आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ बंद, लपून ऑनलाईन वर्ग घेताहेत शिक्षक:अफगाणी मुली म्हणाल्या- तालिबानने आम्हाला एकच काम ठेवले- मुले जन्माला घाला अन् वाढवा

लेखक: पूनम कौशलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'माझे नाव ईरम आहे. मी अफगाणिस्तानात राहते. पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारतातून अफगाणिस्तानात परतले तेव्हा तालिबानचे सरकार आले होते. मुलींचा हक्क हिरावून घेणार नाही असे ते सांगत होते, पण ते सर्व खोटे होते. आमचे विद्यापीठ बंद झाले. आम्ही उद्यानात जाऊ शकत नाही. बाजारात जाता येत नाही. इथे सर्व रस्ते आमच्यासाठी बंद आहेत.

तालिबान सरकारच्या एका निर्णयामुळे ईरमसारख्या हजारो मुलींचे शिक्षण थांबले आहे. 21 डिसेंबर 2022 रोजी सरकारने मुलींना विद्यापीठात जाण्यास बंदी घातली होती. उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी यासाठी सर्व खाजगी आणि सरकारी विद्यापीठांना पत्र लिहिले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मुली ड्रेस कोडचे पालन करत नाही. त्या असे कपडे घालत आहेत जणू त्या लग्नाला जात आहेत.

21 डिसेंबर रोजी सरकारचा आदेश आल्यानंतर काबूल विद्यापीठात मुलींना प्रवेश बंद करण्यात आला. शिक्षणासाठी आलेल्या मुलींना गेटवरूनच परतावे लागले.
21 डिसेंबर रोजी सरकारचा आदेश आल्यानंतर काबूल विद्यापीठात मुलींना प्रवेश बंद करण्यात आला. शिक्षणासाठी आलेल्या मुलींना गेटवरूनच परतावे लागले.

ईरमप्रमाणेच शादलीन नूरझईचेही शिक्षण सुटले. शादलीन म्हणते की कुराणमध्ये लिहिले आहे की– शिका, पण तालिबान आम्हाला थांबवत आहेत. त्यांना माहित आहे की आम्ही शिकलो तर आम्ही त्यांना विचारू की देशात भांडणे का होत आहेत? मुलींनी फक्त मुलांना जन्म द्यावा आणि त्यांचे संगोपन करावे अशी तालिबानची इच्छा आहे.

व्हॉट्सअॅपवर शिकवायला सुरुवात केली, प्रोफाईलला फोटो न ठेवण्याच्या सूचना दिल्या

मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी अफगाणिस्तानातील कार्यकर्ते आणि शिक्षक नवीन मार्ग काढत आहेत. काबुल युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक हसिबुल्ला तरिन यांनी मुलींसाठी ऑनलाइन क्लास सुरू केला आहे. ते व्हॉट्सअॅप क्लासच्या माध्यमातूनही शिकवत आहे.

तरीन सांगतात की, मुलींची सुरक्षा हा मोठा मुद्दा आहे. म्हणूनच आम्ही व्हॉट्सअॅपवर प्रत्येक मुलीचे नाव आणि आडनाव बदलले आहे. आम्ही त्यांची ओळख लपवत आहोत. त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर फोटो न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मुलीही सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक मार्गाचा अवलंब करत आहेत.

'तालिबान अधिक कट्टरवादी विचारसरणीसह परतले'

ईरमसारख्या मुलींना दुःख आहे की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवले, परंतु तालिबान सरकार त्यांना याचा वापरू देत नाही. ईरम म्हणते- मी विचार केला होता की, मी शिक्षण घेऊन नोकरी करेन आणि कुटुंबाला मदत करेन. आता हा मार्ग माझ्यासाठी बंद झाला आहे.

ईरम म्हणते की तालिबानच्या निर्णयावरून दिसत आहे की ते पूर्वीपेक्षा जास्त कट्टरवादी विचारसरणीसह परतले आहेत. आमच्या देशात मुलींना एकटे सोडले आहे.

ऑनलाइन वर्ग हाच शिक्षणाचा एकमेव मार्ग

शादलीन नूरझई ही कायदा आणि राजकारणाची विद्यार्थिनी आहे. ती प्रा. हसीबुल्ला तरीन यांच्या क्लासमध्ये शिकत आहे. काबूलमधील एका खासगी विद्यापीठातून तिसऱ्या सत्रात शिकणारी शादलीन म्हणते- 'तालिबानच्या निर्णयानंतर आमचे आयुष्य अधांतरी आहे. ऑनलाइन वर्ग हा शिक्षण सुरू ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. प्रा. हसिबुल्ला तरीन हे राज्यशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांचा वर्ग माझ्यासाठी शिक्षण चालू ठेवण्याची चांगली संधी आहे.'

शादलीन ऑनलाइन क्लासेसमध्ये पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन, ह्युमन राइट्स आणि इंग्रजीचे शिक्षण घेत आहे. ती म्हणते- 'अफगाणिस्तान नेहमीपासूनच युद्धाचा फटका सहन करत आला आहे. युद्धातून बाहेर पडण्यासाठी लोकांकडे माहिती असणे आवश्यक आहे. शांतता आणि संघर्ष निराकरणाचा अभ्यास करताना, आम्ही संघर्ष आणि युद्धाची कारणे समजून घेतो आणि ते संपवण्याचा विचार करू लागतो.

