आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(उषा बाेर्डे)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन भारताचे राजगायक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या समन्वयातून बुद्धवंदनेचे अजरामर सूर साकार झाले. कृष्णराव फुलंब्रीकर यांनी शास्त्रीय संगीतात त्रिशरण पंचशील गायले होते. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून १९५२ मध्येच बुद्धवंदनेचे ध्वनिमुद्रण करण्यात आले होते. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव होते. त्यांनी नाट्यसंगीतासह शास्त्रीय संगीतात लौकिक मिळवला होता. मास्टरांच्याच आवाजात बुद्धवंदना ध्वनिमुद्रित व्हावी अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केल्यानंतर कृष्णराव अतिशय आनंदी झाले. उच्चारांत कोणताही दोष राहू नये म्हणून त्यांनी महिनाभर सिद्धार्थ महाविद्यालयात जाऊन पाली भाषेचे शिक्षण घेतले. बाबासाहेबांच्या मनाजोगा सूर आणि ताल जमून आल्यावर शास्त्रीय संगीतातील आताच्या भूप रागामध्ये त्यांनी ित्रशरण पंचशीलाचे गायन केले. गौतम बुद्धांची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य असल्याचे म्हणत मास्टरांनी या गायनासाठी एकही रुपया मानधन घेतले नसल्याची आठवण त्यांचे नातू मनोज फुलंब्रीकर यांनी सांगितली. बुद्धवंदनेचे ध्वनिमुद्रण असलेली 78 RPM ची ही तबकडी मनोज यांनी शारजातून मिळवली आहे. आता यूट्यूबवरही ही वंदना उपलब्ध आहे.
... आणि भोसले यांना भेट दिली घड्याळ
या कामासाठी बाबासाहेबांचे अनुयायी आकाशवाणी धारवाडचे तत्कालीन केंद्र संचालक भास्कर भिकाजी भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हाेती. बाबासाहेबांनी फुलंब्रीकरांशी याविषयी पत्रव्यवहार केला हाेता. मास्तरांच्या आवाजातील बुद्धवंदना ऐकून बाबासाहेब खुश झाले आणि त्यांनी हातातली घड्याळ काढून भास्कर भिकाजी भोसले यांना भेट दिली.
बाबासाहेबांची सांगीतिक आवड :
बाबासाहेब हे व्हायोलिन, तबला व हार्मोनियम सहजपणे वाजवत. संगीतावर त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणूनच माझ्या भाषणांच्या दहा सभा आणि कर्डक मंडळींचा एक जलसा बरोबर आहे, असे ते म्हणत. १९५६ ला नागपुरात धर्मांतर सोहळ्यात हे ध्वनिमुद्रण वाजवले हाेते. मुंबईचे आंबेडकरी जलसेकार शंकरनाथ कांबळे यांच्या पेटीवर “असारा पसारा शून्य संसार सारा” हे गीतही त्यांनी आपल्या खड्या आवाजात सादर केल्याचा उल्लेख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजगायक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर या दोन महान साधकांच्या साधनेतून निर्माण झालेली बुद्धवंदनेच्या ध्वनिमुद्रणाची संगीत कलाकृती अत्यंत सूचक आहे. भावी पिढीला बुद्धवचनाचे गायन करण्यासाठी दिशानिर्देश करणारी आहे. - डॉ. संजय माेहड, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.