आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट73 मृत, 32 अंध, तरीही राजरोसपणे कच्च्या दारुची विक्री:तस्कर म्हणाला- हा तर कुटिरोद्योग, ठाण्यातच मिळेल

लेखक: अंकित फ्रान्सिस/वैभव पळनीटकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'अहो सर, सारणच्या घटनेनंतर खूप कडक झालंय सगळं, आता भेटता येणार नाही.'

'सर, पाटण्याच्या आजूबाजूला 100 किलोमीटरमध्ये देशीवर पोलिसांची मोठी कारवाई सुरू आहे, इंग्रजी तर कशीतरी मिळतच आहे.'

‘ना-ना सर कॅमेऱ्यावर येणार नाही, मरायचंय का?’

आम्ही म्हणालो- चेहरा दाखवणार नाही.

तो म्हणाला- 'सर टेक्नॉलॉजी इतकी प्रगत आहे, सगळे पकडले जाते, आता आम्ही येणार नाही.'

आम्हाला एकापाठोपाठ एक तीन नकार मिळाले होते. दिल्लीहून पाटण्याला निघालो होतो, तेव्हा 6 मद्य तस्कर लाईनअप होते. ते बिहारमध्ये बनत असलेली कच्ची दारू, दुसरी राज्ये आणि देशांतून होत असलेली परदेशी दारूची तस्करी आणि राज्यातील वितरणाचे नेटवर्क याविषयी सांगण्यास तयार होते.

सारणमध्ये बनावट दारूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा वाढली आणि पोलिसांची कारवाईही वाढली. सर्वजण भूमिगत झाले. एकूण 73 मृत्यू झाले आणि 32 लोकांची दृष्टी गेली.

बोलणार, पण कॅमेऱ्यावर येणार नाही, सध्या कोणीच बोलणार नाही

25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7 च्या सुमारास आम्ही पाटण्यातील एका हॉटेलमध्ये बसलो होतो. आमच्या सूत्रााचा अचानक फोन आला, 'सर, वैशाली जिल्ह्यातील महुआ येथे दारू तस्कर भेटायला तयार आहे, पण आताच या.'

आम्ही विचारले- 'भेट होईल का? तस्कर कॅमेऱ्यावर येणार का?

उत्तर मिळाले - 'तुम्ही या, मी बघतो..'

आम्ही कटिहारला जाण्याचा विचार करत होतो, तिथेही दोन तस्कर कॅमेराशिवाय बोलायला तयार होते. एक तस्कर कच्ची दारू विकताना कॅमेऱ्यावर दाखवण्याचा दावाही करत होता, तो आम्हाला बक्सरला बोलावत होता. स्थानिक लोक आणि आमच्या नेटवर्कने इशारा दिला होता की, हे धोकादायक आहे. हे लोक खूप लवकर हिंसक होतात.

आम्ही ठरवले आणि महुआकडे निघालो. सूत्राने सांगितलेले स्थान सुमारे 44 किमी दूर होते. पाटणा सोडले आणि गंगा नदीवर बांधलेला जेपी पूल ओलांडत नाही तोच सूत्राचा संदेश आला 'सर अर्जंटमध्ये कॉल करा'.

आम्ही गाडी कडेल लावली कॉल केला - 'सर, जो तस्कर येणार होता, त्याला कोणीतरी घाबरवले आहे. आता ते शक्य होणार नाही, पोलिसांनी रात्रीच परिसरात छापेमारी केली आहे. कॅमेऱ्यावर तर बिल्कूलही शक्य नाही.

आम्ही म्हणालो- 'तुम्ही तर म्हटले होते की आम्ही तुमची तस्कराशी भेट घालवून देऊ, आम्ही अर्ध्या वाटेत आलो आहोत. जर पोलिसांचा धाक असेल तर आम्ही तस्कराचा चेहरा दाखविणार नाही.'

