आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरतमधील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 81 वर्षीय आसारामला गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो जोधपूर कारागृहात बंद आहे. त्याचा मुलगा नारायण साईही बलात्काराच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
एक काळ असा होता की आसारामच्या आश्रमात चोवीस तास गर्दी असायची. लोक लांबून आश्रमात पोहोचायचे. त्याला पाहण्यासाठी लोक तासन्तास उभे असायचे. त्याच्या दरबारात राजकारण्यांपासून ते अभिनेते नतमस्तक व्हायचे. चार दशकात त्याने 10 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण केले.
आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्यानंतर या साम्राज्याचा वारसदार कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला. आसारामचे 400 हून अधिक आश्रम कोण सांभाळणार? आसारामशी भक्त अजून जोडलेले राहतील का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणून आसारामची मुलगी भारती देवी पुढे आल्या आहे. ज्यांना 'भारतीश्री' आणि 'श्रीजी' म्हणून ओळखले जाते.
अनेक वर्षांपूर्वी 'संत श्री आसाराम ट्रस्ट'ची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे, परंतु आसारामने देश-विदेशात जे आश्रम, शाळा किंवा इतर संस्था बांधल्या आहेत, त्या सर्वांची देखभाल या ट्रस्टच्या माध्यमातून भारतीदेवी करत आहेत. भारती गेल्या 19 वर्षांपासून आश्रम आणि ट्रस्टचे व्यवस्थापन करत आहेत, परंतु त्या नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत. आसारामच्या अनुयायांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा आहे.
भारती देवीची पडद्यामागची भूमिका
वर्ष 2004, हा तो काळ होता जेव्हा आसारामचे नाव अध्यात्माच्या जगात शिखरावर होते. त्याचा मुलगा नारायण साई देखील देशभरात झालेल्या आध्यात्मिक चळवळींच्या केंद्रस्थानी होता. त्याच वर्षी भारती देवी यांनी आसारामच्या आध्यात्मिक व्यासपीठावर प्रवेश केला. हळूहळू त्या आसारामच्या सत्संगालाही जाऊ लागल्या. आसारामच्या अनुयायांमध्ये त्यांचा प्रभाव वाढू लागला.
कोणतीही गोष्ट सहजपणे लोकांच्या मनात बिंबवणे हे भारतीदेवींचे सर्वात मोठे कौशल्य आहे. तरीही भारती देवींची बाहेरच्या जगात क्वचितच चर्चा होते, कारण लोकांचं लक्ष आसाराम आणि नारायण साईकडे जास्त होतं.
2013 मध्ये अटक झाल्यानंतर भारती देवी चर्चेत आली होती.
2013 मध्ये आसाराम आणि नारायण साई यांच्यासाठी अडचणीच्या दिवसांची सुरुवात झाली. दोघांना लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यादरम्यान पहिल्यांदाच त्याची मुलगी भारतीदेवीचे नाव चर्चेत आले. भारती देवी आणि त्यांची आई लक्ष्मी देवी यांनाही बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती.
सूरतमधील मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसारामनंतर भारती देवी या दुसऱ्या आरोपी होत्या, तर आसारामची पत्नी लक्ष्मीबेन तिसऱ्या आरोपी होत्या. मात्र, 31 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने भारती देवी आणि लक्ष्मीबेन यांना निर्दोष घोषित केले. आसाराम आणि नारायण साई यांना तुरुंगात टाकले होते, तेव्हा 2013 मध्येच भारतीदेवींनी आसारामची गादी हाती घेतली होती.
लोकांना भावूक करणाऱ्या वडिलांची शैली अंगीकारली
आसारामच्या प्रवचनात भारती देवी भजने म्हणायची. याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच आपल्या भाषणाने लोकांना भावूक करण्याची शैली ही भारतीदेवींची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूलाही लोकांची गर्दी असते.
