आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हकोरोनावरील प्रोपोगंडासाठी चीनकडून भारतीयांचा वापर:विद्यार्थी बनले खबरी; प्रतिमा जपण्यासाठी इंटरनेटवर बंधने

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1. डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत चीनमध्ये सुमारे 25 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

2. शेन्डोंग प्रांतातील किंगदाओचे महापौर बो ताओ म्हणाले की, शहरात एका दिवसात 5 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत.

3. चीनमधील लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे खात आहेत, देशात संत्र्यांची कमतरता आहे.

4. कोरोनामुळे घाबरलेले लोक रक्तदान करत नाहीयेत, त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा आहे.

5. 25 डिसेंबरपासून चीनने कोरोना प्रकरणाचा दैनिक डेटा अपडेट देणे बंद केले.

6. 8 जानेवारी 2023 पासून, इतर देशांतून येणाऱ्या लोकांना विलगीकरणात जाण्याची गरज भासणार नाही.

या महिन्यात चीनमधून आलेल्या या काही बातम्या आहेत. यातून दोन गोष्टी कळतात. सर्वप्रथम, चीनमध्ये कोरोनाची भयानक लाट सुरू आहे. आणि दुसरे म्हणजे सरकार याबाबत उदासीन आहे. जिनपिंग सरकारने डिसेंबरच्या सुरुवातीला शून्य कोविड धोरण मागे घेतले. नवीन रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या प्रथम खूप कमी सांगितली गेली, नंतर सांगणे बंद केले.

दरम्यान, काही व्हिडिओ येऊ लागले ज्यामध्ये चीनमध्ये राहणारे भारतीय म्हणतात की चीनमध्ये कोरोना नाही. भारतीय माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. आम्ही चीनमधील आमच्या सूत्रांना विचारले की प्रकरण काय आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधन अभ्यासकांचा समावेश आहे. तेथील परिस्थितीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, पण नाव न सांगण्याचीही ताकिद दिली. हे वृत्त त्याच लोकांच्या हवाल्याने आहे.

चीन सरकार व्हिडिओच्या माध्यमातून प्रोपोगंडा चालवत आहे

सातत्याने भारतीयांचे व्हिडिओ समोर येणे हा चीन सरकारचा प्रोपोगंडा आहे. कोरोनामुळे चीनची प्रतिमा डागाळू नये म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक युनिटशी संबंधित लोक असे व्हिडिओ बनवत आहेत. सहसा असे आदेश बीजिंगमधील नेतृत्वाकडून येतात.

जे परदेशी लोक चीनमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडून 'चायना इन माय आइज' या मोहिमेअंतर्गत व्हिडिओ बनवून घेतले जातात. हे व्हिडिओ पीपल्स डेली या अधिकृत मीडिया साइटवर अपलोड केले जातात. चांगल्या व्हिडिओंना पुरस्कार दिले जातात, म्हणजेच ही एक प्रकारची सशुल्क चळवळ आहे. भारतीय व्यापारी यिवू, शेन्झेन आणि ग्वांगडोंगमध्ये जास्त राहतात. येथे अनेक विद्यार्थीही आहेत. या शहरांमध्ये सर्वाधिक व्हिडिओ बनवण्यात आले आहेत.

सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाची मोहीम

कम्युनिस्ट पक्षाची एक व्यवस्था आहे. सरकारला त्यांच्या समर्थनार्थ मोहीम राबवायची असेल, तर त्यासाठी तोंडी आदेश येतो. ही गोष्ट नगरसेवकासारख्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. कोरोनाच्या बाबतीतही असेच झाले आहे. भारतीयांना सांगण्यास सांगण्यात आले की, भारतीय मीडियामध्ये सुरू असलेल्या गोष्टी चुकीच्या असून चीनमध्ये सर्व काही ठीक आहे असे त्यांनी सांगावे.

ग्वांगझू आणि शेन्झेन या दोन शहरांमध्ये बनवलेले दोन व्हिडिओ आम्ही पाहिले. दोन्हींमध्ये जवळपास एकसारखीच गोष्ट सांगण्यात आली होती. पहिली- भारतीय मीडिया चुकीचे सांगत आहे की चीनमध्ये कोरोनामुळे दररोज 5000 मृत्यू होत आहेत. आणि दुसरी- लोक आजारी आहेत किंवा त्यांना कोविड आहे, पण भारतात जितके सांगितले जात आहे तितके नाही. हा व्हिडिओ बनवण्याच्या हेतूविषयी दिव्य मराठी नेटवर्क कोणताही दावा करत नाही.

चीनमधील प्रत्येक माहितीवर नजर, नियम मोडल्यास तुरुंगवास

चीनकडे प्रोपोगंडा पसरवण्याची संपूर्ण यंत्रणा आहे. तथापि चीनमधून कोणतीही माहिती दुसऱ्या देशात पाठवणे खूप अवघड आहे. सरकार त्यावर नजर ठेवते. हे टाळण्यासाठी अनेक लोक व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच व्हीपीएन सारख्या पद्धतींचा वापर करतात, पण यातही धोका वाढत आहे. VPN विकल्याबद्दल काही लोक तुरुंगात गेले आहेत तर काहींना दंड ठोठावण्यात आला आहे.

