आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने गांधी कुटुंबाला घेरले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांच्या चौकशीचे सत्र सुरु आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते. बुधवारी ईडीने दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील केले.आज काँग्रेसकडून महागाई आणि ईडीविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.
नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीने 21 जुलैला 3 तास, 26 जुलैला 6 तास आणि 27 जुलैला 3 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने जूनमध्ये पाच दिवसांत राहुल गांधींची 50 ता्सांपेक्षा जास्त चौकशी केली होती.
आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने घेरले आहे ते नेमके काय आहे? त्याची स्थापना कोणी केली? याबद्दल जाणून घेऊया...
द नॅशनल हेराल्ड काय आहे?
द नॅशनल हेराल्ड हे द असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड द्वारे प्रकाशित केलेले एक भारतीय वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या यंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या मालकीचे आहे. हे वृत्तपत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाच्या सदस्यांशी जोडलेले असून त्यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते. नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे मुखपत्र आहे. आर्थिक कारणास्तव 2008 मध्ये वृत्तपत्राचे कामकाज बंद पडले. मात्र 2016 मध्ये, याचे पुन्हा डिजिटल प्रकाशन लाँच करण्यात आले.
द नॅशनल हेराल्डची स्थापना कोणी केली?
द नॅशनल हेराल्डची स्थापना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लखनौ येथे 9 सप्टेंबर 1938 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचे साधन म्हणून केली होती. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिश सरकारने यावर बंदी घातली होती. मात्र पुढे ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीनंतर हे भारतातील प्रमुख इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांपैकी एक बनले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून नेहरूंनी लिहिलेले लेख प्रकाशित केले जात होते.
या वृत्तपत्राचे मास्टहेड 'Freedom is in Peril, Defend it with All Your Might' ज्याचा अर्थ होतो (स्वातंत्र्य धोक्यात आहे, सर्व शक्तीने त्याचे रक्षण करा) असे होते. हे मास्टहेड इंदिरा गांधींनी नेहरूंना पाठवलेल्या ब्रेंटफोर्ड, मिडलसेक्स येथील गॅब्रिएलच्या व्यंगचित्रामधून घेण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू हे या वृत्तपत्राचे सुरुवातीचे संपादक होते आणि पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती होईपर्यंत हेराल्डच्या संचालक मंडळाचे ते अध्यक्षही होते.
के. रामाराव नॅशनल हेराल्डचे पहिले संपादक
1938 मध्ये के. रामाराव यांची द नॅशनल हेराल्डचे पहिले संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट 1942 मध्ये सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्यांवर करण्यात आलेल्या निर्घृण अत्याचारांबद्दल टीका करणाऱ्या त्यांच्या "जेल ऑर जंगल" या लेखामुळे ऑगस्ट 1942 मध्ये ब्रिटिश सरकारकाडून त्यांना लखनौ येथील तुरुंगात टाकण्यात आले.
भारत छोडो ठरावानंतर ब्रिटिशांकडून नॅशनल हेराल्डवर बंदी
ऑगस्ट 1942 च्या भारत छोडो ठरावानंतर, ब्रिटिशांनी भारतीय प्रेसवर ताबा मिळवला आणि 1942 ते 1945 दरम्यान या वृत्तपत्रावर बंदी आणली. पुढे 1945 मध्ये वृत्तपत्र पुन्हा सुरु करण्यात आले आणि 1946 ते 1950 पर्यंत फिरोज गांधी यांनी वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करून बंदीदरम्यान झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत केली. 1946 ते 1978 पर्यंत, मणिकोंडा चालपती राऊ यांची हेराल्डचे संपादक म्हणून नियुक्ती झाली.
नेहरूंनी काही काळ वृत्तपत्राचे आंतरराष्ट्रीय वार्ताहर म्हणून काम सांभाळले आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी याचा वापर अलोकप्रिय विचारांना समर्थन देण्यासाठी आणि विविध समस्यांवरील त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला.
द नॅशनल हेराल्डच्या हिंदी आणि उर्दू भाषेत आवृत्त्या
नवजीवन इंडिया ( 'new life' India) हे द असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड द्वारे प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील भारतीय वृत्तपत्र आहे. याची सुरुवात 1 नोव्हेंबर 1947 पासून झाली. हे वृत्तपत्र सुरु करण्यापूर्वी महात्मा गांधी यांनी नवजीवन नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले होते मात्र द असोसिएट जर्नल्सने त्यांच्या परवानगीने नवजीवन प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. महात्मा गांधींच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या तत्त्वांचा आणि जवाहरलाल नेहरूंच्या आधुनिक भारताच्या दृष्टिकोनाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने नवजीवन सुरू करण्यात आले होते. लोकशाही, उदारमतवादी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीला पाठिंबा देणाऱ्या वाचकांना माहिती देणे आणि प्रभावित करणे हा वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. मार्च 2016 मध्ये, द असोसिएटेड जर्नल्सने याचे डिजिटल रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.
कौमी आवाज ( व्हॉइस ऑफ नेशन) हे भारतातील असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड द्वारे प्रकाशित होणारे उर्दू भाषेचे वृत्तपत्र आहे, याची सुरुवात जवाहरलाल नेहरूंनी नोव्हेंबर 1937 केली होती. कंपनी तोट्यात गेल्यामुळे हे वृत्तपत्र 2008 मध्ये बंद झाले. 21 जानेवारी 2016 रोजी AJL ने लखनौ येथील बैठकीत तीन दैनिके पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 12 ऑगस्टमध्ये कौमी आवाज डिजिटल स्वरूपात लाँच करण्यात आले. जफर आगा हे कौमी आवाजचे मुख्य संपादक आहेत.
वृत्तपत्राला डिजिटल स्वरूपात लाँच करण्याचा निर्णय
मार्च 2016 मध्ये द असोसिएटेड जर्नल्सने या वृत्तपत्राला डिजिटल स्वरूपात लाँच करण्याचा निर्णय घेतला. 1 ऑक्टोबर 2016 रोजी, नीलाभ मिश्रा यांची नॅशनल हेराल्ड ग्रुपचे मुख्य संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली.14 नोव्हेंबर 2016 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात नॅशनल हेराल्ड समूहाने संपादकीय तत्त्वे जाहीर केली ज्यात प्रामुख्याने जवाहरलाल नेहरू यांच्या संपादकीय तत्वांना आणि विचारांना पुढे नेण्याचा उल्लेख करण्यात आला होता.
ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घ्या काय आहे हेराल्ड प्रकरण ज्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे.......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.