आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची डागडुजी तसेच सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून सातत्याने रस्त्यावरील खड्डे आणि धुळीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना या कामांमुळे दिलासा मिळत असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरात विकासकामे एकदाच सुरू असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की शहराचे सुशोभिकरण नेमके कशासाठी केले जात आहे? नागरिकांच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर आम्ही या एक्स्पेलनरमधून देणार आहोत.
जी-20 साठी औरंगाबादचे सुशोभिकरण
जगातील 20 बलाढ्य देशांची संघटना असलेल्या जी-20 समूहाचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आले आहे. यंदा जी-20 परिषद भारतात होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशात अनेक आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदा आणि कार्यक्रम होणार आहेत. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून जी-20 राष्ट्रांतील सुमारे 500 जणांचे शिष्टमंडळ येत्या 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
या दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळे अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ल्यासह ऑरिक सिटीला भेट देणार आहे. या शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबादची प्रतिमा उंचावण्यासह गुंतवणूक आकर्षित करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या दृष्टीनेच स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहेत आणि त्यानुसार योजना आखत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यात शहर आणि जिल्ह्याची चांगली प्रतिमा निर्माण होऊन अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने सध्या शहरात जोरदार विकासकामे केली जात आहेत.
शहरात कोण-कोणती कामे केली जात आहेत?
जी-20 शिष्टमंडळाच्या भेटीच्या दृष्टीने शहरात प्रामुख्याने दोन कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.
1. रस्त्यांची डागडुजी
2. सुशोभिकरण
औरंगाबाद शहरातील रस्त्यांची डागडुजी आणि सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. यात रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांची दुरुस्ती व रंगरंगोटी, रस्त्यालगतच्या भिंती व पुलांची रंगरंगोटी, पथदिवे बसवणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती, वाहतूक नियोजन अशी कामे केली जात आहेत. याशिवाय प्रशासकीय स्तरावरही शिष्टमंडळाच्या दौऱ्याचे नियोजन व त्यांच्या निवास व इतर गोष्टींच्या चोख व्यवस्थेचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. अजिंठा लेण्यांना भेट देण्याच्या दृष्टीने सिल्लोड व फर्दापूरमधील हेलिपॅडचेही काम केले जात आहे.
या शिष्टमंडळात 19 देशांतील सुमारे 250 पाहुण्यांचा समावेश असेल. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांशिवाय ते प्रसिद्ध बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला यासह इतर प्रमुख स्थळांना भेट देतील.
ऑरिक सिटीत शिष्टमंडळासमोर सादरीकरण
नियोजनानुसार, पाहुणे औरंगाबादचे औद्योगिक शहर ऑरिक सिटीला देखील भेट देतील. तिथे शहराच्या औद्योगिक विकासाबद्दल आणि तेथील वाहतूक पायाभूत सुविधांबद्दल शिष्टमंडळासमोर एक सादरीकरणही केले जाईल. याशिवाय विद्यमान औद्योगिक सेटअप्सबद्दल सादरीकरणाचीही योजना आखण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ऐतिहासिक ठिकाणी दौरा, अजिंठाही तात्पुरत्या यादीत
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही त्यांना बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद शहरातील विविध ऐतिहासिक दरवाजे, दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी येथे नेण्याची योजना आखली आहे. आम्ही अजिंठा लेणीचा देखील तात्पुरत्या यादीत समावेश केला आहेत, परंतु या एका ठिकाणी भेट देण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल आणि शिष्टमंडळाकडे केवळ दोन दिवसांचा मर्यादित वेळ आहे,”
“परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, आम्हाला शहराचे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना वाहतूक कनेक्टिव्हिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ, आमच्याकडे औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीसाठी दररोज उड्डाणे आहेत. आम्ही समृद्धी महामार्ग (मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे) शी जोडलेलो आहोत ज्याने मुंबईला नागपूरला जोडले आहे. औरंगाबाद हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) चा एक भाग आहे आणि जालना येथे ड्राय पोर्ट देखील येत आहे तेथून कंटेनर रस्त्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) मध्ये नेले जातील,” असेही केंद्रेकर यांनी म्हटले आहे.
शिष्टमंडळात कोणत्या देशातील पाहुणे असतील?
या शिष्टमंडळात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, यूएसए - आणि युरोपियन युनियनमधील पाहुण्यांचा समावेश असेल.
आता जाणून घेऊया जी-20 बद्दल
जी-20 ही युरोपियन युनियन आणि इतर 19 देशांची जगातील बलाढ्य संघटना आहे. यात युरोपियन युनियनसह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका या देशांचा समावेश आहे.
यंदा जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे, भारतातच परिषद
जी-20 संघटनेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे असेल. यंदाची जी-20 परिषद ही भारतात 9 व 10 सप्टेंबर रोजी भारतात होणार आहे. परिषदेची 18 वी बैठक राजधानी नवी दिल्लीतील प्रगती मैदानात होणार आहे. या परिषदेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 43 प्रमुखांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. गेल्या वर्षीच्या जी-20 च्या बाली येथील परिषदेनंतर संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले. पुढच्या वर्षी जी-20 चे अध्यक्षपद हे ब्राझीलकडे असेल.
जी-20 परिषदेसाठी भारतात येणार हे नेते
जी-20 परिषदेसाठी या गैर-सदस्य राष्ट्राच्या नेत्यांना निमंत्रण
देशातील 50 शहरांत 200 हून अधिक बैठका
जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारतातील 50 शहरांत 32 वेगवेगळ्या क्षेत्रात 200 हून जास्त बैठका होणार आहेत. जी-20 च्या पाहुण्यांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा या जवळपास वर्षभराच्या आयोजनात बघता येणार आहे. यंदाच्या जी-20 ची थीम ही वसुधैव कुटुंबकम अशी ठेवण्यात आली आहे.
जी-20 चे जागतिक पातळीवर महत्व
जी-20 देशांचा एकूण जीडीपी जगाच्या जीडीपीच्या 85 टक्के आहे. या देशांचा जगातील एकूण व्यापारातील वाटा 75 टक्के तर या देशांत जगातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या राहते.
अशी झाली जी-20 ची स्थापना
आशियाई आर्थिक संकटानंतर अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर्सना जागतिक अर्थव्यवस्था आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चेसाठी व्यासपीठ मिळावे म्हणून 1999 मध्ये जी-20 ची स्थापना झाली. यानंतर ती राष्ट्रप्रमुख/सरकारी पातळीवर अपग्रेड करण्यात आली. 2007 आणि 2009 मधील आर्थिक संकटादरम्यान या संघटनेला आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे महत्वाचे व्यासपीठ म्हणून गणले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.