आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये एकट्या सचखंड एक्स्प्रेसमुळे औरंगाबाद स्थानकाला दरराेज मिळतेय 50 हजार रुपयांचे उत्पन्न

सतीश वैराळकर | औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनपूर्वी प्रवासी वाहतुकीतून दर महिन्याला मिळायचे तीन कोटी, आता धान्याची वाहतूक वाढली

हुजूर साहेब नांदेड ते अमृतसर धावणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसमुळे औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या महसुलात वाढ झाली आहे. १ जून रोजी देशभरात २०० एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. सचखंडने प्रारंभी राज्याबाहेरील प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी होती. २ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील स्थानकाअंतर्गत प्रवासाची परवानगी मिळाल्याने औरंगाबाद स्थानकास दरराेज सरासरी ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शहरात प्रत्येक महिन्यात धान्य, सिमेंट, बी-बियाणे व खतांचे अठरा रेक येत आहेत. लॉकडाऊनपूर्वी रेल्वेस्थानकाला प्रवासी वाहतुकीतून महिन्याला ३ कोटींचे उत्पन्न मिळायचे. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतुकीचा महसूल बुडाला आहे.

मराठवाड्यातील श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वेच्या वतीने १ मेपासून श्रमिक एक्स्प्रेस सुरू केल्या. यामुळे औरंगाबाद स्थानकाला १ कोटी तीन लाख रुपये मिळाले. बारा श्रमिक एक्स्प्रेसमधून सुमारे सतरा हजारांवर मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडसाठी रेल्वे चालवण्यात आल्या. औरंगाबाद स्थानकाला लॉकडाऊनपूर्वी प्रति महिना प्रवासी वाहतुकीतून ३ कोटींचा महसूल मिळायचा. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने २३ एप्रिलपर्यंत स्थानकाला प्रवासी वाहतुकीतून शून्य महसूल मिळाला. एप्रिलअखेरपर्यंत स्थिती अशीच होती.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळाले १.३ कोटी :औरंगाबादहून पहिली श्रमिक एक्स्प्रेस भोपाळसाठी सोडण्यात आली. त्यानंतर जबलपूर येथे श्रमिकांसाठी विशेष एक्स्प्रेस धावली. खंडवा, गोरखपूर, लखनऊ, आग्रा, उन्नाव, डाल्टनगंज (झारखंड), मुजफ्फरपूर, बलिया, अरेरिया (बिहार), बस्ती (उत्तर प्रदेश) अशा बारा विशेष श्रमिक एक्स्प्रेस धावल्या. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ कोटी ३ लाख रुपये प्राप्त झाले. प्रत्येक श्रमिक एक्स्प्रेसच्या अंतरानुसार डीडीद्वारे रक्कम जमा केली जायची. ७ लाख ते १० लाखांवर रक्कम अदा करण्यात आली. शेवटची रेल्वे बस्ती येथे गेली.

१ जूनपासून सचखंड सुरू, २ सप्टेंबरपासून राज्यात प्रवासास परवानगी

लॉकडाऊनमध्ये धावलेल्या पहिल्या (१ जून) सचखंडमध्ये नांदेडहून ४२६, परभणी ६३, पूर्णा ६, जालना ६१, सेलू ५, औरंगाबादहून २७८ प्रवासी बसले होते. औरंगाबाद स्थानकावरून १५ ऑगस्टपर्यंत परताव्याची रक्कम देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते. १ व २ ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तिकीट बुकिंग बंद ठेवण्यात आली होती. आता प्रत्येक कर्मचारी एक दिवसाआड कामाला येत आहे. २ सप्टेंबरपासून राज्यातील एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने स्थानकावर दरराेज ५० हजार रुपये जमा होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...