आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक धाडसी मुलगी जिला भगतसिंग हे क्रांतिकारक दीदी म्हणायचे. वयाच्या 14 व्या वर्षी महात्मा गांधींचे भाषण ऐकायला गेलेली एक मुलगी इतकी प्रभावित झाली की तिने तिची सोन्याची अंगठी दान केली.
वडिलांनी क्रांतिकारक होण्यास आक्षेप घेतल्यावर मुलीने घर सोडले. पुढे देशभक्तांना पैशांची कमतरता असताना या मुलीने आपल्या आईकडून 10 तोळे सोने घेऊन ते दान केले. हे सोने आईने तिच्या लग्नासाठी ठेवले होते. सुशीला असे या मुलीचे नाव होते.
1905 मध्ये आजच्याच दिवशी 5 मार्च रोजी दत्तोचुहाड नावाच्या गावात सुशीला यांचा जन्म झाला. आता हे गाव पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे.
आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, सत्यदेव विद्यालंकर यांच्या 'दीदी सुशीला मोहन' या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांतिकारी दीदींची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया...
सुशीला यांचा जन्म एका कट्टर राष्ट्रवादी कुटुंबात झाला
सुशीला यांचा जन्म कट्टर राष्ट्रवादी आणि आर्य समाजातील कुटुंबात झाला. त्यांचे वडील करमचंद हे व्यवसायाने सैन्यात डॉक्टर होते. करमचंद 1927 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले.
यानंतर त्यांची निस्वार्थ समाजसेवा पाहून इंग्रजांनी त्यांना 'राय साहेब' ही उपाधी देऊन सन्मानित करण्याची ऑफर दिली, ती करमचंद यांनी नाकारली. मुलगी सुशीला थोडी मोठी झाल्यावर करमचंद यांनी तिला डीएव्ही शाळेत दाखल केले. त्यावेळी डीएव्ही शाळा ही राष्ट्रवादी शिक्षणाचे केंद्र मानली जायची.
वयाच्या 14 व्या वर्षी महात्मा गांधींचे भाषण ऐकून क्रांतिकारक बनल्या
1919 मध्ये सुशीला 14 वर्षांच्या होत्या. 13 एप्रिल रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत 5 हजारांहून अधिक लोक जमले होते. हे लोक ब्रिटिशांनी बनवलेल्या रौलेट कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. वास्तविक, राष्ट्रवादी चळवळ चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी हा कायदा केला.
तेव्हा जनरल डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने जालियनवाला बागेत जमलेल्या जमावावर गोळीबार केला. अमृतसरच्या उपायुक्त कार्यालयाने सांगितले की, या घटनेत 400 हून अधिक लोक निर्घृणपणे मारले गेले. तर 2,000 हून अधिक जखमी झाले. या घटनेने सुशीला आतून हादरल्या.
या घटनेनंतर देशभरात इंग्रजांविरोधात आंदोलन सुरू झाले. संतप्त जमावाने गुजरांवाला (आता पाकिस्तानमध्ये) रेल्वे स्टेशन पेटवून दिले. प्रत्युत्तरादाखल ब्रिटीश सैन्याने शहरावर हवाई बॉम्बवर्षाव केला.
यावेळी महात्मा गांधी गुजरांवाला येथे पोहोचले. त्यांच्या जाहीर सभेला हजारो लोक जमले होते. अशाच एका जाहीर सभेत सुशीलाही गांधींना ऐकण्यासाठी पोहोचल्या. गांधींनी इथल्या लोकांना विदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकून स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी खादी परिधान करण्याचे आवाहन केले. गांधींचे भाषण ऐकून सुशीला एवढ्या प्रभावित झाल्या की, त्यांनी त्याचवेळी आपली सोन्याची अंगठी देशासाठी दान केली.
वडिलांनी क्रांतिकारक बनण्यास मनाई केल्यावर सुशीलांनी घर सोडले
आता सुशीलांनी स्वातंत्र्यलढ्यात पूर्णपणे उडी घेतली होती. राष्ट्रवादी भावना पसरवण्यासाठी त्यांनी कविता आणि गाणी लिहायला सुरुवात केली. एके दिवशी राष्ट्रवादी नेते चित्तरंजन दास त्यांच्या शाळेत आले. सुशीलांनी कविता वाचायला सुरुवात केली तेव्हा चित्तरंजन दास आणि तिथे बसलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
त्याचप्रमाणे लाला लजपत राय यांना अटक झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध लिहिलेली कविता संपूर्ण पंजाबमध्ये वितरित करण्यात आली होती.
