आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इये बोलिचिये नगरी...:बाईलभाषा..!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहू पाटोळे

खऱ्याअर्थाने भाषा आणि खाद्यसंस्कृती यांचे आदान-प्रदान झाले असेल ते स्त्रियांमुळेच. कारण स्त्रियाच तेवढ्या विवाहसंबंधांच्या निमित्तानं कायमस्वरूपी एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित होत असत. सासरी जाताना ती स्त्री एकटी जात नसे तर ती तीच्या जन्मगावात, घरात मिळालेले संस्कार, भाषा घेऊन नव्या घरी जायची. हे सांस्कृतिक, भाषिक वहन स्त्रिया शतकानुशतकांपासून करत आहेत. या वहनात स्त्रिया मुख्य जागी असल्या तरी यातील मुख्य भूमिकेत कोणत्या स्त्रियांचे वर्चस्व राहिले असेल, याचा मागोवा घेणेसुद्धा उचित ठरेल.

कोस-कोस पर बदले पाणी बारा कोस पर बदले वाणी या प्रकारचा वाक्यप्रचार भारतात सर्वत्रच ऐकायला येतो. पण हा वाक्प्रचार अर्धवट आहे वा सत्यावर उतरू शकत नाही. कारण ज्यांना गावाची संस्कृती माहित आहे त्यांना हेही माहीत असते की, गावांमध्ये जात, वर्ण, सामाजिक स्तरनिहाय जसे मानसिकतेत, खाद्यसंस्कृतीत भेद असतात, तसेच भेद भाषेतील शब्दांत, उच्चारणांत आणि व्यक्त होण्यात असतात. कोणत्याही संस्कृतीतून वा सामाजिक स्तरातून एकजीव झालेलं कोणतंही कारक वेगळं, सुटं काढून त्याचा अभ्यास वा विश्लेषण करता येत नाही. अशी समरसता गावांमध्ये असती तर वरच्या आळीच्या भाषेत आणि खालच्या आळीच्या भाषेत भेद राहिले नसते. आणि वरच्या आळीतील लोकांनी खालच्या आळीतील लोकांची भाषेवरून खिल्ली उडवली नसती.

भारतीय गावं ही घेट्टो असतानाची गावाची भाषा आरोह-अवरोह वा स्वरांनी किंचित खालीवर असली तरी ती गावांपुरती समुच्चित झालेली होती. गावाबाहेरच्यांशी काही कामानिमित्ताने इतरांशी संबंध, संपर्क आल्यामुळेच काय ते नवीन शब्दांचे आदान-प्रदान होत असे. पण खऱ्याअर्थाने भाषा आणि खाद्यसंस्कृती यांचे आदान-प्रदान झाले असेल ते स्त्रियांमुळेच. कारण स्त्रियाच तेवढ्या विवाहसंबंधांच्या निमित्तानं कायमस्वरूपी एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित होत असत. सासरी जाताना ती स्त्री एकटी जात नसे तर ती तीच्या जन्मगावात, घरात मिळालेले संस्कार, भाषा घेऊन नव्या घरी जायची. हे सांस्कृतिक, भाषिक वहन स्त्रिया शतकानुशतकांपासून करत आहेत. या वहनात स्त्रिया मुख्य जागी असल्या तरी यातील मुख्य भूमिकेत कोणत्या स्त्रियांचे वर्चस्व राहिले असेल, याचा मागोवा घेणेसुद्धा उचित ठरेल. कालौघात गावाच्या घेट्टोंची तटबंदी ढासळली गेली आणि त्यातून सामाजिकतेसोबतच समाजाच्या अनेक घटकांवर त्याचा प्रभाव पडत गेला. विवाहसंस्था जी अद्यापही चारी कोने टिकून आहे, तिला थोडेबहूत टवके गेले, ज्याला आंतरजातीय विवाह असे संबोधण्यात येऊ लागले. क्वचित आंतरधर्मीय, आंतरशाखीय विवाह होऊ लागले त्यातून

अशा स्त्रियांचा खालच्या वा वरच्या भिन्न संस्कृतींची सकल सरमिसळ वाढली. त्यात भिन्न अनुभवांसह भाषेचा समावेशही झाला.

ग्रामघेट्टोकाळी विवाह संबंध प्रामुख्याने पंचक्रोशीतीत, जातीत- नात्यात होत असत. पण ब्रिटिशोत्तरकाळात दळणवळणाची साधने, शिक्षण, नवरोजगार यामुळे बदल होत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे आंतरशाखीय, आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह होत गेले. त्यातून एका नव्या मिश्र संस्कृतीचा पाया घातला गेला. आजही अशा संस्कृतींचा परीघ छोटा आहे, पण आहे. मुळात स्त्री धाडस करत नाही वा पुढाकार घेत नाही तोवर एतद्देशीय संस्कृतीक आंतरजातीय विवाह होत नाहीत. ती ज्या घरात लग्न करून येते त्या घरात तिचे स्थान, तिचा जन्म ज्या जातीत झालेला असेल त्यावरून ठरते. ती उच्च जातीतील असेल आणि नवरा साथ देत असेल वा ती मिळवती असेल तर तिचीच भाषा, खाद्यसंस्कृती वा संस्कृती तेथे प्रभाव गाजवते. ती कमावती आणि अन्य भाषक असेल तर मुले मातृभाषा आणि पित्रुभाषा दोन्ही शिकतात. कमावती नसली तरी तिची मातृभाषा मुलांना अवगत होते, पण मातृभाषा म्हणून नोंद करताना त्यांना वडिलांचा धर्म आणि जात लागते. तशीच भाषाही मातृभाषा म्हणून लागते. एका मित्राच्या बायकोला ती सीमावर्ती भागातील असल्याने कानडी बोलता यायची, तर लग्न झाल्यानंतर सासूने तिला सक्तीनं कानडी न बोलण्याचा दम दिला आणि त्यांची तिन्ही मुले एका अन्य भाषेला मुकली. एका मित्राची बायको केरळी आहे परंतु त्याने तिला अशी काही आडकाठी केली नाही, म्हणून त्यांच्या मुलांना मातृ, पितृ, संवादभाषा आणि शिक्षणाची भाषा अशा चार भाषा अवगत होऊ शकल्या. भाषांनी समृद्ध असणाऱ्या ईशान्य भारतातील नागालँडसारख्या राज्यांमध्ये आंतरजमातीय लग्नांना सामाजिक आडकाठी नसल्याने तिथल्या मुलांना मातृभाषा, पितृभाषा, समाजात संवाद साधण्याची नागाभीज व हिंदी भाषा आणि शिक्षणाचे माध्यम असलेली इंग्रजी, इतक्या कमीतकमी भाषा येतातच.

