आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.5.2.1.7 मुळे हाहाकार माजला आहे. या व्हेरिएंटला BF.7 असेही म्हटले जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने तिथल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये 7 दिवसांतच 35 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 9928 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील कोरोनाचे मृत्यूतांडव बघून जगभरातील राष्ट्रांमध्येही आता कोरोनाचा अलर्ट दिला जात आहे. चीनमधील स्थिती पाहून अनेक देश आधीच सतर्क झाले आहेत.
आरोग्य मंत्री घेणार आढावा
चीनमधील कोरोनाचे संकट बघता भारतही अलर्ट झाला असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज आढावा बैठक घेणार आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता त्यांनी राहुल गांधींनाही पत्र लिहून भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे प्रतिबंध लागण्याची ही चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया भारतातही पुन्हा कोरोना पसरू लागला तर आपण याचा सामना करण्यासाठी किती सज्ज आहोत...
आधी नजर टाकूया देशात कोरोनाची सध्या काय स्थिती आहे...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 डिसेंबर रोजी देशात कोरोनाचे 131 नवे रुग्ण आढळले. तर देशभरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3408 इतकी आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 20 डिसेंबर रोजी देशभरात कोरोनाच्या 1 लाख 15 हजार 734 चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात कोरोनाचे 4 कोटी 46 लाख 76 हजार 330 रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी 4 कोटी 41 लाख 42 हजार 242 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 680 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात 132 सक्रीय रुग्ण
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, राज्यात सध्या कोरोनाचे 132 सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 81 लाख 36 हजार 386 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 79 लाख 87 हजार 824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे राज्यात 1 लाख 48 हजार 412 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्याची आकडेवारी पाहता देशात आणि राज्यातही कोरोना प्रसाराचा वेग बराच कमी आहे. पण तरिही चीनमधील नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराचा धोका पाहता देशातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे.
आता पाहूया लसीकरणाची स्थिती
220 कोटी लस दिल्या
देशात आतापर्यंत एकूण 220 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. यात कोरोनाचे दोन्ही लस घेतलेल्यांची म्हणजेच पूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या 86 कोटी 50 लाख इतकी आहे. अनेकांनी कोरोनाचे बूस्टर डोसही घेतले आहेत. भारतातील 22 कोटींहून अधिक लोकांनी कोरोनाचे बूस्टर डोस घेतले आहेत.
राज्यात 7 कोटी लोकांचे डबल डोस
महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 17 कोटी 76 लाख कोरोना लस देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्यांची संख्या 7 कोटी 15 लाख 88 हजार 411 इतकी आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील संरक्षक कवचाच्या बाबतीतही भारतात चांगली स्थिती असल्याचे सध्या तरी म्हटले जाऊ शकते.
कोरोना टेस्टिंगसाठी 2500 हून अधिक प्रयोगशाळा
आयसीएमआरच्या माहितीनुसार डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा उद्रेक. 6 जानेवारी 2020 मध्ये आयसीएमआरच्या मुख्यालयात कोव्हिड नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी पुण्यातील एनआयव्हीमध्ये कोरोना चाचणीसाठी भारतातील पहिली प्रयोगशाळा उभारण्यात आली. यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रसारानंतर देशभरात या प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढवण्यात आली. मे 2021 पर्यंत देशभरात चाचणीसाठी 2500 हून प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या होत्या. सध्या देशभरात कोरोना चाचणीसाठी 3393 प्रयोगशाळा आहेत.
22 लाख चाचण्यांचा विक्रम
या प्रयोगशाळांच्या माध्यमातून चाचण्यांचे प्रमाण आणि क्षमताही सातत्याने वाढवण्यात आली. मे 2021 मध्ये या प्रयोगाशाळांमध्ये 34 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. दिवसाला सर्वाधिक 22 लाख चाचण्यांचा विक्रम यावेळी करण्यात आला होता. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 90 कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. 20 डिसेंबर रोजीही देशभरात कोरोनाच्या 1 लाख 15 हजार 734 चाचण्या करण्यात आल्या.
