आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:खरचं तालिबानी बदलताहेत...?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाज़िया हया

शाज़िया हया ही बीबीसीची पत्रकार.... तब्बल दोन दशकांनंतर अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात दोहा येथे जी शांतता कराराची परिषद झाली त्याचे वृत्ताकंन करणारी ही पत्रकार. तालिबानींची महिलांच्या अधिकारांबद्दलची भूमिका, त्यांच्याच होऊ घातलेला बदल आणि तालिबानींमधील जनरेशन गॅप हे सगळे विषय एका महिलेच्या नजरेतून शाज़ियाने टिपले...

माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगण्यात आले आहे हे मला माहित नाही, परंतू मी कोणी खुनी नाही. इथे मी राजकारणावर नाही बोलणार, परंतू तुम्हा सगळ्यांसोबत चहा मात्र नक्की घेणार आणि काही कवितादेखील ऐकवणार अतिशय मृदू स्वरात हसतमुख चेहऱ्याने ते बोलत होते. तालिबानचा सदस्य... आणि अशा पद्धतीचं बोलणं! माझा यावर विश्वासच बसत नव्हता. तब्बल दोन दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील ऐतिहासिक चर्चा कतारमधील दोहा येथे संपन्न होणार होती. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे आता अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेचा मार्ग मोकळा झाला होता. आणि पत्रकार या नात्याने मला ही ऐतिहासिक चर्चा कव्हर करण्याची संधी मिळाली होती. तालिबानी नेत्याची मुलाखत घेण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ज्या नरमाईने ते माझ्याशी बोलले तेव्हा मला धक्काच बसला. जिथे ही चर्चा होणार होती त्या दोहाच्या आलिशान शेराटॉन हॉटेलमध्ये मी जेव्हा दाखल झाले तेव्हा तालिबानचे अनेक सदस्य इथे-तिथे फिरताना मी पाहिले. मी माझी बॅग ठेवली आणि लगेचच मुलाखतीसाठी धावपळ सुरू केली. मला पाहिल्यावर तालिबानच्या नेत्याने लगेचच सांगितले की, मी तुमच्याशी बोलणार नाही.

मला पाहिल्यानंतर त्यांना वाटणारी असहजता माझ्या लक्षात आली होती. मी लगेचच जरा मागे हटली आणि त्यांना हसतच म्हणाली,मी इथे फक्त कॅमेरा पकडणार आहे. मुलाखत माझा पुरुष सहकारीच घेईल.

दोहामध्ये काम करणे किती कठीण असणार आहे याचा अंदाज मला हळूहळू यायला लागला होता. शेवटी बराच खटाटोप करून मी त्या तालिबानी नेत्याची मुलाखत घेतलीच, परंतू पूर्ण मुलाखतीदरम्यान तालिबानी माझ्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. पुरुषांसोबत ही मंडळी जितक्या सहजतेने वावरत होते तितकी सहजता माझ्याशी बोलताना त्यांना जमत नव्हती. जी महिला तुम्हाला परिचीत नाही त्या महिलेशी नजर भिडवणे हे आजही तालिबानी अपमानकारक आणि गुन्हा असल्याचे समजतात. मी एका वरिष्ठ तालिबानी नेत्याची तीन मिनिटे मुलाखत घेतली, परंतू त्यादरम्यान त्याने एकदाही त्याची नजर उंचावली नाही.

मला मात्र त्यांच्या या कृतीने जराही आश्चर्य वाटले नाही. वर्षानुवर्षे लपूनछपून लढणारे आता तुमच्या समोर उभे आहेत आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत हीच अधिक आश्चर्यकारक बाब आहे. अगदी असे काही घडू शकेल याची कल्पना काही महिन्यांपूर्वीही करणे अशक्य होते. माझ्यासमोर एक इतिहास साकारत होता... २००२ पासून मी अफगाणिस्तानमध्ये कित्येक बदल पाहिले होते. तालिबान्यांना हुसकावून लावल्यानंतर नवा अफगाणिस्तान जन्माला आला तेव्हापासून त्यांचा आणि तालिबान्यांचा रक्तरंजित संघर्ष मी फार जवळून पाहिला होता. १८ वर्षे झाली... समझोत्याच्या व्यासपीठावर आता उभय पक्ष एकत्र बसायला तयार झाले होते.

