आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर रिएक्सप्लोअर्ड:कबीराचा मार्ग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षाराणी पांढरे
‘पंथ’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘पथ’ म्हणजे ‘मार्ग’ असा होतो. ‘कबीर पंथ’ म्हणजे ‘कबीराचा
मार्ग’ होय. ‘कबीर पंथ’ हा स्वत: कबीराने सुरु केला की कसे याबद्दल निश्चितपणे सांगता येत
नाही. मात्र, कबीराच्या पश्चात त्याच्या अनुयायांकडून कबीराच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक पंथ सुरु केले गेले असल्याचे खात्रीलायकरित्या मानले जाते. भक्ती परंपरेतील महान संत कबीर आणि त्याच्या मागून उदयास आलेल्या कबीर पंथाचा आढावा घेणारा हा लेख...

भारताच्या इतिहासासात मध्ययुग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळात भक्ती संप्रदाय हा उदयाला येऊन प्रचंड मोठ्याप्रमाणात भरभराटीस आला. भक्ती संप्रदाय हा ‘भक्ती मार्ग’ वर आधारलेला होता. ‘भक्ती मार्ग’ हा सर्वसामान्यांना अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने अनुष्ठानविरहित ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवू शकत होता. भक्ती मार्गाचा हा सरळसोटपणा हे भक्ती संप्रदायाच्या भरभराटीचे गमक होते. भक्ती मार्ग जरी सरळसोट वाटत असला तरी तो तत्कालीन समाजातील प्रस्थापित रूढी-परंपरा, चालीरिती, धार्मिक कर्मठपणा-अनुष्ठाने, अस्पृश्यता, जातीयता, विषमता या सर्वांविरोधात विविध सामाजिक समूहांचे विविध पातळीवरील विद्रोहाला प्रतिबिंबित करत होता. प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून भक्ती परंपरेतील महान संत कबीर आणि त्याच्या मागून उदयास आलेल्या कबीर पंथाचा आढावा घेतला आहे. साधारणपणे पंधराव्या-सोळाव्या शतकात कबीर हे सर्वदूर पसरलेले प्रभावशाली नाव होते. कबीराच्या पूर्वायुष्याबाबत विश्वसनीय माहिती मिळत नाही. कबीराचे दोहे, रचना, पदे अतिशय विपुल प्रमाणात उपलब्ध असून देखील कबीरावर तो अमुक-अमुक धर्माचा असा दावा करता येत नाही. कबीरानेच तशी सोय ठेवली नाही. कबीराच्या रचना या पूर्वी अनुयायांकडून मुखोद्गत करण्यात आल्या आणि नंतर कधी तरी त्या एकत्रितपणे संकलित केल्या गेल्या. कबीराच्या रचनांना स्मृतींमध्ये जतन करण्याच्या आणि पुढे या स्मृतींना संकलित करण्याच्या प्रक्रियेमध्ये कबीराच्या रचनेत काही प्रमाणात बदल झाले. कबीराच्या काही रचना विस्मृतीत गेल्या असाव्यात तर काही नवीन रचनांची भर कबीराच्या नावाने झाली असावी. कबीराचे मूळ दोहे आणि नंतर जोडले गेलेले दोहे यांच्यातील फरक ओळखणे कठीण आहे. कबीराच्या रचना या कबीर बीजक, आदिग्रंथ म्हणजेच गुरुग्रंथसाहिब, कबीर ग्रंथावली, कबीर परछाई, साखी ग्रंथ इत्यादी संकलनात आढळतात. कबीराच्या रचनांवर हिंदू,मुस्लिम, सुफी, योगमार्गी, नाथपंधी यासर्वांचा प्रभाव आढळतो. कबीराने कोणताही विशिष्ठ पंथ किंवा धर्म न अनुसरता स्वअनुभवाच्या ज्ञानाला अधिक महत्त्व दिले. कबीराने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांची चिकित्सा केली. तत्कालीन लोकांना कबीराने दाखवून दिले की, कशाप्रकारे धार्मिक नेतृत्व करणारे लोक धर्माचा खरा उपदेश व सार समजावून न सांगता सर्वसामान्यांना औपचारिक कर्मकांडे –अनुष्ठांनाच्या नादी लावतात आणि स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात. धर्ममार्तंडांच्या कथनी आणि

