो. मग मला आवाज आला आणि मग आकाशात काळा धूर दिसला. थोड्या वेळाने नारंगी रंगाच्या ज्वाला आकाशात उठल्या आणि आमच्या दिशेने येऊ लागल्या. आम्हाला कल्पना आली की ते विमान आहे.'

त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत ढिगारा पडल्याचे रज्जाक सांगतात. ते म्हणतात, 'आम्ही अजूनही ते भारतीय विमान आहे की पाकिस्तानी हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तोपर्यंत थोड्या अंतरावर हवेत पॅराशूट दिसले. मी माझा शेजारी अब्दुल रहमानला हाक मारली आणि आम्ही पॅराशूटच्या दिशेने निघालो.'

हा पाण्याचा तोच झरा आहे जिथे अभिनंदन यांना गर्दीने घेरले होते.
हा पाण्याचा तोच झरा आहे जिथे अभिनंदन यांना गर्दीने घेरले होते.

अब्दुल रहमान हे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सदस्य आहेत. अब्दुल म्हणतात, 'मला वाटलं की हा पाकिस्तानी सैनिक असू शकतो, म्हणून मी एका मगमध्ये पाणी घेऊन त्या दिशेने धावलो. त्याच्या अंगावर पॅराशूट होते आणि तो झाडाला टेकून बसला होता.' अब्दुल रहमान सांगतात की, अभिनंदनने हे कोणते ठिकाण आहे असे विचारले असता त्यांनी हिंदुस्थान सांगितले. ते म्हणतात, 'त्याने पिस्तूल काढली आणि जमिनीवर टेकून बसला. थोड्यावेळाने 'जय हिंद' असा नारा दिला आणि मग पिस्तुल आत करत दोन्ही हात हवेत उंचावून 'काली माता की जय' असा जयघोष केला.'

यानंतर अभिनंदन यांनी अब्दुल रहमानकडे पाणी मागितले आणि पाठीवर झालेल्या दुखापतीचा उल्लेख केला. दरम्यान, स्थानिक नागरिक तेथे जमा झाले होते. अभिनंदनच्या गणवेशावरून त्यांना ओळखल्यानंतर अचानक गर्दीतून कोणीतरी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

हे ऐकून अभिनंदन सावध झाले आणि हाताचा आधार घेत उभे राहिले. एका हातात पिस्तूल घेऊन त्यांच्यासमोर रोखली. यानंतर खिशात हात घालून एक कागद काढला आणि तो गोल करून गिळला.

अभिनंदन यांनी दुसरा कागद काढला. तो जरा मोठा होता त्यामुळे ते गिळू शकत नव्हते. त्यांनी बंदूक रोखली आणि तो कागद फाडून तो फेकायला सुरूवात केली.

अभिनंदन यांचे पिस्तूल आणि त्यांच्याकडे सापडलेला नकाशा. फोटो- ISPR
अभिनंदन यांचे पिस्तूल आणि त्यांच्याकडे सापडलेला नकाशा. फोटो- ISPR

रहमान म्हणतात, 'आम्ही सर्वजण त्याच्या मागे धावलो, पण त्याच्याकडे पिस्तूल होते. माझ्यासोबत गावातील काही लोकही त्याच्या मागे लागले.'

अब्दुल रहमानच्या म्हणण्यानुसार अभिनंदन विमानाच्या ढिगाऱ्याच्या दिशेने धावले, पण गावकऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. अभिनंदन पाण्याच्या झऱ्याकडे धावले आणि त्यात उडी मारली. पाणी कमी होते त्यामुळे ते थांबून पाणी पिऊ लागले. अब्दुल रहमान सांगतात, 'पळताना पाहून मी माझा शेजारी मोहम्मद रफीकला आवाज दिला आणि बंदूक आणण्यास सांगितले.'

अभिनंदन यांच्याकडे आणखी काही कागदपत्रे सापडली जी पाकिस्तानी लष्कराने जारी केली होती.
अभिनंदन यांच्याकडे आणखी काही कागदपत्रे सापडली जी पाकिस्तानी लष्कराने जारी केली होती.

