आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:कोंडले श्वास मोजताना..

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय बिघडलं आहे, काय उसवलं, फाटलं आहे भोवतालात या? अणुबॉम्ब तयार केले आणि ऑक्सिजनच्या नळकांड्या मात्र राखून ठेवल्या नाहीत. आपण चंद्रामंगळाचे वेध घेतले आणि आपली पोरेबाळे भविष्याच्या चिंतेने उभ्याजागी करपून जाताना पाहत राहिलो बुब्बुळांमध्ये अजिबात कणव उमटू न देता. आपण भव्य पुतळे उभारले, भव्याहून भव्य मंदिरांचे आराखडे रेखाटले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांअभावी मरून जाणाऱ्यांची मात्र फिकीर केली नाही आपण. आपण पूर्वजांच्या पूर्वदिव्यात रमत राहिलो आणि वर्तमानाला लागत असलेल्या विक्राळ वणव्याकडे कानाडोळा करत राहिलो सतत...

दिवसभरातून किमान पाचपंधरावेळा रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज ऐकायला येतात. अधूनमधून रस्त्यावरून ‘रामनाम सत्य है’ किंवा ‘बुद्धं सरणं गच्छामि’चे गंभीर स्वर उमटतात. माझ्या घराच्या तीन दिशांना असलेल्या तीन मशीदींमधून दिवसातून दोनतीनदातरी ‘सभी मोहल्लेवालोंको इत्तेल्ला दी जाती है के आटाचक्कीवाले जनाब सलीमभाई इनके वालीद का इंतेकाल हो चुका है. नमाजे-जनाजा फलाना मस्जिदमे फलाना बजे अदा होगी. इन्शाल्ला!” असल्या उद्घोषणा कानावर येतात. रुग्णवाहिका वगळता, हे रामनाम, बुद्धं सरणं किंवा इत्तेल्ला’ देणारे अंत्यकाळचे अन्य स्वर बहुतेकवेळा करोना चाचणी न होता घरातल्या घरात मरून जाणाऱ्या लोकांच्या यात्रांचे असतात, असं खाजगीत लोक सांगतात.

आधी हे असं नव्हतं. महिन्यातून कधीतरी एखादी ‘इत्तेल्ला’ किंवा ‘रामनाम’चा एखाददुसराच गजर होई. हल्ली हे चित्र बदललं आहे. जवळजवळ रोज दुपारभरच्या सुन्न उन्हात हे असले जीवाला काचणी लावणारे आवाज ऐकताना सुरुवातीला काळजी वाटत असायची. चारआठ दिवसांनतर ‘रोज मरे त्याला कोण रडे’ ही म्हण सार्थ ठरायला लागली. म्हणजे सततच्या घोषित-अघोषित टाळेबंदीमुळे दिवसभर घरात घरकोंबडेपणा करत राहून कंटाळून संध्याकाळी घराच्या छतावर तासभर फेऱ्या मारायला जाऊन ऐन संध्यासमयी आपण मनातल्या मनात ‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी..’ असं गुणगुणत असतो; आणि क्षितिजापार बुडत्या सूर्याच्या मोहक तांबड्यासोनेरी रंगाने न्हालेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर उंचावलेल्या मिनारावरच्या कर्ण्यामधून ‘मोहल्लेवालोंको इत्तल्ला’ देण्याची खणखणीत आकाशवाणी होते, किंवा ‘स्वर्गरथ’ नामक टेम्पोच्या चौफेर आसमंतभरातून ‘हे राम.. हे राम..’ असे अनवरत स्वर आपल्या कर्णपटलावर कोरीवकाम करायला लागतात, तेव्हा सुरुवाती-सुरुवातीला आपण अस्वस्थ होणं साहजिक असतंच. पण रोजच असं व्हायला लागलं तर आपल्या भोवतालातल्या दु:खाची धार बोथट व्हायला लागते, हे कुणीही कबूलच करेल. शिवाय मुदलातला मुद्दा असाही असतो की दु:खाच्या या देशविश्वअवकाशव्यापी संततधारेने अस्वस्थ होऊन ज्यांनी ‘माऊली’पण धारण करून आपल्या विराट हातांनी आकाश तोलून धरायला हवं, तेच महानुभाव सवंग दाढी वाढवून निवडणुकांचा प्रचार करण्यात गुंग होत असतील, तर आपल्यासारख्या चिमूटभर जीवांनी कशाकशाची फुका काळजी करत बसावं?

