आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा काळ आणि अतिदुर्गमतेचा शाप यामुळे अंगणवाड्यांमधील लेकरे असोत वा शाळेतील बालके असोत, पोषण आहार पोहोचवणे हे प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हान बनले होते. अशा वेळी एक अंगणवाडी ताई मात्र आपल्या लहान्या लेकरासह गावातल्या लहान्यांचा आहार घेऊन नियमित पाड्यावर पोहोचली. लॉकडाऊनच्या काळात बोटीतून पोषण आहार पोहोचवणाऱ्या चिमलखेडी या अतिदुर्गम गावच्या अंगणवाडी सेविका रेणू वसावे यांची ही यशोगाथा.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव हे अतिदुर्गम तालुके. नर्मदा काठावरील अतिशय खडतर जीवन. लॉकडाऊनच्या काळात या गावांमधील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेणू रमेश वसावे यांनी मात्र कर्तव्यात कसूर केली नाही. कधी बोटीतून तर कधी पहाडाच्या वाटा तुडवत त्या गावागावात जात राहिल्या. हात धुण्याचा मंत्र आदिवासी खेड्यापाड्यातील महिलांना सांगत राहिल्या. अनेक गावांपर्यंत जाण्याचा रस्ता नव्हता तर अनेक ठिकाणी गाड्याही बंद झालेल्या. पण रेणूताईंनी रस्ता नाही, वाहन नाही अशा परिस्थितीतही बोटीतून, पावसापाण्यातून वाट काढत शासनाने नेमून दिलेले जनजागृतीचे, आहार पोहोचवण्याचे काम पार पाडले. नर्मदेच्या काठांवरील गावे पालथी घालत कोविडपासून वाचण्याची माहिती महिलांना दिली. आजारी बालकांना फिरत्या दवाखान्यापर्यंत नेले. ही गावे एवढी दुर्गम की प्रसंगी त्यांना मोलगी सारख्या गावात मुक्काम करण्याचीही वेळ आली, तरी त्या डगमगल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी झाला नाही. जे काम दिले ते आनंदानेच केले पाहिजे ही त्यांची भूमिका. त्यामुळेच अडथळे कितीही जास्त असोत आणि वेतन कितीही कमी असो, याचा विचार न करता त्यांनी कोविडच्या संकटात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडले.
पाड्यापाड्यांवर जाऊन केली जागृती
कोविड काळात गरोदर महिला हा संवेदनशील समूह. त्यांच्यापर्यंत प्रतिबंधात्मक काळजीची माहिती, पूरक औषधे आणि पोषण आहार पोहोचवण्याची जोखमीची जबाबदारी अंगणवाडी सेविका म्हणून रेणूताईंनी निभावली. अंगणवाड्या बंद होत्या, पण त्यांचे काम थांबले नाही.
काेराेना काळात कुठे प्रशासनातील कडी म्हणून, कुठे दवाखान्यातील सेवा म्हणून तर कुठे थेट सामाजिक बांधिलकीचा वसा जपत माणुसकीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणीं’च्या यशोगाथांवर महिला - बालविकास विभाग आणि ‘दिव्य मराठी’चा प्रकाशझोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.