आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:अरेबियन नाइट्स!

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. पण युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये फुटबॉल ही संस्कृती आहे. या अभिजात संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणजे ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा. अरबस्तानातील कतारमध्ये आजपासून या स्पर्धेचा थरार सुरू होतो आहे. त्यामुळं पुढचे २९ दिवस ‘अरेबियन नाइट्स’प्रमाणं सुरस फुटबॉलकथा अन् चर्चा ऐकायला मिळाल्या, तर नवल वाटू नये!

ट् वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाच्या वाटचालीला पूर्णविराम मिळाल्यावरही त्याचं कवित्व अद्याप सुरू आहे. अशातच, या क्रिकेट फीव्हरचं संक्रमण फुटबॉलमध्ये होणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ अशी फुटबॉलची ख्याती. त्यातील विश्वविजेतेपद म्हणजे तुलनेनं विश्वचषक क्रिकेटपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्कंठा अन् थरार! २००२ मध्ये दक्षिण कोरिया आणि जपानने भूषवलेल्या यजमानपदानंतर यावेळी कतारच्या रुपाने दुसऱ्यांदा आशिया खंडात ही स्पर्धा होत असल्यानं त्याचं आणखी अप्रूप! ९२ वर्षांचा इतिहास असलेली ही स्पर्धा गेली काही दशके मे-जून-जुलैमध्ये व्हायची. पण, कतारच्या तीव्र उन्हाळ्यातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ती खेळवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेचे आयोजन, लढती अन् चुरशीची उत्कंठा नि या खेळात आपण कुठे होतो, कुठे आहोत, याचा वेध घ्यायला हवा. कतार अन् ‘काफला’... गेल्याच आठवड्यात ‘फिफा’चे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी कतारला विश्वचषकाचे यजमानपद बहाल करणे, ही मोठी चूक असल्याची कबुली दिली होती. कारण विश्वचषक यजमानपदाची प्रक्रिया डागाळल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. २०१० मध्ये झुरिच येथे २२ सदस्यांची ‘फिफा’ कार्यकारिणी समिती यजमानपदाचा फैसला करणार होती. पण, मतासाठी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपामुळे दोन कार्यकारिणी सदस्यांची हकालपट्टी झाली. फुटबॉल इतिहासात त्याची नोंद सदैव घेतली जाईल. काही वर्षांपूर्वी ‘दी गार्डियन’ या वृत्तपत्रानं विश्वचषक तयारीच्या बांधकामासाठी परदेशी कामगारांना दिली जाणारी वागणूक जगासमोर आणली. याला कारण ठरली, ती आखाती देशांत स्थलांतरित कामगारांसाठी कार्यरत असलेली ‘काफला पद्धती’. चहूबाजूने टीका झाल्यामुळं कतारला कामगार धोरणात सुधारणा करावी लागली. यातून सावरत असतानाच कतारमधील मद्यधोरण फुटबॉलप्रेमी परदेशी चाहत्यांसाठी अडचणीचं ठरणार आहे. कारण कतारमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा गुन्हा आहे. यावर काही प्रमाणात दिलासा देण्याचं धोरणसुद्धा आखण्यात आलं आहे. त्यामुळे यजमान म्हणून प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या कतारला मैदानावर लक्षवेधी कामगिरी करणे अवघड असले, तरी यजमान म्हणून प्रतिमा सुधारण्याची संधी चालून आली आहे.

रोनाल्डो, मेसी, की..? पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी या फुटबॉलच्या महानायकांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न कारकीर्दीतील अखेरच्या विश्वचषकात साकारणार का, याची यंदा सर्वांना उत्सुकता असेल. याशिवाय, ब्राझीलचा नेमार आणि व्हिनिशियस ज्युनियर, फ्रान्सचे करिम बेन्झेमा, अँटोनी ग्रीझमन आणि किलियान एम्बापे, वेल्सचा गॅरेथ बेल, पोलंडचा रॉबर्ट लेवांडोवस्की, अर्जेंटिनाचा पावलो डायबाला, उरुग्वेचा लुइस सुआरेझ या तारांकित फुटबॉलपटूंच्या गोल कामगिरीकडं चाहत्यांचं लक्ष असेल. सर्वात समतोल संघ अशी ओळख असणाऱ्या गतविजेत्या फ्रान्ससह ब्राझील, अर्जेंटिना, बेल्जियम आणि पोर्तुगाल या पाच संघांना संभाव्य विजेता म्हणून गणले जात आहे. क्रोएशिया, उरुग्वे हे संघसुद्धा धक्कादायक निकाल नोंदवू शकतील. ३२ संघांचा समावेश असलेली ही अखेरची स्पर्धा आहे. कारण २०२६ पासून विश्वचषक स्पर्धा ४८ संघांपर्यंत विस्तारणार आहे.