भसाभस मरत आहेत माणसं, आणि आपण कुंभमेळे भरवत आहोत. माणसं भसाभस मरतायेत, आणि आपण निवडणूक-निवडणूक खेळत आहोत. होत्याची नव्हती होतायत माणसं भसाभस, आणि आपण नवी संसद बांधायला घेतली आहे. माणसं मरू घातली आहेत भसाभस आणि आपण प्रधानसेवकासाठी दीडेक हजार कोटींचं घरकुल बांधायला घेतलं आहे. घराच्या उंबऱ्यात, दवाखान्यांच्या दारात, नगरपालिकांच्या आवारात, रस्त्याकाठच्या झाडांच्या बुडाशी, सुन्नाट तापल्या डांबरी सडकांच्या कडेला, प्रियजनांच्या कुशीत किंवा सगळं गणगोत असूनही बेवारश्यांसारखी माणसं मरून पडत आहेत भसाभस; आणि आपले कारभारी सत्तालालसेने जाहीर सभांतून ‘दिद्दी ओ दिद्दी..’ अशा विकृत वाटाव्याशा आरोळ्या ठोकत खुर्चीची गणितं बांधत असतील अष्टौप्रहर मनोमन, तर कशाला काय अर्थ असणार आहे? तर आपल्यासारख्या य:कश्चित किरकोळ इसमाने कशाकशापोटी जीव आटवावा? तर आपण जिवंत आहोत तोवर ‘सकारात्मक विचार करत’ आपापल्या कोशात सुखाने गच्चीवर चकरा मारत ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’ का गुणगुणू नये?

कबूल आहे की, ‘अकारण अपराधगंड’ नावाची एक काहीतरी गोष्ट असते आणि सतत अबोलपणे ती आपल्याला भोसकत जखमी करत राहते. पण असं अश्वत्थाम्यासारखं आपल्या सदैव वाहत्या जखमांसाठी तेल हुडकत हिंडण्यापलीकडे आपल्या हाती दुसरं काय उरलेलं आहे? आपण काही सलमान खानसारखे दणदणीत अब्जाधीश ‘बीईंग ह्युमन’ नसतो किंवा सोनू सूदसारखा आपल्याकडे जनहितार्थ उधळायला गडगंज पैसा नसतो किंवा हजारांच्या संख्येतली ‘रेमडेसिवीर’ गुप्तपणे कब्जात घेऊन त्याचा आपातकालीन साठा आपल्या सग्यासोयऱ्यांंसाठी राखून ठेवायला ना आपण सत्तापक्षाचा खासदार असतो, ना आपल्या ताब्यात एखादं पक्षकार्यालय असतं! आपण साले तहहयात निबर अशक्त हतबलतेचे धनी! आपल्या हातात असतंच काय इथे?

म्हणजे, काल-परवा तिकडे शेकड्यांच्या संख्येने गंगेच्या की यमुनेच्या प्रवाहातून शेकड्यांच्या संख्येने प्रेते वाहत आली, तर गंगेमध्ये देह विसर्जित झाला म्हणजे केवढं पुण्य गाठीला असणार त्यांच्या, असं म्हणून उरलेल्यांनी त्यांचा हेवा करावा असलं निर्विघ्न मध्ययुगीन सगळं चाललेलं असताना दोन हजार वीस सालच्या इसवीमध्ये आपण महासत्ता की कायसं होणार होतो या निश्चयाचा कुठे मागमूस तरी उरलेला दिसणार कुठून? म्हणजे पहिलीपेक्षा भयानक अशी करोनाची दुसरी लाट येते आणि तरी आपले राष्ट्रनायक निवडणुकांतच गर्क आहेत हे कळल्यावर इथल्या अश्राप लोकांसाठी बांगलादेश आणि भूतानसारखे नखाएवढाले देशसुद्धा हळहळून ऑक्सिजन आणि औषधांचा दानधर्म देऊ करतात, तेव्हा कुठल्या तोंडाने आपण स्वत:ला ‘महासत्ता’ म्हणवून घ्यावं? आपण केवळ ‘हिंदूराष्ट्र’ म्हणवून घेण्यालायक जत्था आहोत, हे जास्त खरं आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही हे जगातलं सगळ्यात मोठं विडंबन होऊन बसलं आहे, हे कडवट असलं तरी खोटं कोण म्हणेल? असं म्हणतात, की, ‘भारताला स्वातंत्र्य द्यावं की नको?’ या विषयावर चर्चा करताना विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की, ‘Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre & men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India’. चर्चिल असलं काही म्हणाला नव्हता, हे कुणीतरी त्याच्या नावावर खपवलं आहे, असं अनेक लोक म्हणतात. ठीक आहे! माउंट स्ट्यूअर्ट एलफिन्स्टनने किंवा ‘भो पंचम जॉर्ज भूप धन्य धन्य’ने म्हटलेलं असेल. खोटं काय आहेत यात? हवेअभावी तडफडून माणसं मरत आहेतच जागजागी; आणि पायलीभर मापाचे पाण्याचे ‘जार’ विकत घेऊनच घरोघरची माणसं पाणी पितायत प्रत्यही. शिवाय सत्तासुंदरी ‘रास्कलां’च्या पायातळीची बटीक होऊनही युगं उलटली आहेत, यातही खोटं काय आहे? अगदी संडासबांधणीच्या योजनेतही पैसे खाणारे पुढारी गावगन्ना मातलेले आहेतच.