करणी मधील फरक कबीराने लोकांसमोर उघडा पाडला. बनारस सारख्या ठिकाणी अशाप्रकारचे विद्रोही-क्रांतिकारी विचार लोकांच्या ब्रज आणि अवधी धाटणीच्या बोलीभाषेत मांडण्याचे धैर्य कबीराने केल्याने त्याला कोणत्या प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागले असेल याची कल्पना करता येत नाही. कबीर ज्यांना भावला तो समाज हा जातीव्यवस्था, शोषण, गरिबी आणि निरक्षरतेमुळे येणाऱ्या धार्मिक अज्ञानतेचा बळी होता. परमेश्वर आणि भक्त यांचे एकत्व, सर्वांप्रती प्रेमभाव, मानवता आणि शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा असा साधा सोपा कबीराचा ‘भक्ती मार्ग’ होता. कबीराच्या या विचाराचा प्रभाव अनेक शतके समाजावर कायम राहिला आहे. कबीर हा धार्मिक कर्मकांडे, धार्मिक अस्मितादर्शता आणि धार्मिक विद्वेष याच्या विरोधातील विद्रोहाचा प्रतिक बनला आहे. ‘पंथ’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘पथ’ म्हणजे ‘मार्ग’ असा होतो. ‘कबीर पंथ’ म्हणजे ‘कबीराचा मार्ग’ होय. ‘कबीर पंथ’ हा स्वत: कबीराने सुरु केला की कसे याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, कबीराच्या पश्चात त्याच्या अनुयायांकडून कबीराच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक पंथ सुरु केले गेले असल्याचे खात्रीलायकरित्या मानले जाते. कबीराला लोकांमध्ये आधीपासूनच आदराचे स्थान असल्यामुळे या पंथांना चांगला प्रतिसाद मिळत गेला व कबीराचे विचार सर्वदूर पसरले. कबीराच्या भक्ती मार्गाच्या प्रभावाने ‘कबीर पंथ’ नावाचे अनेक पंथ देखील भरभराटीस आले. मात्र, या अनेक कबीर पंथांमध्ये आचार विचारांच्या बाबतीत एकवाक्यता आढळत नाही. कबीराने ज्या धार्मिक कर्मकांड-अनुष्ठानांना, धार्मिक नेतृत्वपणाला विरोध केला त्यांचेच अवडंबर काही कबीर पंथी करताना आढळतात. तर काही कबीर पंथांनी या धार्मिक कर्मकांडे-अनुष्ठाने पूर्णपणे मोडीत काढली. अनेक कबीर पंथांमधील दोन ‘कबीर पंथ’ हे प्रमुख मानले जातात आणि त्यांच्या देखील देशोदेशी अनेक शाखा आहेत. बनारस येथील ‘कबीर चौरा’ आणि मध्यप्रदेश येथील ‘धर्मदासी पंथ’ हे दोन कबीर पंथ प्रमुख आहेत. वेगवेगळ्या कबीर पंथी साधनांच्या आधारावर असे कळते की, बनारस येथील कबीराचे घर हे मठ म्हणून स्थापन केले गेले व ‘कबीर चौरा’ हा पंथ स्थापन झाला. या पंथाची स्थापना सुरत गोपाल नावाच्या कबीर शिष्याने केली. दरवर्षी होणाऱ्या यात्रेत नव्या अनुयायांना ‘कबीर चौरा’ची दीक्षा दिली जाते. ‘धर्मदासी’ किंवा ‘छत्तीसगढी’ या कबीर पंथांची स्थापना धर्मदास नावाच्या अनुयायाने साधारणपणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस मध्यप्रदेशात बांधोगढ येथे केली. धर्मदासी पंथाच्या देखील अनेक शाखा-उपशाखा आहेत. कबीर पंथाचा एक प्रमुख धर्मगुरु असतो ज्याला आचार्य असे देखील म्हणतात. साधारणपणे कबीर पंथाच्या विविध शाखांमधील शाखाप्रमुखास महंत म्हणतात. कबीर पंथाचे अनुयायी होण्यासाठी विशिष्ट पद्धतीने दीक्षा देण्याचा विधी केला जातो. दीक्षा घेणाऱ्याला कंठा म्हणून ओळखली