आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Too Hard To Do Business, However, Plenty Of Career Opportunities; BIBA's MD Reveals The Ins And Outs Of The Fashion Industry

युनिकॉर्न ड्रीम्स:व्यवसाय करणे खूप कठीण मात्र, करिअरच्या भरपूर संधी; BIBA च्या एमडींनी उलगडले फॅशन उद्योगाचे अंतरंग

कुशान अग्रवालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

35 वर्षांपूर्वी 8 हजार रुपयांचे कर्ज घेऊन सुरू झालेला 'बिबा' आज भारतातील महिलांच्या फॅशनचा एक मोठा ब्रँड आहे. महिलांना त्यांच्या वॉर्डरोबमध्ये बिबाचे कपडे नक्कीच हवे असतात. त्यामुळेच बिबाने आतापर्यंत भारतात 310 हून अधिक स्टोअर सुरु केले आहेत.

आज 'Unicorn Dreams with कुशान अग्रवाल' मध्ये आपण BIBA चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बिंद्रा यांच्याशी चर्चा करणार आहोत. ही चर्चा कंपनी आणि फॅशन इंडस्ट्रीबद्दल देखील आहे मात्र, त्याआधी चर्चा अशा विषयावर ज्यामुळे कंपनी बनली, वाढली आणि यशस्वी झाली…

कुशान : सर्वप्रथम आम्हाला बिबाच्या सुरुवातीची गोष्ट जाणून घ्यायची आहे? त्याची सुरुवात कशी झाली आणि बिबा हे नाव कोठून आले?

सिद्धार्थ बिंद्रा: आमची सुरुवातच खूप अनोखी आहे. बिबा ब्रँडची सुरुवात माझ्या आईने 1980 मध्ये केली होती. खरंतर मी मोठा झालो तेव्हा आई घरीच असायची. माझे वडील नौदलात होते आणि आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. मग त्यांनी 8000 रुपयांचे कर्ज घेतले आणि घरीच एक छोटेसे कपड्यांचे प्रदर्शन भरवले. ते खूप यशस्वी झाले आणि त्यानंतर आम्ही कधीच मागे वळून पाहिले नाही.

त्या काळी सलवार कमीजला पंजाबी सूट म्हणत. एका सुंदर मुलीला पंजाबीमध्ये बीबा म्हणतात आणि तिथून आईने या ब्रँडचे नाव बीबा ठेवले.

कुशान: तुम्ही 1997 मध्ये BIBA मध्ये रुजू झालात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सर्वात मोठे आव्हान कोणते होते? आपण त्यास सामोरे जाण्यासाठी काय केले?

सिद्धार्थ बिंद्रा: मी जेव्हा या व्यवसायात सामील झालो तेव्हा व्यवसाय खूप छोटा असला तरी चांगला प्रस्थापित होता. त्यावेळी सर्वात मोठे आव्हान होते ते पैशांचे. आम्ही खूप रूढिवादी होतो आणि कर्ज घेण्याची आमची तयारी नव्हती. त्यामुळे पैशांशिवाय व्यवसाय वाढवणे हेच सर्वात मोठे आव्हान होते.

कुशान: तुम्ही देशातील फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहात, म्हणून मला फॅशन कोण ठरवते? हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे.

सिद्धार्थ बिंद्रा: आमच्याकडे डिझाइनर्सची एक टीम आहे जी यावर काम करते. माझ्या मते डिझायनिंग हे विज्ञान आणि कला यांचे मिश्रण आहे. बाजारात कोणता ट्रेंड आहे, काय विकले जातेय किंवा लोकांना काय जास्त आवडते, कोणत्या दुकानात काय पाठवायचे यासारखे फॅशनचे शास्त्र समजून घेतले पाहिजे. या सर्वांचा सखोल अभ्यास करयला हवा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातली कला. फॅशनमधील सर्जनशीलतेमुळे नवीन डिझाइन्स येतात. त्यांची प्रेरणा समाज, इतिहास, पुस्तकांपासून संस्कृतीपर्यंत सर्वांमधून मिळते. या सर्वांमधून वेगवेगळे डिझाइन्स बनवले जातात.

