आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनपासून 12 हजार किलोमीटर दूर, जमिनीपासून 24 किलोमीटर उंचीवर असलेल्या अमेरिकेच्या हद्दीत चिनी बलून काय करायले गेले होते? चीनचे म्हणणे आहे की ते हवामानाची माहिती गोळा करत होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे.
अशा बलूनचा उद्देश हवामानाची माहिती गोळा करणे किंवा केवळ हेरगिरी करणे नसतो, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. अणुहल्ल्यासाठीही चीन काही नवीन पद्धती शोधत असेल असेही असू शकते. अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ एचआय सटन यांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही असाच एक बलून भारतावरून उडाला होता.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये चीनच्या हेरगिरी बलूनविषयी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
हेरगिरी बलून चीनमधून अमेरिकेत कोणत्या मार्गाने आले?
28 जानेवारी रोजी एक चिनी हेरगिरी बलून अमेरिकेच्या विमानतळ क्षेत्रात प्रवेश करताना दिसले होते. यानंतर ३ फेब्रुवारी रोजी मोन्टाना परिसरात ते उडताना दिसले. हे अमेरिकेचे आण्विक क्षेपणास्त्र क्षेत्र आहे. या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा संशय लष्कराला होता. तेव्हापासून त्याच्यावर नजर ठेवण्यात येत होती.
यानंतर शनिवारी दुपारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे बलून पाडण्याचे आदेश दिले. यानंतर हे बलून अशा भागात येण्याची वाट पाहण्यात आली की, ते पडल्यास लोकांना कोणताही धोका होणार नाही.
त्यानंतर कॅरोलिना कोस्टपासून 6 मैल अंतरावर सर्व प्रकारची हवाई वाहतूक बंद करण्यात आली. 60 ते 65 हजार फूट उंचीवरून हे बलून उडत असतानाच अमेरिकेच्या F-22 फायटर जेटने क्षेपणास्त्र हल्ला करून चिनी हेरगिरी बलून खाली पाडले.
हेरगिरी बलून रडारद्वारे सहज का पकडले जात नाही?
आपण ज्या स्पाय बलूनबद्दल बोलत आहोत त्याचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहे. जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात बलूनद्वारे अमेरिकेत आग लावणारे बॉम्ब टाकले होते.
हे कॅप्सूलसारखे फुगे अनेक चौरस फुटांचे असतात. जसे चीनचे स्पाय बलून 120 फूट रुंद आणि 130 फूट लांब होते.
या बलूनमधील हेलियम वायूमुळे यात साधारणपणे जमिनीपासून 37 किलोमीटर उंचीवरून उडण्याची क्षमता असते. या कारणास्तव, ते हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी वापरले जातात. उंचीवरून उडण्याच्या क्षमतेमुळे त्यांचा हेरगिरीसाठीही वापर केला जातो. तसेच, ते रडारवरही येत नाही.
अमेरिकेच्या एअर फोर्सचे एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या 2009 च्या अहवालानुसार, हेरगिरी बलूनमध्ये उपग्रहांपेक्षा मोठे क्षेत्र स्कॅन करण्याची क्षमता असते. सोबतच लक्ष्य क्षेत्रात अधिक वेळ घालवण्याची क्षमता देखील असते.
या चिनी बलूनचा अमेरिकेला धोका का होता?
चीनचे हे हेरगिरी बलून शुक्रवारी अमेरिकेतील मोंटाना शहरातून 60 हजार फूट उंचीवरून उडत होते. या भागात हवाई दलाचे क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विंग आहे. याशिवाय याने अमेरिकेची व्योमिंग न्यूक्लियर मिसाईल साइट आणि नॉर्थ डकोटा न्यूक्लियर मिसाईल साइटजवळूनही उड्डाण केले.
पेंटागॉनने सांगितले की हेरगिरी बलूनचा मार्ग त्याला मोंटानावर घेऊन गेला होता. ज्यामुळे ते आण्विक क्षेपणास्त्र साइट्सवर हेरगिरी करत असल्याची भीती निर्माण झाली.
चीनने शुक्रवारी सकाळी दावा केला की हे एक नागरी बलून होते जे हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी वापरले जाते, परंतु काही तासांनंतर पेंटागॉनमधील ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक रायडर यांनी सांगितले की आम्हाला माहित आहे की हे एक हेरगिरी बलून आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या बलूनच्या माध्यमातून अमेरिकेच्या आत हेरगिरी करू शकतो असा संदेश चीनने दिला आहे. सिंगापूरच्या राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे बेंजामिन हो म्हणतात की चीनला हे दाखवायचे आहे की तो अमेरिकेच्या मागे नाही. त्यामुळे चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची जनतेमध्ये विश्वासार्हता वाढेल.
या बलूनमुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे, यावरून तुम्ही धोक्याचा अंदाज लावू शकता. ते रविवारपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार होते.
या बलूनमधून अणुबॉम्ब नेणे शक्य आहे का?