भारती देवी महागड्या गाड्यांच्या शौकीन आहे, परंतु आश्रमातील संशयास्पद हालचाली आणि आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्याने त्यांनी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केले आहेत.
आता त्यांनी लोकांमधील थेट संपर्क कमी केला आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. भारती देवी अहमदाबादमधील आश्रमात राहतात आणि नियमितपणे येथे होणाऱ्या आरतीला उपस्थित राहतात. त्यांची प्रवचनेही सोशल मीडिया हँडलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जातात. जेणेकरून आसारामने उभारलेल्या साम्राज्याचा पाया कमकुवत होण्यापासून रोखता येईल.
कवी, शास्त्रज्ञ आणि संगीतकार
डिसेंबर 1975 मध्ये जन्मलेल्या भारतीने वयाच्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतली. त्यांनी एम.कॉम.पर्यंतच शिक्षण घेतल्याची अनधिकृत माहितीही आहे. भारती देवी स्वत: कवयित्री, शास्त्रज्ञ आणि संगीतकार असल्याची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. भारती यांनी 1997 मध्ये एका डॉक्टरशी लग्न केले होते, परंतु काही काळानंतर घटस्फोट झाला.
यानंतर त्यांनी आश्रमाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. भारती आसारामप्रमाणे सत्संग आणि प्रवचनासाठी सतत वेगवेगळ्या शहरात जात नाही. ट्रस्टच्या सर्व कामांवर त्या ऑनलाइन नजर ठेवतात.
अशा प्रकारे आसाराम करोडोंची कमाई करत असे
अहमदाबादमध्ये पहिला आश्रम बांधल्यानंतर सुमारे 20 ते 30 वर्षांत आसारामच्या अनुयायांची संख्या इतकी वाढली की आता देश-विदेशात त्याचे 400 हून अधिक आश्रम आहेत. यामध्ये 40 ते 50 गुरुकुल आहेत. याशिवाय 17 हजारांहून अधिक बाल समाधी केंद्रे, 1500 हून अधिक सेवा समित्या आहेत.
आसाराम अध्यात्मिक नेता तसेच व्यापारी बनला. त्याच्या आश्रमातही विविध पदार्थांची विक्री सुरू झाली. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्मृती चूर्ण, सांधेदुखीसाठी संधिशुल्हार चूर्ण, कॅन्सरवर गोळी, सरबत, च्यवनप्राश आणि डोळ्यांची औषधे. इतकंच नाही तर अनेक आश्रमांमध्ये आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादनेही विकली जात होती.
पोलीस तपासात असे समोर आले आहे की अहमदाबादमधील एका कंपनीला आश्रमातील उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वार्षिक 350 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
फक्त दोन मासिके वर्षाला 10 कोटी कमावत
आसारामच्या नावाने ऋषिप्रसाद आणि लोककल्याण सेतू ही दोन मासिकेही प्रसिद्ध व्हायची. या दोन्ही मासिकांच्या अडीच लाख प्रती वर्षाला विकल्या जात. त्यातून सुमारे 10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळायचे. दोन-तीन दिवस चालणाऱ्या आसारामच्या सत्संगात अनुयायी दान करायचे. विशेषत: गुरुपौर्णिमेला विशेष कार्यक्रम आयोजित केले जात होते आणि अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आसारामच्या आश्रमात पोहोचत असत.
एका छाप्यात 42 बॉक्समध्ये सापडली आसारामची कर्मकुंडली
26 ऑक्टोबर 2013 रोजी पोलिसांनी बलात्कार प्रकरणात फरार आसारामचा मुलगा नारायण साई याच्या शोधासाठी अहमदाबादमधील सीजी रोडवरील एका अपार्टमेंटवर छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वीच नारायण साई येथून फरार झाला, मात्र अपार्टमेंटमध्ये कागदपत्रांनी भरलेले 42 बॉक्स पोलिसांच्या हाती लागले. या कागदपत्रांच्या छाननीत आसारामने 500 हून अधिक लोकांना 1635 कोटी रुपये कर्ज चढ्या व्याजाने दिल्याचे समोर आले.