भारतीय मानस धर्म, जात आणि संस्कृतीबद्दल जितकं संवेदनशील आहे, तितकेच ते भाषेबद्दलही संवेदनशील आहे. अशा संवेदनशीलतेमुळेच भारतीय भाषांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्या-त्या भाषा, त्या-त्या समुहांपूरत्या मर्यादित राहिल्या. शिवाय संस्कृत आणि उर्दू या भाषांना धर्माशी जोडल्याने त्यांचा विकास कुंठित झाल्याचे दिसते. म्हणूनच संस्कृतच्या प्रचार- प्रसारासाठी इतके प्रयत्न होत असूनही संस्कृतपासून बहुसंख्य समाज अंतर राखून आहे. तर अशाच अपप्रचारामुळे एतद्देशीय असलेली उर्दू केवळ बहुसंख्यांकांना परकी भाषा वाटते. हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवला, तर कोणत्याही घरातील स्त्री जर प्रभाव राखून असेल तर त्या घरात तिची भाषा आपसूकपणे प्रभावी असते. अशा भाषक प्रभावाला त्या स्त्रीच्या धार्मिक, सामाजिक, जातीय आणि सांस्कृतिक स्थानाचे पण महत्त्व दुर्लक्षित करता येत नाही.

सामाजिक परिस्थितीमध्येही त्या-त्या काळातील त्या- त्या समाजातील अभिजन वर्गाचा सामाजिक प्रभाव जसा संस्कृतीवर असतो तसाच तो भाषांवरही असतो. अभिजन जी भाषा बोलतात तीच "प्रमाण भाषा' मानण्याकडे बहुसंख्य लोकांचा कल असतो. आणि त्यातून आपली जी भाषा आहे, आपण जे उच्चार करतो त्याबद्दल त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मग पाण्यातील "न' लहान की मोठा यावरून हिणवले जाते, तेव्हा पाण्याच्या गुणधर्माकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. व्याकरणाच्या आणि पावित्र्यतेच्या चौकटीत कोंडून बंद केलेल्या भाषा ज्ञानभाषा होऊ शकत नाहीत

हा आजवरच्या भाषांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. मुल भाषा कसं शिकतं आणि त्यातही आईचीच भाषा कसं शिकतं यावर नीटसा प्रकाश पडलेला नाही. पण भाषा शिकल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न मिटतो म्हणूनही भाषा शिकल्या जातात. गरज अशी शोधाची जननी असते, तद्वत भाषा सुद्धा रोजगाराचे साधन आहे. हे आपल्याला जगभरातील असंख्य उदाहरणांवरून सांगता येते.

महाराष्ट्रापुरतं बघायला गेलं तर भाषांच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत तितकी वेगळी परिस्थिती नाही. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून मुंबई-पुण्यात रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले, पण त्यांच्या भाषेवर तिथल्या भाषेचा तितकासा परिणाम झाला नाही. त्यांच्या भाषेत आपसुकच तिथले शब्द सामील झाले, पण त्यांच्या भाषेवरून तिथे त्यांना कोणी तितकसं हिणवलं नाही. कारण तिथे गेलेले रोजगारासाठी गेले होते... साहित्यिक म्हणून गेले नव्हते, म्हणून असावे कदाचित. इकडून तिकडे विवाह होऊन गेलेल्या मुली आजही आपली गावातील मराठी टिकवून आहेत. शाळेतील पुस्तकी मराठी असतं ते परीक्षेत लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपलीच भाषा असते हे गृहीतक अजून तरी टिकून आहे. आता तर गावागावातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी पिवळ्या बसमध्ये बसून विद्यार्थी जातात आणि संध्याकाळी परत येतात. अशा मुलांचा आयांना मुलांच्या वेगळ्या शिक्षणाच्या भाषेचं भलतच कोड कौतुक वाटतं, कारण त्यांना इंग्रजी ही मुलांसाठी भावी 'रोजगाराची भाषा' वाटते म्हणून असावे. जोवर आया घराघरात मराठीतून संवाद साधत आहेत, तोवर मराठीच काय तर इतर कोणत्याही भाषेला मरण नाही. मग ती आई कोणत्याही जाती-धर्माची असो!

shahupatole@gmail.com

बातम्या आणखी आहेत...