चीन या बलूनचा वापर अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी करू शकतो, असा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकन लीडरशिप अँड पॉलिसी फाउंडेशनच्या 2015 च्या अहवालात असे म्हटले आहे की शत्रू देशाने सोडलेले बलून अमेरिकेत अण्वस्त्रे सोडू शकतात. तसेच इलेक्ट्रिकल ग्रिडमध्ये व्यत्यय आणू शकतात.
या अहवालाचे लेखक हवाई दलाचे मेजर डेव्हिड स्टकेनबर्ग यांनी लिहिले की, असे बलून काही महिन्यांत बनवले जाऊ शकते. शेकडो किलोग्रॅम वजनाचे शस्त्र एवढ्या उंचीवर नेल्यानंतर रडारही ते शोधू शकत नाही.
स्टकेनबर्ग यांनी शुक्रवारी सांगितले की, हे चिनी बलून अमेरिकेला धोरणात्मक संदेश देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ड्राय रनचा प्रकार होता.
संरक्षण तज्ञ जॉन पॅराचिनी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या आकाशात घिरट्या घालणारे बलून जवळपास तीन बसेस इतके लांब होते.
याआधीही बलूनमधून बॉम्ब टाकण्यात आले आहेत का?
5 मे 1945 ची गोष्ट आहे. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या शरणागतीच्या 3 दिवस आधी. अमेरिकेतील ओरेगॉनमधील ब्ले शहरात सहा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गनपावडरने भरलेले मोठे बलून त्यांच्यावर टाकण्यात आले होते. खरे तर हे बलून जपानने पाठवले होते.
यूएस नेव्हीच्या जुन्या कागदपत्रांनुसार, बलून 10 मीटर रुंद, 20 मीटर उंच आणि हायड्रोजन वायूने भरलेले होते. हे बलून सोडताना जपानने प्रशांत महासागरातील हवेच्या प्रवाहाचा फायदा घेतला. वारा त्यांना थेट अमेरिकेत घेऊन जाईल हे त्यांना माहीत होते.
हे बलून अतिशय हलक्या कागदाने बनलेले होते, ज्यात सेन्सर बॉम्ब बसवलेले होते. त्यांच्या नळ्या गनपावडरने भरलेल्या होत्या आणि त्यासोबत एक ऍक्टिव्हेशन डिव्हाईसही बसवण्यात आले होते. हे बलून 12 किलोमीटर उंचीपर्यंत उडण्यास सक्षम होते आणि एका चार्जवर 7,500 किलोमीटरपर्यंत उडू शकत होते.
भारतासह जगातील इतर देशांमध्येही चिनी बलून दिसले
जानेवारी 2022 मध्ये चीनच्या हेरगिरी बलूननी भारताच्या लष्करी तळाची हेरगिरी केल्याचा दावा अमेरिकन संरक्षण तज्ञ एचआय सटन यांनी केला आहे. यादरम्यान अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरवर चिनी गुप्तहेर बलून उडाले. त्यादरम्यान त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्यावेळी भारत सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नव्हते. ते बलून कोणाचे होते हेही उघड झाले नाही. तरीही चीनबद्दलच संशय व्यक्त केला जातो.
6 जानेवारी 2022 रोजी स्थानिक मीडिया संघटना अंदमान शिखाच्या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की हे बलून कोणत्या एजन्सीने आकाशात उडवले आणि का उडवले? हे बलून अंदमानातील कोणत्याही एजन्सीने उडवले नसेल तर ते हेरगिरीसाठी पाठवले होते का?
अमेरिकेनेही हेरगिरीसाठी अशा प्रकारचे बलून वापरले आहे का?
प्रोजेक्ट जेनेट्रिक्स: यूएस एअर फोर्सने दुसऱ्या महायुद्धानंतर चीन, पूर्व युरोप आणि सोव्हिएत युनियनची हेरगिरी करण्यासाठी प्रोजेक्ट जेनेट्रिक्स सुरू केले. हे WS-119L म्हणूनही ओळखले जाते.
या देशांची गुप्त माहिती आणि छायाचित्रे मिळविण्यासाठी जनरल मिल्सने 10 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी 1956 रोजी 5 वेगवेगळ्या प्रक्षेपण स्थळांवरून 516 हेरगिरी बलून लाँच केले.
त्यापैकी केवळ 31 नी कामाची छायाचित्रे आणि गुप्त माहिती पाठवली होती. यावेळी अनेक बलून खाली पाडण्यात आले. यापैकी अनेक देशांनी राजनैतिक विरोधही नोंदवला होता.
प्रोजेक्ट मोगुल: सन 1947 मध्ये यूएस एअर फोर्सने प्रोजेक्ट मोगुल सुरू केला. सोव्हिएत युनियनच्या अणुबॉम्बची हेरगिरी करणे हा त्याचा उद्देश होता.
यादरम्यान हेरगिरी बलूनमध्ये मायक्रोफोन बसवण्यात आले. अणुबॉम्बच्या चाचणीदरम्यान त्याच्या ध्वनी लहरी शोधणे हा त्याचा उद्देश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.