आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरमुघलांना पिटाळणारे सेनापती लचित बरफुकन मोदी-शहांचे हिरो:औरंगजेबच्या सैन्याला हरवून आसाम अभेद्य ठेवले

लेखक: शिवांकर द्विवेदी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1663 ची गोष्ट आहे. अहोम राजा जयध्वजचा मुघलांकडून पराभव झाला होता. युद्धाचा दंड म्हणून 1 लाख रुपये, 82 हत्ती, 675 तोफा आणि 1 हजार जहाज द्यावे लागले. राजा जयध्वजला आपली एकुलती एक मुलगी आणि पुतणीलाही मुघल हरममध्ये पाठवावे लागले. तेव्हा औरंगजेबचे शासन होते. या पराभवाने व अपमानाने दु:खी होत जयध्वजाने मृत्यूला कवटाळले.

या घटनेला 8 वर्षेही पूर्ण झाले नव्हते. अहोम योद्ध्यांनी मुघलांच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून वचपा काढला. या अहोम सैन्याचे सेनापती लचित बरफुकन यांची आज 24 नोव्हेंबर रोजी 400 वी जयंती आहे. आसाम सरकार दिल्लीच्या विज्ञान भवनात 'लचित दिवस' साजरा करत आहे, ज्यात गृहमंत्री अमित शहांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वजण उपस्थित राहणार आहेत.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही लचित बरफुकन आणि मुघलांसोबतच्या युद्धाची संपूर्ण कथा सांगत आहोत…

4 रुपयांच्या कर्जासाठी बंधपत्रित मजूर झाले होते लचित यांचे वडील

मोमाई तामुली बोरबरुआ यांना चार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी बंधपत्रित मजूर व्हावे लागले होते. नंतर, मोमाईंची नेतृत्व क्षमता पाहून, अहोम राज्याचे दहावे राजे प्रताप सिंह यांनी त्यांना आपला सेनापती बनवले. यानंतर हे कुटुंब पूर्णपणे राजा आणि अहोम साम्राज्यासाठी समर्पित झाले.

याच मोमाईंच्या घरी 24 नोव्हेंबर 1622 रोजी लचित बरफुकन यांचा जन्म झाला. लचितही आपल्या वडिलांप्रमाणे उत्कृष्ट लीडर बनले. त्यांना अहोम राज्यातील रॉयल अस्तबलचा प्रभारी बनवण्यात आले. परंतु त्यांचे युद्ध कौशल्य पाहून काही दिवसांतच त्यांना अहोमचे 14वे शासक चक्रध्वज सिंह यांच्या विशेष रक्षक दलात सामील करण्यात आले.

इतिहासाच्या पानांत लाचित बरफुकनचे एकही चित्र उपलब्ध नाही. परंतु एका जुन्या इतिहासात त्यांच्याबद्दल लिहिले आहे - त्यांचा चेहरा रुंद होता, ते चंद्रासारखे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहण्याची कोणाचीही क्षमता नव्हती.

मुघल आणि अहोम राज्य यांच्यातील सुरुवातीची लढाई

मुघलांच्या अहोम साम्राज्यासोबतच्या संघर्षाची कहाणी लचित यांच्या जन्माच्या सहा वर्षे आधीच सुरू झाली होती. 17 व्या शतकाच्या सुरुवातीला मुघलांनी ईशान्येकडील राज्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती.

या राज्यांतील हस्तिदंत, लांब काळे मिरे, सोन्याची धूळ, कस्तुरी आणि लाखावर मुघलांची नजर होती. मुघल दरबारात या सर्वांकडे मौल्यवान वस्तू म्हणून पाहिले जायचे. यासोबतच मुघल तिबेट आणि चीनमध्ये जाण्याचा मार्गही शोधत होते.