रॅपिड अँटिजेन, वैयक्तिक चाचणी किटमुळे लवकर निदान
आरटीपीसीआर चाचण्यांना होणारा विलंब पाहता नंतर रॅपिड अँटिजेन टेस्टवर भर देण्यात आला. याशिवाय काही खासगी कंपन्यांनी कोरोनाची घरीच चाचणी करण्याच्या किटही तयार केल्या. यालाही चाचणीनंतर लगेच परवानगी देण्यात आली. यामुळे देशात कोरोना निदानासाठी चाचणीची मोठी यंत्रणा देशभरात उभी राहिली. लवकर निदानामुळे लवकर उपचार झाल्याने कोरोना नियंत्रणात मोठी मदत झाली.
एका दिवसात 20 लाख टेस्टिंगची क्षमता
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान या वर्षीच्या जानेवारीत देशात एकाच दिवसात कोरोनाचे 3.47 लाख रुग्ण आढळले होते. त्या दिवशी देशभरात कोरोनाच्या सुमारे 20 लाख चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या लाटेदरम्यान एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 4.14 लाख रुग्ण आढळले होते. तेव्हाही एका दिवसात सुमारे 20 लाख चाचण्या केल्या जात होत्या.
भारतात 834 लोकांमागे एक डॉक्टर
जून 2022 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, देशात 13.08 लाखांहून अधिक अॅलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. याशिवाय 5.64 लाख आयुष डॉक्टर्स आहे. यानुसार देशात 834 लोकांमागे एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार हजार लोकांमागे एक डॉक्टर असायला हवा. याशिवाय सरकारने गेल्या वर्षी संसदेत दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2021 पर्यंत देशभरात एक कोटीपेक्षाही जास्त आरोग्य कर्मचारी होती. यात डॉक्टर, नर्सेस, आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश आहे.
देशभरात 19 लाख बेड उपलब्ध!
स्टॅटिस्टा या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार भारतातील सरकारी रुग्णालयांत 7 लाख 14 हजार खाटा आहेत. तर खासगी रुग्णालयांत सुमारे 11 लाख 85 हजार खाटा आहेत. अशा प्रकारे भारतातील रुग्णालयांची सुमारे 19 लाख खाटांची एकूण क्षमता आहे. कोरोनाच्या उद्रेकादरम्यान देशात कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णालये उभारण्यात आली होती.
कोरोना उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा
पीआयबीवरील माहितीनुसार कोरोना संकटात 17 डिसेंबर 2021 रोजी देशात 23,680 कोविड उपचार केंद्र उपलब्ध होते. यात 18 लाख 12 हजार 17 डेडिकेटेड आयसोलेशन बेड होते. यापैकी 4 लाख 94 हजार 720 बेडना ऑक्सिजन सपोर्ट उपलब्ध होता. याशिवाय 1 लाख 39 हजार 423 आयसीयू बेड उपलब्ध होते. यात 65 हजार 397 व्हेंटिलेटल बेडचा समावेश होता.
कोरोनाचा सामना करण्यास भारत सज्ज
याशिवाय कोरोना संकटादरम्यान महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटरही उभारण्यात आले होते. याशिवाय रेल्वेच्या डब्यांचेही आयसोलेशन बेडमध्ये रुपांतर करण्यात आले होते. यामुळे देशातील कोरोना उपचारांसाठी उपलब्ध सुविधांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सध्या हे कोविड सेंटर बंद करण्यात आलेले असले तरी पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढल्यास ही यंत्रणा पुन्हा कार्यन्वित करणे आणि ती वेगाने वाढवणे भारतासाठी सध्याच्या स्थितीत सोपे आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला तर भारत त्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचे सध्याच्या स्थितीत तरी म्हणावे लागेल.
संदर्भः
https://www.mohfw.gov.in/
https://www.icmr.gov.in/COVIDTimeline/cindex.html
https://www.statista.com/statistics/1128673/india-number-of-public-and-private-hospital-beds-estimated/
https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1787361
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.