आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:समतेसाठी संघर्ष करणारे केशवराव जेधे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ एप्रिल ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती; तर २१ एप्रिल ही बहुजनांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी संघर्षात्मक भूमिका घेणाऱ्या देशभक्त केशवराव जेधे यांची १२५वी जयंती. या दोन्ही समकालीन नेत्यांनी दलितांना, अस्पृश्यांना, बहुजनांना स्वतःची ओळख मिळवून देण्याची आणि त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करण्याची भूमिका वेळोवेळी घेतली. दोघांचीही भूमिका संघर्षात्मक होती आणि तत्कालीन राजकारणाला-समाजकारणाला नवे वळण देणारी होती. चवदार तळ्याचा सत्याग्रह, देशाचे दुष्मन खटला, राज्यघटनेच्या संदर्भातील सभागृहातील चर्चा अशा काही घटनांच्या निमित्ताने या दोन महान व्यक्तिमत्त्वांचा संबंध येत राहिला. हाच संबंध उलगडून दाखवणारा हा लेख.

विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद पुण्यात चांगलाच चिघळला होता. अर्थात, हा वाद शिगेला पोहोचण्यामागे टिळक-शाहू वाद आणि वेदोक्त प्रकरण हे मुख्य कारण होते. १९२० पर्यंत विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमात सक्रिय असणारे केशवराव जेधे आता राजकीय जीवनात सक्रिय होऊ पाहत होते. केशवराव जेधेंचा औपचारिकदृष्ट्या राजकारणात प्रवेश झाला तो १९२५ साली. त्या वर्षी ते पुणे म्युनिसिपालिटीत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकूण ४३ सभासद असलेल्या पुणे नगरपालिकेत ब्राह्मणेतरांची संख्या जरी जास्त असली, तरी टिळक गटाचाच प्रभाव म्युनिसिपालटीवर होता. साहजिकच, केशवराव जेधे विकासात्मक आणि सुधारणावादी दृष्टिकोनातून जे प्रस्ताव मांडायचे ते फेटाळले जाणार होते हे उघड होतं. त्यातच त्यांनी महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मांडलेला ठराव ब्राह्मणवादी गटाने फेटाळला आणि हा वाद अधिकच धुमसत गेला. सार्वजनिक पाणवठ्यांवर सर्व जाति-धर्मांच्या लोकांना प्रवेश देण्यात यावा; मुलींचं प्राथमिक शिक्षण मोफत असावं असे अनेक प्रागतिक विचारांचे ठराव केशवराव हिरिरीने मांडू लागले; आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करू लागले. जेधेंच्या या प्रागतिक भूमिका सनातनी वर्गाला मुळीच मान्य नव्हत्या. परिणामी, जेधेंचे सर्व प्रस्ताव म्युनिसिपालटीत फेटाळले जाऊ लागले.