मुघलांनी प्रथम ईशान्येतील कोच राज्य काबीज केले. हे राज्य अहोमांच्या सीमेला लागून होते. मुघल व्यापाऱ्यांच्या कुकर्मांमुळे सीमेवर तणाव निर्माण होऊ लागला होता. अहोमचे राजे प्रताप सिंग यांना मुघल व्यापारी पसंत नव्हते आणि 1616 मध्ये अहोम नौदल आणि मुघल सैन्यात घनघोर युद्ध झाले.

अहोमांनी जिंकलेली लढाई समाधाराची लढाई या नावाने ओळखली जाते. मुघल सेनापती मिर्झा नाथन यांनी या युद्धाविषयी आपल्या बहारिस्तान-ए-घायली या पुस्तकात लिहिले आहे – युद्धात मुघलांचे 1700 लोक मारले गेले, 3400 जखमी झाले, 9 हजार लोकांना कैद करण्यात आले.

या युद्धानंतरही दोन्ही बाजूंकडील संघर्ष थांबला नाही. 1618 मध्ये दोन्ही सैन्य पुन्हा एकदा हाजो येथे समोरासमोर आले. पण यावेळी अहोमांचा पराभव झाला. यानंतर संघर्ष आणखी वाढला.

हे लक्षात घेऊन 1639 मध्ये दोन्ही पक्षांनी एका तहानुसार आसाममध्ये आपली सीमा निश्चित केली. ब्रह्मपुत्रा नदीने आसामचे उत्तराकुल आणि दक्षिणाकुल असे दोन भाग केले होते. लांबीच्या आधारावर त्याचे पश्चिम आणि पूर्व आसाम असे दोन भाग होते भाग होते. तहानंतर गुवाहाटीसह पश्चिम आसाम मुघलांच्या ताब्यात गेला.

अहोम राजाने पुन्हा एकदा मुघलांविरोधात युद्ध पुकारले

राजा प्रताप यांनी आपले सैन्य मजबूत करण्यास सुरुवात केली. प्रताप यांनी शेजारील राज्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. पाईक प्रणाली नव्याने स्थापन करण्यात आली, त्याअंतर्गत सर्व बेरोजगार तरुणांची नोंदणी करण्यात आली. सैन्यात बरबरुआ आणि बरफुकन नावाच्या दोन नवीन पोस्ट देखील तयार केल्या गेल्या. 1641 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर 1648 मध्ये जयध्वज सिंह अहोम राज्याचे राजे बनले. दिल्लीतील शाहजहानच्या मुलांमधील भांडणाचा फायदा घेऊन जयध्वजाने मुघलांना आसाममधून बाहेर काढले आणि गुवाहाटीपर्यंत आपली सीमा वाढवली. येथून पुन्हा एकदा मुघल आणि अहोम यांच्यात आरपारची लढाई सुरु झाली.

मुघल सम्राट औरंगजेबाने बंगालचा सुभेदार मीर जुमला याला गुवाहाटी परत घेण्यासाठी आसामकडे कूच करण्याचा आदेश दिला. यानंतर मीर जुमला याने अहोमच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेत सिहोमचे सिमुलगड, समधारा आणि त्याची राजधानी गडगाव ताब्यात घेतले. या तीन भागातून मुघलांनी 82 हत्ती, 3 लाख सोन्या-चांदीची नाणी, 675 तोफा आणि 1000 जहाज हस्तगत केले.

राजा जयध्वज आणि मुघल यांच्यात पुन्हा एकदा युद्ध झाले. अहोमांचा पराभव झाला. 9 जानेवारी 1663 रोजी मीर जुमलासोबत झालेल्या गिलजारीघाटच्या तहानुसार जयध्वज यांना आपली मुलगी आणि पुतणीला मुघलांच्या हरममध्ये पाठवावे लागले. एक लाख रुपयांसह अनेक क्षेत्र गमवावे लागले. बाकीचे पैसे देईपर्यंत त्यांच्या मंत्र्यांच्या मुलांना बंदी बनवण्यात आले.

