आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • After Telling The Story, The Health Of The Hospitalized Child Improves Quickly And The Pain discomfort Also Decreases

दिव्य मराठी विशेष:गोष्टी सांगितल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल बालकांच्या आरोग्यात लवकर सुधारणा, वेदना-अस्वस्थताही कमी होते

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझीलमध्ये आयसीयूत दाखल मुलांवर गोष्टी आणि कोड्यांचा दिसला सकारात्मक परिणाम

मुलांवर गोष्टींचा परिणाम जादूसारखा होतो हे सर्वांना माहीतच आहे, पण मुलांना गंभीर आजारावर मात करण्यासाठी आणि त्यांची वेदना कमी करण्यातही गोष्टी मोठी भूमिका बजावू शकतात. ब्राझीलमध्ये झालेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात आयसीयूत दाखल २ ते ७ वर्षे वयाच्या मुलांना गोष्टी सांगण्यात आल्या तसेच कोडी सोडवण्यासाठी देण्यात आली. त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता. यादरम्यान मुलांच्या शरीरात कॉर्टिसोलची (तणावाशी संबंधित हार्मोन) पातळी कमी झाली आणि ऑक्सिटोसिनमध्ये (भावनांशी संबंधित हार्मोन) वाढ झाली. अस्वस्थता आणि वेदनाही आधीच्या तुलनेत कमी झाली. त्याशिवाय समूहात गोष्टी सांगितल्यानंतर मुलांमध्ये जे परिणाम दिसले ते दुप्पट चांगले होते. आजारी मुलांची ऑक्सिटोसिनची पातळी तब्बल ६ पट वाढली होती, तर त्यांच्या वेदनांचा स्तर पाच पट घटला होता.

ब्राझीलच्या डी’ऑर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशनने हा अभ्यास केला होता. त्याअंतर्गत अस्थमा, ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल ८१ मुलांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यास गटाचे प्रमुख लेखक गुइलहर्मे ब्रॉकिंग्टन यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये म्हटले आहे की, ‘गोष्ट ऐकताना मुलांच्या मनात-मेंदूत काही घडामोडी घडतात. त्यामुळे त्यांना चांगले वाटते. कल्पनांद्वारे वेगळ्या जगात घेऊन जाणारे विचार मुलांच्या मनात येतात. रुग्णालय आणि प्रतिकूल परिस्थितीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही.’

तुम्हाला कोणती गोष्ट सांगायची आणि तुम्ही कोणती कोडी सोडवणार याचा पर्याय निवडण्याची संधी अभ्यासादरम्यान मुलांना देण्यात आली होती. मुलांच्या अर्ध्या गटाला गोष्टी सांगण्यात आल्या, तर इतर मुलांना कोडी सोडवण्यास सांगण्यात आले. या सत्राआधी आणि नंतर मुलांची लाळ घेऊन त्यांच्या शरीरातील कॉर्टिसोल आणि ऑक्सिटोसिन यांच्या पातळीचे विश्लेषण करण्यात आले.

भविष्यात हा उपाय सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत लागू होण्याची शक्यता : संशोधक
अभ्यासाचे नेतृत्व करणारे जॉर्ज मोल म्हणाले,‘मुलांवर बराच अभ्यास झाला आहे. पण हा सर्वात वेगळा असल्याने मी तो महत्त्वाचा मानतो. रुग्णालयातील वातावरणाचा परिणाम आणि त्या काळात औषधांसोबतच आणखी एखाद्या गोष्टीमुळे माणसाच्या वेदना कमी होणे हीच एक आश्चर्यकारक बाब आहे. हा खूप कमी खर्चिक आणि सुरक्षित उपाय आहे, त्यामुळे तो भविष्यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतही लागू केला जाऊ शकतो. त्याचे कुठले नुकसानही नाही. त्याची उपयोगिता जास्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी आम्ही लवकरच मोठ्या प्रमाणावर हा अभ्यास करू.

बातम्या आणखी आहेत...