जाणारी तुळशीमाळ घालावी लागते. तत्पश्चात बंदगानी म्हणजे नामजप केला जातो आणि रात्री सर्व उपस्थितांसाठी भोजन समारंभ केला जातो. कबीर पंथाची दीक्षा घेणाऱ्यास आपले घरदार सोडून मठामध्ये वास करावा लागतो. त्याला गुरूची सेवा करावी लागते. महंत आपल्यामागे ‘महंत’ पदावर एखाद्या चांगल्या अनुयायाची निवड करून ठेवतो. महंताचे संन्यासी आणि गृहस्थ असे दोन वर्ग आहेत. संन्यासी महंतास ‘पर्वत’ तर गृहस्थ महंतास ‘गिर’, ‘अतिथी’, ‘पुरी’ किंवा ‘भारथी’ अशा उपाधी दिल्या जातात. गृहस्थ महंत हे सहकुटुंब आपल्या मठात राहतात मात्र संन्यासी महंताहून यांचा दर्जा हीन मानला जातो. कबीर पंथात विशेषत: धर्मदासी पंथात चौका विधी, जोतप्रसाद , परवाना इत्यादी विधींना फार महत्त्व

आहे. मात्र, नंतरच्या काळात ‘कबीर चौरा’ या कबीर पंथाने ‘चौका विधी’ ही प्रथा आपल्या पंथातून समूळ नष्ट करून टाकली. चौकाविधी ही प्रथा कबीराने स्वत: कधीही पुरस्कृत केली नव्हती. मात्र, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात कबीर पंथीयांमध्ये विस्तृत प्रमाणात फैलावली होती. ‘धर्मदासी’ पंथाचा संस्थापक असलेल्या धर्मदास यांनी असा दावा केला की, कबीराने स्वत: प्रकट होऊन धर्मदास यांना साक्षात्कार दिला की धर्मदास हे एक दैवी अवतार म्हणजे सतपुरुष आहेत जो या जगातील प्रत्येक युगात वेगवेगळ्या अवताराच्या रुपात पुनर्जन्म घेत राहील. धर्मदास यांनी ‘सागर’ नावाचा नवीन ग्रंथ लिहिला. या ग्रंथात कबीराची मूळ शिकवण आणि काही नवीन शिकवण याची भर टाकली गेली. तसेच चौका ही विधी समाविष्ट करण्यात आली. ‘धर्मदासी पंथ’ हा झपाट्याने सर्वदूर पसरला आणि त्याच्या अनेक शाखा प्रस्थापित झाल्या. कबीराच्या शिकवणुकीची धर्मदासी नवीन आवृत्ती लोकांना अधिकाधिक आकर्षित करू लागली आणि कबीर पंथांतील ‘धर्मदासी पंथ’ हा सर्वात लोकप्रिय पंथ बनला. धर्मदासी पंथाचा वार्षिक उत्सव छत्तीसगढ येथील दामाखेडा या ठिकाणी असतो आणि लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित असतात. सुप्रसिद्ध इतिहासकार डेव्हिड लॉरेनज यांनी चौका विधीची तुलना ही हिंदू धर्मियांत प्रचलित असणाऱ्या ‘सत्यनारायण’ व्रताशी केली आहे. चौका विधीमध्ये सत्यपुरुषचा अंश असलेला कबीर - कबीराचा अंश असलेल्या महंताची सामुहिक पूजा केली जाते. महंताला विविध फळ-वस्तू अर्पित करून कबीराचे दोहे, भक्तीगीते म्हटली जातात. धर्मदासी पंथीयातील काही जणांना ही चौका विधी विवेकनिष्ठ वाटत नाही म्हणून ते व्यक्तिगत पातळीवर विरोध करतात. त्यांच्या अनुसार कबीराने ज्या कर्मकांडाला विरोध केला तेच कर्मकांड चौका विधीत केले जाते व इतर धर्मातील रितीरिवाज हे स्वरूप बदलून अवलंबले जातात. कबीर चौरा पंथातील विवेकदास यांनी अलीकडच्या काळात चौका विधीचे झालेले व्यवसायीकरण, बाजारीकरण हे सडेतोड पद्धतीने कबीर पंथीयांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. चौका विधी दरम्यान गायिली जाणारी गीते, आरती ही कबीराच्या क्रांतिकारी विचारावर हिंसक हल्ला चढवल्या सारखी आहेत हे दाखवून दिले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खऱ्या अर्थाने विवेकदास यांनी कबीर पंथाला ‘लोकल ते ग्लोबल’ स्वरूप प्राप्त करून दिले. विविध