आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यश्लोक अहिल्याराणी स्मृतिदिन विशेष:चांदवडचा रंगमहाल वटवाघळांमुळे बेरंगी, साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक वास्तू संगोपनाच्या प्रतीक्षेत

दीप्ती राऊत | नाशिकएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

कल्याणकारी राज्यकारभाराचा वसा घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्यासह मराठी साम्राज्याच्या साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या चांदवडच्या रंगमहालाचे रंग निधीअभावी फिके पडले आहेत. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या या वास्तूतील नेत्रदीपक कोरीव काम आणि दुर्मिळ रंगकाम लयाला जात असून वटवाघळांच्या वसाहतीने दुर्गंधीसह त्याच्या दर्शनी भागाचीच दुर्दशा झाली आहे. गेल्या ५० वर्षांपासून होळकर ट्रस्टच्या वतीने या महालाची देखभाल करणारे ट्रस्टचे मॅनेजर एम. के. पवार ८०व्या वर्षात पदार्पण करत असताना थकलेल्या गात्रांनी या खंगणाऱ्या महालाची दुर्दशा रोखण्यासाठी झगडत आहेत.

मराठा साम्राज्याचे सरदार मल्हारराव होळकरांनी सन १७५२ मध्ये चांदवडमधील हा महाल मुघलांकडून खरेदी केला. त्यांच्या पश्चात राणी अहिल्याबाई राज्यकारभार करू लागल्यावर राजधानी माहेश्वरी ते राणींचे जन्मगाव असलेले चौंढी या राजमार्गावरील या वास्तूस विशेष महत्त्व प्राप्त झाले. भव्य दरबार मंडप, नगारखाने, बुरूज, पक्की धान्याची कोठारे, भुयारी मार्ग, बारमाही बावडी आणि बावडीतून महालात पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था, तीन मजली सागवानी बांधकाम, सुबक कोरीवकाम, भिंतींवरील रंगबेरंगी कलाकुसर अशा दुर्मिळ वास्तुकलेचा नमुना असलेल्या या महालातून अहिल्यादेवींनी पंचक्रोशीतील परगण्यांचा कारभार केला. स्वातंत्र्यानंतर राजेरजवाड्यांच्या दौलती सार्वजनिक संपत्तीत विलीन झाल्यावर राणींच्या सासूबाईंची खासगी दौलत म्हणून हा रंगमहाल होळकर ट्रस्टकडे राहिला. महसूल खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन सन १९६९ पासून होळकर ट्रस्टच्या वतीने या महालासह होळकर घराण्याच्या मालमत्तेची देखभाल करणारे एम. के. पवार यांच्या पाठपुराव्यानंतर १९९२ मध्ये पुरातत्व विभागातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून याची घोषणा झाली. त्यानंतर ५० वर्षे अविरतपणे या महालाचे संगोपन करणारे पवार आता थकले आहेत. सुरक्षेअभावी येथे चालणाऱ्या गैरप्रकारांबद्दल उद्विग्न होत आहेत.

रंगमहालाचा प्रवास

 • सन १७५६ : मल्हारराव होळकरांनी मुघलांकडून केला खरेदी
 • सन १७६७ : अहिल्याराणी होळकरांचा कारभार
 • सन १७९५ : अहिल्याराणींचा देहान्त
 • सन १९९२ : राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित
 • सन २००८ : १२ व्या वित्त आयोगातून २.५० कोटी मंजूर
 • सन २०११ : १२ व्या वित्त आयोगातून ३.४६ कोटी मंजूर
 • सन २०१२ : १३ व्या वित्त आयोगातून १.५१ कोटी मंजूर
 • सन २०१८ : अतिरिक्त आठ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित
 • सन २०२० : फेब्रुवारीमध्ये निविदा आणि वर्क ऑर्डर
 • ऑगस्ट २०२० : काम ठप्प

भविष्याची चिंता

साडेतीनशे वर्षांचा इतिहास या वाड्याभोवती गुंफलेला आहे. चांदवडसह पंढरपूर, जेजुरी, गोकर्ण, रामेश्वर या सर्व तीर्थांवरील राणींच्या कामकाजाचे, होळकरांच्या मालमत्तेचे ऐतिहासिक दस्तावेज आम्ही या ठिकाणी जतन केले आहेत. पुढील पिढीला माहिती व्हावे यासाठी. - एम. के. पवार, व्यवस्थापक, रंगमहाल

संगाेपनाच्या सेवेची प्रतीक्षा

या इतिहासाचे जतन व प्रचार करण्याच्या उद्देशाने ही वास्तू धनगर समितीस संगोपनासाठी मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे. याची मालकी पुरातत्व खात्याकडेच राहील. आम्ही देखभाल करू व इतिहास सांगू. - बापू शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय धनगर समाज संघर्ष समिती

आठ काेटी प्रलंबित
सन २००८ पासून रंगमहालाचे संवर्धन सुरू आहे. आतापर्यंत ८ कोटी निधी खर्च करण्यात आला. २३ लाख २६ हजार रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर फेब्रुवारीत काढण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अडचणी आहेत. - विजय धुमाळ, उप आवेक्षक, आर्कीओलॉजी विभाग, नाशिक

बातम्या आणखी आहेत...