काबूलवरून आमचे विमान दोहासाठी उडाले आणि मुलाखतींचे प्रश्न काय काय असू शकतील याचा विचार करू लागले. अचानक मी कोणता ड्रेस घालू या प्रश्नाने छळायला सुरूवात झाली. खरं म्हणजे मनात असा प्रश्न उद्भवणे हेच मुळात हास्यास्पद होते परंतू माझ्या पुरूष सहकाऱ्यांना असा प्रश्न पडणारही नाही याचीही मला खात्री होती. महिलांचे स्वातंत्र्य, अधिकार याबाबतीत तालिबान्यांची कट्टरता मला चांगलीच माहित होती... आणि म्हणूनच महिला पत्रकार या नात्याने हा प्रश्न निर्माण झाला होता. तालिबानी नेत्यांची मुलाखत मिळवणे हे माझ्यासाठी अति महत्वाचे होते आणि माझ्या पोषाखामुळे कदाचित ती संधी हिरावली असती... आज जो पोषाख घालून मी दररोज ऑफिसला जाऊ शकते, काबूलच्या गल्लोगल्ली फिरू शकते, दोहा येथे सुरू असलेली ही परिषद कव्हर करू शकते तेच कपडे मी १८ वर्षांपूर्वी घालू शकली असती का? मला आठवतयं... तालिबान्यांनी महिलासाठी कठोर ड्रेसकोड लागू केला होता. जर महिलांनी निळ्या रंगाची चदरी (डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत झाकलेला हिजाब) ओढलेली नसेल तर त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जायची. मी अवघ्या चार वर्षांची होती... अम्मीसोबत निघाली होती मावशीकडे जायला. अम्मीने चदरी ओढली होती. मावशीचे घर जवळ आले आणि अम्मीने चदरी खाली ओढली ज्यामुळे तिचा चेहरा दिसू लागला. नेमक्या त्याचक्षणी एक तालिबानी हातात हंटर घेऊन अम्मीच्या पुढ्यात उभा राहिला आणि अपना चेहरा ढँको असं इतक्या मोठ्याने किंचाळला की आजही तो प्रसंग माझ्या आयुष्याचा थरकाप उडवण्यासाठी पुरेसा ठरतो. परिषदेत एका तालिबानी नेत्याला ही घटना मी मुद्दामच सांगितली आणि आता याबाबतीत तुम्ही काय विचार करता असा प्रश्न केला. त्यानेही अतिशय शांतपणे, भुतकाळात काही चुका निश्चितच झाल्या असल्या तरी भविष्यात मात्र त्याची पुनरावृत्ती होणार नसल्याचे सांगितले. तालिबानचे शिष्टमंडळ जर आज काबूलला गेले तर त्याना नेमका हाच बदल पाहायला मिळू शकेल. बदललेल्या अफगाणिस्तानात आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळत आहे. संसदेत तर २५ टक्के आरक्षण महिलांसाठी आहे. माध्यमाच्या आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात युवतींची संख्या लक्षणीय आहे. शिक्षण क्षेत्रात स्त्रियांच्या वाढत्या सहभागाने अफगाणिस्तानचा चेहरा खुपच बदलला गेलाय. मध्यंतरी मी बऱ्याच कालावधीनंतर काबूलच्या रस्त्यावर फिरत असताना अनेक होर्डिंग्जने माझे लक्ष वेधून घेतले ज्यावर एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी एकत्रपणे शाळेत जाताना दिसत आहेत आणि स्लोगन होतं... आओ, पढाई करे.. तालिबानी राजवटीत माझी

बहीण शाळेत जाऊ शकत नव्हती. मात्र आजच्या ताारखेला अफगाणिस्तानमध्ये किमान एक कोटी मुलं शालेय शिक्षण घेत आहेत ज्यात मुलींची संख्याही तितकीच लक्षणीय आहे.

