आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:विधानपरिषद निवडणुकीत आघाडीची का झाली बिघाडी? शिवसेनेला गड राखता आलेला नाही, मतं फुटून नागपूर-अकोल्यात झाला पराभव

वैशाली करोलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन पक्ष एकत्र आले म्हणजे विजय मिळतोच हे गणित फोल ठरले

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव करत भाजपची सत्ता राखली. दुसरीकडे अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल विजयी ठरले आहेत. येथे शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली होती. पण येथे सेनेचे बाजोरिया कमी पडले.

नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अपयशाची कारणे काय आहेत? त्यांना विजयाचा गड का राखता आलेला नाही? या विजयाचा फायदा भाजपला पुढील निवडणुकांमध्ये होणार का? याविषयी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख तसेच एमजीएम विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याशी चर्चा केली विधानपरिषद निवडणुकीत मत फोडाफोडीचे राजकारण महाविकास आघाडीला भोवले असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सर्वप्रथम जाणून घेऊया आतापर्यंत 6 जागांवर कोणकोणते सदस्य होते

आतापर्यंत दोन काँग्रेसचे, दोन शिवसेनेचे आणि दोन भाजपचे आमदार होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. ते सदस्य असे होते...

  • मुंबई - रामदास कदम (शिवसेना)
  • मुंबई - भाई जगताप (काँग्रेस)
  • कोल्हापूर - सतेज पाटील (काँग्रेस)
  • धुळे-नंदुरबार - अमरीश पटेल (भाजप)
  • अकोला-बुलडाणा - गोपीकिशन बजोरिया (शिवसेना)
  • नागपूर - गिरीशचंद्र व्यास (भाजप)

आता भाजपचे 4 उमेदवार निवडणून आले आहेत. शिवाय काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

  • निवडून आलेले नवीन सदस्य

महाविकास आघाडीच्या अपयशाची कारणे काय आहेत?

महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं सांगताना डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, 'नागपूर व अकोला विधानपरिषद निवडणूकीतील निकाल हे पूर्णपणाने लक्षवेधी म्हणता येतील. नागपूरमध्ये विधानसभेच्या निवडणूकीत तिकीट नाकारलेले माजी मंत्री बावनकुळे यांना भाजपने यावेळी तिकीट दिल्याने त्यांना निवडून आणणे अत्यावश्यक होते.'

पुढे ते म्हणाले, 'भाजपाचे पंचायतराज व्यवस्थेत सदस्य मतदारही जास्त होते. त्यात महाआघाडीने उमेदवारीमध्ये घोळ घातला. आधी भाजपतून उमेदवार आयात केला ही एक मोठी चूक नि पुन्हा ऐन निवडणूकीचे आधी अपक्षाला दिलेला पाठिंबा महागात पडला. आघाडीची मग बिघाडी झाली नि मतं फुटून पराभव अंगावर आला.'

अकोल्याचा पराभव मोठा धक्का आहे?
अकोल्यातही हीच परिस्थिती दिसून आली. याबाबत डॉ. गव्हाणे सांगतात, 'तिन्ही पक्षांची जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या निवडणुकींमध्ये एकी होणे शक्य नाही त्यांना निश्चितपणाने एकमेकांविरोधात लढावे लागणार आहे. कारण त्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षाची शक्तीराखून ठेवायची आहे ती वाढवायची आहे. त्यामुळे त्यांची अंतर्गत स्पर्धा राहणार आहे आणि आताचा पराभव हा शिवसेनेला आणि सोबतच महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारा आहे.'

डॉ. गव्हाणे म्हणतात, 'याआधी शिवसेना आणि भाजप एकत्र होते, त्यांच्या एकत्रित शक्तीने शिवसेनेचे उमेदवार निवडणून येत होते. आणि नागपूरची जागा ही भाजपकडे होती त्यामुळे इकडे जिल्हा परिषद ज्याला आपण पंचायत राज व्यवस्था म्हणतो त्यामध्ये या पक्षाची युती होणे, एकी होणे हे अशक्य आहे.'

'एकंदरीत राजकीय परिस्थिती बघात प्रत्येक पक्षाला स्वतःची शक्ती वाढवायची इच्छा आहे इर्ष्या आहे. या दोन्हीमुळे राजकीय स्पर्धा राहणार आहे मात्र विधानसभेच्या वेळीदेखील हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील की नाही याबाबतही शंकाच आहे. त्यामुळे आपण असे म्हणून शकतो की आघाडीला अकोल्याचा निकाल हा धक्काच आहे आणि नागपुरात त्यांनी उमेदवाराबाबत जो बेबनाव केला जो गोंधळ घातला त्याचाही त्यांना झटका बसला आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...