देशात प्रत्यक्ष जाऊन त्याचा प्रसार केला. कैरेबियन देशांत आणि उत्तर अमेरिकेत देखील कबीर चौरा या कबीर पंथाचे अनुयायी आढळतात. एकविसाव्या शतकामध्ये कबीर पंथाच्या सद्यकालीन परिस्थिती समजण्यासाठी शबनम वीरमणी यांची ‘कबीरा खडा बाजार में’ ही डॉक्युमेंटरी फिल्म अत्यंत उपयुक्त आहे. सहाशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या कबीराचा शोध घेण्याचा प्रयत्न ही फिल्म करते. आज कबीर आपल्याला धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये दिसून येतो. एकीकडे कबीर हा सर्वसामान्य कबीरपंथीयांना पूजनीय देवता वाटतो. तर दुसरीकडे ‘एकलव्य’ सारख्या कबीरपंथीयांच्या सामजिक कार्य करणाऱ्या पुरोगामी संघटनेला कबीर हा धार्मिक अवडंबरावर तीक्ष्ण प्रहार करणारा क्रांतिकारी वाटतो. प्रस्तुत डॉक्युमेंटरी फिल्म ही मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात राहणारे दलित लोकगायक प्रल्हाद टिपान्या यांच्या जीवनपटाचा माग घेताना कबीर पंथातील विरोधाभास उजागर करते. मुळचे लोकगायक असलेले प्रल्हाद टिपान्या हे ‘एकलव्य’ संघटनेसाठी देखील काम करत होते. मात्र, नंतरच्या

काळात ते तेथील कबीर पंथाच्या शाखेचे महंत झाले. महंत झाल्यानंतर प्रल्हाद टिपान्या हे त्यांच्या
सीमाकक्षात येणाऱ्या पंथातील अनिष्ट चालीरीती नष्ट न करता केवळ इतर महंतांवर शाब्दिक टीका
करताना दिसतात. सबब, प्रल्हाद टिपान्या यांचे ‘एकलव्य’ संघटनेतील पूर्वाश्रमीचे सहकारी त्यांची
निंदा करतात.
कबीर पंथामध्ये अशापद्धतीने दोन्ही प्रकारचे प्रवाह हे समांतर वाटचाल करताना दिसतात.
कबीर पंथामध्ये जातीव्यवस्था आणि रूढीवादी कर्मकांडे प्रचलित असून या प्रथांचा समर्थन करणारा
प्रवाह जसा अस्तित्वात आहे तसाच त्या विरोधात आवाज उठवणारा विद्रोही प्रवाह देखील कबीर
पंथात वाहता आहे.
कबीराने स्वत:चा पंथ स्थापन केला नसला किंवा कबीराचा एकच एकच कोणताही पंथ नसला
तरी कबीराने सांगितलेला भक्ती मार्ग आणि विद्रोहाचा मार्ग अवलंबणारे कबीर मार्गी सर्वकाली
अस्तित्वात होते. भारतातील तत्त्ववेत्ते, साहित्यिक, कवी, राजकीय कार्यकर्ते यांच्यापैकी काहीजणांवर
कबीराचा प्रभाव कायम राहिला आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्या तीन गुरुंच्या नावात
गौतम बुद्ध आणि महात्मा फुले यांच्या सोबत कबीराच्या नावाचा समावेश केला आहे.
जातिव्यवस्थेच्या आधारे प्रस्थापित धर्ममार्तंडांचे वर्चस्व झुगारून मानवमुक्तीचा पथ शोधण्यात डॉ.
बाबाबासाहेब आंबेडकरांना कबीरने निश्चितच काही प्रमाणात मार्ग दाखवलेला असावा. विणकर
कबीराचा मार्ग जसा ज्ञानाच्या मक्तेदारी विरोधात होता तसाच तो दोन धर्मांतील लोकांच्या मनात
एकत्वाची वीण साधण्याच्या पक्षातील होता. सन १९९० नंतर वाढलेल्या धार्मिक उन्मादाच्या
परिस्थितीत आमचे शिवणकामाचा व्यवसाय करणारे एक दिवंगत गझलकार मित्र मलिक नदाफ
जेंव्हा पुढील ओळी लिहितात तेंव्हा ते देखील मला कबीर मार्गी वाटतात.
‘कबीर समाज विणत गेला, मलिक समाज शिवत गेला’
ह्या वेड्यांना धर्मांध इसम, अखंड सलत गेला.
भगवे, हिरवे, निळे, काळे, धांगे गुंफत रोज गेले
विभिन्नरंगी धर्मधागा, मनास जखमा करत गेला.’

varshapandhare@gmail.com

बातम्या आणखी आहेत...