तेव्हा फार कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण असे आहोत. आणि असंच आपलं चारित्र्य आहे. किंबहुना हे आपल्या सबंध काळाचंच चरित्र आहे. कोट्यवधी चंद्र उगवले आजवर आभाळात आणि समुद्रात लक्षावधी सूर्य मावळले. दरम्यानच्या पिढ्यानपिढ्या शुभंकराची आस बाळगूनच माणसाने हा प्रवास केला असणार. कितीही निराश झालो, तरी, ‘चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत’ असं मागणं मनाच्या तळाशी रुजत ठेवण्याइतकी ओल तर पिढीजात असतेच अंतरात जिवंत आपल्या. तरीही भोवतीने काजळदाट काळोखच माखलेला का दिसतो चहूदिशांनी?

काय बिघडलं आहे, काय उसवलं, फाटलं आहे भोवतालात या? अणुबॉम्ब तयार केले आणि ऑक्सिजनच्या नळकांड्या मात्र राखून ठेवल्या नाहीत. आपण खरी जंगलं संपवली आणि सिमेंटी कायम तप्तमान जंगलं निर्माण केली. आपण चंद्रामंगळाचे वेध घेतले आणि आपली पोरेबाळे भविष्याच्या चिंतेने उभ्याजागी करपून जाताना पाहत राहिलो बुब्बुळांमध्ये अजिबात कणव उमटू न देता. आपण भव्य पुतळे उभारले, भव्याहून भव्य मंदिरांचे आराखडे रेखाटले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांअभावी मरून जाणाऱ्यांची मात्र फिकीर केली नाही आपण. आपण पूर्वजांच्या पूर्वदिव्यात रमत राहिलो आणि वर्तमानाला लागत असलेल्या विक्राळ वणव्याकडे कानाडोळा करत राहिलो सतत.

इसवीसनाच्या ज्ञात दोनतीन हजार वर्षांतल्या प्रत्येक शतकात लागोपाठ ‘महापुरुष’ जन्मले आपल्याकडे. पहिल्या महापुरुषाने जे सांगितलं, तेच शेवटच्यानेही सांगितलं. ‘माणसाशी माणसासारखं वागा’. आपण एकाचंही ऐकलं नाही, राखलं नाही. आपण त्या दृष्ट्या पुरुषांना ‘महापुरुष’ म्हणालो आणि त्यांच्या नावांची मखरं सजवली फक्त. हजारो कोटी खर्चून त्यांचे पुतळे उभारले आपण; आणि उड्डाणपुलाखालच्या कोवळ्या उपाशी पोराच्या मुखात घास घालण्यासाठी मात्र कुठलीच यंत्रणा उभी करू शकलो नाही.

