आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Bitcoin Explainer: How Cryptocurrency Works And Is The Right Time To Invest In Crypto? How To Invest In Crypto

दिव्य मराठी एक्सप्लेनर:बिटकॉइनच्या किमती 50 टक्क्यांनी घसरल्या; क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक नेमकी कशी होते? किती सुरक्षित? भारतात काय आहे परिस्थिती? येथे जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिटकॉइनच्या विरोधात अमेरिका आणि ब्रिटननंतर आता चीनने देखील कारवाई केली. त्यामुळे, एप्रिलमध्ये 50 लाख रुपयांवर पोहोचलेल्या एका बिटकॉइनची किंमत आता घसरून निम्मी झाली आहे. ही घसरण केवळ 2 दिवसांतच पाहायला मिळाली. त्यामुळे, बिटकॉइनचा फुगा फुटला असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, भारतात क्रिप्टो करन्सीला (आभासी चलन) मान्यता नाही. तरीही क्रिप्टो करन्सीचा देशात व्यवहार होतच आहे.

क्रिप्टो एक्सचेंजकडून या प्रकारच्या करन्सीला एसेट क्लास म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी होत आहे. असे झाल्यास गुंतवुकदारांना गुंतवणुकीचे आणखी एक साधन मिळेल. भारतात अंदाजे क्रिप्टो करन्सीचा 1000-1500 कोटी रुपयांचा रोजचा व्यवहार आहे. शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या 2 लाख कोटींच्या दैनंदिन उलाढालीचा हा 1 टक्काच भाग आहे. तरीही यामध्ये एक कोटीपेक्षा अधिक भारतीय गुंतवणूक करत आहेत. अशात क्रिप्टो करन्सीबद्दल जाणून घेणे काहीसे गुंतागुंतीचे होते. आम्ही युनोकॉइनचे सह-संस्थापक आणि सीईओ सात्विक विश्वनाथ यांच्याशी बातचीत करून क्रिप्टो करन्सीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

क्रिप्टो करन्सी नेमके काय?
या प्रकारच्या चलनाला इतर चलनांप्रमाणेच बाजारात एक ठराविक किंमत आहे. परंतु, इतर चलनांप्रमाणे हे प्रत्यक्ष नसून एक आभासी चलन आहे. क्रिप्टोग्राफीच्या सिद्धातांवर काम करणाऱ्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही करन्सी बनलेली आहे. त्यामुळेच, याला क्रिप्टो करन्सी असे म्हटले जाते.

विविध देशांच्या चलनावर त्या-त्या देशातील केंद्रीय बँकांचे नियंत्रण असते. किती चलन छापले जाणार, कधी छापले जाणार हे त्या-त्या देशातील आर्थिक धोरणानुसार ठरवले जाते. परंतु, क्रिप्टो करन्सीवर कुणाचेही नियंत्रण नाही. हे चलन डिजिटल स्वरुपात आहे. कुठल्याही देशाचे सरकार यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे, या चलनाच्या किमतींवर अनिश्चितता असते. या चलनाचा व्यवहार डिस्ट्रिब्यूटेड यंत्रणेवर आधारित असून ते कुणीही हॅक किंवा त्याच्याशी छेडछाड करू शकत नाही.

गुंतणुकीसाठी सुरक्षित आणि पारदर्शक आहे का?
ब्लॉकचेन सर्वात सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक तंत्रज्ञान आहे. सर्वात लोकप्रीय क्रिप्टो करन्सी बिटकॉइनला 2008 च्या आर्थिक मंदीनंतर उभारी आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या चलनात 90 लाख टक्के वाढ झाली आहे.
पण, चिंतेचा विषय म्हणजे क्रिप्टो करन्सीच्या किमती अस्थिर असतात. जेवढ्या झपाट्याने याची व्हॅल्यू वाढते, तेवढ्याच वेगाने त्यात घसरण सुद्धा होते. यात जोखिम आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये यात अनेक चढ-उतार आले. आतापर्यंत जवळपास 400 वेळा बिटकॉइन बंद पडल्याच्या घोषणा देखील झाल्या असतील. सध्या देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. अनेक देशांमध्ये अजुनही क्रिप्टो करन्सीला मान्यता देण्यास मागे-पुढे पाहिले जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये क्रिप्टो करन्सी रसातळाला गेली होती. पण, आता परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतात व्यवहार करता येतो का? कुठे-कुठे कायदेशीर मान्यता?