VPN खरेदी करण्यासाठी 100 ते 200 डॉलर्स द्यावे लागतात. जर ते ब्लॉक झाले तर नवीन विकत घ्यावे लागते. कारवाई टाळण्यासाठी, लोक चिनी सोशल मीडिया अॅप्सवरून माहिती शेअर करत नाहीत. ते सहसा थायलंडचे लाइन अॅप किंवा व्हिएतनामचे सोशल मीडिया अॅप वापरतात. माहिती थायलंड किंवा व्हिएतनामला पाठवली जाते आणि तिथून पुढे पाठवली जाते.

असे करताना कोणी पकडले तर त्याला अटकही केली जाते. त्यामुळेच चीनमध्ये येणाऱ्या परदेशी लोकांना पोलिस एक आठवड्याचे प्रशिक्षण देतात, ज्यामध्ये त्यांना काय करावे आणि काय करू नये हे सांगितले जाते.

चीनची इंटरनेट सेन्सॉरशिप प्रणाली 'ग्रेट फायरवॉल'

चीनमध्ये इंटरनेट सेन्सॉरशिप सिस्टम 'ग्रेट फायरवॉल' 22 वर्षांपासून कार्यरत आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने इंटरनेट साहित्य नियंत्रित करण्यासाठी, व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी आणि खाजगी रेकॉर्ड त्वरीत शोधण्यासाठी सेन्सॉरशिप आणि निगराणी प्रणाली तेव्हा तयार केली होती. त्यासाठी 'गोल्डन शील्ड प्रोजेक्ट' सुरू करण्यात आला होता.

या फायरवॉलने सुरुवातीला फक्त काही अँटी-कम्युनिस्ट चीनी वेबसाइट्स ब्लॉक केल्या. हळुहळु बहुतेक वेबसाईट ब्लॉक झाल्या. जानेवारी 2010 मध्ये, गूगलला चीन सोडण्यास भाग पाडले गेले कारण त्यांनी सर्च रिझल्ट म्हणजेच शोध परिणाम फिल्टर करण्याच्या चीन सरकारच्या विनंतीचे पालन केले नाही.

जिनपिंग यांच्या राजवटीत सेन्सॉरशिप जास्त वाढली

2012 च्या उत्तरार्धात शी जिनपिंग कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले. आणि मग ते चीनचे सर्वात मोठे नेते बनले. नागरी समाज आणि विचारांवर बंधने हे जिनपिंग यांच्या राजवटीचे वैशिष्ट्य राहिले आहे.

नोव्हेंबर 2013 मध्ये, कम्युनिस्ट पक्षाने दस्तऐवज क्रमांक 9 जारी केले. यामध्ये पक्षाच्या सदस्यांना राजवटीच विरोधातील 'सात धोक्यां'पासून सावध राहण्यास सांगितले होते. यामध्ये नागरी समाज आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश होता.

हळूहळू, चीनमधील इंटरनेट सर्फिंगचा अनुभव बदलला. संवेदनशील शब्द आणि फोटोंची यादी वाढत गेली. लेख आणि टिप्पणी लगेच काढून टाकण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संवेदनशील शब्द किंवा वाक्यांच्या प्रतिमा स्कॅन करता येतील, अशी यंत्रणा सरकारने तयार केली.

ग्रेट फायरवॉलने अधिकाधिक परदेशी वेबसाइट्स ब्लॉक केल्या. न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट प्रमाणे, ट्विटर आता चीनमध्ये उपलब्ध नाही.

शाळांमध्ये विद्यार्थी खबरे, तक्रारीनंतर शिक्षकांना 'शिक्षा'

सरकारने प्रत्येक स्तरावर शाळांवर वैचारिक नियंत्रणही घट्ट केले आहे. 2019 मध्ये, जिनपिंग यांनी देशभरातील विचारधारा आणि राजकीय सिद्धांत शिकवणाऱ्या शिक्षकांना वर्गात 'चुकीच्या कल्पना आणि त्यांचे ट्रेंड' यांना विरोध करण्यास सांगितले होते.

आता विद्यापीठातील व्याख्यात्यांनी पुस्तकातील आशयापेक्षा वेगळे काही शिकवले तर त्याची माहिती विद्यार्थी लगेच देतात. हे विद्यार्थी प्राध्यापकांच्या राजकीय विचारांवर सतत लक्ष ठेवून असतात. परदेशी शिक्षकांसह काही प्राध्यापकांना वर्गात सरकारवर टीका केल्याबद्दल शिक्षा झाली आहे.