कुराणच्या एका आयतमध्ये आहे - इकरा म्हणजेच शिका. माझ्यासाठी, माझ्यासारख्या मुलींसाठी आणि प्रत्येकासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षण घेण्याची गरज नाही असे कोणी म्हणत नाही. मात्र तालिबान आमचे शिक्षण थांबवत आहे. माझ्या घरात कोणी शिकलेले नाही, त्यामुळे मुलीला शिक्षण देणे गरजेचे आहे, असे कुटुंबीयांना वाटले. मला विद्यापीठापर्यंत पोहोचवण्यासाठी कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला.

अफगाणिस्तानातील महिलांसमोर इतरही अनेक अडचणी आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ शिक्षणच त्यांची मदत करू शकते. तालिबानची इच्छा आहे की आम्ही शिक्षण घेऊ नये, कारण आम्ही शिकलो तर प्रश्न विचारू. त्यामुळेच तालिबानने आम्हाला भविष्याशी जोडणारा पूल तोडला आहे.

अमेरिका-युरोपचे मित्र मदत करत आहेत, मात्र इंटरनेट आणि विजेची समस्या आहे

ऑनलाइन वर्ग सुरू करणारे प्रा. हसीबुल्लाह तरीन म्हणतात- 'अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांकडे करण्यासाठी काहीही नाही. त्यांना घरात कैद करण्यात आले आहे. आम्ही त्यांना ऑनलाइन क्लासेसद्वारे काहीतरी करण्याची आणि शिकण्याची संधी देऊ इच्छितो, जेणेकरून भविष्यात जेव्हा परिस्थिती चांगली असेल तेव्हा त्या तयार असतील.

तालिबानने मुलींना विद्यापीठात जाण्यापासून रोखले तेव्हा मला खूप धक्का बसला. मला वाटले की कसे तरी मुलींचे शिक्षण चालू राहिले पाहिजे. त्यासाठी मी ऑनलाइन क्लासेस सुरू केले. मला मान्य आहे की शिक्षण व्यवस्था ही एक साखळी आहे, तुम्ही ती कापून पुन्हा जोडायचा प्रयत्न केला तर खूप महागात पडते. याची किंमत एका संपूर्ण पिढीला मोजावी लागते. अफगाणिस्तानातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. सध्या आमचे दोन वर्ग सुरू आहेत.

मुलींना काबूल विद्यापीठात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तालिबानी सैनिकांनी गेटवर बॅरिकेड लावले.
मुलींना काबूल विद्यापीठात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तालिबानी सैनिकांनी गेटवर बॅरिकेड लावले.

'पुढील काही दिवसांत आम्ही मुलींसाठी मानवी हक्कांवर एक वर्ग सुरू करणार आहोत. याशिवाय आंतरराष्ट्रीय संस्थांविषयीही वर्गही सुरू केले जाणार आहेत. युरोप आणि अमेरिकेत राहणारे काही मित्र आम्हाला मदत करत आहेत.

येथे विजेची समस्या आहे, त्यामुळे आम्ही मुलींसाठी पॉवर बँकची व्यवस्था करण्यात व्यस्त आहोत. इंटरनेटची समस्या आहे. चांगल्या इंटरनेट स्पीडसाठी पैशांचीही गरज असते. अफगाणिस्तानबाहेर राहणारे आमचे मित्र तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी मदत करत आहेत. अनेक मुली अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे इंटरनेट नाही.

आता एकच मार्ग आहे. जोपर्यंत मुलींना विद्यापीठात जाऊ दिले जात नाही, तोपर्यंत विद्यापीठ त्यांच्यापर्यंत न्यावे. तथापि, ऑनलाइन वर्ग चालवणे देखील सोपे नाही. इंटरनेट स्पीड व्यतिरिक्त क्लासेस घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न आहे. आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.

ऑनलाईन क्लासबाबत तालिबानने कोणतीही घोषणा केलेली नाही. असे असूनही आम्ही सुरक्षेची काळजी घेत आहोत. आम्ही मुलींना इंटरनेट कॅफे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यास सांगत नाही. त्यांनी त्यांच्या घरातूनच इंटरनेटद्वारे कनेक्ट व्हावे अशी आमची इच्छा आहे.

विद्यापीठ बंदचा जगभरातून निषेध

युनिव्हर्सिटीमध्ये मुलींच्या प्रवेशबंदीच्या निषेधार्थ राजधानी काबूलमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रांशिवाय अमेरिका, युरोपीय देश, कतार आणि सौदी अरेबियासारख्या मुस्लिम देशांनीही तालिबानच्या निर्णयाला विरोध केला आहे.

फोटो अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा आहे. येथे, 22 डिसेंबर 2022 रोजी मुलींनी विद्यापीठांमध्ये शिक्षणावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधाक आंदोलन केले.
फोटो अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा आहे. येथे, 22 डिसेंबर 2022 रोजी मुलींनी विद्यापीठांमध्ये शिक्षणावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधाक आंदोलन केले.

तरीन म्हणतात - तालिबानमधूनही या निर्णयाविरोधात आवाज उठवला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये मुलींचे शिक्षण बंद केल्याचा अनेक स्तरांवर निषेध होत आहे. तालिबानचे बडे नेतेही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा निर्णय रद्द करण्यासाठी गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री नेतृत्वाकडे दाद मागणार आहेत.

(सुरक्षेच्या कारणास्तव कथेतील मुलींची नावे बदलण्यात आली आहेत)

बातम्या आणखी आहेत...