आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:‘भाजपच माझ्या योग्यतेचा खरा उपयोग करू शकते’, मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपत जाणार

तिरुवनंतपुरम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 88 व्या वर्षी ई. श्रीधरन यांची केरळमध्ये निवडणूक लढण्याची इच्छा

मेट्रोमॅन ई. श्रीधरन रविवारी, २१ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणार आहेत. एप्रिल- मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने रविवारपासून ‘विजय संकल्प यात्रा’ काढण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे कासरगोड येथून ही यात्रा घेऊन रविवारी श्रीधरन यांचे गृहनगर मल्लापुरमला पोहोचतील तेव्हा ‘मेट्रोमॅन’ही भाजप आणि त्याच्या यात्रेत सामील होतील. दैनिक भास्करसोबत बोलतांना त्यांनी स्वत:च ही माहिती दिली. एवढेच नव्हे तर वयाच्या ८८ व्या वर्षी निवडणूक लढण्याची हिंमत, राजकीय जीवनासाठी भाजपचीच निवड का आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांना काय करायचे आहे, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलखुलासपणे दिली. त्यांच्या सोबतच्या बातचीतचा मुख्य अंश...

तुम्ही ८८ वर्षांचे आहात. या वयात तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल का?
मला सत्तेची भूक नाही. राष्ट्रनिर्माणासाठी आयुष्यभर सतत काम केले आहे. आताही तेच करायचे आहे. उर्वरित आयुष्य राष्ट्रीय पातळीवर पक्षाची विचारसरणी मजबूत करण्यासाठी समर्पित करायचे आहे. राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर पक्षाने सांगितल्यास कोणत्याही ठिकाणाहून लढण्यास तयार आहे. मात्र, माझे प्राधान्य माझे मूळ गाव मल्लापुरमलाच असेल.

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्याने निर्णय घेतला आहे?
नाही, माझी चर्चा पक्षाच्या प्रदेश नेतृत्वासोबत झाली आहे. त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला याबाबत अवगत केले असावे. प्रदेश समितीने आधीच मला पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी मदत मागितली आहे. मी करतही आहे.

राजकारणात यायचे काय कारण आहे आणि तुम्ही भाजपचीच निवड का केली?
हा अचानक घेतलेला निर्णय नाही. २०११ मध्ये निवृत्त झाल्यानंतर मला लोकांसाठी काम करायचे होते. एकटे काम करण्यात समर्थ नसल्याचे वाटायचे. म्हणून राजकारणात जायचा विचार केला. केरळमध्ये सत्ताधारी डावे पक्ष आणि काँग्रेस आघाडी दोघांनी निराश केले. त्यांच्या धोरणात देशहित नाही. त्यांचे नेते फक्त स्वत:साठी काम करत आहेत. भाजप एकमेव पक्ष आहे ज्या सोबत मी स्वत:ला जोडू शकतो. भाजपच माझ्या योग्यतेचा राज्य व राष्ट्र निर्माणसाठी योग्य उपयोग करू शकतो.

राजकारणात यायचा तुमचा हेतू काय?
देशहितासाठी मला पक्षात यायचे आहे. आज भारताच्या विरोधात काम करणारी शक्ती भारताची प्रतिमा खराब करण्याची माेहिम राबवत आहेत. दुर्दैवाने देशातील विरोधी पक्षही या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. हे केवळ भाजपला विरोध म्हणून केले जात आहे. तर केंद्र सरकारने देश आणि लोकांसाठी अनेक चांगली कामे केली. मला तेच पुढे न्यायचे आहे.

तुम्ही दिल्ली, कोलकाता मेट्रो आणि कोकण रेल्वे सारख्या प्रकल्पांवर काम केले आहे, कधी राजकीय हस्तक्षेपाचा सामना केला का?
मी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझे सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. कधी तरी मतभेद झाले. राजकीय दबावही आला. मात्र मी मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले. कधीच वाढू दिले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...