आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निवीरांना 10% आरक्षण 'उंटाच्या तोंडात जिरे':निमलष्करी दलांत वार्षिक केवळ 3000 अग्निवीरांची भरती, उर्वरित 35 हजारांचे काय?

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथ योजनेच्या विरोधाचा वणवा देशातील 11 राज्यांत भडकला आहे. हिंसक आंदोलन करणाऱ्यांनी 4 वर्षांत रिटायर होण्याच्या मुद्यावर सर्वात मोठी हरकत घेतली आहे. वाढता रोष पाहता गृह मंत्रालयाने शनिवारी CAPF च्या भरतीत 10% आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी संरक्षण मंत्रालयानेही आपल्या भरतीत अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली.

त्यामुळे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया की, 4 वर्षांनंतर लष्करातून बाहेर पडल्यानंतर अग्निवीरांना CAPF व संरक्षण मंत्रालयामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाने त्यांच्या बेकारीचा प्रश्न सुटेल काय?

वर्षाला 37 हजार अग्निवीर होणार रिटायर

सैन्य भरतीच्या 'अग्निपथ' योजनेंतर्गत वार्षिक 45-50 हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निवीरांची पहिली तुकडी 2023 मध्ये सैन्यात भरती होईल. 4 वर्षांनंतर 2027 मध्ये 25% म्हणजे जवळपास 10-12 हजार अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती मिळेल. तर उर्वरित 75% म्हणजे जवळपास 35 ते 37.5 हजार जवान सेवानिवृत्त होतील. याचा अर्थ असा की, 2027 पासून दरवर्षी जवळपास एवढेच अग्निवीर निवृत्त होतील.

गृह, संरक्षण मंत्रालयाचे अग्निवीरांना 10% आरक्षण

थोडक्यात, दरवर्षी सुमारे 50 हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. गृह व संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या 10% आरक्षणाच्या आधारावर आपण अग्निवीरांना उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची गणना करू.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CAPF व आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये गृह मंत्रालयाने 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, संरक्षण मंत्रालयानेही भारतीय तटरक्षक, संरक्षण नागरी पदांसह संरक्षण क्षेत्राशी संबंधित 16 सार्वजनिक उपक्रमांच्या भरतीमध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

CAPF मध्ये गत 4 वर्षांत वार्षिक 28 हजार जणांची भरती

2017 ते 2020 या 4 वर्षांच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPF मध्ये एकूण 1,13,219 भरती करण्यात आली. म्हणजे या दलांत वार्षिक सरासरी 28,304 भरत्या झाल्या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-

CAPF मध्ये दरवर्षी 3 हजार अग्निवीरांना मिळणार नोकरी

मागील 4 वर्षांतील सीएपीएफमध्ये झालेल्या भरतीचा आकडा पाहिला तर वार्षिक जवळपास 28 हजार भरत्या जाल्या. अग्निवीरांना सीएपीएफमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा झाली आहे. म्हणजे या आधारावर सीएपीएफमध्ये एका वर्षात जवळपास 2800 अग्निवीरांना नोकऱ्या मिळतील.

म्हणजे दरवर्षी रिटायर होणाऱ्या 37 हजार अग्निवीरांपैकी सीएपीएफ केवळ 2800 जणांनाच नोकऱ्या देईल. उर्वरित 34 हजार अग्निवीरांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे CAPF मधील भरतीचा आकडा गत काही वर्षांत कमालीचा घटला आहे. 2017 नंतर सीएपीएफच्या भरतीत 80 टक्के घट झाली आहे. 2020 मध्ये या दलाच्या 1.29 लाख रिक्त पदांपैकी केवळ 10184 पदांवर भरती झाली होती.

तत्पूर्वी 2018 मध्ये 30,098 व 2019 मध्ये 14,541 पदांवर भरती झाली होती. तर 2017 मध्ये 77,153 रिक्त पदांपैकी 58,396 पदांवर भरती झाली होती.

डिफेंसमध्ये C कॅटेगरीचे 2 लाख पद रिक्त, अग्निवीरांना किती सरकारी नोकऱ्या मिळणार?

डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालानुसार, डिफेंस सिव्हिलियन पोस्टच्या C कॅटेगरीतील 2,05,193 जागा रिक्त आहेत. आम्ही ही कॅटेगरी यासाठी निवडली की, 12वी पास झाल्यानंतर बहुतांश अग्निवीर याच पदासाठी पात्र ठरतील.

सरकारने एकदाच या सर्व जागा भरण्याची तयारी दर्शवली तरी, अग्निवीरांना 10 टक्के आरक्षणानुसार केवळ 20 हजार नोकऱ्या उपलब्ध असतील. पण, एकदाच एवढ्या जागांवर भरती होणे हे एक दिवास्वप्न आहे. पण, तरीही असे झाले तर ते केवळ एका वर्षासाठी असेल. पुढील वर्षापासून नोकऱ्यांसाठी याहून अनेक पट कमी जागा रिक्त असण्याची भीती आहे. म्हणजे अग्निवीरांना संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांत फार कमी संधी असेल.

CAPF, डिफेन्समध्ये 10% आरक्षण असूनही 15 हजार अग्निवीर बेरोजगार राहणार

CAPF व संरक्षण या दोन्ही नोकऱ्यांत 10% आरक्षणानुसार अग्निवीरांना दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या पाहिल्या तर त्यांची वार्षिक कमाल आकडा 22-23 हजार असेल.

म्हणजेच दरवर्षी निवृत्त होणाऱ्या 35-37 हजार अग्निवीरांपैकी सुमारे 15 हजार अग्निवीर बेरोजगार राहतील.

या 22-23 हजार नोकऱ्याही तेव्हाच मिळतील, जेव्हा सर्व रिक्त पदे एकाचवेळी भरले जातील. तसेच हे सर्व केवळ एकाच वर्षासाठी असेल.

10 लाख जवानांचे CAPF काय आहे?

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) हे देशातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. ते गृह मंत्रालयांतर्गत येते. CAPF मध्ये 7 पोलीस केंद्रीय सशस्त्र दलांचा समावेश होतो.

त्यात आसाम रायफल्स (AR), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) व सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा समावेश आहे.

यापैकी 6 थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत. आसाम रायफल्सचे प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाच्या हातात आहे. परंतु त्याचे ऑपरेशनल नियंत्रण भारतीय लष्कराच्या हातात आहे. आसाम रायफल्समध्ये 46 बटालियन व सुमारे 66 हजार सैनिक आहेत.

बातम्या आणखी आहेत...