ट्विटर वापरल्याबद्दल अटक

शिक्षेचा धाक दाखवून अधिकार्‍यांनी मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक प्रसिद्ध लेखक आणि वकिलांना गप्प केले आहे. जुलै 2015 मध्ये, देशभरातून सुमारे 300 वकील, कायदेशीर सल्लागार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर अत्याचार झाले आणि अनेक जण अजूनही तुरुंगात आहेत. काही ट्विटर युजर्सना पोलिसांनी अटकही केली होती. त्यांची खाती डिलीट करण्यात आली.

चीनमध्ये जगात सर्वाधिक इंटरनेट यूझर्स आहेत. 2021 मध्ये यांची संख्या सुमारे 94 कोटी होती.
चीनमध्ये जगात सर्वाधिक इंटरनेट यूझर्स आहेत. 2021 मध्ये यांची संख्या सुमारे 94 कोटी होती.

नवी पिढी गूगल आणि ट्विटरशिवाय मोठी झाली

जुन्या पिढीला ग्रेट फायरवॉल आवडत नव्हता, पण जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर कॉलेजमध्ये जाणारी पिढी याला पाठिंबा द्यायला लागली. ही पिढी ट्विटर आणि गूगल न वापरता मोठी झाली आहे.

त्यामुळे त्यांना वाटते की ग्रेट फायरवॉल त्यांना चुकीची माहिती आणि देशाला अशांततेपासून वाचवते. चीनच्या स्वदेशी टेक दिग्गजांच्या उदयासाठीही ते योग्य मानतात. चिन सरकारवर केलेली टीका ही अमेरिकन सरकारचे षडयंत्र असल्याचे अगदी सहज स्वीकारले जाते.

हा नवा राष्ट्रवाद कधीकधी मूर्खपणाचा वाटतो, जसे की जेव्हा एका प्रसिद्ध डॉक्टरांनी चिनी मुलांनी नाश्त्यात डाळीऐवजी दुधासोबत अंडी खाण्याचा सल्ला दिला. सरकारी माध्यमांनीही त्यांचा बचाव केला, असे म्हटले की प्रथिने व्हायरसशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करू शकतात.

चीनमधील या लोकप्रिय साइट्सवर बंदी

2012 च्या उत्तरार्धात शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, इंटरनेट वापराबाबत चीनचे नियम अधिक कठोर झाले. वॉशिंग्टनची मानवाधिकार संघटना फ्रीडम हाऊसने 2021 च्या 'फ्रीडम ऑन द नेट' अहवालात चीनला 'नॉट फ्री' श्रेणीत ठेवले आहे. त्याला 100 पैकी फक्त 10 गुण मिळाले. 2020 मध्ये त्याला समान गुण मिळाले.

चीनमध्ये Google, Gmail, Facebook, Twitter, The Wall Street Journal, The New York Times पासून ते PowerPoint शेअरिंग साइट SlideShare वर बंदी आहे. केवळ इंग्रजी वेबसाइटच ब्लॉक केल्या नाहीत, तर गूगल आणि विकिपीडियाच्या चायनीज वेबसाइट्सही ब्लॉक केल्या गेल्या. चीनमधील इंटरनेट सेन्सॉरशिपचे निरीक्षण करणार्‍या Greatfire.org नुसार, चीनमध्ये आघाडीच्या 1,000 अलेक्सा डोमेनपैकी 138 ब्लॉक आहेत.

चीनमधील कोरोनाशी संबंधित अपडेट्स

  1. सार्वजनिक आरोग्य तज्ञ हुआंग यानझोंग यांनी म्हटले आहे की चीन सरकार प्रत्येकाला कोरोना पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यामागची विचारसरणी अशी आहे की कोरोनाचा उच्चांक जितक्या लवकर येईल तितके चांगले.
  2. चायनीज स्प्रिंग फेस्टिव्हलच्या आसपास 80%-90% लोकांना संक्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे. हे संपूर्ण देशाला लसीकरण करण्यासारखे असेल. तथापि, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
  3. चीनमधील रुग्णालये वाढत्या रुग्णांच्या दबावाचा सामना करत आहेत. फिव्हर क्लिनिकमध्ये सामान्य दिवसांच्या तुलनेत 50 पट जास्त रुग्ण येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढला आहे. आयसीयू आणि आयसोलेशन वॉर्ड भरले आहेत.
  4. जवळपास 30 वर्षांपासून बीजिंगमध्ये राहणारे डॉ. हॉवर्ड बर्नस्टीन म्हणाले - मी असे कधीही पाहिले नाही. आमच्या रुग्णालयात सातत्याने रुग्ण येत आहेत. जवळपास सर्वच वृद्ध आहेत आणि त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत आहेत.

या बातम्याही वाचा...

अयोध्येत सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होणार रामलल्ला:डिसेंबरमध्ये राम मंदिराचा गाभारा तयार होईल, वाचा, मंदिर उभारणीविषयी सर्वकाही

त्या तरुणाने माझ्या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला:पती तो डिलीट करायला गेले, तर त्याने माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा गळा कापला

बातम्या आणखी आहेत...