आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन 45 ची घोषणा केली आहे. यानुसार मराठवाड्यातील भाजपकडे नसलेल्या औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांवर आमचे लक्ष आहे असे विधान केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केले होते. विशेष म्हणजे या चारपैकी एका जागेवरील विद्यमान खासदार हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे भाजपच्या मिशन 45 चा शिंदे गटालाही धक्का बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या चारही मतदारसंघांतील पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणांचा घेतलेला हा आढावा...
सर्वात आधी पाहूया भागवत कराड ज्या मतदारसंघाबद्दल बोलले तिथे कोण खासदार आहेत?
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांपैकी जालना, बीड, नांदेड आणि लातूर या लोकसभा मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. तर भाजपकडे नसलेल्या औरंगाबादेत एमआयएमचे इम्तियाज जलील, परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव, हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, उस्मानाबादेत शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत.
आता या चारही मतदारसंघांतील राजकीय स्थिती आणि पक्षीय बलाबल पाहूया...
1. औरंगाबाद
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत गेल्या सुमारे अडीच दशकांपासून शिवसेनेचेच वर्चस्व बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 1999 ते 2014 पर्यंत सलग चार वेळा औरंगाबादचे खासदार राहिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवासाठी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांचा फॅक्टर निर्णायक ठरला. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी सुमारे पावणेतीन लाख मते घेतली. तर विजयी उमेदवार जलील यांना 3 लाख 89 हजार तर चंद्रकांत खैरेंना 3 लाख 84 हजार मते मिळाली. त्यामुळे औरंगाबाद मतदारसंघावरील शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्वच यावरून दिसून आले.
शिवसेनेच्या वर्चस्वाला शिंदे गटाचा धोका
मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असले तरी शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे निवडणुकीची गणिते बदलण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे यापैकी तीन आमदार शिंदे गटात गेले आहेत. कन्नडचे एकमेव आमदार उदयसिंह राजपूत हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे या बदललेल्या राजकीय स्थितीचे परिणाम येत्या निवडणुकीत दिसू शकतात असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
2. परभणी
परभणीचीही शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच ओळख आहे. 1991 पासून परभणीत शिवसेनेचे वर्चस्व बघायला मिळते. 1999 पासून सलग इथून शिवसेनेचेच उमेदवार विजयी ठरले आहेत. सध्या इथून सलग दुसऱ्यांदा खासदार असलेले संजय जाधव शिंदे गटात गेले नाही. शिवसेनेनंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव बघायला मिळतो. गेल्या सलग तिनही निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने परभणीत तुल्यबळ लढत दिली आहे.
एकच विधानसभा शिवसेनेकडे
याशिवाय मतदारसंघातील सहापैकी फक्त एकच विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे. इतर पाचपैकी दोन विधानसभा भाजपकडे, एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी तर एक रासपकडे आहे. परभणीत भाजपचे म्हणावे तेवढे अस्तित्व दिसत नसले तरी अलिकडच्या काळातील बदललेली समीकरणे आणि शिंदे गटाची बंडखोरी यामुळे इथे भाजपच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवली तर शिवसेनेचे पारडे भाजप आणि शिंदे गटासमोर जड ठरू शकते.
3. उस्मानाबाद
उस्मानाबाद मतदारसंघावरही 1996 पासून शिवसेनेचा प्रभाव दिसून येतो. सध्या इथे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत. उस्मानाबादेत नेहमीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत बघायला मिळालेली आहे. शिवसेनेनंतर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव दिसून येतो.
शिंदे गटाचे दोन आमदार
याशिवाय मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा शिवसेनेकडे आहेत. त्यातील दोन आमदार शिंदे गटात गेले आहेत, तर कैलास पाटील हे ठाकरे गटात आहेत. याशिवाय उरलेल्या तीनपैकी 2 विधानसभा भाजपकडे आहेत. तर बार्शीमध्ये अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे आहेत.
पाटील विरूद्ध निंबाळकर लढत
उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणावर निंबाळकर आणि पाटील या दोन्ही कुटुंबांचा मोठा प्रभाव आहे. जिल्ह्याचे माजी खासदार पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे भाजपत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून निंबाळकरांसमोर आव्हान उभे करण्याची भाजपची रणनिती असू शकते असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
4. हिंगोली
हिंगोली मतदारसंघावर 1991 पासून शिवसेनेचा प्रभाव असला तरी इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही मोठा प्रभाव आहे. तिन्ही पक्षांचे उमेदवार इथे अदलून बदलून विजयी झाल्याचे गेल्या निवडणुकांत बघायला मिळाले आहे. सध्या इथे शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत.
विधानसभेत भाजप-शिंदे गटाची ताकद
हिंगोलीतील विधानसभेच्या सहापैकी एकाच जागेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. उर्वरित तीन जागा भाजप, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. त्यामुळे विधानसभा जागांवरील ताकदीच्या जोरावर इथे भाजप आणि शिंदे गट मजबूत स्थितीत दिसत आहे.
महाविकास आघाडी फॅक्टरही निर्णायक
वरिल जागांवर शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे भाजपच्या आशा उंचावलेल्या असल्या तरी, येत्या निवडणुका जर महाविकास आघाडीने एकत्र येत लढवल्या तर शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद मिळून त्यांचे पारडेही जड होऊ शकते. कारण या चारही मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीचाही मोठा प्रभाव आणि मतगट्ठा आहे. त्यामुळे भाजप जरी शिंदे गटाच्या सहकार्याने पुढच्या निवडणुकीत या जागांवर दावेदारी करत असला तरी महाविकास आघाडी फॅक्टरही पुढच्या निवडणुकीत महत्वाचा ठरेल हेही स्पष्ट आहे.
बंडखोरीनेही गणिते बदलतील
याशिवाय एका बाजूने भाजपसह शिंदे गट आणि दुसरीकडे तीन मोठे पक्ष एकत्र आल्याने उमेदवारीच्या मुद्द्यावरून बंडखोरीचीही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे ऐनवेळी दोन्ही बाजूंनीही बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे बंडखोरीचा फॅक्टरही तत्कालीन परिस्थितीत महत्वाचा ठरू शकेल.
मात्र सध्याच्या स्थितीत तरी या सर्व शक्यता आणि अंदाजच आहे. 2024 च्या निवडणुकीला अजून एक वर्ष अवकाश आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाऊ शकते. भविष्यात आणखीही नवीन राजकीय गणिते बघायला मिळू शकतात. त्यामुळे तेव्हाची राजकीय स्थिती आणि उमेदवारी कुणाला मिळणार यावरच निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील.
हे वृत्तही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.