या पराभवाने व अपमानाने दु:खी झालेल्या जयध्वजांनी मृत्यूला कवटाळले. मृत्यूपूर्वी, त्यांनी आपला चुलत भाऊ आणि साम्राज्याचा पुढचा वारस चक्रध्वज सिंग यांच्याकडून मुघलांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची आणि त्यांना आसाममधून हाकलून देण्याची शपथ घेतली.

लचित बरफुकन यांनी नेतृत्व सांभाळत फासे फिरवले

चक्रध्वज सिंह यांनी मीर जुमलाकडून झालेल्या पराभवानंतर विखुरलेल्या सैन्याची जमवाजमव केली. नवीन किल्ले बांधले. अन्न आणि शस्त्रे साठा करण्यास सुरुवात केली. चक्रध्वज यांनी याच दरम्यान लचित बरफुकन यांना आपला सेनापती बनवण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला.

सेनापती होताच लचित बरफुकन यांनी सैन्यात प्राण फुंकले. छोट्या आणि विखुरलेली राज्यांना सोबत घेतलं. त्यांनी एक प्रयोगशील आणि उत्साही सैन्य तयार केले. यानंतर, मुघलांच्या शाही मागण्या कौशल्याने आणि मुत्सद्दीपणे फेटाळण्यात आल्या.

1667 मध्ये गुवाहाटीचे नवे फौजदार फिरोज खान यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यानंतर चक्रध्वजांनी गुवाहाटी परत घेण्याचे ठरवले. ऑगस्ट 1667 मध्ये लचित बरफुकन आणि अतन बुराहागोहेन यांच्या नेतृत्वाखाली अहोम सैन्याने गुवाहाटीच्या दिशेने कूच केले.

अहोम सैनिक ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांना व्यापून पुढे जातात. नोव्हेंबरपर्यंत, मुघलांचा बराचसा भाग ताब्यात घेत सैनिक गुवाहाटीला पोहोचतात. तिथे घनघोर युद्ध होते. अहोम नौदल मुघलांना घेरते. फिरोज खानला कैद केले जाते. अशा प्रकारे गुवाहाटी पुन्हा एकदा अहोमांच्या ताब्यात येते.

संतापलेल्या औरंगजेबाने प्रचंड सैन्य पाठवले

19 डिसेंबर 1667 रोजी मुघल सम्राट औरंगजेबाला याची माहिती मिळाल्यावर त्याने अंबरचे राजे राम सिंह यांना शाही सैन्यासह आसाम काबीज करण्याचा आदेश दिला.

राजा राम सिंह 4,000 सामान्य सैनिक, 1,500 अहादी (विशेष दलाचे सैनिक), 500 बरकंडेज, 30,000 पायदळ, 21 राजपूत सरदारांच्या सैन्य तुकड्या, 18,000 घोडेस्वार, 2,000 धनुर्धारी आणि 40 जहाजांसह 27 डिसेंबर 1667 मध्ये आसामकडे कूच करतात.

डोंगरांनी वेढलेली गुवाहाटी ही युद्धभूमी म्हणून निवडली जाते. पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीतून प्रवेशाचा एकमेव मार्ग होता. अहोमांनी मुघलांच्या नौदलाला सराईघाट येथे रोखण्याची योजना आखली, जी फक्त एक किलोमीटर रुंद होती.

मुघलांच्या पायदळ सैनिकांना थोपवण्यासाठी लचित यांनी गुवाहाटीमध्ये मातीचे किल्ले बांधले. मुघल सैनिकांनी लढाईसाठी पाण्याचा मार्ग निवडला, जी मुघल सैन्याची सर्वात कमकुवत बाजू होती.

लचित बरफुकन यांची मुघलांविरुद्धची युद्धनीती

लचित यांनी युद्धाच्या रणनीतीबद्दलच्या सर्व कल्पनांची लेखी नोंद करण्याचे आदेश दिले. दोन वर्षांनंतर, 1669 मध्ये, मुघल सैन्य मानस नदीच्या काठावर पोहोचले. येथे अहोम सैनिक मुघल सैन्यासमोर थोडा वेळही टिकू शकले नाही.

