आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना तज्ज्ञ डॉ. अंजन त्रिखा यांच्याशी खास बातचीत:लोक बेजबाबदारपणे वागल्याने देश कोविडच्या दुसर्‍या लाटेत अडकला आहे; ही लाट किती वेगाने पुढे जाईल, हे दोन आठवड्यांनंतरच कळेल

रवि यादव2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटात संसर्ग दर जास्त आहे, परंतु मृत्यूचे प्रमाण कमी आहे

देशातील कोरोनाची दुसरी लाट प्राणघातक ठरत आहे. बर्‍याच रुग्णालयांचे आयसीयू बेड भरले आहेत. लोक कोरोना लसीकरणाबाबत फारसे जागरुक नाहीत. एम्स दिल्ली येथील प्रोफेसर आणि कोरोना मेडिकल मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अंजन त्रिखा म्हणतात, “कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे कारणच लोकांना स्वतः ठाऊक आहे. लोकांनी मास्क आणि सहा फुटाचे अंतर या नियमांचे पालन केले नाही, ज्यामुळे प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.' दिव्य मराठीने डॉ. त्रिखा यांच्याशी देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दलही संवाद साधला.

 • कोरोनाची सद्दस्थिती काय आहे?

सध्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांमध्ये डॉक्टरांची संख्या देखील लक्षणीय आहे. लोकांनी मास्क न घातल्याने प्रकरणे खूप जास्त येत आहेत. ज्यांच्या घरात आयसोलेट व्हायला जागा नाही, किंवा घर लहान आहेत, असे लोक मोठ्या संख्येने इस्पितळात पोहोचत आहेत.

 • आतापर्यंत केवळ 5 ते 6% लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. या वेगाने कोरोना किती काळात नियंत्रित केला जाऊ शकतो?

लस घेतल्यानंतर कोणालाही कोरोना होणार नाही, हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतरच व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होतात, परंतु लोक लस मिळाल्यानंतर लगेचच पार्टी करत आहेत. मास्क आणि सहा फुटांचे अंतर यासंदर्भातील जागरुकता कमी झाली आहे. यामुळे गोष्टी अधिकच बिघडत चालल्या आहेत. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे त्वरित लसीकरण व्हायला हवे.

 • कोरोनाची दुसरी लाट किती प्राणघातक आहे?

दुसर्‍या लाटेत संसर्ग दर जास्त आहे. रुग्ण येत आहेत, परंतु मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. आता डॉक्टरांना हा आजार हाताळणे आले आहेत. पूर्वी हा एक नवीन आजार होता, प्रत्येकजण यासाठी इंटरनेटवर सर्च करत असे, परंतु आता लवकरच चाचणी घेतली जाते आणि रुग्णाला वेळेत उपचार मिळू लागले आहेत.

 • दिल्लीच्या परिस्थितीबद्दल काय बोलणार? रूग्णालयात दररोजचे रुग्ण वाढत आहेत.

दिल्लीत कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार थांबवावे लागतील. तरच कोरोना रुग्ण दाखल होऊ शकतील. प्रत्येक रुग्णालयात कोरोनाचे 20 बेड आणि इतर रूग्णांचे 100 बेड असल्यास एकाच दिवसात 20 बेड भरले जातात. अन्य आजारांच्या रुग्णांना व्हिडिओ कॉलवर बघितले जाऊ शकते. फक्त आवश्यक शस्त्रक्रिया आणि इमर्जन्सी आजारांसाठी रुग्णालयात लोकांनी यायला हवे.

 • आगामी काळासाठी एम्सकडे आयसीयू व्यवस्था आहे का?

आम्ही दररोज सकाळी यावर एक बैठक घेतो. आम्ही लवकरच हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील रुग्णांसाठी एम्स भाग दोन उघडणार आहोत. जे कमी गंभीर रूग्ण आहेत त्यांना आम्ही तिथे पाठवू. तिथे एक हजार रूग्णांची व्यवस्था आहे. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत केले जाईल. यामुळे परिस्थितीची हाताळण्यात मदत होईल.

 • भारत सरकार कोरोनाबाबत जी पावले उचलत आहे, ती पूर्णपणे बरोबर आहेत का?

माझे वैयक्तिक मत असे आहे की, भारत सरकारने संपूर्ण प्रकरण अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. देशात दुसरी लाट आली कारण लोकांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. जनतेने खबरदारी घेणे बंद केले. भारत सरकार कोरोनाशी लढण्यासाठी जे काही करु शकत होते, ते यापूर्वीही केले आहे आणि आताही करत आहे. पूर्वी कोरोनावर एकही औषध उपलब्ध नव्हते, आता सर्व औषधे विनाशुल्क उपलब्ध आहेत. येथे दाखल झालेल्या रूग्णाला खाण्यापिण्यासह महाग औषधे मोफत मिळतात.

 • कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावायला हवे का?

पूर्वी जे लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याचा फायदा झाला. त्याकाळात आम्ही आयसीयू बेड बनवून रुग्णालयांमध्ये व्यवस्था केली. लोकांना जागरूक केले लॉकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. देशभरात सरसकट लॉकडाऊन करण्याऐवजी ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे, तिथे लॉकडाऊन केले पाहिजे. जसे की सोसायटी, कॉलनी, रस्ता, सेक्टर ओळखून तेथे काटेकोरपणे काम केले पाहिजे.

 • आपल्या मते देश कोरोनापासून मुक्त होऊ शकतो का?

आपण जर मास्क घातला तर या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो. लोकांनी व्हॅक्सिन घ्यायला हवी. लसीकरणासाठी सक्ती केली जात नाहीये. 15 दिवसांपूर्वी आमच्या रूग्णालयात फक्त 28 रुग्ण होते. आम्हाला आनंद झाला की कोरोना संपला, परंतु नंतर ही संख्या झपाट्याने वाढली. पुढील दोन आठवड्यांत कोरोनाची दुसरी लाट कुठवर जाईल हे आम्हाला कळेल.

 • लोकांनी अजूनही परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही तर?

दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याने लोक आता घाबरले आहेत. ही गोष्ट जनतेसाठी फायदेशीर आहे. लोक जितकी दक्षता घेतील तितक्या लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल.

 • आपण कोरोना संदर्भात काही सल्ला, संदेश देऊ इच्छिता?

लस नक्की घ्या आणि मास्क घाला. जर सर्दी-ताप असेल तर घरी आराम करा. लोकांना असे वाटते की, हे हवामानातील बदलामुळे होते आणि ते निष्काळजीपणे वागतात, परंतु अशा परिस्थितीत घरी रहा आणि चाचणी घ्या. अशी खबरदारी घेतल्याने कोरोनाचा वेग कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...