आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:शासनाच्या जावयांचा प्रताप : कोरोना संकट चरणावर असताना 75 लोकसेवक चरले भ्रष्टाचारी कुरणावर!

लहू गाढे | जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर, नर्स, पोलिसांचे लाखो हात कोरोना याेद्धे म्हणून काम करत असताना भ्रष्ट लोकसेवकांची लाचखोरी

देशात काेराेना चरणावर असताना काही लाेकसेवक भ्रष्टाचाराच्या कुरणावर चरत हाेते. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अनेक शहरांत कार्यरत असलेल्या राज्यातील ३२२ लोकसेवकांनी या संकटाच्या काळातही लाच घेतली. या प्रकरणांत या लाचखाेरांसह ४४७ आरोपींना अटक करण्यात आली. सर्वाधिक लाचखोरांचे प्रमाण महसूल व पोलिस प्रशासनात आहे. एकीकडे डॉक्टर, नर्स, तसेच प्रामाणिक पोलिसांचे लाखो हात कोरोना ‘वाॅरिअर्स’ म्हणून काम करत आहेत. तर दुसरीकडे याच संकटाच्या काळात लाच खाऊन स्वतःची घरे भरण्याचे काम काही शासनाचे जावई करत आहेत. एकट्या जालना जिल्ह्यात १३ तर मराठवाड्यात ७५ लोकसेवकांनी लाच घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखोरांना रंगेहाथ पकडून त्यांची रवानगी पोलिस कोठडीतही केली हाेती.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लाचखोरांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही लाचखोर लोकसेवक तुरुंगात जाण्याची शक्यता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. काही लाचखोर लोकसेवकांना दोन ते तीन वेळा रंगेहाथ गजाआड केले आहे. मात्र, लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते कायद्याच्या पळवाटा शोधत राजरोस पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. लाचखोरीची हाव सुटलेल्या अशा अनेकांनी मोठी अपसंपदा मिळवली. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सरकारी कार्यालयांतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही आपली घरे भरण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या संकटातही तब्बल ३२२ लोकसेवकांनी लाच खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन काळात एकट्या जालना जिल्ह्यात अशा १३ लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. विशेष म्हणजे लाचखोरांचे सर्वाधिक प्रमाण प्रशासनाचा कणा समजल्या जाणाऱ्या महसूल विभागात असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले. सरकारी काम करून घेण्यासाठी भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच देण्याऐवजी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, तरच हे भ्रष्ट लोकसेवक गजाआड होतील. लॉकडाऊन काळातही लाच मागण्याच्या तक्रारी आल्या. संबंधित लोकसेवकांना सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. दरम्यान, लाच देऊ नका, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी अथवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

५०० ते ५ लाखांपर्यंत लाच घेतल्याचे उघड

या लोकसेवकांनी नागरिकांना दिलासा तर दिलाच नाही, उलट संकटाच्या काळात त्यांच्याकडून सरकारी काम करून देण्यासाठी ५०० ते ५ लाख रुपयांपर्यंत लाच मागितली. त्यात महावितरणचे कर्मचारी, महसूलचे तलाठी, कृषी सहायक, तसेच पोलिस प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गतवर्षीपेक्षा लाच घेण्याचे प्रमाण कमी

गतवर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत ४७७ गुन्हे घडले होते. यात ६३८ आरोपींना अटक करण्यात आली होती. चालू वर्षात याचे १५५ ने प्रमाण कमी झाले आहे. यात सापळा वाढीची टक्केवारी ३२ टक्क्यांनी कमी झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी अाणि जून महिन्यात लाच घेण्याचे जास्त प्रकार घडल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते.

 

बातम्या आणखी आहेत...