हॉटेलच्या लॉबीमध्ये अनेक विदेशी महिला पत्रकार वेगवेगळ्या पोषाखांमध्ये फिरत होत्या आणि तालिबान्यांना आता त्याचं फारसं काही वाटत नव्हतं. अफगाणी सरकार आणि तालिबानी यांच्यात जो शांतता करार होत आहे त्यात महिलांचे स्वातंत्र्य आणि अधिकार या विषयावर एकमत होईल का, असा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. या परिषदेत अफगाणी सरकारकडून तालिबानींशी वाटाघाटी करण्यासाठी पाच महिला प्रतिनिधी होत्या. मला हे चित्र खुपच आश्वासक वाटलं. दुसऱ्या बाजूला तालिबानींच्या शिष्टमंडळात मात्र एकही महिला नव्हती. एका नेत्याला मी हे मुद्दाम विचारलं, त्यावर तो म्हणाला की, आमच्या महिला या शिकल्या- सवरलेल्या आहेत. त्या नेहमी बिहाईंड द सीन (पडद्याच्या मागे) काम करतात आणि त्यांचे इथे येणे अशी परिस्थिती अद्याप तरी निर्माण झालेली नाही. मात्र महिला जर काम करू इच्छित असल्या तर तालिबानची त्याला काहीही हरकत नसेल.

दोहाच्या या परिषदेत तालिबानी जनरेशन गॅप फारच इंटरेस्टिंग होती. एका गटात सगळे वरिष्ठ तालिबानी नेते असायचे ज्यांच्या चेहऱ्यावर कायम धीरगंभीर कठोर भाव दिसायचे. ती मंडली नेहमी पहिल्या रांगेत बसायची. पाठीमागच्या रांगेत मात्र सगळे युवा तालिबानी असायचे जे अतिशय सहज आणि नैसर्गिकरित्या वावरत होते. जेव्हा तालिबानी शिष्टमंडलाचे मुख्य मुल्ला बरादर यांनी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथील वातावरण एकदम बदलून गेले. शांत... धीर गंभीर... मात्र जेव्हा ते हॉलमध्ये नसायचे तेव्हा हे युवा तालिबानी मोकळेपणाने बोलायचे, वागायचे. माझं स्त्री असणं हा मुद्दा या युवा पिढीसाठी फारसा महत्वाचा नव्हता. त्यांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. तालिबानी जे काही निर्णय घेतात त्यात या तरुणाईला आणि महिलांना काहीच स्थान नसते. मात्र तालिबान हे देखील ओळखून आहे की अफगाणी लोकसंख्येचा अधिकाधिक हिस्सा आज युवा आहे. शिक्षण, इंटरनेट आणि स्मार्टफोनची ही पिढी आहे आणि त्यांना देशाच्या भविष्यामध्ये त्यांच स्थान हवे आहे.

कसे असेल या युवा तालिबानींचे भविष्य...?

दोहामध्ये मी जे काही पाहिलं ते एक सकारात्मक चित्र निश्चितच आहे, मात्र दुसऱ्या बाजूला हे ही तितकंच खरं आहे की, फक्त कडक इस्त्री केलेले कपडे घालून या परिषदेमध्ये मिरवणाऱ्या तालिबानी नेत्यांशिवाय आजही तालिबान्यांचे काही गट असे आहेत ज्यांच्या अंगावर कायम युद्धजन्य पोषाख असतो आणि आजही अफगाणी सीमेवर त्यांचे अफगाणिस्तान सरकारविरुद्ध सतत युद्ध सुरू आहे. (सौजन्य : बीबीसी)

बातम्या आणखी आहेत...