आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्तमान:कचऱ्यातून वेदना वेचताना...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला जगायला काय लागतं? असा प्रश्न केला तर एका वाक्यात उत्तर देता येईल की दोन वेळचं फक्त अन्न! पण या अन्नासाठी माणसाला काय काय करावं लागतं. किती आटापिटा करून तो भाकरीचा घास मिळवावा लागतो. त्यासाठी साखर झोपेतून उठून किती पायपीट करावी लागते. हे सगळं करण्यासाठी कोणाच्या वाट्याला कोणत जगणं येईल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कचरा गोळा करणाऱ्या बायांचं दुःख असंच आहे. ते मांडण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. पहाटे पहाटे कचरा वेचणाऱ्या दोन बाया एका जागेवर बसून एकमेकींचे डोळे पुसताना पाहिले आणि मन गलबलून गेले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील एक म्हणाली,चार वाजताच नवऱ्याने मला उठवलं आणि अख्ख्या बाई जातीचा उद्धार केला. पाठीवर चार रट्टे दिले. कचरा गोळा करण्यासाठी अक्षरशः घरातून बाहेर ढकलून दिले. मग मी विचारलं, पण तुम्हाला पहाटेच नवऱ्याने मारण्याचे कारण काय? त्यावर तिचं उत्तर ऐकून मी अवाकच झालो. ती म्हणाली, टाळेबंदीमुळे लोकांचं बाहेर पडण फारसं नव्हतं. मग रस्त्यावर, घरांच्या आजूबाजूला कचरा मिळणार कसा? तरीही या दिवसात मी कचरा थोडाफार गोळा करण्याचा प्रयत्न केलाही. पण नवऱ्याला वाटलं मी जास्त कचरा गोळा करत नाही म्हणजे आळस करते. म्हणून त्याने पहाटेच मला बडवलं. हे सांगतानाच तिच्या समोर बसलेल्या दुसऱ्या बाईकडे बघत ती रडत होती.क्षणभर काय बोलावं हे मलाही सुचत नव्हतं. फक्त सहज मनात उद्गार येऊन गेला अपवाद वगळता पुरुष ही जातच स्त्रीवर वर्चस्व ठेवणारी असते!

जेव्हा मी गावातून शहरात राहायला आलो तेव्हा प्रथम कचरा गोळा करणाऱ्या बाया बघितल्या. अंगावरचे मळकट कपडे, शरीर पूर्ण अस्ताव्यस्त, केस अनेक दिवस न विंचरल्याची अवस्था, गालावर कसलेतरी ओघळ आणि पाठीवर किंवा काखेला गोळा केलेला कचरा टाकण्याची एखादी पिशवी.त्यांना पाहिलं की त्यांच्यापासून दुरूनच आपण चालावं असं वाटून जायचं. पण एक गोष्ट मात्र नकळत मनात यायची. कचरा गोळा करायला जोडीने जाणाऱ्या बायका आपापसात सतत बोलत असतात, नेमकं काय बोलत असतील? त्यांना असे जगण्याचे काय प्रश्न पडले असतील? कचरा तर गोळा करायचा आहे आणि शांत जगायचं आहे. त्यांच्याकडे बघण्याचा हा माझा दृष्टिकोन म्हणजे माझे अज्ञान होते हे त्यांना कित्येक वर्ष पहाटेचा कचरा गोळा करताना पाहिले आणि लक्षात येत गेले. पण एकाच जागेवर बसून या दोन कचरा गोळा करणाऱ्या रडणाऱ्या बाया पाहिल्या आणि कित्येक वर्षांपूर्वी माझ्या पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर मला मिळालं तेव्हा मलाच माझी लाज वाटू लागली.

