आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:गोष्ट एका तहानेची..!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलेची तहान, ओढ स्वस्त बसू देत नाही. कलाकृती तुम्हाला आतून धडका मारते. विषय सुचतो अन् काही तरी वेगळं आपल्या हातून होऊन जातं. अगदी असंच घडलं. एका तहानेतून कलेची दुसरी तहान पूर्ण झाली. ती लोकांना आवडलीही. ‘थर्स्टी’ ही त्या तहानेमागची गोष्ट...

‘थर्स्टी’ या शॉर्टफिल्मची संकल्पना सुचण्यामागं एक कारण आहे. म्हैसूर वॉटर फिल्म फेस्टिव्हलचा एक मेसेज आला होता. त्याठिकाणी ‘पाणी’ या विषयावर फिल्म पाठवायची होती. काय करावं या विषयावर? कारण पाण्याच्या विषयावर खूप साऱ्या फिल्म्स् आलेल्या आहेत. तेच-तेच करण्यात अर्थ नाही. काहीतरी नवीन संकल्पना मांडली पाहिजे, असं वाटत होतं. सादर करायला सोपी, पण त्यात नावीन्य असायला हवं होतं. मात्र, नवीन असं काहीच सापडत नव्हतं.

मार्च महिना आलेला. फक्त दोन आठवडे बाकी होते. आजचं उद्यावर ढकलत होतो. पण, आता काय ते लवकर करायचं म्हणून संकल्पनेवर काम करु लागलो. काही तरी हटके पाहिजे. लोकांनी जे मांडलं, त्यालाच थोडं वेगळं वळण देवून मांडायचं नव्हतं. काहीतरी असं की जे लोकांच्या नजरेसमोरही असेल; पण त्याचा लोकांनी कधी विचारच केला नसेल. असं वाचण्यात आलं होतं, की माणूस वेळ पडली, तर स्वत:चे मूत्रही प्राशन करू शकतो. हे वाक्य आठवलं. बस्स! विषय ठरला. अगदी वेगळा. याच वाक्यातून प्रेरणा घेऊन संकल्पनेचा विस्तार करण्यास सुरूवात केली.

हा विषय मांडायचा कसा, हा मोठी प्रश्न होता. लोकांना पटेल अशी आणि सोपी, पण तितकीच खोल अशी मांडणी करायची होती. कुठल्या परिस्थितीत माणूस स्वतःचं मूत्र प्राशन करण्यापर्यंत जाऊ शकतो? ती परिस्थिती कुठे तयार होवू शकते? हे मांडायचं होतं. एखाद्या वाळवंटी, शुष्क प्रदेशात, जिथे दूर-दूरपर्यंत पाणी दिसणारही नाही, अशा ठिकाणी ही परिस्थिती तयार होऊ शकते. हाच आधार घेऊन गोष्ट विकसित केली. आता स्क्रिप्टची वेळ होती. त्यात किती पात्रं ठेवावीत, वेळ किती ठेवावा, असे प्रश्न समोर होते. फिल्म जास्त लांबलचकही नसावी, असं वाटत होतं. थोडक्या अवधीत भरपूर आणि तेही मुद्देसूद मांडायचं होतं. स्क्रिप्ट तयार केली. समोर आव्हाने होतीच. पण, त्यावर मात करून एकेक गोष्ट सोपी करायची होती. सोबतीला माझा मित्र शुभम सावळे होता. शूटिंगसाठी अशी फक्त दोघांचीच टीम होती. १० मार्च २०२० ला रंगपंचमीच्या दिवशी शूटिंग पूर्ण करण्यासाठी दोघे पोहचलो. मोबाइलने शूट चालू केलं. इतर काही साहित्य नसल्यानं त्रास झाला. पण, शूट पूर्ण केलं. डबिंग वगैरे करायला लागू नये म्हणून फिल्म सायलेंट ठेवली. आता एडिटिंग आणि म्युझिकसाठी अडचण आली. तेव्हा मोबाइलवरच एडिटिंग करायचं आणि संगीतही यूट्यूबवरून डाऊनलोड करून जोडण्याचं ठरवलं. त्यात शुभम सावळे, शुभम गंगावणे, आकाश कोल्हे, अमोल साठे, बाळू खंडागळे आणि सागर जोगदंड यांनी मदत केली. साऱ्यांंनी मिळून फिल्म पूर्णत्वाला नेली. एका तहानेचा प्रवास कलेच्या दुसऱ्या ‘तहाने’ने परिपूर्ण झाला होता.

खिशात एक रुपयाही नव्हता... स्क्रिप्ट तयार झाल्यावर शूटिंगला सुरूवात करायची होती. इथं खरं आव्हान होतं. खिशात एक रुपयाही नव्हता. फक्त मनात होतं, की फिल्म करायचीच. कॅमेरा, एडिटिंग आणि संगीत यासाठी पैसा लागणार होता. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं आणता येत नाही. काय करावं, काहीच सुचत नव्हतं. शेवटी ठरवलं, की झीरो बजेट शॉर्टफिल्म बनवायची. त्यासाठी परत मांडणी करावी लागली. आजूबाजूची सगळी पात्रं कमी करून फक्त एका पात्रावर लक्ष केंद्रित केलं अन् कॅमेऱ्याऐवजी मोबाइलनेच शूटिंग करायचं ठरवलं. तरीही आम्ही जिंकलो. तब्बल सात फिल्म फेस्टिव्हलमध्ये या फिल्मची निवड झाली. ‘कोलकाता ऑनलाइन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘टॉप सोशल मेसेज फिल्म’चा अवॉर्ड मिळाला.

आकाश बोर्डे
(लेखक आणि दिग्दर्शक)

बातम्या आणखी आहेत...