आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनानंतर आता डेंग्यूचा कहर:जाणून घ्या मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी डेंग्यू का आहे धोकादायक ? सुरुवातीला तो कसा ओळखावा आणि त्यापासून कसा बचाव करावा?

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • डेंग्यू हा विशिष्ट प्रकारच्या (एडिस ) डासामार्फत पसरणारा एक प्रकारचा विषाणू-ताप आहे.

देशातून कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा तिस-या लाटेचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान डेंग्यूचा कहरदेखील वाढतोय. देशभरात डेंग्यूच्या गंभीर संसर्गामुळे मृतांची संख्या 150 पेक्षा जास्त आहे आणि हजारो लोक रुग्णालयात दाखल आहेत.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण डेंग्यूने आजारी पडत आहेत, परंतु मुलांना डेंग्यूचा धोका अधिक असतो. एकदा घरी राहून कोरोना टाळता येऊ शकतो, परंतु डेंग्यू हा असा आजार आहे जो लोकांना घरबसल्या आपला बळी बनवत आहे. सुरुवातीला सामान्य वाटणारा डेंग्यू ताप निष्काळजीपणामुळे मात्र जीवघेणा ठरू शकतो.

या पावसाळ्यात विशेष तयारी आणि खबरदारी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला डेंग्यूमुळे होणाऱ्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवू शकू. डेंग्यू आणि त्याच्या प्रतिबंधाशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ...

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू हा एक विषाणू आहे. ‘एडिस इजिप्ती’ नावाच्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. या डासाच्या पायावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे त्याला ‘टायगर मॉस्क्युटो’ म्हणतात. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे केवळ घरीच नव्हे तर इतरत्र कोठेही चावू शकतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध झाल्यास त्यातून पुन्हा अळी तयार होते. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) च्या अहवालानुसार, डेंग्यू हा जगातील 100 हून अधिक देशांमध्ये एक सामान्य आजार आहे. जगातील सुमारे 40% लोकसंख्या अशा ठिकाणी राहते जिथे डेंग्यूचा धोका असतो.

डेंग्यूची गंभीर प्रकरणे जीवघेणी आहेत. या डासांचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढतो. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी घर परिसराची स्वच्छता, घराभोवती पाण्याची डबकी साठवू नये, पाण्याची भांडी नियमित घासणे, पाण्याच्या भांड्याला घट्ट झाकण लावणे, आवारात पडलेल्या टायरमधील पाणी, कुंड्यातील पाणी, गच्चीत साठलेले पाणी याचा नियमित निचरा करावा. या गोष्टी पाळल्या तर एडीस डास उत्पत्ती कमी होईल. गप्पी मासे अळीनाशक असल्याने त्यांच्यामुळेही डासांची उत्पत्ती कमी होते. त्यांना साचलेल्या पाण्यात सोडावे.

डेंग्यूची गंभीर लक्षणे कधीकधी जीवघेणी ठरतात

डास चावल्यानंतर सुमारे 3 ते 5 दिवसांनी डेंग्यूची लक्षणे दिसतात. तीव्र ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी ही सामान्य लक्षणे आहेत. डेंग्यूची लक्षणे सौम्य आणि गंभीर अशी दोन प्रकारची असतात. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते. डेंग्यूची गंभीर लक्षणे मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. देशात सातत्याने डेंग्यूच्या प्रसारामुळे लहान मुलांसह मोठ्यांच्याही मृत्यूची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे व्हायरल तापासारखीच असतात

एका रिपोर्टनुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डेंग्यू होण्याची अधिक शक्यता असते. मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे व्हायरल तापाच्या लक्षणांसारखीच असतात. जर यापैकी कोणतीही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • डेंग्यूच्या आजारात अंगदुखी, पाठदुखी विशेष करून असते. म्हणून त्याला ‘बॅक ब्रेक फीव्हर’ असेही म्हणतात.
 • तीव्र ताप, खोकला
 • नेहमीपेक्षा जास्त रडणे
 • धाप लागणे
 • तोंड, ओठ, जीभ कोरडे पडणे
 • सातत्याने उलट्या झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता
 • अशक्तपणा आणि चिडचिडेपणा
 • हात आणि पाय थंड पडणे, कधीकधी शरीराचा रंग देखील बदलतो

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे अधिक धोकादायक आहे

सामान्यत: निरोगी शरीराच्या रक्तात 1.5 ते 4 लाख प्लेटलेट्स असतात. प्लेटलेट्स शरीरात रक्तस्त्राव थांबवण्याचे काम करतात. डेंग्यू विषाणू सहसा प्लेटलेट्स कमी करतो, ज्यामुळे शरीरात रक्तस्त्राव सुरू होतो. डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या 40 हजारांपासून 20 हजारांपर्यंत पोहोचते. 40-50 हजार प्लेटलेट्सपर्यंत रक्तस्त्राव होत नाही, परंतु जर रुग्णामध्ये प्लेटलेट्स 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी झाल्या तर प्लेटलेट्स देणे आवश्यक आहे.

शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्याने केशवाहिन्या फुटतात. या अवस्थेत योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण ‘शॉक’मध्ये जाऊ शकतो. याला ‘डेंग्यू ऑफ सिंड्रोम’ म्हणतात. यात लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब कमी होतो. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणूनच योग्य वेळी निदान व उपचार होणे आवश्यक असते.

डेंग्यू टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या पाहिजेत

इंदूरच्या महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे असोसिएट प्राध्यापक डॉ. अतुल शिंदे यांनी डेंग्यूपासून बचाव करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत...

 • घर आणि परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा: डास मुख्यतः गलिच्छ किंवा साचलेल्या पाण्यात प्रजनन करतात. घराच्या आत आणि बाहेरील ती सर्व ठिकाणे स्वच्छ करा जिथे जिथे पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ जुने टायर, तुटलेल्या बाटल्या, डबे, वॉटर कूलर, नाले याठिकाणी पाणी साचू देऊ नका.
 • खिडक्या आणि दरवाज्यांवर जाळी लावा : डास खिडक्या आणि दरवाज्यांमधून आत येतात. खिडक्या आणि दरवाजे किंवा इतर प्रवेशद्वारांवर जाळी बसवून डेंग्यू टाळता येऊ येतो.
 • डास प्रतिबंधक द्रव, स्प्रे किंवा क्रीम लावा : बाजारात ऑल आऊट, गुड नाईट सारखे अनेक प्रकारचे डास प्रतिबंधक उपलब्ध आहेत. हे खोलीत लावून डासांपासून बचाव करता येऊ शकते. या व्यतिरिक्त, ओडोमॉस सारख्या रिपेलेंट क्रीम देखील शरीरावर लावता येतात.
 • मच्छरदाणी वापरा: झोपताना मच्छरदाणी वापरा. मच्छरदाणी केवळ डेंग्यूच नव्हे तर इतर कीटकांपासून बचाव करण्याचे काम करते.
 • पूर्ण बाहीचे कपडे घाला: जर तुम्ही घराबाहेर असाल तर शरीराला झाकण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला. जेणेकरून डास तुम्हाला चावू शकणार नाहीत.

डेंग्यू झाल्यास काय करावे?

 • जर तुम्हाला ताप आला असेल किंवा डेंग्यूची लक्षणे दिसली तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटा.
 • शक्य तितकी विश्रांती घ्या.
 • जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय प्या.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विशेषत: एस्पिरिन किंवा इबुप्रोफेन घेऊ नका.
 • सौम्य लक्षणे आढळल्यास, आजारी सदस्याची डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी काळजी घेतली जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...