केशवराव जेधेंनी सभागृहात तंटेबखेडे उभे केले आणि सभागृहाबाहेर ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा थेट संघर्ष अधिक धारदार होत राहिला. दोन्ही पक्ष परस्परांच्या सभा उधळून लावू लागले, वृत्तपत्रांतून-पुस्तिकांतून एकमेकांवर जहरी प्रहार करू लागले. केशवराव जेधेंचे सहकारी दिनकरराव जवळकर हे अशा तिखटजाळ लिखाणाचे शिरोमणीच! पुणे, कोल्हापूर आणि एकूणच दख्खन प्रांतात जुलै १९२५ मध्ये एका पुस्तकाच्या जाहिरातीने खळबळ माजवून दिली. "विजयी मराठा' या पत्रात केशवराव जेधे यांच्या नावासह पुस्तकाची जाहिरात झळकली आणि मराठी मुलखात धुराळा उडाला. पुस्तकाचे शीर्षक होते - देशाचे दुष्मन. लेखक - दिनकरराव जवळकर. मुद्रक - रामचंद्र नारायण लाड आणि प्रकाशक - केशवराव जेधे. या पुस्तकात दिनकरराव जवळकरांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यावर अत्यंत तिखटजाळ भाषेत प्रहार केले होते. या एका पुस्तकामुळे समाजजीवन अक्षरशः तापले. अखेरीस, टिळक समर्थकांच्या जाहीर सभेत ठराव मंजूर झाला आणि प्रकाशक केशवराव जेधे, लेखक दिनकरराव जवळकर, मुद्रक लाड, प्रस्तावनाकार बागडे यांच्यावर खटले भरण्यात आले. चिपळूणकर आणि टिळक यांच्या वारसदारांनी आपल्या पूर्वजांची बदनामी होत असल्याचा खटला भरला. १५ सप्टेंबर 1926 रोजी या खटल्याचा निकाल फ्लेमिंग साहेबांनी दिला. यात जवळकर व लाड यांना प्रत्येकी एक वर्ष साधी कैद व अडीचशे रुपये दंड; तसेच दंड न दिल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. तर प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावनाकार बागडे यांना प्रत्येकी सहा महिने कैद व शंभर रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टात केस उभी राहिली आणि आता केशवरावांना अटक होणार म्हणून पुणेरी सनातन्यांचा आनंद पोटात मावेनासा झाला. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही. कारण केशवरावांच्या बाजूने केस लढवण्यासाठी ठामपणे उभे राहिले दस्तुरखुद्द बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

डॉ. आंबेडकर यांच्या आरंभीच्या कारकिर्दीतील ही केस होती. पण त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने अत्यंत नेटकेपणाने केस लढवली आणि केशवराव जेधे व बागडे यांची जामिनावर सुटका झाली. आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली असताना, ब्राह्मणेतर चळवळीचे नेते कायद्याच्या कचाट्यात सापडलेले असताना मुंबईतील एकही वकील जेधेंचे वकीलपत्र घेण्यासाठी तयार झाला नाही. पण अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला कायदेतज्ज्ञ धावून यावा ही महाराष्ट्राच्या राजकारणाला-समाजकारणाला नवी दिशा देणारी घटना ठरली. बाबासाहेबांनी न्यायाधीश फ्लेमिंगसाहेब यांनी दिलेल्या निकालातील त्रुटी आणि विसंगती यांवर नेमके बोट ठेवले; आणि अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल सरकार फ्लेमिंगसाहेबाविरूद्ध काय कारवाई करणार असा खुलासा मागवायलाही बॅरिस्टर आंबेडकर कचरले नाहीत. या एका प्रसंगामुळे मराठा समाजात आणि एकूणच ब्राह्मणेतर पक्षात बाबासाहेबांची कीर्ति पसरली. १९२० नंतर बहुजनांचे नेते म्हणून केशवराव जेधेंच्या हाती निर्विवाद सूत्रे होती; तर दलितांचं नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. पण या दोन्ही नेत्यांचा लढा एकाच प्रकारच्या शोषणवादी, वर्चस्ववादी व्यवस्थेविरूद्ध होता. केशवराव जेधे यांना राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची आकांक्षा नव्हती. ते पुढे लोकसभेत खासदारही झाले; पण केशवरावांचे नेतृत्व फुलले ते फुले पुतळ्यासाठी संघर्ष केल्यामुळे आणि १९३० नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर. सत्शील, निर्भीड आणि बहुजनांच्या हितार्थ संघर्षात्मक भूमिका घेणाऱ्या केशवराव जेधेंमुळेच १९३६ नंतर काँग्रेस खेडोपाड्यात पोहोचली होती. केशवरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातला मराठा समाज, बहुजन समाज कैक पटीने काँग्रेसमध्ये सहभागी होत होता. केशवराव जेधे हे नाव घराघरात पोहोचलं होतं आणि केशवरावांमुळेच काँग्रेसला आता विराट रूप आलं होतं. केशवराव हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते.

४ ऑगस्ट, १९२३ रोजी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतर पक्षाचे नेते श्री. सीताराम केशव बोले यांनी असा ठराव मांडला की, मंदिरे, धर्मालये, सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी खुली करण्यात यावीत. हा ठराव सभागृहात पासही झाला. पण महाड येथील बहुसंख्य हिंदुंनी तिथल्या दलितांना चवदार तळ्याचे पाणी प्राशनास बंदी घातली होती. १९२४ साली पारित झालेल्या या ठरावाला अनुसरून, १९२७ साली काही दलित बांधव चवदार तळे येथे पाणी पिण्यासाठी गेली असता, त्यांना जबर मारहाण केली आणि तळ्याचा विटाळ झाला म्हणून वेदमंत्र-पठणाने तळ्याचे शुद्धीकरण करून घेतले. महाड येथील या प्रकाराने व्यथित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाकडे लक्ष घातले; त्याच वेळी केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर या ब्राह्मणेतर नेत्यांनीही महाड येथे सत्याग्रह पुकारला. केशवराव जेधेंनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या ब्राह्मणेतर पक्षातील मंडळींना आणि त्याचबरोबर अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांनाही आवाहन केले. या आवाहनाशिवाय जेधे आणि जवळकर यांनी महाड सत्याग्रह कशा प्रकारे करावा याची एक रूपरेषा प्रसिद्ध केली. चवदार तळ्यावर सर्व अस्पृश्य बांधवांनी आणि ब्राह्मणेतर मंडळींनी मोठ्या प्रमाणात जमून अस्पृश्यतेचा कलंक कायमचा मिटवून टाकावा, असे जाहीर आवाहन जेधे यांनी केले. दरम्यान, मराठा समाज हा खरं तर अस्पृश्यांच्या विरोधात आहे अशा कंड्या महाडमध्ये पिकवण्यात आल्या होत्या. अशा तणावपूर्ण परिस्थितीत केशवराव जेधेंनी महाडमधील मराठा पुढाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांना मराठे हे अस्पृश्यांच्या बाबतीत अगदीच अनुकूल असल्याचे ध्यानात आले.

महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने केशवरावांच्यात दडलेला एक पुरोगामी विचारांचा, समतेचा पुरस्कार करणारा नेता दिसून येतो. ज्या प्रमाणे देशाचे दुष्मन खटल्यात केवळ बाबासाहेब धावून आले; त्या प्रमाणे चवदार तळ्याच्या सत्याग्रहात मराठा समाजाचे व ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेते म्हणून केशवराव अखेरपर्यंत बाबासाहेबांशी बांधील राहिले. पुढे १९२९ साली पर्वती मंदिर सत्याग्रहात केशवरावांनी सक्रिय भूमिका घेतली. पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळायलाच हवा, यासाठी केशवरावांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेला सत्याग्रह आणि सत्याग्रहाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी फुले मंडईच्या सभेत सनातनी वृत्तीच्या लोकांचा केलेला तीव्र निषेध अशा घटनांतून त्यांची बाबासाहेबांशी असलेली वैचारिक संलग्नता ध्यानात येते.

आज डॉ. आंबेडकर आणि देशभक्त केशवराव जेधे, दोघेही देहाने आपल्यात नाहीत. पण त्यांनी दिलेला समतेचा वारसा आपल्याकडे आहे. या दोन्ही महापुरुषांची जयंती या महिन्यात असावी हा त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं स्मरण एकत्रीतपणे करण्याचा योग मला वाटला, या दोन्ही महापुरुषांच्या पवित्र स्मृतीस हृदयापासून अभिवादन.

चेतन कोळी
(लेखक अनुवादक, संपादक असून सध्या ते देशभक्त केशवराव जेधे यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहेत.)
koli4157@gmail.com

बातम्या आणखी आहेत...