आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Arrangement Of Oxygen Pipelines From The Crowd At The Covid Center; The Initiative In Chopda Proved To Be An Ideal In The Battle Of Corona In 15 Talukas

मंडे पॉझिटिव्ह:कोविड सेंटरमध्ये लोकवर्गणीतून ऑक्सिजनच्या पाइपलाइनची व्यवस्था; चोपड्यातील उपक्रम ठरला 15 तालुक्यांतील कोरोना लढ्यात आदर्श

विकास पाटील | जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा येथे करण्यात आलेली ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था.
  • अमळनेर, पारोळा, धरणगाव, जामनेर, बोदवड, रावेरमध्ये काम पूर्ण, इतर तालुक्यांमध्ये प्रगतिपथावर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांवर गेली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्थानिक प्रशासनासोबतच प्रत्येक घटक पूर्ण क्षमतेने लढत आहे. या लढ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील जनतेने आदर्श निर्माण केला असून नागरिकांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लोकवर्गणीतून पाईपलाईनची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांतून रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने वैद्यकीय यंत्रणेलाही आधार झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील हा पॅटर्न कौतुकास्पद ठरत आहे.

बोथरा बंधूंकडून ३० खाटांसाठी व्यवस्था

चोपड्यातील लोकसहभागाचा प्रयोग पाहून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये हा प्रयोग राबवला. त्यानंतर अमळनेर, पारोळा, धरणगाव, जामनेर, रावेर, बोदवड या तालुक्यांत ऑक्सिजन पाइपलाइनचे काम पूर्ण झाले तर इतर तालुक्यांमध्येही काम प्रगतिपथावर आहे. अमळनेरच्या बोथरा बंधूंनी तर ३० खाटांसाठी ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था करून दिली.

मजूर, शेतकरी धावले मदतीला : 

केवळ ऑक्सिजन पाइपलाइनच नव्हे , तर बेडशीट, शुद्ध पाणी, व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीन, पीपीई किट असे साहित्यही लोकसहभागातून उपलब्ध झाले आहे. अगदी तळहातावर पोट असलेले मजूर, शेतकरी, नाेकरदारही यात मदतीला धावले. १०० रुपयांपासून लाखांपर्यंत त्यांनी मदत दिली.

चोपड्यात ६.५ लाख वर्गणी

कोरोना रुग्णांवरील उपचारांत शासन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देत आहे. मात्र, नियमित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते एस. बी. पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे तालुकावासीयांना यासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले. अवघ्या काही दिवसांत साडेसहा लाख रुपये जमा झाले. चार दिवसांत चोपड्याच्या सेंटरमध्ये ९० बेडसाठी ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था झाली.

जिल्हाभर ऑक्सिजन पाइपलाइनचे काम

चोपड्यात लोकसहभागाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले. त्यास सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला. ‌-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव