आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:'न्यूज रुम'च्या नावाखाली दरबार...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेजिंदर सिंह सोढी

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणापासून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणापर्यंतच्या प्रवासात अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक चॅनेलला अनेक अनुभवी आणि संवदेनशील पत्रकारांनी रामराम ठोकला...आत्ममग्न स्वभाव, पत्रकारितेची हत्या, ढोंगी राष्ट्रवाद आणि अर्णबची स्वत:ची घराणेशाही अशा वेगवेगळ्या कारणांनी हे पत्रकार "रिपब्लिक'मधून बाहेर पडले. अर्णब गोस्वामीचे हे नावालाच प्रजासत्ताक चॅनेल आहे मात्र त्यात प्रत्येकवेळी लोकशाहीचा खुन पाडला जातो. हे चॅनेल म्हणजे न्यूज रुमच्या नावाखाली एक दरबार आहे असा आरोप या मंडळींनी केलायं.

पत्रकारितेची साडेतीन वर्ष हत्या केल्यामुळे मी माफीनामा लिहून अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टिव्हीचा राजीनामा दिला आहे. २७ ऑगस्ट रोजी रिपब्लिक चॅनेलचे जम्मू-काश्मीर ब्युरोचिफ तेजिंदर सिंग सोढी यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आणि त्यांनी रिपब्लिकच्या एचआर विभागाला पाठवलेले लांबलचक पत्र लगेचच व्हायरल झाले. अर्णबसोबत काम करताना आलेले भयावह अनुभव तेजिंदर यांनी त्यांच्या या पत्रात नमूद केले आहेत. तेजिंदर सिंग सोढी यांच्या राजीनामा पत्राचा हा संपादित अंश... त्यांंच्याच शब्दात!

सुपारीबाजसारखे काम ...

समाजातल्या शोषित-वंचितांसाठी, ज्यांचा आवाज दाबला जातोय अशांचा रिपब्लिक चॅनेल हा आवाज असणार आहे, असा विश्वास जेव्हा अर्णव गोस्वामीने मला दिला तेव्हा मी त्याच्यासोबत काम करायला तयार झालो. परंतु फार लवकरच माझ्या लक्षात आले की, चॅनेलमधील आमच्यासारख्या पत्रकारांचा वापर अर्णब फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी आणि लोकांवर निशाणा साधण्यासाठी करतोय. याचा अनुभव मला सर्वप्रथम आला जेव्हा माझ्यासह चॅनेलच्या सर्व पत्रकारांना सांगण्यात आले की हातात एक पोस्टर घ्या, तोंडाला काळी पट्टी बांधा आणि आपापल्या राज्यातील कॉँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर निदर्शन करा. मला प्रश्न पडला की हे एका पत्रकाराचे काम कसे असू शकेल? मात्र त्यावेळी नाईलाजास्तव हे काम करावे लागले. सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात तर मला धक्कादायक अनुभव आला. मला सांगण्यात आले की, सुनंदा पुष्करच्या घराजवळ लपून बस आणि माझ्या पुढच्या सुचनेची वाट बघ.. लपून का बसायचं? कारण अर्णबला त्याच्या सहकाऱ्यांवरही भरोसा नसायचा. त्याच्या मेंदूत जे काही पिकायचं ते तो सहकाऱ्यांना अगदी शेवटच्या क्षणी सांगायचा. झालंही नेमकं तसंच... मला अचानक सुनंदा पुष्करच्या घरात घुसायला सांगण्यात आले आणि माइक सुनंदाच्या वयोवृद्ध वडिलांच्या तोंडाजवळ नेऊन जबरदस्तीने हे वदवून घ्यायला सांगितले की, त्यांच्या मुलीच्या हत्येसाठी कॉँग्रेसचे खासदार

शशी थरूरच जबाबदार आहेत. मी तसा प्रयत्न केला पण नंतर वडिलांची अवस्था मला बघवेना. त्यांना बघून माझ्या डोळयातही अश्रु आले आणि मी हतबल झालो. हे काम मी करणार नसल्याचे डेस्कला कळवले. मात्र मला सांगण्यात आले की, अर्णब प्रचंड चिडले आहेत. अर्थातच हे काम मी केले नाही, मात्र घरातल्या नोकराची मुलाखत घेतली, ज्याने शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या नात्यामधल्या खुप चांगल्या गोष्टी शेअर केल्या होत्या. अर्थातच नोकराची ही मुलाखत कधीच प्रदर्शित झाली नाही...

जम्मू आणि काश्मीर ब्युरोचिफ असल्यामुळे माझं मुख्य काम हे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधणे हे होतं. उमर अब्दुल्ला काय बोलतात, मेहबूबा मुफ्ती काय बोलतात यावर बारकाईने निरिक्षण करायचं आणि त्यातला निवडक भाग वेगळा काढायचा किंवा त्यांच्या वाक्यांचा वेगळाच अर्थ काढायचा आणि त्यांना देशद्रोही ठरवायचं... ही जबाबदारी मी अतिशय चांगल्याप्रकारे निभावली मात्र तरीही अर्णबचं समाधान होत नसायचं... बॉलीवूडच्या सिनेमामध्ये चेज सिक्वेन्स म्हणजे सतत एखाद्याचा पाठलाग करत राहणे नावाचा एक प्रकार असतो. अर्णबने आपल्या चॅनेलसाठी हा प्रकार अतिशय खुबीने स्वीकारलाय. प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सतत पाठलाग करणे, त्यांच्या तोंडात अक्षरश: माईक घुसवणे, सतत उत्तर मागणे, त्याला इरिटेड करणे हे प्रकार आम्हाला शिकवण्यात आले होते. भाजपमध्ये सारं काही आलबेल हे अस नाही, मात्र तरीही भाजपच्या बाबतीत असले प्रकार फारच कमी व्हायचे. भारतीय सैन्यासंबंधी खुप मेहनत घेऊन मी एक स्टोरी केली होती. नगरोटा, जम्मू येथील सैन्याच्या गोदामाला खेटूनच अनधिकृत बांधकाम झाल्याचा माझा रिपोर्ट अर्णबने येऊ दिला नाही. वास्तविक त्या रिपोर्टमध्ये सैन्याच्या प्रवक्त्याचेही अधिकृत निवेदन होते. हे अनधिकृत बांधकाम जम्मू- काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री असलेल्या निर्मल सिंह आणि कविंदर गुप्ता यांचे होते. म्हणूनच म्हणतो की रिपब्लिक चॅनेलचा हा दांभिक राष्ट्रवाद आहे.

ढोंगी नेपोटिजम चॅनेलवर सतत नेपोटिजमच्या (घराणेशाही) नावाने गळा काढणाऱ्या अर्णबच्या रिपब्लिक चॅनेलमध्येच घराणेशाहीचा वरचष्मा आहे. अर्णबची पत्नी सौम्याब्रता रे यांचा शब्द हा हिंदी आणि इंग्रजी चॅनेलसाठीचा अंतिम शब्द असतो. सोनिया गांधींवर सुपर प्रधानमंत्री म्हणून टीका करणाऱ्या अर्णबच्या चॅनेलमध्ये त्याची पत्नीच सुपर संपादक आणि मॅनेजिंग एडिटर आहेत.त्यांच्या इशाऱ्याशिवाय चॅनेलमध्ये एक पानही हलत नाही. पूर्वी त्यांनी टेलिग्राफ, एएएनआय आणि तेहलकामध्ये काम केले होते आणि आता त्या रिपब्लिकच्या व्यवस्थापकीय संपादक आणि मालकी हक्काच्या भागीदार आहेत. इतर अनेक महत्वाच्या पदावर या दोघांच्याच ओळखीच्या लोकांना ठेवले आहे ज्यांचे काम फक्त आमच्यासारख्यांवर नजर ठेवणे हेच आहे. मी स्वत:हून कधीच रिपब्लिक टिव्हीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला नव्हता. २०१७ मध्ये ज्या दिवशी माझं लग्न होणार होतं नेमक्या त्याचदिवशी अर्णबच्या ऑफिसमधून फोन आला, अर्णबला माझ्याशी बोलायचं होतं. मी त्या दिवशी गुरुद्वारेत काही वेळातच फेरे घेणार होतो. मला वाटलं की, कोणीतरी माझ्यासोबत मस्करी करतयं. तेव्हा मी त्याला टाळलं आणि म्हणालो की, काही

दिवसांनंतर फोन करा. काही दिवसांनी मला परत फोन आला आणि यावेळी स्वत: अर्णब माझ्यासोबत व्हिडियो कॉलवरून बोलत होता. खूप शालीनतेने आणि शांतपणे तो माझ्याशी बोलला. मी प्रचंड उत्साहित होतो. ज्या व्यक्तीला आतापर्यंत मी टिव्हीवर बघत आलो होतो तीच व्यक्ती माझ्याशी संवाद साधत होती. टाइम्स नाऊ सोडल्यानंतरची ती घटना होती. मला म्हणाला की, अनेक कारणांमुळे त्यांचा टाइम्स नाऊमध्ये अपमान करण्यात आला. एक महिन्यापर्यंत स्टूडिओच्या आत येऊ दिले नाही. अर्णबने मला सांगितले की, तो एक नवीन चॅनेल सुरु करणार आहेत आणि त्यासाठी त्याला नव्या दमाची तगडी माणसं हवी आहेत ज्यामुळे टाइम्स नाऊ उध्वस्त होईल. त्यांनी वचन दिले की, रिपब्लिक टिव्ही माध्यम उद्योगात क्रांतिकारी बदल घडवून आणेल आणि सत्तेत बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारेल... हे असे चॅनेल असेल जे वंचित आणि शोषित लोकांचा आवाज असेल. समग्र बातम्या देणारे चॅनेल असेल. अर्णब एक जबरदस्त वक्ता आहे. बोलताना तो तुमच्यावर मोहिनी घालतो. तुम्ही आपोआप त्याच्या आहारी जाता. मीही त्याला बळी पडलो. चॅनल लॉन्च झाले तेव्हा टीआरपीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. आम्ही सगळेच खूप खूश आणि उत्साहित होतो कारण हे आमच्या मेहनतीचे फळ होतं. नंतर हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की, हे चॅनल फक्त अर्णबसाठीच आहे ज्यात टीमवर्क किंवा सामूहिक प्रयत्नांना काहीच महत्व नाहीये. काही महिन्यातच वाटू लागले की रिपब्लिकसाठी इतर गोष्टी या फिलरप्रमाणे आहेत, जे दिवसभर अर्णबच्या अनुपस्थितीची जागा भरुन काढायचा प्रयत्न करतात, आणि संध्याकाळी हा मंच अर्णबच्या हवाले केला जातो. अर्णब हे एक असे वडाचे झाड आहे ज्याच्या खाली कोणतही दुसरं रोपही उगवू शकत नाही.

आज जेव्हा मी मागे वळून पाहतो त्यावेळी रिपब्लिकमध्ये काम करण्याच्या माझ्या निर्णयावर मला पश्चाताप होतोय. त्यांनी पत्रकारितेत क्रांती नाही तर पत्रकारितेची हत्या केली आहे. पत्रकारितेचं विनोदात रुपांतर करुन टाकलयं. कुठे ना कुठे तरी या गुन्ह्यांत मी स्वत:लाही भागीदार समजतो. अर्णव गोस्वामीची आत्ममग्नता, घराणेशाही आणि राजकीय पूर्वग्रह यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी रिपब्लिक टिव्हीला राम-राम केलाय. काही दिवसांनी अर्णबला पैसे आणि सत्तेचे बळ मिळत गेले तसा अर्णबचा अहंकारही वाढत गेला. ज्याप्रमाणे अर्णब टिव्हीवर कुणाचेच ऐकत नाही तशाच पद्धतीने तो आपल्या स्टाफचेही ऐकत नाही. स्टाफवर आरडा-ओरडा करणे, त्यांच्या अपमान करणे, शिव्या देणे इतकचं काय तर कधीकधी त्याने मारहाणसुद्धा केली आहे. ज्यावेळी रिपब्लिकला कोणतेही वर्तमान नव्हते ना भविष्य होते त्यावेळी अनेक लोक हे आपली चांगली नोकरी सोडून अर्णबसोबत आले होते, हळूहळू सगळ्यांनी नोकरी सोडायला सुरु केली. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, चंदीगढ, बेंगलोर प्रत्येक ब्यूरोने संपादकीय भूमिकांमुळे राजीनामे दिले. जवळजवळ सर्वच प्रमुख अँकरनी नोकरी सोडून दिली.

रिया चक्रवर्तीची मुलाखत न मिळू शकल्याने अर्णबने त्याच्या स्टाफला प्रचंड शिव्या घातल्या ज्यामुळे आठवड्याभरातच अनेकांनी नोकरी सोडली. प्रतिस्पर्धी चॅनेलवर रियाची मुलाखत प्रदर्शित झाल्यामुळे नैतिक-अनैतिकतेचा ढोल बडवणारा अर्णब खाजगीमध्ये हीच मुलाखत न मिळाल्यामळे सहकाऱ्यांना अपमानित करतो यासारखे दुसरे ढोंगी उदाहरण नाही.

दरबार संस्कृती अर्णबच्या चॅनेलमध्ये आता अनुभवी पत्रकार कधीच काम करणार नाहीत. अर्णबने चॅनेलमध्ये जे काही तयार केले आहे ते न्यूजरुम नसून दरबार आहे. साधारणपणे चॅनेलमध्ये कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ अशाप्रकारची रचना असते. परंतु त्याने अलिकडच्या काळात इतके अननुभवी लोकांची भर्ती केली आहे जे कधीही त्याच्या विरोधात तोंड उघडणार नाहीत. एकामागोमाग लोकं सोडून गेल्यानंतर अर्णबने खरं तर शांतपणे त्याचा विचार करायला हवा होता. मात्र तसे काहीही न करता सहकाऱ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्याची ढवळाढवळ असते. रात्री एक वाजता तो सहकाऱ्यांना फोन करतो आणि तेही फक्त त्यांच्या चुका दाखवून देण्यासाठी आणि त्यांच्यावर ओरडण्यासाठी... मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत संपादकीय बैठक चालायची आणि लगेचच सकाळी साडेसात वाजका सगळ्यांना कामावर हजर राहण्याचा फतवा निघायचा.

२०१९ नंतर...

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अर्णबमध्ये अधिक बदल झाला. स्वत: अर्णब आणि त्याच्या चॅनेलवर येणारी लोकं अतिशय आक्रमक बनली. शोच्या नावाखाली सुरू असलेला ड्रामा, सतत मोठमोठ्याने किंचाळणं हे काही काळाने बटबटीत आणि लाजिरवाणं वाटायला लागतं. काहीही करून टीआरपीमध्ये सातत्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या "आज तक'ला मागे टाकणे यासाठीचा हा सगळा त्याचा खटाटोप होता. त्यात अर्णब यशस्वी झालाही मात्र पत्रकारितेची सारी मुल्ये पायदळी तुडवून...

स्टिंग ऑपरेशन

पत्रकारितेमध्ये सोर्सला खुप महत्व आहे. अर्णब मात्र या सोर्सचेच स्टिंग ऑपरेशन करायला सांगतो. आपल्या विश्वसनीय सुत्रांना भेटा आणि त्यांचे स्टिंग ऑपरेशन करा, असा आदेश त्याने अनेकदा दिला आहे. वास्तविक सुत्रांना त्यांची ओळख कधीच उघड करू द्यायची नसते. पत्रकाराचे हे आद्य कर्तव्य आहे की त्याने त्याच्या सोर्सचे नाव उघड होऊ नये याची पूर्ण खबरदारी घ्यायची. अलिकडेच सुशांत सिंह प्रकरणात त्याचा फिटनेस ट्रेनरचे स्टिंग ऑपरेशन अर्णबने अशाचप्रकारे केले होते. त्याला सांगितले की हे आपण ऑफ द रेकॉर्ड बोलतोय. मात्र त्याचवेळी छुपा कॅमेरा सगळं काही टिपत होता.

नरेंद्र मोदींनंतर मीच... एका पत्रकारापासून सुरू झालेला अर्णबचा प्रवास आज कोट्यवधी रुपयांच्या चॅनेलच्या मालकापर्यंत झाला ही साधी बाब नाही. तो अतिशय हुशार व्यापारी आहे. प्रेक्षकांना नेमंक काय हवयं याची त्याला पूर्ण कल्पना आहे. निवडणुकींदरम्यान सकाळी सहा पासून रात्री १२ पर्यंत सलग काम करणे हे खायचे काम नाही. आपली स्तुती करणं, सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चांगलं बोलणं यात त्याला खुपच इंटरेस्ट आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यानंतर या देशात सगळ्यात शक्तीशाली कोण असेल तर तो मीच आहे, हा विचार अर्णबच्या मनात कायम असतो.

आता शांताश्री सरकार देखील... शांताश्री सरकार या पत्रकार स्त्रीने रिपब्लिक टीव्हीमधून राजिनामा दिला आहे. आणि त्याबद्दल तिने सोशल मीडियावर लिहिले आहे. ती लिहिते- मी अखेर हे सोशल मिडियावर उघड करते आहे. मी रिपब्लिक टीव्ही सोडला ते नैतिक कारणांमुळे. अजूनही माझा नोटिस दिल्यानंतरचा कालावधी सुरू आहे, पण तरीही मला आता रिपब्लिक टीव्हीने रिया चक्रवर्ती विरुद्ध चालवलेल्या अतिशय आक्रमक अशा हेतुपूर्वक मोहिमेबद्दल लिहिलेच पाहिजे अशी वेळ आली आहे. मला बोललेच पाहिजे. पत्रकारिता ही सत्य उजेडात आणण्यासाठी केली जाते असं मला शिकवलं गेलं होतं. सुशांतच्या या प्रकरणात मात्र मला सर्व तपशील खोदून काढायला सांगितले गेले- सत्य सोडून. मी शोध घेत असताना मला दोन्ही कुटुंबांशी बोलल्यानंतर हे कळले की सुशांतला अवसाद किंवा डिप्रेशनचा त्रास होत असे. पण रिपब्लिकच्या अजेंड्याला हे मान्य करणे परवडत नव्हते. मला या प्रकरणातील आर्थिक कंगोरा काय आहे त्याचा तपास करायला सांगितले गेले. रियाच्या वडिलांच्या खात्याचे तपशील शोधायला सांगितले गेले. त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅट्समध्ये सुशांतचा पैसा गुंतवण्यात आल्याचे त्यात कोणत्याही प्रकारे दिसत नव्हते, सिद्ध होऊ शकत नव्हते. अर्थातच हेही रिपब्लिकच्या अजेंड्याला सोयीचे नव्हते. मग मी पाहिलं, माझे अनेक सहकारी रियाच्या घरी गेलेल्या, जाऊन आलेल्या कुणालाही सतावू लागले. पोलिसांनाच काय अगदी साध्या डिलिवरी करणाऱ्या मुलांनाही त्यांनी भंडावून सोडले. ओरडाआरडा करणे आणि बाईचे कपडे खेचणे यातून आपली चॅनेलमधली वट वाढते असा त्यांचा समज आहे. हे सारे वृत्तांकन पाहून, एका स्त्रीला जाहीररित्या नाहक बदनाम केले जात असलेले पाहून मी संतप्त होत होते, तेव्हाच मी त्यांना हव्या तसल्या बातम्या लावत नाही म्हणून मला त्रास दिला जाऊ लागला. जराही विश्रांती न देता माझ्यावर काम टाकले जाऊ लागले. एकदा तर मी ७२ तास न थांबता काम केले. रिपब्लिक टीव्हीमध्ये पत्रकारितेचा मुडदाच पडला आहे. आजवर मी केलेल्या वृत्तांकनात कधीही एका विशिष्ट बाजूला झुकले नव्हते. आणि आज एका स्त्रीला दोषी ठरवण्यासाठी नैतिकता विकण्याचा प्रश्न आला तेव्हा मी भूमिका घेतली आहे. रियाला न्याय मिळालाच पाहिजे.

(सौजन्य :न्यूजलॉन्ड्री डॉट कॉम, पीगुरुज डॉट कॉम)

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser