आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचीनी स्पाय शिप 11 ऑगस्टला श्रीलंकेत दाखल:भारताच्या नौदल तळांपासून इस्त्रोपर्यंत सर्वत्र हेरगिरीचा धोका

नीरज सिंह14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे गुप्तचर जहाज युआन वांग-5 ताशी 35 किलोमीटर वेगाने भारताच्या हेरगिरीसाठी श्रीलंकेच्या दिशेने जात आहे. हे जहाज 11 ऑगस्ट रोजी हंबनटोटा येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजाबाबत भारताने श्रीलंकेकडे निषेध नोंदवला आहे. मात्र तरीही श्रीलंकेने या जहाजाला हंबनटोटा पोर्टात येण्यास परवानगी दिली असून याबाबत भारत आता सतर्क झाला आहे. भारतीय नौदलाकडून जहाजाच्या प्रतेय्क हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये चीनचे हे जहाज किती धोकादायक आहे? आणि भारताकडून याबाबत चिंता का व्यक्त केली जात आहे? याबद्दल जाणून घेऊ..

युआन वांग-5 बीजिंगच्या जमीन-आधारित ट्रॅकिंग स्टेशनला माहिती पाठवते

चीनचे युआन वांग-5 जहाज 13 जुलै रोजी जियांगयिन बंदरातून निघाले असून ते 11 ऑगस्ट रोजी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात पोहोचेल. हंबनटोटामध्ये हे जहाज आठवडाभर म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत राहील. चीनने हे बंदर श्रीलंकेकडून 99 वर्षांच्या लीजवर घेतले आहे.

या जहाजाचा अंतराळ आणि उपग्रह ट्रॅकिंगमध्ये प्रभाव आहे. चीन युआन वांग श्रेणीच्या जहाजांद्वारे उपग्रह, रॉकेट आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स (ICBMs) च्या प्रक्षेपणाचा मागोवा घेतला जातो. चीनकडे अशी 7 जहाजे आहेत, जी संपूर्ण पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरावर हेरगिरी करतात आणि बीजिंगच्या जमिनीवर आधारित ट्रॅकिंग स्टेशनला संपूर्ण माहिती पाठवतात.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, हे जहाज PLAच्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (SSF) द्वारे चालवले जाते. SSF ही थिएटर कमांड लेव्हल संस्था आहे. हे PLA ला अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक, माहिती, संप्रेषण आणि मनोवैज्ञानिक युद्ध मोहिमांमध्ये मदत करते.

यापूर्वी 2022 मध्ये, जेव्हा चीनने लाँग मार्च 5B रॉकेट लॉन्च केले होते. त्यानंतर ते जहाज पाळत ठेवण्याच्या मोहिमेवर गेले. अलीकडेच ते चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनच्या पहिल्या लॅब मॉड्यूलच्या लॉन्चिंगच्या सागरी निरीक्षणामध्ये देखील सामील होते.

श्रीलंकेतून भारताची हेरगिरी करणे सोपे

श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी चीनचे जहाज हंबनटोटा येथे आल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. नंतर श्रीलंकेने या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत याला नियमित कामकाज असे म्हणत, यापूर्वी अनेक देशांना अशी परवानगी दिली असल्याचे सांगितले. श्रीलंकेकडून आतापर्यंत लष्करी कारवायांसाठी हंबनटोटा बंदराचा वापर करू देणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह श्रीलंका (BRISL) ने म्हटले आहे की, युआन वांग-5, 11 ऑगस्ट रोजी हंबनटोटा येथे पोहोचल्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हिंदी महासागर क्षेत्रातील उत्तर-पश्चिम भागात चीनी उपग्रहांना ट्रॅक करून त्यावर संशोधन करणार आहे.

BRISL ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, युआन वांग-5 च्या हंबनटोटा बंदराच्या भेटीमुळे श्रीलंका आणि इतर विकसनशील देशांना त्यांचे स्पेस प्रोग्राम्स शिकण्याची आणि विकसित करण्याची संधी मिळू शकते.

हे जहाज 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हंबनटोटा येथे राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कालावधीत बरीच माहिती गोळा केली जाऊ शकते, असे असताना श्रीलंकेकडून याला केवळ एक नियमित कामकाज म्हणणे चुकीचे आहे.

भारताचे नौदल तळ चीनच्या रडारखाली

युआन वांग-5 हे लष्करी नसून शक्तिशाली ट्रॅकिंग जहाज आहे. चीन किंवा इतर कोणताही देशाकडून क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या तर हे जहाज हालचाल करते. हे जहाज 750 किलोमीटर अंतरापर्यंत देखरेख करू शकते. 400-क्रू असलेले हे जहाज पॅराबॉलिक ट्रॅकिंग अँटेना आणि अनेक सेन्सर्सने सुसज्ज आहे.

हंबनटोटा बंदरात पोहोचल्यानंतर या जहाजाला दक्षिण भारतातील कल्पक्कम, कुडनकुलम सारख्या प्रमुख लष्करी आणि आण्विक तळांवर प्रवेश मिळेल. तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक बंदरे चीनच्या रडारवर असतील. भारताच्या मुख्य नौदल तळ आणि अणु प्रकल्पांची हेरगिरी करण्यासाठी चीन हे जहाज श्रीलंकेत पाठवत असल्याचेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या जहाजाला हायटेक इव्हस्ड्रॉपिंग उपकरणे बसवण्यात आली आहेत. म्हणजेच हे जहाज श्रीलंकेच्या बंदरावर उभं राहून भारताच्या अंतर्भागापर्यंतची माहिती गोळा करू शकते. तसेच, पूर्व किनारपट्टीवर असलेले भारतीय नौदल तळ या जहाजाच्या निशाण्यावर असतील. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चांदीपूरमधील इस्रोचे लॉन्चिंग सेंटरही जहाजाच्या रडारवर असू शकते. एवढेच नाही तर देशाच्या अग्नीसारख्या क्षेपणास्त्राची कार्यक्षमता आणि रेंज अशी सर्व माहिती या जहाजाकडून गोळा केली जाऊ शकते.

31 जुलै रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, हे जहाज ऑगस्टमध्ये हंबनटोटा बंदरात पोहोचल्याची बातमी मिळाली असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हित लक्षात घेऊन भारत सरकार प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहे.

त्याच वेळी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित देश चीनच्या सागरी वैज्ञानिक संशोधनाकडे योग्य नजरेने पाहतील तसेच यामध्ये हस्तक्षेप करण्याचे टाळतील.

श्रीलंकेकडून हंबनटोटा बंदर 99 वर्षांच्या लीजवर चीनला सुपूर्द

कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यानंतर श्रीलंकेने 2017 मध्ये दक्षिणेकडील हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांच्या लीजवर सुपूर्द केले. हे बंदर आशिया आणि युरोपमधील मुख्य सागरी व्यापार मार्गाजवळ आहे. हे बंदर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

1.5 अब्ज डॉलर्स खर्च करून बांधण्यात आलेले हे बंदर चीनचे नौदल तळ म्हणून प्रस्थापित होऊ शकते, अशी चिंता भारत आणि अमेरिकेकडून नेहमीच व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षा तज्ञांनी त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचा समावेश चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स स्ट्रॅटेजीमध्ये होतो असेही म्हटले गेले आहे. याअंतर्गत चीन हिंद महासागराच्या माध्यमातून भारताला जमिनीपासून ते समुद्रापर्यंत वेढा घालू शकतो.

हंबनटोटा बंदराचे बांधकाम 2008 मध्ये सुरू झाले, ज्यासाठी चीनने श्रीलंकेला 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी आणि चायना हायड्रो कॉर्पोरेशन नावाच्या सरकारी कंपन्यांनी हे बांधण्यासाठी एकत्र काम केले.
हंबनटोटा बंदराचे बांधकाम 2008 मध्ये सुरू झाले, ज्यासाठी चीनने श्रीलंकेला 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी आणि चायना हायड्रो कॉर्पोरेशन नावाच्या सरकारी कंपन्यांनी हे बांधण्यासाठी एकत्र काम केले.
बातम्या आणखी आहेत...