कुशान: बिबाचे देशभरातील 120 शहरांमध्ये 310 स्टोअर्स आहेत. ज्यामध्ये फक्त 20% फ्रँचायझी मॉडेलवर आहेत. जगभरातील इतर ब्रँड्स फ्रेंचायझी मॉडेलवरच काम करत आहेत. याचे कारण काय?

सिद्धार्थ बिंद्रा: जेव्हा आम्ही बिबाचे पहिले दुकान उघडले तेव्हा ते आमचे स्वतःचे होते. तिथे आम्हाला खूप छान अनुभव यायचा. तेव्हापासून, आमचा विश्वास आहे की, ग्राहकाला प्रत्येक स्टोअरमध्ये चांगला अनुभव मिळायला हवा कारण तो ब्रँडची प्रतिमा तयार करतो. आमचे स्वतःचे दुकान असल्याने आम्ही याची काळजी घेण्यास सक्षम आहोत आणि यावर वैयक्तिक पातळीवर देखरेख केली जाते. यामुळे आम्हाला किरकोळ विक्रीवर पूर्ण नियंत्रण मिळते आणि आम्हाला जास्तीत जास्त नफाही मिळतो.

मात्र, आता आम्ही फ्रेंचायझी मॉडेलकडेही वाटचाल सुरू केली आहे. आता आमची एकूण 310 दुकाने आहेत. आम्ही जेव्हा लहान शहरांमध्ये दुकान सुरू करण्याचा विचार करतो, तेव्हा तिथले व्यवस्थापन करणे कठीण होते. हेच लक्षात घेऊन आम्ही टिअर 2-3 शहरांमध्ये फ्रेंचायझी मॉडेल सुरू केले आहे. यासाठी, आम्ही चांगल्या फ्रँचायझी भागीदारांच्या शोधात आहोत जे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देऊ शकतात. परंतु असे असूनही, कंपनीची स्वतःची दुकाने बीबाचा सर्वात महत्त्वाचा भाग राहतील.

कुशान: बिबा केवळ चांगल्या दर्जाचे कपडेच विकत नाही तर स्थानिक डिझाईनचे कपडे देखील विकतो. मग बिबा हे स्थानिक विक्रेते किंवा बुटीकपेक्षा वेगळे कसे आहे? BIBA चे स्पर्धक कोण आहेत आणि त्याचा USP काय आहे?

सिद्धार्थ बिंद्रा: BIBA चा USP म्हणजे चांगल्या दर्जाचे आणि नवीनतम डिझाईनचे कपडे परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच ‘अफॉर्डबल फॅशन’ हाच आहे. गेल्या तीस वर्षांपासून आमच्यात सुधारणा होत आहे. आम्ही ब्रँड मार्केटमध्ये चुडीदार, अनारकली, पटियाला सलवार असे अनेक नवीन ट्रेंड आणले आहेत. आमचे कपडे संपूर्ण देशासाठी आहे, कारण आमची दुकाने देशाच्या राजधानीपासून लहान शहरांपर्यंत आहेत.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कपडे विकणारे सर्व व्यवसाय हे आमचे स्पर्धकच आहेत. प्रत्येक ब्रँडचा स्वतःचा USP असतो जसे की स्थान, किंमत, कपड्यांचा आकार इ.

दुसरीकडे, आम्ही 1980 पासून अनेक प्रकारचे कपडे बाजारात आणले आहेत. सुरुवातीला आम्ही फक्त साधे सलवार-कमीज विकायचो, नंतर 2004 मध्ये आम्ही रेडी-टू-स्टिच सुरू केले. त्यानंतर 2007 मध्ये, आम्ही मिक्स आणि मॅच श्रेणी घेऊन आलो. त्यानंतर 2010 मध्ये आम्ही मुलांचे कपडे विकायला सुरुवात केली. आता बीबावर तुम्हाला फॉर्मल कपडेही मिळतील.

कुशान : अनेक चित्रपटांमध्ये बीबाचे कपडेही दाखवले जातात. बॉलीवूड आणि बिबाचा काय संबंध?