इकडे अभिनंदन यांना तलावात गावकऱ्यांनी घेराव घातला. अभिनंदन यांना गावकऱ्यांनी घेरल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात काही पाकिस्तानी मुले अभिनंदन यांना मारहाण करत होते आणि पाकिस्तान आर्मी झिंदाबादच्या घोषणा देत होते. काही वेळातच पाकिस्तानी सैन्य तेथे पोहोचले. गोळीबार करत ते पाण्यात गेले आणि अभिनंदन यांना सोडवले.

यावेळी गाव प्रमुख रफिक उपस्थित होते. ते म्हणतात, 'अभिनंदनने आपले पिस्तूल फेकून दिले आणि सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. सैनिकांनी त्यांना त्यांच्या गाडीत बसवले आणि सोबत नेले.'

पाकिस्तानी सैनिकांसह जखमी अभिनंदन
पाकिस्तानी सैनिकांसह जखमी अभिनंदन

घटनेनंतर काही तासांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना आणि देशाला सांगितले की, पाकिस्तानने भारतीय जवानांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे सैन्य तयार होते, त्यामुळे प्रयत्न फसला.

त्यांनी सांगितले की आमच्या एरियल एंगेजमेंटमध्ये मिग-21 ने पाकिस्तानी विमान पाडले आणि पाकिस्तानात त्यांचे पडणारे विमानही लष्कराच्या जवानांनी पाहिले. ते म्हणाले की दुर्दैवाने यात आपले मिग विमान क्रॅश झाले आणि पायलट 'मिसिंग इन अॅक्शन' आहे, पाकिस्तानने आपले पायलट ताब्यात असल्याचा दावा केला आहे आणि आम्ही त्यांच्या दाव्याची पडताळणी करत आहोत.

दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई दलाने अभिनंदन यांचा एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. थोड्याच वेळात तो डिलीट करण्यात आला.

संध्याकाळपर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आणखी एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली. त्यात मंत्रालयाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या भारतात प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा हवाला देत अभिनंदन यांच्या सुरक्षेबाबतही कठोर शब्दांत बजावले. भारताने पाकिस्तानला म्हटले की, अभिनंदन यांची सुरक्षित माघार सुनिश्चित केली जावी आणि त्यांना कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जावी.

या प्रेस रिलीजनंतर लगेचच, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी संध्याकाळी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात फक्त एक भारतीय पायलट आहे आणि त्यांच्याशी लष्कराच्या आचारसंहितेनुसार वर्तणूक केली जात आहेत.

अणुयुद्धाची वेळ आली होती का?

गेल्या महिन्यापासून 'नेव्हर गिव्ह अॅन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पुस्तक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील परराष्ट्र मंत्री असलेल्या माईक पॉम्पेओ यांनी लिहिले आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की, फेब्रुवारी 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होण्याची वेळ आली होती.

'नेव्हर गिव्ह अॅन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकात इतर अनेक भारतीय नेत्यांवरही भाष्य करण्यात आले आहे.
'नेव्हर गिव्ह अॅन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकात इतर अनेक भारतीय नेत्यांवरही भाष्य करण्यात आले आहे.

पॉम्पेओ लिहितात, ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही. माझी उत्तर कोरियाशी चर्चा सुरू होती आणि काश्मीर सीमेवर भारत-पाकिस्तानने एकमेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली होती.

त्यांनी लिहिले की त्या रात्री त्यांना भारतातील त्यांच्या समकक्षांचा फोन आला. फोनच्या दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात आले की, 'पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याची तयारी केली असून भारतही तयारी सुरू करण्याचा विचार करत आहे. मी त्यांना थांबवून थोडा वेळ मागितला.'