अनवाणी पायांची आख्यायिका... फुटबॉलमधील भारताचं स्थान शोधायचं तर थोडं इतिहासात डोकवावं लागेल. स्वातंत्र्यानंतर आशियातील फुटबॉलच्या अव्वल तीन संघांमध्ये भारत गणला जायचा. १९५१ आणि १९६२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक भारतानं जिंकलं होतं. एस. ए. रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ४-२-४ अशा व्यूहरचनेसह खेळणारा पहिला आशियाई संघ ठरला होता. चुनी गोस्वामी, पी. के. बॅनर्जी आणि तुलशीदास बलराम ही त्रिमूर्ती या यशाची शिल्पकार. भारतीय फुटबॉलमध्ये त्यांना ‘ब्रह्मा - विष्णू - महेश’ म्हटले जायचे. भारतीय फुटबॉल संघ १९५० च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला पात्र ठरूनही अनवाणी पायांमुळे सहभागी होऊ शकला नाही, अशी एक आख्यायिका गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. मात्र, यात तथ्य नसल्याचा दावा अनेक जण करतात. ‘फिफा’च्या नियमानुसार विश्वचषक स्पर्धेत शूजसह खेळणे अनिवार्य होते. विश्वचषकात मातब्बर संघांकडून भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागेल. त्यामुळे १९४८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, ही भीती संघटकांना वाटत होती. याशिवाय, परदेशी चलनाची कमतरता आणि एक महिन्याचा ब्राझीलचा सागरी प्रवास या अडचणी समोर उभ्या ठाकल्याने भारताने माघार घेतली. त्याचप्रमाणे भारतीय संघाच्या खेळाडूंकडे ९० मिनिटांचा सामना खेळण्याची क्षमता नव्हती. १९७० पर्यंत भारतातील स्थानिक फुटबॉल सामने ७० मिनिटांचे खेळवले जायचे. त्यामुळे अखेरच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंची दमछाक व्हायची. वास्तववादी कारणे अनेक होती. शूज हे त्यापैकी एक असावे. भारतीय संघ विश्वचषक खेळला असता, तर देशातील फुटबॉल संस्कृतीमध्ये किती क्रांती घडली असती, याचा विचार त्या वेळी कुणीच केला नव्हता. अखेरच्या क्षणी विश्वचषकातून माघार घेतल्यामुळे ‘फिफा’ची नाराजी भारताने ओढवून घेतली. त्यामुळे १९५४ मध्ये भारताची प्रवेशिका फेटाळली गेली. हे शीतयुद्ध अनेक वर्षे सुरू होते. १९८० मध्ये भारतीय संघटनेचे सरचिटणीस अशोक घोष यांच्या प्रयत्नांमुळे १९८६ पासून विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारताला सहभागी होता आले.

...अन् उपेक्षेचं वास्तव ‘आमच्यावर रागवा, टीका करा; पण फुटबॉल सामने पाहायला मैदानावर या..’ असं भावनिक आवाहन भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने २०१८ मध्ये केले होते. भारतीय क्रीडाशौकिन देशातील फुटबॉल सामन्यांकडे पाठ फिरवतात, याकडं छेत्रीने लक्ष वेधलं होतं. अगदी इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या सामन्यांनाही मोजक्याच ठिकाणी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. खेळात जेव्हा नायक घडतात, तेव्हा खेळ विकसित होतो, हे क्रीडासृष्टीचे वैशिष्ट्य आहे. आता फुटबॉलमध्येही बायचुंग भुतियानंतर सुनील छेत्रीचे नायकत्व अधोरेखित होऊ लागले आहे. ही खेळासाठी सकारात्मक गोष्ट आहे. पण, ३८ वर्षांच्या छेत्रीनंतर कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पश्चिम बंगाल, गोवा, केरळ, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांत फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. ड्युरँड चषक ही देशातील सर्वांत जुनी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची जुनी स्पर्धा मानली जाते. इंग्लिश एफए चषक आणि स्कॉटिश एफए चषक स्पर्धेनंतर तिचा क्रमांक लागतो. याशिवाय; संतोष करंडक, फेडरेशन चषक, आयएफए चषकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा आपल्याकडं होतात. देशातील फुटबॉलचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी २००७ मध्ये आय-लीगला प्रारंभ झाला. मग २०१३ मध्ये ‘आयपीएल’च्या धर्तीवर ‘आयएसएल’ रुजवण्याचा प्रयत्न झाला. पण, नामांकित फुटबॉलपटूंना या व्यासपीठावर आणू न शकल्यामुळं त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. २०१७ मध्ये कुमार (१७ वर्षांखालील) आणि २०२२ मध्ये कुमारी विश्वचषक स्पर्धा भारतात झाल्या. सध्या भारतीय संघाचे फुटबॉल क्रमवारीतील स्थान १०६ वे आहे. जागतिक फुटबॉलच्या दृष्टीने हे फारसे समाधानकारक नसले, तरी भारताच्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीकडे पाहता ते आशादायी नक्कीच आहे. त्यामुळं कतारमधील फुटबॉल विश्वचषकाच्या ‘अरेबियन नाइट्स’चा आनंद अन् थरार अनुभवताना, भारतानेही फुटबॉलमधील ‘गोल्डन गोल’चं स्वप्न साकारण्यासाठी बॅक पोझिशन सोडून सेंटर फॉरवर्डला येऊन प्रयत्न करायला हवे.

प्रशांत केणी prashantkeni@gmail.com

संपर्क : 9821407660

बातम्या आणखी आहेत...