आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:"रसिक'ने कायम "नाही रे' वर्गाचा आवाज बनून रहावं - अमोल उदगीरकर

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या लिखाणाची सुरुवात कुठून होते याची छाप तुमच्या पुढच्या सर्व लिखाणावर पडू शकते . "रसिक' मध्ये लिहिलेल्या "रील अँड रियॅलिटी' या सदराचा ठसा असाच माझ्या लिखाणावर उमटला आहे. आपल्या सिनेमाचा भारतीय समाजजीवनावर पडणारा राजकीय आणि सामाजिक परिणाम हा विषय तसा मराठी चित्रपटविषयक लिखाणात फारसा आलेला नव्हता. या विषयावर कॉलम करण्याची संधी मला "रसिक' ने दिली. मिथुन चक्रवर्तीचं "उटिवूड', "भारत पाकिस्तान संबंध आणि सिनेमा', सिनेमा सोडून एका निसर्गरम्य जागी स्थानिक झालेला मन्सूर खान हा दिग्दर्शक, श्वेता बसू प्रसाद या अभिनेत्रीवर झालेल्या अन्यायावर लिहिलेला लेख असे अनेक वेगळ्या विषयांवरचे लेख मला दर रविवारी "रसिक' मध्ये लिहायला मिळाले .

"रसिक' मध्ये मिळालेलं विषय निवडीचं आणि लिखाणाचं स्वातंत्र्य हे कुठल्याही स्तंभलेखकासाठी हत्तीचं बळ ठरतं . माझं आगामी "न नायक ' पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे."न -नायक ' सदराच बीज पण "रसिक ' मध्येच लिहिलेल्या "भारतीय सिनेमातले बोलट' या लेखात आहे.या पुस्तकात "रसिक' मध्ये लिहिलेले काही लेख (अर्थातच थोडीशी भर टाकून अपडेट केलेले ) पण आहेत . "रसिक' मधल्या लिखाणामुळे माध्यमांमध्ये जे "गुडविल' तयार झालं त्यामुळे आघाडीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये मला लिखाणाची संधी मिळाली हे कृतज्ञतेने नमूद करावं लागेल .

आम्हा सर्व लेखकांना परिवाराचे सदस्य समजणाऱ्या "रसिक' च्या टीमने असंच सतत नवीन लेखकांना संधी देत राहावी, "नाही रे' वर्गाचा सतत आवाज बनून राहावं आणि मराठी माध्यमांसाठी नव्या दमाच्या लेखकांचे "पुरवठाकेंद्र ' म्हणून कार्यरत राहावं.

मनापासून शुभेच्छा.

अमोल उदगीरकर
(लेखक आघाडीचे सिनेब्लॉगर आणि पटकथाकार असून २०१६ साली "रसिक'मधील त्यांचा "रील अँड रियॅलिटी' हा स्तंभ प्रचंड गाजला होता.

बातम्या आणखी आहेत...