आपल्या सैन्याची वाईट अवस्था पाहून लचित यांनी गुहावटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजा राम सिंह यांची भेटही घेतली आणि त्यांना राजाभाई असे संबोधले चर्चाही केली. युद्ध टळण्याची चिन्हे दिसताच मुघल सैन्य बेफिकीर झाले. दरम्यान, लचित यांना लढण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी अधिक वेळ मिळाला.

जेव्हा लचित युद्धासाठी पूर्णपणे तयार झाले तेव्हा त्यांनी फिरोज खान यांच्याकडून राम सिंह यांना संदेश पाठवला की अहोम गुवाहाटीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास तयार आहेत.

यानंतर मुघल सैन्याने भौगोलिक परिस्थितीच्या आधारे स्वतःचे चार भाग केले. राम सिंह स्वतः उत्तरेकडील तीरावर तैनात होते. इतर तीन तुकड्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर, सिंदुरीघोपा प्रवेशद्वारावर आणि जहाजांवर तैनात होत्या.

अशाप्रकारे, अहोम दोन भागांत विभागले गेले - उत्तरेकडील बाजू अतान बुराहागोहेन यांनी आणि दक्षिणेकडील बाजू लचित यांनी सांभाळली.

राजपुतांसमोर सैनिकांना ब्राह्मण म्हणून उभे केले

5 ऑगस्ट 1669 रोजी शाही सैन्य आणि अहोमच्या सैनिकांचा अलाबोईच्या डोंगरांत सामना झाला. राजपूत योद्ध्यांसमोर अहोमांनी आपले सैनिक ब्राह्मणांच्या पोशाखात उभे केले. दुसरीकडे, राम सिंहांनी एक महिला योद्धा मदनवतीला पुरुषाच्या रुपात तयार केले आणि तिला सैन्याच्या कमांडवर ठेवले. अहोमांनी युद्ध जिंकले तर त्यांचा विजय कलंकित व्हावा, अशी राम सिंहांची इच्छा होती.

युद्धाच्या पहिल्या टप्प्यात मदनवतीने अहोम योद्ध्यांच्या चार तुकड्या उध्वस्त केल्या. दुसऱ्या टप्प्यात गोळी लागल्याने मदनवतीचा मृत्यू झाला. अहोमांनी मुघलांना ब्रह्मपुत्रा नदी पार करण्यापासून रोखले. लढाईच्या तिसऱ्या टप्प्यात मीर नवाबच्या पायदळाला अहोमी घोडदळांनी पिटाळून लावले.

अहोमांच्या यशाने संतप्त झालेल्या राम सिंहांनी आपले सर्वात अनुभवी घोडेस्वार युद्धभूमीवर पाठवले. यानंतर नरसंहार सुरू झाला, सुमारे 10 हजार अहोम सैनिक मारले गेले.

सराईघाटची लढाई आणि अहोम सैन्याचा ऐतिहासिक विजय

युद्धात स्वतःची सरशी पाहून राम सिंहांनी भेटवस्तू आणि पैशाने अहोमांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा एकदा 1639 मधील तहानुसार आसामच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. दरम्यान राजा चक्रध्वज यांचा मृत्यू होतो आणि त्यांचे भाऊ उदयादित्य सिंह राजे होतात. गुवाहाटीचा निर्णय ते त्यांच्या दोन सेनापतींवर सोडतात. यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करण्यात आला. औरंगजेबाचा सेनापती राम सिंहही अंतिम आणि थेट हल्ल्यासाठी उत्तर किनार्‍याकडे सरकू लागतो.

