आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Avoidance Of Locomotives Due To Engine Failure; Additional Static Converter Fixes Engine Failure Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:इंजिन बंद पडल्याने होणारा रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार; अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टरमुळे इंजिन फेलची समस्या निकाली

श्रीकांत सराफ | भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सर्वप्रथम भुसावळच्या विद्युत इंजिन कारखान्याने स्टेटिक कन्व्हर्टरचा प्रयोग केला यशस्वी

बिघाड होऊन इंजिन बंद पडल्याने अनेक रेल्वे गाड्यांचा पूर्वी खोळंबा व्हायचा. ही समस्या निकाली निघाली असून भुसावळच्या विद्युत इंजिन कारखान्यात (पीओएच) एका इंजिनमध्ये अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे एका कन्व्हर्टरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे कन्व्हर्टर काम करेल. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार आहे. देशभरात सर्वप्रथम भुसावळच्या पीओएचने हा प्रयोग यशस्वी केले आहे.

भारतीय रेल्वेत भुसावळ पीओएच कारखान्याचे नाव गाैरवाने घेतले जाते. भुसावळ पीओएच कारखान्यात यापूर्वी थेट अॅसेंबल इंजिन तयार केले जात हाेते. चित्तरंजनपाठाेपाठ भुसावळ पीओएच कारखान्याने हा बहुमान पटकावला होता. पीओएच कारखान्यात २०१२ ते २०१५ या काळात २३ इंजिनांची निर्मिती करण्यात आली हाेती. तसेच रेल्वे इंजिनात वातानुकूलित यंत्रणा लावण्याचाही प्रयोग कारखान्याने यशस्वी केला आहे. त्याहून पुढे जात आता बिघाड झालेले इंजिन पूर्ववत होण्यासाठी अतिरिक्त स्टेटिक कन्व्हर्टरचा पर्याय शोधला आहे.

भुसावळ विभागात लावली यंत्रणा

ही यंत्रणा भुसावळ विभागातील इंजिन क्रमांक २२३०७ मध्ये लावली आहे. यात पूर्वी १८० केव्हीएचे एकच कन्व्हर्टर युनिट हाेते. ते काढून तेथे १३० केव्हीए क्षमतेचे दाेन युनिट लावण्यात आले. यातील काही माेटार, पंखे, लाइट यासह अन्य यंत्रणा ही थ्री फेजवर चालते. या सर्वांना कन्व्हर्टरमधून वीजपुरवठा केला जातो.

सर्वांच्या मेहनतीचे फळ...

पीओएच कारखान्यात नेहमीच नवीन प्रयाेग केले जातात. ते यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी मेहनत घेतात. पीओएच कारखाना म्हणजे आमचे कुटुंब आहे याच भावनेतून सर्वजण काम करत असल्याने कारखान्याचा लौकिक वाढत आहे. - शिवराम, मुख्य कारखाना प्रबंधक, पीओएच, भुसावळ

एका युनिटची किंमत लाखात

इंजिनमधील स्टेटिक कन्व्हर्टरची किंमत ३० लाख ६६ हजार ८२० रुपये आहे. अशा प्रकारचे दोन कन्व्हर्टर इंजिनमध्ये लावल्याने मालगाड्या, रेल्वे गाड्यांचे इंजिन बंद पडण्याची समस्या आता निकाली निघेल.

काय काम करते स्टेटिक कन्व्हर्टर...

भारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये स्टेटिक कन्व्हर्टर यंत्रणा लावली जाते. या यंत्रणेत सिंगल फेज वीज सप्लाय घेऊन त्याचे थ्री फेज सप्लायमध्ये रूपांतर केले जाते. अन्य उपकरणांना लागणारा थ्री फेज सप्लाय स्टेटिक कन्व्हर्टरमध्ये निर्माण होतो. त्यामुळे इंजिनच्या कार्यशैलीत याची महत्त्वाची भूमिका आहे.