सुशीला आता आपल्या कवितेतून लोकांमध्ये देशभक्तीचा अंगार पेटवत होत्या. त्याचा परिणाम वडिलांच्या नोकरीवरही होत होता.
एके दिवशी सुशीलाच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या नोकरीवर परिणाम होईल असे काहीही लिहू नको. त्यांनी सुशीलांना उघडपणे स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्यास मनाई केली. सुशीलांनी वडिलांचा हा सल्ला मानण्यास नकार दिला. देशाच्या स्वातंत्र्याचे ध्येय सोडून देण्याऐवजी घर सोडणे पसंत करणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर पुढील दोन वर्षे सुशील घरी परतल्या नाही.
देशभक्तांच्या फाशीची बातमी ऐकून परीक्षा हॉलमध्ये सुशीला बेशुद्ध पडल्या
1925 ची गोष्ट आहे. क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती. अशा स्थितीत क्रांतिकारकांनी शस्त्रे खरेदी करण्यासाठी ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याची योजना आखली.
9 ऑगस्टच्या रात्री त्यांनी शहाजहानपूरहून लखनौला जाणारी ट्रेन अडवून आठ हजार रुपये लुटले. ही घटना घडवण्यासाठी जर्मनीमध्ये बनवलेल्या 4 माऊजर पिस्तुलांचा वापर करण्यात आला.
इतिहासात ही घटना काकोरी कांड म्हणून ओळखली जाते. राम प्रसाद बिस्मिल, अशफाक, रोशन सिंग आणि राजिंदर लाहिरी या चार क्रांतिकारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुशीला परीक्षेला बसल्या होत्या त्याच दिवशी चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही बाब सुशीला यांना समजताच त्या परीक्षा हॉलमध्येच बेशुद्ध पडल्या.
जेव्हा सुशीलांनी भगतसिंगांना इंग्रजांपासून वाचवले
सुशीला दीदींनी कोलकात्यात शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे राहून त्या क्रांतिकारकांना सतत मदत करत होत्या. 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाला लाजपत राय लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करत होते.
त्याचवेळी इंग्रज अधिकारी सँडर्स आणि काही पोलिस तेथे पोहोचले. सँडर्सच्या सांगण्यावरून पोलिसांनी लाला लाजपत राय यांच्या छातीवर अमानुष लाठीमार केला.
17 नोव्हेंबर रोजी लाजपत राय यांचे निधन झाले. याच्या एका महिन्याच्या आत 17 डिसेंबर रोजी देशभक्तांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सला रस्त्याच्या मधोमध गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणी राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांच्यावर खटला चालवण्यात आला. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे लागले होते.
भगतसिंग लपण्याची जागा शोधत होते. ते कसे तरी कोलकाता गाठण्यात यशस्वी झाले. इकडे सुशीलांनी भगतसिंग यांना बराच काळ आपली वेशभूषा बदलून वाचवले. भगतसिंग सुशीला यांना आपली मोठी बहीण मानत होते. ते तिला दीदी म्हणायचे.
सुशीला आणि भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकण्याची योजना आखली
भगतसिंग यांना आपल्या घरी लपवून ठेवलेले असताना सुशीला आणखी दोन क्रांतिकारक भगवती चरण आणि त्यांच्या पत्नी दुर्गादेवी वोहरा यांना भेटल्या. या सर्वांनी मिळून स्वातंत्र्यलढ्यासाठी लोकांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. यासोबतच पुढील नियोजन, देणग्या गोळा करणे, गुप्त माहिती आणणे ही जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती.
सुशीलांच्या मदतीने भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी लपून राहून त्यांच्या पुढील योजनेवर काम केले. 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना सेंट्रल असेंब्लीवर बाँब टाकण्यासाठी पाठवण्याची योजना आखण्यात आली. भगतसिंगही आपल्या मिशनला जाण्यापूर्वी सुशीलांना भेटायला गेले होते.
मात्र, या घटनेनंतर भगतसिंग यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणी इंग्रजांनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांवर कट आखल्याचा खटला सुरू केला. आता त्यांना वाचवण्यासाठी सुशीला दीदी देणगी गोळा करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचल्या.
भवानीपूरमध्येही एका सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि जनतेला 'भगतसिंग संरक्षण निधी'साठी पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता सुशीला नोकरी सोडून क्रांतिकारी पक्षाला पूर्ण वेळ देऊ लागल्या.