बरफुकनच्या सैनिकांनी गनिमी युद्धाची रणनीती स्वीकारली. ते मध्यरात्री किल्ल्यांमधून बाहेर पडायचे आणि शत्रूंवर गुप्तपणे हल्ला करायचे. राम सिंह यांनी याला चोर आणि डकैतांचे कृत्य म्हटले. प्रत्युत्तरात अहोम राजदूतांनी सांगितले की त्यांच्या सैन्यात 1 लाख राक्षस आहेत जे फक्त रात्रीच लढू शकतात.

सराईघाटावर मुघलांना रोखण्याची जबाबदारी गंभीर आजारी पडलेल्या लचित बरफुकन यांची होती. दुसरीकडे मुघल नौदल कमांडर मुनव्वर खान आपल्या सैनिकांसह अंधरुबलीमध्ये येथे उतरणार होता. हा युद्धाचा तो काळ होता जेव्हा मुघल सैन्य आपला विजय निश्चित मानत होते.

तेव्हा लचित आपले नौसैनिक आणि जहाजांसह मुनाव्वर खान आणि त्याच्या नौसैनिकांना सराईघाट येथे घेरतात. या युद्धादरम्यान ब्रह्मपुत्रा नदीत त्रिकोण तयार झाला होता. ज्याच्या एका कोपऱ्यात कामाख्या मंदिर, दुसऱ्या बाजूला अश्वक्लांताचे विष्णू मंदिर आणि तिसऱ्या बाजूला इटाकुली किल्ल्याच्या भिंती होत्या.

मुघल कमांड मुनव्वर खान विजयाचे स्वप्न पाहत हुक्का ओढत जहाजात बसला होता, जो अहोमांच्या गोळीने मारला गेला. तोफांनी भरलेले जहाज घेऊन आलेल्या मुघल सैनिकांना जीव वाचवून पळ काढावा लागला. लचित यांच्या सैनिकांनी मुघलांना मनसाच्या पलीकडे पिटाळून लावले. निर्णायक युद्धात अहोम सैन्याचा विजय झाला आणि मार्च 1671 मध्ये राम सिंहांना रंगामाटीला परतावे लागले.

सराईघाटीच्या लढाईत अहोमांचा विजय झाला, परंतु मुघल आणि अहोम यांच्यातील हा शेवटचा संघर्ष नव्हता. 1672 मध्ये कालियाबोर येथे आजाराने लचित यांचे निधन झाले. 1676 पर्यंत राम सिंह दुसऱ्या संधीच्या शोधात आसाममध्ये आपला वेळ वाया घालवत राहिले. 1682 मध्ये मुघलांना आसाममधून पूर्णपणे हुसकावून लावण्यात आले.

लचित बरफुकन आणि अहोम सैन्याबाबत राम सिंह म्हणाले होते, 'एकाच सेनापतीचे संपूर्ण सैन्यावर नियंत्रण आहे. प्रत्येक अहोमी सैनिक बोट चालवणे, तिरंदाजी करणे, खंदक खोदणे आणि बंदूक वापरणे यात निपुण आहे. अशी अष्टपैलू सेना मी भारताच्या कोणत्याही भागात पाहिली नाही. मी स्वत: रणांगणात सहभागी असूनही त्यांची एकही कमजोरी मला पकडता आली नाही.'

भाजपचा नवे हिरो लचित बरफुकन

  • लचित यांची कथा भलेही आसामच्या बाहेर तेवढी गेली नाही. पण इथल्या लोकांमध्ये बरफुकन हे शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारखेच आहेत.
  • आसाम सरकारने सन 2000 मध्ये लचित बरफुकन पुरस्काराची सुरुवात केली. हा पुरस्कार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सर्वोत्कृष्ट कॅडेटला दिला जातो.
  • आसाममध्ये दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी आसामी सैन्याच्या विजयासाठी आणि लचित यांच्या स्मरणार्थ लचित दिवस साजरा केला जातो. भाजपला आता या योद्ध्याला आपला नवा नायक म्हणून सादर करायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...