आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून पक्षी सप्ताह:मराठीला एक लाख शब्द हे आदिवासींचं देणं; झाडीपट्टीचा वाटा सिंहाचा!

अतुल पेठकर | नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरण्यऋषी जंगल वाचणारा माणूस मारुती चितमपल्ली यांचा आज वाढदिवस,

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस व पद्मभूषण दिवंगत डॉ. सलीम अली यांची १२ नोव्हेंबरला जयंती. या दोन महान अभ्यासकांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारकडून पक्ष्यांची सुरक्षितता व संवर्धनासाठी यंदापासून "पक्षी सप्ताह' साजरा केला जात आहे. यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातील. आजपासून सुरू होणाऱ्या सप्ताहानिमित्त "दिव्य मराठी'ने आपल्या वाचकांसाठी केलेला हा छोटासा प्रयत्न...

माणसे पुस्तके वाचतात, काही जण माणसे तर काही भविष्यही वाचतात. पण, जंगल वाचून प्राण्यांची भाषा कळणारे ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली हे एकमेव आहेत.

जंगलात फिरता फिरता स्वत:च एक चालतंबोलतं रान झालेल्या चितमपल्ली यांचा गुरुवारी (दि.५) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता आदिवासींनी मराठी भाषेला दिलेल्या एक लाख शब्दांचा खजिना त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी खुला झाला.

पारधी, माडीया, गोंड, कोरकू, कातकरी अशा अनेक आदीवासी जमातींजवळ विपूल शब्द संपदा आहे. चितमपल्लींना या आदीवासींना रानवाटा दाखवताना शब्द संपत्तीही दिली. ‘चकवाचांदणं’ हे चितमपल्लींच्या आत्मचरित्राचे नाव. ते त्यांना पारध्यांनी दिले. आदीवासी सकाळी शिकारीला जाऊन सायंकाळी परत येतात. परततांना घुबड ओरडले की रानभूल होते. म्हणून चांदणं निघेपर्यत वाट बघतात. त्यातून चकवा चांदण हे नाव सुचल्याचे चितमपल्लीनी सांगितले. ‘तनमोर’ला दहा ते बारा शब्द आहेत. त्याला ते तितर म्हणतात. कुंभार कुकडीला झाडीबोलीत ३१ नावे आहेत. अशी एक ना दोन तर तब्बल लाखभर नावं अरण्यऋषींनी आपल्याला देऊ केलीत. आपल्याकडे वासाला शब्द नाही. पण, माडीया गोंड आदीवासीत ती आहे. मोह फुलला की ‘मोयान मोयान’ म्हणतात. अस्वलाच्या वासाला ‘गुटऱ्यान’ असे म्हणतात. झाडीबोलीतून सर्वाधिक शब्द मिळाले.

गवाभोरूच्या ठिकाणी वसते गाव

गव्यांचा कळप ठरावीक ठिकाणी बसतो. कोरकू त्याला गवाभोरू म्हणतात. एखादे गाव गवाभोरूच्या ठिकाणी वसते. कारण वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मलमूत्र विसर्जन केल्यामुळे जमीन सुपीक झालेली असते. शिवाय तिथे उधळी लागत नाही. म्हणून अशा ठिकाणी गाव वसते, असे चितमपल्लींनी सांगितले.

अरण्यातले लोटण, खरमत, घासण आणि ढवसण

सांबर, रानगवा, बारशिंगी हे अरण्यात लोळण घेतात. त्यांच्याशी संबंधित लोटण, खरमत किंवा चाटण, घासण, ढवसण असे शब्द आहे. काही ठिकाणी देव हा शब्द ‘जायंट’ला पर्याय म्हणून वापरतात. जायंट स्क्विलर म्हणजे देवखार, जायंट स्पायडर देवकोळी, देववेलू, देव ससाणो देव टिटवा, देव सुगरण आदी शब्द दिले. बांबूच्या कोंबासाठी वासोट, समदड म्हणजे शमी आणि सिपना म्हणजे सागवान, अमलतासला कोरकू बाणा की बासुरी, वेळूवरील अळं ब्यांना वेळूवास्ते, तर वेळूच्या कोंबांना वेळू साते म्हणतात. आर्द्रा नक्षत्राला आडदरा, पुनर्वसूला राजकुंवर, पुष्य म्हणजे कुलीम कुंवर अशी नावे आदिवासींमध्ये आहेत.

माणसाचा स्पर्शही नसलेले ‘कुंवार अरण्य’

साधारणत: जंगलातील दुर्गम भागासाठी घनदाट व निबिड असे शब्द वापरतात. पण माणसांचा स्पर्शही झालेला नाही, अशा जंगलातील अस्पर्श भागासाठी चितमपल्ली यांनी ‘कुंवार अरण्य’ असा शब्द वापरलाय. याच रांगेत पुढे सवान (पठार), झिलान (उथळ दलदल), हुडकी (पाण्यात गेलेले जमिनीचे टोक), सरणा (तळ्याचे आत गेलेले मुख) असे शब्द येतात. माणसांची पायवाट असते. तशी वन्यप्राण्यांची ‘सगर’ असते. शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची खडका (चाहूल) सर्वप्रथम वानरांना लागते.