सुशीला दीदी इंग्रजांच्या डोळ्यात येऊ लागल्या
इंग्रज अधिकार्यांच्या नजरेत आता सुशीला यायला लागल्या होत्या. दरम्यान, सुशीलांचे मन स्वातंत्र्य लढ्यात साथीदार असलेले वकील श्याम मोहन यांच्यावर जडले.
1 जानेवारी 1933 रोजी वेगवेगळ्या जातीतील असूनही दोघांनी आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर त्या सुशीलांपासून सुशीला मोहन झाल्या. दोघांनी मिळून आपले ध्येय पुढे नेले.
त्याचवेळी सुशीला दीदींनी भगतसिंग यांना पत्र लिहिले. हे पत्र 'स्वतंत्र भारत' या राष्ट्रवादी वृत्तपत्राच्या हाती लागले, त्यानंतर वृत्तपत्राने हे पत्र प्रसिद्ध केले. ते प्रसिद्ध करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल वृत्तपत्राचे संपादक भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासोबतच त्यांना 10 हजारांचा दंड आणि सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सुशीला दीदींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते.
चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूनंतर आणि भगतसिंग यांच्या फाशीनंतर कमान सांभाळली
27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू आणि 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिल्यानंतर क्रांतिकारकांचे नेतृत्व कमकुवत होऊ लागले. यावेळी सुशीला मोहन यांनी स्वातंत्र्य संग्रामाची मशाल हातात घेतली.
आपल्या साथीदारांसोबत त्यांनी दिल्ली आणि लाहोरमध्ये संघटना मजबूत केली. पंजाब सरकारचे सचिव सर हेन्री किर्क यांच्या हत्येची योजना आखली, ज्यांनी भगतसिंग यांना फाशी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याचे कारण म्हणजे सुशीला यांना भगतसिंगांसह 3 देशभक्तांच्या हौतात्म्याचा बदला घ्यायचा होता.
हे मिशन 'लाहोर किर्क प्लॅन' म्हणून ओळखले जाऊ लागले. हे कार्य करण्यासाठी सुशीला दीदी धन्वंतरी, सुखदेव राज आणि जगदीश लाहोरमध्ये भेटले. चुकून हे सारे प्लॅनिंग फुटले आणि पोलिसांनी जगदीशला लाहोरच्या शालीमार बागजवळ चकमकीत ठार केले. तर सुखदेव राजला अटक करण्यात आली.
काही दिवसांनी सुशीला दीदींनाही अटक करून दिल्लीतील पोलीस ठाण्यात बंद करण्यात आले. मात्र, पोलिसांना सुशीला दीदींविरुद्ध पुरावे गोळा करता आले नाहीत आणि त्यांना 24 तासांत दिल्ली सोडण्याचे आदेश देऊन सोडण्यात आले.
पती-पत्नी दोघांनाही 6 महिने तुरुंगात जावे लागले
1942 च्या आंदोलनात सुशीला दीदींची सक्रियता पाहून पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी सुशीलांसोबत त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली. श्याम मोहन यांना दिल्लीत तर सुशीला दीदींना लाहोरमध्ये ठेवले होते. मात्र, यामुळे सुशीलांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. अखेर महान नायक-नायिकांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्यानंतरही सुशीला यांनी अज्ञात राहून देशसेवा केली
स्वातंत्र्यानंतरही सुशीलांच्या आतून देशभक्तीची भावना कमी झाली नाही. मात्र, त्यांनी देशासाठी जे काही केले, त्यासाठी सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा पुरस्काराची अपेक्षा नव्हती.
त्यामुळेच सुशीला दीदींनी जुन्या दिल्लीत अनामिक राहून हस्तकला शाळा सुरू केली. दलित वस्तीत राहणाऱ्या महिलांना हस्तकला प्रशिक्षणही दिले.
त्या दिल्ली महानगरपालिकेच्या सदस्याही होत्या. 3 जानेवारी 1963 रोजी देशाच्या या शूर क्रांतिकारक कन्येने जगाचा निरोप घेतला.
आता जुन्या दिल्लीतील चांदनी चौकातील एका रस्त्याला 'सुशीला मोहन मार्ग' असे नाव देण्यात आले आहे. मात्र, नव्या पिढीतील फार कमी भारतीयांना त्यांच्याबद्दल माहिती आहे.
दिव्य मराठी ओरिजनलमधील ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.