आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Bombay High Court Grants Permission To Uddhav Thackeray Shivsena For Dussehra Melava On Shivaji Park At Dadar

दसऱ्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज:सर्वाधिक चर्चेतील तीन दसरा मेळावे, जाणून घ्या मेळाव्याचा अन् वादाचा इतिहास...

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थापनेपासूनच शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याविषयीचा संभ्रम शुक्रवारी दूर झाला. यंदाच्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार यावर हायकोर्टाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. दसरा मेळाव्यासंदर्भातील शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळत कोर्टाने शिवसेनेला परवानगी दिली. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठीच्या दावेदारीत उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि मनसेवर बाजी मारली आहे.

यापार्श्वभूमीवर जाणून घेऊया शिवसेनेसह राज्यातील इतर दसरा मेळाव्यांचा इतिहास आणि अलिकडे निर्माण झालेल्या वादाविषयी...

आधी जाणून घ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा इतिहास

उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळाव्याची परंपरा पुढे
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे कायम ठेवली. 2013 पासून उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरेंची भाषणाची शैली बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक नसल्याने त्यांच्या दसरा मेळाव्यातील पहिल्या भाषणाविषयी अनेक चर्चाही झाल्या. पण दसरा मेळाव्याविषयी काहीही प्रश्न यानंतर निर्माण झाले नव्हते. शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे उद्धव ठाकरे हेच पारंपरिक वारसदार ठरले आणि त्यांनी तो वारसा पुढे चालवलाही. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासमोर दोन आव्हाने निर्माण झाली होती. एक स्वतः शिंदे गटाचे आणि दुसरे आव्हान होते मनसेचे.

शिंदे गटाचाही मेळावा होणार

दसऱ्याला शिंदे गटाकडूनही मेळावा घेतला जाणार आहे. फक्त तो मेळावा कुठे घेतला जावा यावरूनच शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आले होते. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न होते. पण हायकोर्टाच्या निकालामुळे शिंदे गटाला फटका बसला आहे. आता सुप्रीम कोर्टात जाण्याचेही संकेत शिंदे गटाने दिले आहेत. याशिवाय बीकेसी मैदानावर मेळाव्यासाठी शिंदे गटाने आधीच अर्ज केलेला आहे.

दसऱ्याला राजकीय आयोजने

खरंतर दसरा हा आपल्या संस्कृतीतील पारंपरिक सण. पण महाराष्ट्रात हा सण राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. कारण दसऱ्याला होणारे राजकीय मेळावे आणि आयोजने. महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन महत्त्वाचे दसरा मेळावे होतात. पहिला शिवसेनेचा, दुसरा बीडच्या भगवानगडावरील आणि तिसरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा. याशिवाय इतर राजकीय पक्षांकडूनही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आयोजने होत असतात. त्यामुळे दसरा हा सण अलिकडील काळात राजकीय झाल्याचेच चित्र आहे. शिवसेनेशिवाय इतर दसरा मेळाव्यांविषयी जाणून घेऊया...

मुंडे कुटुंबीयांचा दसरा मेळावा

शिवसेनेशिवाय दुसरा महत्त्वाचा दसरा मेळावा आहे मुंडे कुटुंबीयांचा बीडमध्ये होणारा मेळावा. बीडच्या भगवानगडावर परंपरेनुसार होणाऱ्या दसरा मेळाव्यात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी 1993 मध्ये सर्वप्रथम भाषण केले. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत गोपीनाथ मुंडे भगवानगडावरील दसरा मेळाव्यात सहभागी होत होते. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाल्यानंतर भगवान गडावरील मेळावा रद्द करण्यात आला होता. यानंतर 2015 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंनी गडावरील दसरा मेळाव्यात भाषण केले. यानंतर पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यात मतभेद झाले. नामदेव महाराज शास्त्रींनी दसरा मेळाव्यात राजकारण नको अशी भूमिका घेतल्याने 2016 मध्ये पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. तर 2017 पासून त्या भगवान बाबांचे गाव सावरगाव घाट इथे दसरा मेळावा घेत आहेत.

1951 पासून भगवानगडावर मेळावा

बीडमधील राजकीय अभ्यासक दादासाहेब मुंडे यांच्या सांगण्यानुसार, वास्तविक भगवानगडावर 1951 पासून दसरा मेळाव्याला सुरूवात झाली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मेळाव्याची सुरूवात झाली असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या त्या कालखंडातील महत्त्वाचे नेते या मेळाव्यात येत गेले. 1993 पासून गोपीनाथ मुंडे या मेळाव्यात यायचे. अजूनही भगवान गडावरील हा मेळावा सुरू आहे. हा मेळावा म्हणजे मुळात धार्मिक उत्सव असतो असे ते म्हणतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच 27 सप्टेंबर 1925 पासूनच संघाचा दसरा उत्सव दरवर्षी न चुकता संघाच्या नागपुरातील रेशीमबागेतील मुख्यालयात होत असतो. शस्त्रपूजन, स्वयंसेवकांकडून कवायतींचे सादरीकरण आणि सरसंघचालकांचे मार्गदर्शन असे या उत्सवाचे स्वरूप असते. संघाच्या राजकीय प्रभावामुळे या उत्सवातील सरसंघचालकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असते. या उत्सवात संघाकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले जाते. प्रमुख पाहूण्यांच्या भाषणानंतर सरसंघचालक मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संघासोबत जोडणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते. कोरोना काळातील अपवाद वगळता संघाचा हा दसरा उत्सव अखंडपणे सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...