माझ्या घराच्या समोरच रस्त्यावर या कचरा वेचणाऱ्या बायांबरोबर माझं बोलणं चालू होतं.सकाळचे सहा वाजले असतील. मी त्यांना म्हटलं, तुम्ही किती वाजता उठता कचरा गोळा करण्यासाठी. तर त्या दोघी एकाच सुरात-एकाच वेळी म्हणाल्या पहाटे चार वाजता. उठायला उशीर झाला तर नवरा लाथ घालतो आमच्या कंबरड्यावर.मग कचरा गोळा करून परत कधी जाता, तर त्या म्हणाल्या, सात वाजता परत घरी पोहचतो. तुमचा गाव कुठे? तर त्या म्हणाल्या जिथे जाऊ तोच आमचा गाव. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव उदास दिसत होता. आणि खरंही आहे. ज्याची स्वतःची भूमी नाही त्याची आयुष्यभराची उदासी त्याला कायमच त्रास देत असते. मी खूप त्यांच्याशी आपलेपणाने बोलत होतो. चहा-भाकरी हवी का? विचारत होतो. तेव्हा त्यांनी या सगळ्याला नकार दिला. मात्र वर्षानुवर्ष दुःख कोंडून ठेवावं आणि भडभडून कुणासमोर तरी बोलावं तशा त्या आपल्या आयुष्याबद्दल माझ्याशी आपलेपणाने मोकळ्या होत होत्या. मी विचारलं तुमची मुलं शाळेत जातात का? तर या माझ्या प्रश्नावर त्या दोघी माझ्या चेहऱ्याकडे एकटक बघतच राहिल्या. त्यांना काय उत्तर द्यावे हे कळत नसावं बहुदा. असं माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांना पुन्हा जोरात विचारलं तुमची मुलं शिकलेली आहेत का? त्यावर त्यातील एक जरा उंच स्वर करत म्हणाली, कशाला शिकायला पाहिजे. आयुष्यात कचरा तर गोळा करायचा आहे ना? आमचंही आयुष्य कचरा गोळा करण्यातच केलं ना? या तिच्या प्रश्नावर मी मात्र काहीच बोलू शकलो नाही. तोच त्यातील एक म्हणाली मला वाटत होतं पोरं शिकायला हवी होती. चार बुक शिकली असती तर या घाणीत आयुष्यभर खितपत पडली नसती. पण आमच्या घरवाल्यांना पोरांनी शिकलेल आवडत नाही. या त्यांच्या बोलण्यावर मी लगेच म्हणालो, मुलांनी शिकलेलं का आवडत नाही तुमच्या नवऱ्याला? माझा हा प्रश्न संपतो न संपतो तोच ती म्हणाली, दारुड्याला काहीच चांगलं आवडत नसतं. या तिच्या उत्तरावर मी म्हणालो तुमचा नवरा दारू पितो? तेव्हा त्या दोघी खळखळून मोठ्याने हसल्या. आपापसात आपल्या भाषेत काहीतरी पुटपुटल्या. मला त्यांचं ते हसणं जिव्हारी लागलं. मी काही चुकीचं विचारलं का? असं त्यांना विचारताच त्यातील एकजण म्हणाली, माझा नवरा दिवस-रात्र फक्त दारूच पितो. म्हणजे दारूच नवऱ्याला तुझ्या पीत असेल ना? बहुतेक माझं हे बोलणं तिला आवडलेलं दिसत नव्हतं. माझं बोलणं ऐकताच तिने माझ्यावर डोळे वटारले. मनात वाटून गेलं, नवरा कितीही वाईट असू दे त्याच्या नावाने एखदा गळ्यात डोरल बांधल की तो आयुष्यभरासाठी पवित्र होतो, असे अनेकजणींना वाटत राहतं. यामागची त्यांची मानसिकता खरतर आपण समजून घेण्याची आवश्यता असते. असं वागणं त्यांचं चुकीचं असतं. परंतु 'पदरात पडलं आणि पवित्र झालं' या न्यायाने त्या वागण्यामागे त्यांची जन्मापासूनची मानसिक, शारीरिक, आर्थिक, कुचंबणा तसेच त्यांच्यातील व्यक्तिस्वातंत्र्याचा अभाव आणि या त्यांच्या सगळ्या अज्ञानातून ही एकनिष्ठता नवऱ्यावर दाखवली जाते. मग एकादी मोठ्या हुद्यावर असणारी बाई असो किंवा अशी कचरा वेचणारी बाई असो.

अशाच एका ठिकाणच्या कचरा वेचणाऱ्या बाईच्या मुलीची कहाणी मन बेचैन करणारी आहे. रेल्वेस्टेशन परिसरात कचरा गोळा करणारा परिवार राहत होता. ना घर ना दार असणाऱ्या अशा व्यक्तींना आजूबाजूचा सगळाच परिसर आपलाच वाटत असतो आणि कधीकधी आपल्या दैनंदिन जीवनात आजूबाजूला वावरणाऱ्या परक्या व्यक्तींवर त्यांचा पूर्ण विश्वास बसतो.याच परिसरात रेल्वे स्टेशनच्या बाजूला वडापाव विकणारा एक व्यावसायीकही होता. त्याची नजर चांगली नव्हती. या कचरा वेचणाऱ्या महिलांपैकीची एक मुलगी वयात येताना तो पाहत होता. त्याची नजर तिच्यावर पडली. त्याने वडापाव आणि खाऊ देऊन तिला आपलंसं केलं. एके दिवशी या बारा वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागलं तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेल्यावर तिच्या आईच्या लक्षात आलं की आपली मुलगी चार महिन्यांची गरोदर आहे.अर्थात हे त्या कचरा गोळा करणाऱ्या माउलीला कळूनही काही उपयोग झाला नाही. त्या वडापाववाल्याने कचरा गोळा करणाऱ्या परिवाराला धमकी देऊन तिथून त्यांचा बाडबिस्तार गुंडाळायला लावला. मअशा वर्गातील स्त्रियांची लैंगिक फसवणूक हा आपल्याकडे मोठा सामाजिक प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाकडे हव्या त्या गांभीर्याने फारसं कुणी पाहिलेलं नाही असं लक्षात येतं. अर्थात कचरा वेचणाऱ्या वर्गातील बाईचं हे शोषण असं सामाजिक असो की कौटुंबिक. पण त्यांच्या शोषणाला वाली मात्र कोणीच नाही. या दोन बाया रडताना पाहून मी सगळी त्यांची विचारपूस केली खरी, पण त्यांच्या पुरुषांना एवढं कसं कळलं नाही की टाळेबंदी मध्ये कचरा मोठ्या प्रमाणात मिळणे ही तशी दुरापास्तच गोष्ट.

सध्या शेतकरी आंदोलन दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण या आंदोलनाचा सगळ्यात आनंद कचरा वेचणाऱ्या वर्गाला झाला. कारण त्यांच्या मते या देशातील टाळेबंदीनंतर प्रथमच एवढा मोठा कचरा या आंदोलनाच्या एकच ठिकाणी मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा कचरा हा माणसांच्या रोजचा रहदारीतूनच गोळा होत असतो. पण हे कळायला मात्र कचरा वेचणाऱ्या त्या बायांच्या पुरुषांना कधीतरी कचरा वेचणाऱ्याच बाया बनावं लागेल! ajay.kandar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...