आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Annabhau Sathe Death Anniversary | Anna's Teaching Is Earnings, The Government Should Take Care Of The Society

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित:अण्णांची शिकवण हीच कमाई, सरकारने समाजाची काळजी घ्यावी

सावित्रीबाई साठे | वाटेगाव (सांगली)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अण्णाभाऊंच्या सूनबाई सावित्रीबाईंच्या शब्दांतच कुटुंबीयांची कथा

‘मला अण्णाभाऊंची सून म्हणून मानसन्मान मिळतो आहे तेच पुष्कळ आहे. आधी मी तर खुरपणी करण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात राबत होते. त्यापेक्षा तर आत्ता आर्थिक स्थिती ठीकच आहे. मुली, जावई कष्ट करून पोट भरत आहेत. कष्ट तर करावेच लागतील. अण्णांची हीच तर शिकवण आहे.अण्णाभाऊंच्या कुटुंबाचे आम्ही सदस्य आहोत हीच आमची कमाई आहे. आता यापेक्षा जास्त काही नकोय. माझा मातंग समाजच माझे कुटुंब आहे. सरकारने समाजाच्या हालअपेष्टा थांबवाव्यात एवढीच माझी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात मागणी आहे..!'

आमच्या कुटुंबाने कायम विवंचनेत दिवस काढले, पण कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. अण्णाभाऊंची शिकवण हाच आमचा ठेवा होता आणि तो यापुढेही राहीन. अण्णाभाऊ साठेंचे चिरंजीव मधुकर अल्पशिक्षित होते. परिस्थितीमुळे तेही शिक्षणापासून वंचित राहिले.

मधुकर यांच्या निधनानंतर चार मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. दीपाली (३५), सुवर्णा (२९), ज्योती (२७) आणि आरती (२५) या चारही मुलींची आता लग्ने झाली आहेत. दीपाली स्वतः आणि तिचे नॉनमॅट्रिक पती संजय सकट शेतमजूर आहेत.

ज्योती आणि आरती मुंबईत राहतात. त्यांचे पती गणेश गॅस एजन्सीत, तर अविनाश सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सुवर्णाचे पती जॉकी मिसाळ कामगार आहेत. सुवर्णा मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहे. असा आमचा कुटुंबकबिला. आर्थिक घडी आधीपासूनच विस्कटलेली. कधी ती बसलीच नाही. मागे चरितार्थासाठी सासवड येथील कार्यकर्त्यांनी वर्गणीतून शालेय साहित्य विक्रीचे दुकान टाकून दिले आहे. त्यातून काय तो आधार मिळतो. पण कधी या गरिबीचं दु:ख वाटलं नाही. लाज तर मुळीच नाही. आम्हाला सरकारकडून आता कशाचीही अपेक्षा नाही. सरकारने मातंग समाजाकडे लक्ष द्यावे अन् त्यांचे प्रश्न सोडवावेत.

दीड दिवस शाळेत गेले अन् क्रांती केली

१ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते. तरीही त्यांनी ३५ कादंबऱ्या, १० कथासंग्रह, १२ पटकथा, १० पोवाडे आणि नाटकांसह विपुल साहित्य निर्माण केले. म्हणूनच त्यांना आपण साहित्यसम्राट संबोधतो.

कांशीराम यांनी घर बांधून दिले

बसपाचे दिवंगत नेते कांशीराम यांनी २००३ दरम्यान घर बांधून दिले. गृहप्रवेश करताना कांशीराम स्वतः उपस्थित होते. तीन खोल्यांच्या घरात आता मी राहते. १९९५-९९ दरम्यानच्या युती सरकारने माझ्या खात्यावर अडीच लाख रुपये डिपॉझिट केले आहेत. त्याचे दरमहा १३०० रुपये व्याज मिळते आहे.