सिद्धार्थ बिंद्रा: आम्ही 2002 पासून बॉलिवूडसाठी कपडे डिझाइन करायला सुरुवात केली. किशोर बियाणी यांचा 'ना तुम जानो ना हम' हा आमचा पहिला प्रोजेक्ट होता. आमच्यासाठी हे एक मोठे यश होते कारण आम्ही बॉलीवूडसाठी कपडे डिझाइन करणारा पहिला ब्रँड ठरलो. 4-5 वर्षांनी ब्रँडची भागीदारी वाढली आणि या कामाची किंमतही वाढली. आजकाल एका चित्रपटासाठी 15-20 ब्रँड्स काम करतात.

बॉलीवूड आणि क्रिकेट ही भारतातील दोन क्षेत्रे लोकांवर सर्वाधिक प्रभाव टाकणारी आहेत. चित्रपटांमध्ये ब्रँडच्या दिसण्याबाबत बोलायचे झाल्यास, ते नेहमीच प्रभावी असते. हे खूप मोठे व्यासपीठ आहे आणि जर तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला भरपूर नफा मिळतो.

कुशान : तंत्रज्ञानाप्रमाणे फॅशनही खूप वेगाने बदलते. अशा परिस्थितीत फॅशन इंडस्ट्रीत येणाऱ्या नवोदितांना तुम्ही काय सल्ला द्याल?

सिद्धार्थ बिंद्रा: फॅशन ही अतिशय रोमांचक आणि मोठी श्रेणी आहे. येथे व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. आज भारतात फक्त 30% ब्रँडेड मार्केट आहे, उर्वरित 70% अनब्रँडेड मार्केट आहे. देशातील महिला अधिकाधिक या कामाकडे वळत आहेत आणि याचा फॅशनवर मोठा परिणाम होत आहे. कार्यक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कपड्यांची आणि विशेषतः ब्रँडेड कपड्यांची मागणी वाढते. त्यामुळे बाजारात भरपूर वाव आहे.

वास्तविक, फॅशन व्यवसाय खूप अवघड आहे. यामध्ये तुम्ही उत्पादन बनवण्यापासून ते त्याचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्रीपर्यंत सर्व कामे करता. त्यामुळे पूर्ण वेळ इथेच द्यावा लागतो.

करिअरच्या दृष्टीने हा खूप चांगला उद्योग आहे जिथे तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील. या उद्योगात येऊ इच्छिणाऱ्यांना मी नेहमीच प्रोत्साहन देईन. तुम्ही तुमच्या ब्रँडचा यूएसपी ठरवा आणि त्यातूनच तुमचा ब्रँड पुढे न्या, असा सल्ला मी इंडस्ट्रीतील नवोदितांना देईल. असे केल्यास हे तुम्हाला नक्कीच यशाकडे नेईल.

कुशान : बिबाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? तुम्हाला कधी पराभवाचा स्वीकार करावा वाटला का? अशा कठीण काळातून तुम्ही स्वतःला कसे बाहेर काढले?

सिद्धार्थ बिंद्रा: गेल्या 24 वर्षांत आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. व्यवसाय सुरू करणे खूप कठीण आहे आणि या प्रवासात सर्व उद्योजकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात मी शिकलो की, कधीही हार मानू नये आणि हिंमत कमी होता कामा नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल तर त्यासाठी काम करा. कदाचित त्यामध्ये बदल करावे लागतील. पण जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही 10 पैकी 9 वेळा नक्कीच विजयी व्हाल.

कुशान : आता थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. आपण व्यवसाय या विषयावर बोलत नसता तेव्हा काय करता? म्हणजे तुमचे छंद कोणते आहेत?

सिद्धार्थ बिंद्रा: मला क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे आणि त्याबरोबर मला बागेत काम करायला आवडते. वास्तविक मला घराच्या बाहेरची कामे (आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज) आवडतात. त्यासोबतच चित्रपट पाहणे आणि संध्याकाळी कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणे नेहमीच चांगले असते.

कुशान : वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत?

सिद्धार्थ बिंद्रा: मी अजूनही बिबाला स्टार्ट-अप म्हणून पाहतो. आपण अजूनही नवनवीन शोध घेऊ शकतो आणि आपल्या सर्वांमध्ये स्टार्ट-अपची ऊर्जा आहे. आम्ही आमचा पुढील पाच वर्षांचा व्यवसाय आराखडा तयार केला असून त्यावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत.

वैयक्तिक योजनांबद्दल सांगायचे झाल्यास, मला व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे. याशिवाय मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडते.

बातम्या आणखी आहेत...