गोमुत्र पीत राहिल्यावर कॅन्सरपासून करोनापर्यंत काहीही नष्ट होतंच, हेच मान्य असल्यावर ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीकडे लक्ष जाईलच कशाला आपलं? आत्ता दवाखान्यांच्या व्हरांड्यात श्वास कोंडून मरणारी माणसं तसं असहाय मरून जाताना इथल्या कशाचा अभिमान मनाशी जपत पृथ्वीवरून निरोप घेत असतील? राहुल वोहरा नावाचा कुणी अभिनेता असा दमसास अवरुद्ध होऊन मरून गेला परवा, तर मरण्याआधीच्या दिवशी त्याने पोस्ट लिहिली की ‘मला नीट उपचार मिळाले असते तर मी जगलो असतो अजून’. असं एखाद्याला ‘आपलं मरण आपुल्या डोळ्याने’ पहायला मिळणं ही थोर आध्यात्मिक गोष्ट असली तरी महाप्रचंड प्रगत लौकिकाच्या एकविसाव्या शतकाला ते अजिबातच शोभून दिसणारं नाहीय.

तसं तर खूप गोष्टी शोभून दिसत नाहीत आपल्या लौकिकाला. म्हणजे कधी ना पाहिलेला-अनुभवलेला-कल्पिलेला एक भयंकर साथरोग अवतरतो आहे तर आपण किती विचारपूर्वक, किती सजगपणे, किती अष्टावधानाने काय काय करायला हवं होतं? तर आपण फुकापासरी टाळ्या पिटल्या. अकारण घंटा बडवल्या. प्रत्यक्षातले आणि अकलेचेही दिवे पाजळले आपण. मग आत्मसंतुष्टीच्या मूर्ख नशेत एका बेसावध क्षणी आपण अवघा देश कुलुपबंद करून टाकला. भेदरून गेलेल्या लक्षावधींना आपण टाचा सोलून जाईपर्यंत शेकडो मैल वाट कातरायला भाग पाडलं. सिमेंटच्या मिक्सरमधून, दुधाच्या बंद टँकरमधून घराकडे चाललेल्या अश्राप श्रमिकांना मध्येच उतरवून पोलिसांहातून बूड सुजेपर्यंत सटकावलं आणि परदेशातून येऊ पाहणाऱ्या श्रीमंतांना मात्र विशेष विमानं पाठवून सुखरूप घरपोच करत राहिलो आपण. आपण सार्वजनिक पक्षपाताचं, सार्वजनिक मूर्खपणाचं, सार्वजनिक बुद्धिदारिद्र्याचं लक्षणीय ठळक असं उदाहरण ठरलो आहोत. आपण केवळ अभिनिवेशी बिनडोकांचा एक अतिविशाल जत्था आहोत फक्त. चर्चिलच्या त्या कथित विधानाचा बावन्नकशी सारांश आहोत आपण. आपण स्वत:ला सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाचे रहिवासी मानत राहू, ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ करून ठेवलेल्या थोर पूर्वजांचे वारस आहोत म्हणून आम्हीही त्यांच्याइतकेच महान आहोत असं म्हणत राहू मनोमन, काल्पनिक मोठेपणाच्या हव्यासापोटी इतिहासाच्या तलवारीने वर्तमानाला भोसकत राहू, घरोघरी, रस्तोरस्ती, इस्पितळोइस्पितळी श्वास कोंडून माणसं मरून पडत असताना आपण मात्र नाक वर करून विचारत राहू की ‘मग ‘पर्याय’ कोण आहे तुमच्याकडे?’

इथल्या उन्हात ‘ऊब’ शिल्लक नाही, आणि पावसात संजीवक धर्म उरलेला नाही. सुरुंग लावून जखमी केलेयत डोंगर चौफेर, कवितेचा अर्थ उमगेल इतकी ओल उरलेली नाही अंतरात, चौदा विद्या-चौसष्ट कलांच्या वैभवशाली वारशाच्या प्रदेशात भामटेगिरीला ऊत आलेला आणि ‘सभ्य समाज’ नावाच्या संकल्पनेची उभीआडवी-तिरपीतारपी लक्तरे फडकताना दिसतायत चौफेर.

सव्वाशे कोटी पैदास असूनही ‘पर्याय नसलेला प्रदेश’ झालो आहोत आपण. लुप्त झालेल्या प्राचीन संस्कृतीबद्दलची एखादी कृष्णधवल डॉक्युमेंटरी पाहत आहोत की काय असं वाटत राहतं, ‘आदेशान्वये’ निर्मनुष्य ‘केलेल्या’ रस्त्याकडे पाहताना! कितीही आटोकाट अडवलं, तरी पापण्यांआडून पाणी दाटायला लागतंच. लवकरात लवकर चेतनांचे श्वास सळसळोत या भुईवर! आमेन!

बालाजी सुतार
majhegaane@gmail.com

बातम्या आणखी आहेत...