अपार्टमेंटमधून आठ कोटी रुपयांची रोकड सापडली
इतकेच नाही तर सोहम इंक आणि कोस्टास इंक या दोन अमेरिकन कंपन्यांमध्ये 156 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अपार्टमेंटमधून 8 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. नंतर नारायण साईच्या साथीदारांना अटक केल्यानंतर त्याला अटकेपासून वाचवण्यासाठी पोलिसांना लाच देण्यासाठी ही रक्कम जमा करण्यात आल्याचे उघड झाले.
आसारामचे साम्राज्य 10 हजार कोटींच्या वर आहे
सुरतचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश अस्थाना आणि त्यांच्या पथकाने आसारामच्या विविध कागदपत्रांची तपासणी केली असता धक्कादायक खुलासे झाले. राकेश अस्थाना यांनी ईडी आणि आयकर विभागाला पत्र लिहून आसाराम आणि नारायण साई यांनी अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करून करोडो रुपयांचा कर चुकवल्याचे सांगितले.
तसेच, देशभरातील मोठ्या संख्येने व्यापारी, उद्योगपती आणि रिअल इस्टेट डीलर्सची नावेही समोर आली, जे काळ्या पैशाचे पांढरे करण्यासाठी आसारामशी व्यवहार करायचे. तपासात आसारामच्या साम्राज्याचा आकडा 10 हजार कोटींच्या पुढे गेला होता.
एका सामान्य व्यक्तीपासून आसाराम बनण्याची कहाणी...
याची सुरुवात 7 ऑक्टोबर 1964 पासून होते. आसारामच्या अधिकृत वेबसाईटवर वर्षांपूर्वी एक डॉक्युमेंट्री अपलोड करण्यात आली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार, आशुमल नावाने ओळखल्या जाणाऱ्या आसारामच्या कुटुंबाने गुजरातच्या भरुचमध्ये धार्मिक अनुष्ठान केले होते.
या अनुष्ठानादरम्यान आई आणि पत्नीने त्याला आध्यात्माचा मार्ग सोडून गृहस्थ जीवन सुरू करण्यास सांगितले. आशुमल आपल्या आई आणि पत्नीचे म्हणणे ऐकतो आणि गृहस्थ जीवन सुरू करण्यासाठी आपल्या कुटुंबासह अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढतो, परंतु काही वेळानंतर तो चालत्या ट्रेनमधून उडी मारतो. येथून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढतो.
आशुमल ट्रेनने मुंबईजवळील वाजेश्वरीला पोहोचतो. येथे त्याची भेट लीलाशाहजींशी होते. लीलाशाहजी त्याला शिष्य म्हणून स्वीकारतात आणि आशुमलच्या जागी त्याचे नाव 'आसाराम' ठेवतात.
वाजेश्वरीमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर आसाराम पुन्हा अहमदाबादला पोहोचतो. साबरमतीच्या काठावर विरळ लोकवस्ती असलेल्या भागात तो 'मोक्ष कुटीर'ची स्थापना करतो. येथे तो पूजा-अर्चा, भजन-कीर्तनासह लोकांच्या समस्या ऐकतो आणि त्या सोडवण्याचा मार्ग दाखवतो.
जसजसा काळ जातो तसतशी आसारामची कीर्ती पसरत जाते. तो लोकांचा आदरणीय बनतो. अशा प्रकारे एकेकाळी झोपडी असणा-या मोक्ष कुटीरला आता भव्य आश्रमाचे स्वरूप येते. सण असो की सुट्टी, आश्रमात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जाते.
आसाराम हळूहळू देशाबरोबरच परदेशातही धर्माच्या नावाखाली प्रचार सुरू करतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न सुरू होते. अशाप्रकारे, सुमारे चार दशकांत आसारामची संपत्ती 10,000 कोटी रुपयांवर पोहोचते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.