जगभरात क्रिप्टो करन्सीला मिळणारा प्रतिसाद एकसारखा नाही. भारत आणि चीनकडून याला नेहमीच विरोध होतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर बंदी लावली आहे. तर अमेरिकेसह इतर काही देश त्यावर अनुकूल आहेत. मध्य अमेरिकेतील छोटासा देश एल सल्वादोरच्या संसदेने 8 जून 2021 रोजी बिटकॉइनला मान्यता दिली. बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा हा पहिलाच देश आहे. आता दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील काही देश सुद्धा याला कायदेशीर मान्यता देण्यावर विचार करत आहेत.

भारतात क्रिप्टो करन्सीची खरेदी आणि विक्री करणे प्रतिबंधित नाही. 2018 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टो करन्सीवर बंदी लावली. क्रिप्टो करन्सीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होत असल्याचा दावा आरबीआयकडून करण्यात आला. परंतु, 2020 मध्ये सुप्रीम कोर्टात आरबीआयला हे सिद्ध करता आले नाही. यानंतर रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढला आणि नवीन आदेश जारी करण्यात आले. त्यात क्रिप्टो करन्सी खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात आली.

भारताने क्रिप्टो करन्सी अँड रेगुलेशन ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल 2021 संसदेत सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे, याला खासगी चलनांवर बंदी आणली जाईल आणि केंद्रीय बँकांनी ठरवलेल्या डिजिटल करन्सीला मान्यता देता येईल. भारतात क्रिप्टो करन्सीला विरोध होत असला तरीही लवकरच परिस्थिती बदलेल असे जाणकारांना वाटते.

आरबीआयच्या निर्देशात क्रिप्टो करन्सीवर नेमके काय म्हटले?

  • आरबीआयने आपल्या निर्देशात ग्राहकांना क्रिप्टो करन्सीच्या खरेदी आणि विक्रीची परवानगी दिली आहे. क्रिप्टो एक्सपर्ट्सच्या मते, एवढे निर्देश सुद्धा क्रिप्टो करन्सीसाठी खूप महत्वाचे आहेत.
  • आरबीआयच्या निर्देशानुसार क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करताना KYC, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादावर होणाऱ्या वित्तपुरवठा इत्यादी मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व गोष्टींवर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायदा (FEMA) अंतर्गत नजर ठेवली जात आहे.
  • क्रिप्टो गुंतवणूकदार यावर समाधानी आहेत. एल-साल्वादोर या देशाप्रमाणे भारतात सुद्धा क्रिप्टो करन्सीला परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतात क्रिप्टो करन्सीमध्ये कशी होते गुंतवणूक?

जगातील सर्वात लोकप्रीय क्रिप्टो करन्सी बिटकॉइन आहे. पण, ही एकमेव क्रिप्टो करन्सी नाही. कुठल्याही क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतणूक करण्यासाठी तुम्हाला एक क्रिप्टो वॉलेट सुरू करावे लागेल. एखाद्याने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जसे डीमॅट अकाउंट काढले जाते तसेच क्रिप्टो वॉलेटला मानता येईल.

  • क्रिप्टो वॉलेटसाठी KYC आणि इतर गोष्टींच्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. यानंतर तुम्हाला क्रिप्टो करन्सीमध्ये तुमच्या बँक खात्यातील रक्कम गुंतवावी लागेल. अशी ही क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची सोपी पद्धत.
  • भारतात काही प्लॅटफॉर्म तुम्हाला अवघ्या 100 रुपयांत क्रिप्टो वॉलेट सुरू करण्याची परवानगी देतात. काही वॉलेट मोफत सेवा देतात. तर काही वॉलेटमध्ये किमान 100 रुपये मेनटेनन्स चार्ज घेतला जातो. हे त्या-त्या क्रिप्टो एक्सचेंजवर विसंबून आहे. विशेष म्हणजे, बिटकॉइनच्या किमतीत घसरण झाली त्यापूर्वी ब्लूमबर्गच्या इंटेलिजेन्स रिसर्च रिपोर्टने दावा केला होता की 2021 मध्ये बिटकॉइनची किंमत 4 लाखांपर्यंत जाईल.
  • भारतात कायदेशीर मान्यता मिळेल का? सध्या काय प्रयत्न सुरू आहेत?

क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता देणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी महिने आणि वर्ष देखील लागू शकतात. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये सुद्धा याला मान्यता देणे शक्य वाटत नाही. भारतात डेटा यूजर आणि प्रायव्हसीवर आधीच चिंता वाढल्या आहेत. यासाठी काही टेक कंपन्यांची मदत घेण्याचा देखील प्रयत्न झाला. परंतु, यासाठी मनी लॉन्ड्रिंग, आर्थिक दहशतवाद आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी कठोर नियमावली बनवणे आवश्यक आहे. हे होत नाही तोपर्यंत कायद्याच्या कचाट्यातून क्रिप्टो करन्सीची मुक्तता शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...