त्यानंतर पॉम्पेओ यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी चर्चा केली आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्यांनी लिहिले, 'भारताकडून फोन केल्यानंतर मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांच्याशी बोललो आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. ते म्हणाले की, असे नाही, पण भारत अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असे आम्हाला वाटत आहे. कोणताही देश अण्वस्त्र युद्धाची तयारी करत नाही याची खात्री त्यांना पटवून देण्यात आम्हाला काही वेळातच यश आले.'

अभिनंदन यांना कसे सोडले गेले?

28 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेची संयुक्त बैठक बोलावली होती. ज्यामध्ये पाकिस्तान सरकार अभिनंदन यांना सोडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. इम्रान खान यांनी या रिलीजला 'जेस्चर ऑफ पीस' म्हटले होते.

यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही मीडियाला सांगितले की, त्यांच्या सरकारने शांततेच्या इच्छेने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केली आहे.

अनेक प्रसारमाध्यमांच्या अहवालात म्हटले आहे आहे की, अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर अमेरिका, चीनसह अनेक मोठ्या देशांचा दबाव होता.

यानंतर, 1 मार्चच्या पहाटे अभिनंदन यांना वाघा-अटारी सीमेवर आदराने आणण्यात आले. तेथून लष्कराचे अधिकारी त्यांना प्रथम अमृतसरला घेऊन गेले. त्याच दिवशी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला नेण्यात आले. तेथे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अभिनंदन यांच्या डोळ्यांवर जखम झाली होती आणि एका हाडालाही जखम झाली होती. मात्र त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती.

पाकिस्तानमध्ये त्यांच्या सैनिकांमधील अभिनंदन यांच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट.
पाकिस्तानमध्ये त्यांच्या सैनिकांमधील अभिनंदन यांच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट.

दरम्यान, पाकिस्तानने युद्धादरम्यान F-16 चा वापर केला नसल्याचे सातत्याने सांगितले. अमेरिकेने पाकिस्तानला हे विमान केवळ संरक्षणासाठी वापरायचे आहे, हल्ल्यासाठी नाही या अटीवर दिले आहे.

यानंतर, 2 मार्च रोजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी F-16 आणि भारतीय मिग-21 यांच्यातील हवाई चकमकीची कागदपत्रे आणि छायाचित्रे दाखवली. पाकिस्तानने वापरलेले AIM-120 AMRAAM क्षेपणास्त्र फक्त पाकिस्तानच वापरत असल्याचेही स्पष्ट केले. भारतीय हवाई दलाने इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे हे स्पष्ट केले की पाकिस्तानने F-16 चा वापर केला होता.

अभिनंदन कोण आहेत?

अभिनंदन वर्धमान हे तमिळनाडूतील कांचीपुरमचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील निवृत्त एअर मार्शल आणि आई डॉक्टर आहे. अभिनंदन एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 2004 मध्ये फ्लाइंग ऑफिसर बनले. ते यापूर्वी सुखोई-30 स्क्वाड्रनचे पायलट होते. त्यानंतर त्यांना मिग-21 स्क्वाड्रनमध्ये सामील करण्यात आले. अभिनंदन पाकिस्तानातून परतल्यावर त्यांना बढती देऊन ग्रुप कॅप्टन बनवण्यात आले. अभिनंदन यांना नोव्हेंबर 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर चक्र प्रदान केले होते.

अभिनंदन यांचा वीर चक्रने सन्मान करताना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद.
अभिनंदन यांचा वीर चक्रने सन्मान करताना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

दिव्य मराठी ओरिजनलमधील या बातम्याही वाचा...

कांद्याचा नेमका काय आहे वांदा?:इथे शेतकऱ्यांना तर विदेशात ग्राहकांना रडवतोय; सत्ताधारी-विरोधकांचीही कांद्यावरून रडारड

ना डॉक्टर, ना प्रसूतीगृह; हा भारत नाही अमेरिका आहे:US चा ग्रामीण भाग अडचणीत, तोट्यातील रुग्णालये प्रसूती वॉर्ड बंद करत आहेत