अनेकवेळा विनंती करूनही तो तयार होत नव्हता. फोन डिस्कनेक्ट झाला. दोन मिनिटांनी पुन्हा फोन आला, सूत्राने म्हटले, 'या, कसेतरी त्याला राजी केले आहे, पण त्याला कॅमेरा दाखवू नका. पळून जाईल. गाडी स्टार्ट करून आम्ही महुआच्या दिशेने निघालो…

मद्य तस्करीत तुरुंगवास भोगून आलो, लोक करोडोंची कमाई करत आहेत

महुआच्या गांधी चौकापासून, सूत्र आम्हाला शहराच्या सुमारे 200 मीटर पुढे घेऊन गेला. मेडिकलच्या दुकानाजवळ गाडी थांबवली. घराच्या गेटमधून आत शिरल्यावर शिडी चढून छतावर पोहोचलो. गच्चीवर आमच्यासाठी खुर्च्या होत्या. सुमारे अर्धा तास उलटून गेला तरी तस्कर आलाच नाही.

आम्ही चहा घ्यायला आलो. बराच वेळ वाट बघून आम्ही थकलो होतो, तेवढ्यात बाईकवरून एक धडधाकट माणूस आमच्या दिशेने आला. दुचाकीवरून खाली उतरताच त्याने खिशातून गुटखा काढून खाण्यास सुरुवात केली. आमचा सूत्र त्याच्याकडे गेला, आम्हाला समजले की हा दारू तस्कर आहे, ज्याची आम्ही वाट पाहत होतो.

राजू (नाव बदलले आहे) येऊन खुर्चीवर बसला. एका नजरेत आजूबाजूला कॅमेरा किंवा माईक आहे का हे त्याने तपासले. येताच त्याने दारूबाबत बोलणार नाही, असे सांगितले. आम्ही संवाद पुढे चालू ठेवला.

तुम्ही काय काम करता?

असेच काहीतरी.. आता छोटा-मोठा व्यवसाय करतो. पूर्वी दारू तस्करीचे काम करायचो. जेव्हा ते काम करायचो तेव्हा कधीही पकडलो गेलो नाही. कोणीतरी खोटी तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवून तुरुंगात पाठवले. या धंद्यात लोकांना खूप हेवा वाटतो. लाखो कमावले, पण गमावलेही. तुरुंगातून आल्यापासून हे काम सोडून दिले आहे. (तथापि त्याच्या पुढील गोष्टींतून स्पष्ट होत होते की, तो अजूनही तस्करीत गुंतला आहे.)

इथेही कच्ची दारू बनते का?

तो हसत म्हणाला - ठर्रा, महुआ, चोऊआ... इथे तर काय-काय नावे आहेत माहीत नाही. हे सर्व मृत्यू याच दारूमुळे झाले आहेत. गूळ, खजूर, महुआ, युरिया, होमिओपॅथीची औषधे, तांदूळ अशा गोष्टी सडवून दारू बनवली जाते. ठर्रामध्ये 40-60% पर्यंत स्पिरिट घालावे लागतात. हे प्रमाण बिघडले तर खेळ होतो, सारणमध्येही तेच झाले. (पुन्हा हसायला लागतो.)

बिहारच्या या भागात दारू येते कुठून?

आसाम, अरुणाचल, पंजाब, बंगाल, झारखंड, नेपाळ, सगळ्या मार्गांनी दारू येत आहे. दुचाकीपासून ते फॉर्च्युनर्स आणि अगदी ट्रकमधूनही दारूची तस्करी होते. अनेक वेळा पेट्रोल-डिझेलच्या टँकरमधूनही दारू आणली जाते. त्याला थांबवत आमचा सोर्स हसतो आणि म्हणतो- 'सर पण पोस्टाच्या गाडीतूनही येते. पोलिस ठाण्यांतच मिळते, शिपाई स्वतःच त्याची विक्री करत आहेत.'

तस्कर पुढे म्हणतो- सर, ट्रेंड बदलत राहतात, पोलिसांच्या कारवाईनुसार आम्ही पद्धती बदलतो. सर्वात मोठा कट शेवटच्या तस्कराचा असतो. याचे कारण पोलिसांच्या कारवाईचा सर्वाधिक धोका आम्हालाच असतो. आम्ही थेट संपर्कात येतो, पोलिसांच्या नाकाखालून दारू पोहोचवतो.

ब्लेंडर्स प्राइड व्हिस्कीची बाटली दिल्लीत 750 रुपयांना मिळते, महुआमध्ये त्याची किंमत किती?

इतर राज्यांच्या तुलनेत येथे किंमत 2-3 पट जास्त आहे. ब्लेंडर्स प्राइड 2000-2500 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. आता नवीन वर्षाचा हंगाम आहे, त्यामुळे ती महाग आहे. इथे जास्त लोक 8PM, ऑफिसर्स चॉइस इत्यादी मागतात.

तुम्हाला पोलिसांची भीती वाटत नाही का?

बिहारमध्ये पोलिसांची सक्ती खूप आहे, छोटे तस्कर किंवा कॅरिअर म्हणा त्यांना धोका जास्त आहे. पोलिसांनी पकडले तर तुरुंगात जावेच लागते. मी स्वतः सहा महिने तुरुंगवास भोगून येथे आलो आहे. आधी मी दारूचे काम करत होतो, पण पोलिसांनी मला पकडले तेव्हापासून मी हे काम बंद केले.

दारूबंदीपासून तुम्ही तस्करी करत होता, आठ वर्षांत काही बदल झाला का?

नवीन गोष्ट ही आहे की पूर्वी दारू खेड्यांतून शहरांत पुरवली जात होती. आता ती शहरांतून खेड्यांत येते. गावात पोलिसांची कारवाई सहज होते. अशा स्थितीत हा साठा शहरात असतो. जेव्हा ग्राहकाची मागणी येईल, तेव्हाच त्याचा पुरवठा केला जातो. मुलगा बाईकवरून बाटली देऊन येतो.

तस्कराची ही गोष्ट खरी असून, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 20 डिसेंबर रोजी अशाच एका टोळीला पकडले आहे. यामध्ये सहभागी असलेला आशुतोष दिवसा बीपीएससीची तयारी करायचा आणि रात्री दारू पुरवायचा. त्याला 25 नग टेट्रा पॅकसह पकडण्यात आले होते. तो स्कूटीने हाजीपूर येथे डिलिव्हरीसाठी आला होता.

उत्पादन शुल्क निरीक्षक अजित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांची एक टोळी अभ्यासासोबतच बॅगमध्ये पुस्तकांत लपवून दारूची होम डिलिव्हरी करतात. या सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी हे करत होते.

दारूसाठी कॉल आणि मेसेजची यंत्रणा कशी काम करते?

अर्धा किलो, एक किलो, पनीर, मिठाई, हाफ, फुल, असे कोडवर्ड लोक बनवतात आणि वापरतात. दारू हा शब्द कोणी वापरत नाही. आपला फोन टॅप झाला तर पोलीस पकडतील, अशी भीती सर्वांनाच आहे.

कच्ची दारू बनवणार्‍याला भेटवाल का?

त्यांचे माहिती नाी. मी फक्त इंग्रजी दारू पुरवतो. हे सर्व मागासवर्गीय लोक बनवतात, तेच पितात. तुम्ही शोध घ्या, कळेल की मरणार्‍यांमध्ये सर्व तेच आहेत.

तस्कर उठतो आणि निघून जातो, आम्हीही बक्सरला निघतो. त्याच्याशी बोलल्यानंतर कळाले की खिशात पैसे असतील तर बिहारमध्ये दारू सुरक्षितपणे आणि सहज मिळते. विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे सामाजिक स्थान आणि आर्थिक स्थिती हाही एक घटक आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना RJD आणि JDU सारखे पक्ष आपली कोअर व्होट बँक म्हणतात. 20 रुपयांची दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची विचारपूस करायला कोणी येत नाही.

कच्च्या दारूच्या शोधात बक्सरला पोहोचलो, सांगण्यात आले- आत धोका आहे, सर...

सारणच्या घटनेनंतर कच्ची दारू मिळते की नाही याचा तपास करत आम्ही पाटण्यापासून 127 किमी अंतरावर असलेल्या बक्सरला पोहोचलो. स्थानिक स्रोत आम्हाला खलावा नावाच्या ठिकाणाजवळील बंझू डेरा येथे घेऊन जात होता. हे ठिकाण डुमराव दियारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.

स्रोत घाबरलेला होता, त्याला वाटेत एक मित्र भेटला. त्याचे म्हणणे ऐकून त्याने गाडी थांबवली. दारू तर मिळत आहे, पण कोणीही बोलणार नाही. तुमच्यासाठी जाणेही सुरक्षित नाही. एवढ्या लांब येणे वाया गेल्यासारखे आम्हाला वाटत होते, तितक्यात त्याचा मित्र काहीतरी म्हणाला. स्रोत म्हणाला- मी प्रयत्न करतो, तुम्ही गाडीतच वाट बघा. त्यानंतर तो मित्राच्या दुचाकीवरून निघून गेला.

संध्याकाळ होत होती, आमचा ड्रायव्हर म्हणू लागला की हा परिसर सुरक्षित नाही, चला जाऊया. सुमारे अर्ध्या तासात स्त्रोत परत आला. हसत हसत बोलू लागला की तुमच्या नादात एक ग्लास प्यावी लागली. त्याने स्वत: जाऊन व्हिडिओ बनवला होता. तो स्थानिक होता, त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेतला नाही.

या व्हिडिओमध्ये एक कच्चे घर दिसत आहे, स्त्रोत बाहेर पान-सिगारेटच्या कियॉस्कवर पैसे देतो. घरात गेल्यावर त्याला एका भांड्यात कच्ची दारू दिसते. एक माणूस दोन ग्लास आणतो, स्त्रोत आणि त्याचा मित्र पटकन पितात आणि निघून जातात. 25 डिसेंबरच्या संध्याकाळी त्याने हा व्हिडिओ शूट केला.

यावरून सिद्ध होते की, सारण घटनेच्या 15 दिवसांनंतरही उघड्यावर कच्ची दारू विकली जाते. बक्सरमध्येही 27 जानेवारी 2022 रोजी बनावट दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू डुमराव उपविभागातील मुरार पोलीस स्टेशन हद्दीतील आमसारी गावात झाले होते. आम्ही जिथे पोहोचलो तिथून ही जागा 10 किलोमीटरवरही नव्हती.

कटिहारच्या तस्करांनीही कॅमेरासमोर येण्यास नकार दिला, रेकॉर्डिंगला परवानगी दिली

बक्सरहून आम्ही पाटण्याला परतलो आणि दुसऱ्या दिवशी कटिहारला जायची तयारी केली. रात्री उशिरा कटिहारच्या सूत्राचाही फोन आला. म्हणाला- सारणनंतर इथेही कडक वातावरण आहे, 28 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत (आता निवडणुका झाल्या आहेत). काही तस्कर तर स्वबळावर लढत आहेत. तुम्ही आलात तरी व्हिडीओवर कोणी येणार नाही. आम्ही विचारलं आता काय करायचं? म्हणाले - तुम्ही प्रश्न पाठवा, आम्ही उत्तर रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवू.

जास्त अपेक्षा नव्हती, तरीही आम्ही हे 6 प्रश्न पाठवले...

  1. कच्ची दारू कशी बनवली जाते?
  2. ती कधी विषारी होते?
  3. बिहार आणि कटिहारमध्ये इंग्रजी दारू कुठून येते?
  4. ती कोणत्या वाहतुकीद्वारे येते?
  5. शहरात आल्यानंतर त्याचे वितरण कसे होते?
  6. प्रत्येक स्तरावर किती मार्जिन मिळते?

26 डिसेंबर रोजी आमच्या कटिहारच्या सूत्राने व्हॉट्सअॅपवर दोन रेकॉर्डिंग पाठवले. यामध्ये दोन वेगवेगळ्या तस्करांनी प्रश्नांची उत्तरे दिली.

पहिल्या तस्कराने सांगितले...

टुनटुन भैया (नाव बदलले आहे) झारखंडमधून इंग्रजी दारू आणतो. तो सांगतो- कटिहारमध्ये इंग्रजी दारू बंगाल, लाभा, मनिहारी, अमानाबाद आणि बारसोई मार्गेही येते. कार, ​​स्कूटी, दुचाकी, टोटो (ई-रिक्षा), पिकअप, सर्व प्रकारच्या वाहनांतून दारूची तस्करी होते. कधी कधी रेल्वेनेही आणतात. बंगालमधून येणारी दारू कटिहार जंक्शनच्या आधी मनिया हॉल्टवर उतरते. बंगालच्या रेल्वेतून खुलेआम वाहतूक केली जाते, प्रशासनालाही सर्व माहिती आहे.

कटिहारमध्ये बोटीनेही दारू येते, पूर्ण वेळ ठरलेली असते. झारखंडहून आणणारा व्यक्ती बोटीतून नदीत फिरत राहतो. किनारा रिकामा होताच तो माल उतरवतो. इथले लोक तो उचलतात. बायकर्सही सीमा ओलांडतात, तेव्हा किमान 50 बाटल्या आणतात. बाकी वाहनांच्या आकारानुसार तस्करी होते.

पोलिसांच्या कडक बंदोबस्ताविषयी, तस्कर म्हणाला - कटिहारला येण्यासाठी रस्त्याने येण्याची गरज नाही. पोलिस चौकी टाळण्यासाठी लोक गाव आणि शेताच्या मार्गाने येतात. बाईकने आणणे सोपे असते.

बंगाल-झारखंडमध्ये आमची सेटिंग असते. हे काम कोणीही एकटे करू शकत नाही. छोटी टोळी बनवतात, मग काम पूर्ण होते. बंगालमध्ये रॉयल स्टॅग व्हिस्कीची बाटली 740 रुपयांना मिळते, तर कटिहारमध्ये 1400-1500 रुपयांना मिळते. एका बाटलीवर आम्हाला 400 रुपये मिळतात.

दुसऱ्या तस्कराने आम्हाला कच्च्या दारूबद्दल सांगितले...

सुरेश (नाव बदलले आहे) कच्ची दारू पितो आणि विकतोही. तो सांगतो- गूळ, महुआ दोन-तीन दिवस आधी उन्हात शिजवतात. यानंतर ते स्टोव्हच्या आचेवर शिजवले जाते. त्याची गरम वाफ निघते, ती स्पिरिट बनते. त्यात पाणी मिसळतात. जर 5 कच्च्या बाटल्या निघाल्या तर त्यात 12 पाण्याच्या बाटल्या टाकल्या जातात.

महुआ कटिहारमध्ये उगत नाही, परंतु झारखंड आणि इतर ठिकाणांहून त्याचा पुरवठा केला जातो. ज्याच्याकडे पैसा आहे, तो महुआ विकत घेतो आणि बाकीचे गरीब लोक गुळापासून बनवतात.

ही दारूला मादक बनवण्यासाठी युरियाची गोळी (बाकड की गोली), औषध आणि स्पिरिट मिसळले जाते. यामुळेच दारू विषारी बनते. बंटी-बबली नावाची दारू सिवानच्या छपरामध्ये वाटली होती, ज्यामुळे मृत्यू झाले होते.

या तपासातून या 6 गोष्टी समोर आल्या...

1. मद्य तस्करीचे 2 मॉडेल: बिहारमध्ये दारू तस्करीचे दोन मॉडेल आहेत. पहिल्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि दिल्ली येथून विदेशी दारू बिहारमध्ये आणली जात आहे. ती शहरांमध्ये ठेवली जाते आणि नंतर स्थानिक लोक तिचा पुरवठा करतात.

ग्रामीण भागात स्पिरिटची खेप मागवून किंवा महुआ देशी दारू बनवली जाते. राज्यातील अवैध दारू तस्करीपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त देशी दारूचा वाटा आहे.

2. बिहारमध्येच बनवली जात आहे विषारी दारू: देशी दारू बनवणारे ती जास्त मादक बनवण्यासाठी त्यात युरिया, ऑक्सिटोसिन आणि मिथेनॉल मिसळतात. यामुळे शरीरात फॉर्मेल्डीहाइड किंवा फॉर्मिक अॅसिड तयार होते, ज्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो.

त्यामुळे विषारी दारू पिऊन लोक आंधळे होतात आणि अनेक वेळा त्यांना जीव गमवावा लागतो. सारण प्रकरणात, बिहार पोलिसांनी असा दावा केला की बनावट दारू यूपीमधून आली होती, त्यानंतर त्यांनी स्वतःच होमिओपॅथीच्या औषधांच्या बाटल्या आणि मास्टरमाइंड शोधून काढले.

3. गरीब आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले विषारी दारूचे बळी: सारण, गोपालगंज, भागलपूर, बांका, मधेपुरा, बक्सर, सिवान आणि शेखपुरा आणि वैशाली या जिल्ह्यांमध्ये विषारी दारुमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेले आहेत.

4. दारूची तस्करी बनला कुटिरोद्योग : पूर्वी येथील दबंग आणि हिस्ट्रीशीटर इंग्रजी दारूची तस्करी करत होते. त्यातले चांगले मार्जिन पाहून मध्यम व निम्नवर्गीय तरुणही आता तस्कर बनले आहेत. नेपाळ सीमेवरून आणणे सोपे आहे, खुली आहे आणि चेकिंग नाही.

यूपी, झारखंड आणि बंगालमधून सर्वाधिक दारू येत आहे. यूपीमधून येणारी दारू हरियाणामध्ये बनते. मद्य कंपन्या आणि वितरक देखील पुरवठा साखळीचा भाग आहेत. हरियाणातील बिहार पोलिसांनी अशा अनेक दारू कंपन्यांवर छापे टाकले आहेत जिथून थेट बिहारमध्ये दारूचा पुरवठा केला जात होता.

5. कोडवर्डद्वारे फोन-व्हॉट्सअॅपवरून मिळते : अर्धा लिटर पाणी, एक किलो साखर, सफरचंद असे कोडवर्ड वापरून दारूचे व्यवहार सुरू आहेत. फोनवर होम डिलिव्हरी होत आहे. सामान्यपेक्षा दोन ते अडीच पट जास्त दर मोजावे लागतात.

6. दारू पिण्यासाठी सीमा ओलांडतात लोक: कुशीनगरचे पनियेहवां रेल्वे स्टेशन, रक्सौल, समूर बाजार, सलेमगढ, डिबनी बंजरवा, तमकुही, पटहेरवा, दुदही, देवरिया जिल्ह्यातील मेहरूना, मझौली, बनकटा यूपी सीमेवरील असे भाग आहेत जिथे बिहारचे लोक दारू पिण्यासाठी जातात. .

नेपाळचे ठुठीबारीही बिहारमधून दारू पिण्यासाठी जाणाऱ्यांसाठीही एक अड्डा आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा अहवाल आला आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की बिहारमधील 15% लोक दारूबंदी असतानाही सतत दारू पितात.

बिहार दारुकांडाबद्दलचा हा ग्राऊंड रिपोर्टही वाचा...

20 रुपयांची दारू प्यायली, भाऊ मेला, मी आंधळा झालो:नीतिश यांनी दारुबंदीचे नाटक थांबवावे, अजुनही 100 पैकी 70 जण पितात

बातम्या आणखी आहेत...