आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनु-बंध:निवडा तुमची बाजू, लढाई होणार आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरत यादव

बेगडी विकासवेडाने झपाटलेले राजकारणी तसेच त्यांच्यामागे फरपटत निघालेला चंगळवादी शहरी समाज यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी कोलकातानिवासी असलेले ज्येष्ठ हिंदी लेखक- कवी राज्यवर्द्धन यांची कविता आहे.

कोलकातानिवासी असलेले ज्येष्ठ हिंदी लेखक-कवी राज्यवर्द्धन यांचे आजवर राष्ट्रीय स्तरावरील अनेक साहित्यिक नियतकालिकांमधून वाङमयीन तसेच सामाजिक विषयांवरील लेखन प्रसिध्द झाले आहे. हिंदीतील समकालीन अकरा कवींच्या कवितांचे त्यांनी संपादन केले असून ते "स्वर-एकादश' या नावाने प्रसिध्द आहे. चित्रकलेच्या प्रांतातही ते आवडीने आणि तितक्याच अधिकारवाणीने मुशाफिरी करत असतात. "कबीर अब रात में नहीं रोता' हा त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रसिध्द होत आहे. निसर्ग,समाजाकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन त्यांच्या कवितांमधून मिळतो. त्याचबरोबर सध्य राजकीय स्थिती व प्रसंगांवर कवितेतून मार्मिक टिप्पणीसुध्दा ते सहजपणे करतात.भारतातील ग्रामीण संस्कृतीकडे म्हणजेच गावखेड्यातील निकोप प्रथा-परंपरांकडे कवितेच्या चष्म्यामधून पाहताना कवीचे पर्यावरणपूरकतेचे भान सुटत नाही. बेगडी विकासवेडाने झपाटलेले राजकारणी तसेच त्यांच्यामागे फरपटत निघालेला चंगळवादी शहरी समाज यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी राज्यवर्द्धन यांची कविता आहे.

बाजू जे लेखक,कलावंत, शास्त्रज्ञ,अधिकारी, उद्योगपती तसेच बुद्धीजीवी हिंदू लोक आमच्याबाजूने नाहीत ते कम्युनिस्ट आहेत किंवा मग हुजरे आहेत काँग्रेसचे ..तसेच जे मुस्लिम, आमच्या बाजूने नाहीयेत ते पाकिस्तानी आहेत केवळ माझीच विचारधारा देशाच्या संस्कृतीशी जोडली गेलेली आहे, पवित्र आहे,

देशाच्या परंपरेची खरी वाहक आहे पावन आहे इतर विचारधारा देशद्रोही आहेत देशाला बदनाम करण्याची कारस्थानं आहेत, देशाच्या विकासातले अडथळे आहेत आम्हांला सहिष्णुतेचे धडे शिकवू नका तुम्हीच असहिष्णु आहात, जे आमच्या विचारधारेशी संबंध ठेवत नाहीत आमच्यासारखा विचार करत नाहीत आमच्यासारखे बोलत नाहीत आमच्यासारखा पेहराव करत नाहीत अजूनही वेळ आहे निवडा तुमची बाजू लढाई होणार आहे

पूल पूल कोलकाता-मुंबईचा असो अथवा काशी-बिहारचा किंवा वस्तीमधला, काही फरक पडत नाही सत्ता आणि पूल या दोहोंचीही संरचना एकसारखीच आहे भ्रष्टाचाराचे मटेरियल दोहोंमध्ये समान दिसते त्यामुळे पूल कुठेही कोसळत असतो विशेष बाब म्हणजे कोसळणारे सारे पूल व्हाया सरकारी अधिकारी सत्ता आणि कंत्राटदारांशी जोडलेले असतात

जनता मुर्ख आहे विनाकारण पूलावरुन चालत जीव देत असते हे ठाऊक असूनही की पूल सरकारी आहे, केव्हाही कोसळू शकतो कवी आहे, त्यामुळे असे वाटते की, मानवतेच्या हितासाठी देशातल्या सगळ्या पूलांनी लवकरात लवकर कोसळून पडायला हवं ज्यामुळे वित्त व जीवीताची होणारी आणखी हानी टळेल, पडण्यावर, कोसळण्यावर कुठलीच मर्यादा नाही मनुष्य असो वा पूल देशामध्ये कुणीही कुठेही कितीही मर्यादेपर्यंत कोसळू शकतो, पडू शकतो पडणे एक भयावह क्रिया नाही एक प्रतिष्ठित बाब आहे पडणारे सगळेच्या सगळे लब्धप्रतिष्ठित आहेत.

झाड जेव्हा आपण आपल्या हव्यासापोटी विकासाची मानके प्राप्त करण्यासाठी हवेत मिसळवत असतो- विष, तेव्हा तो दिवसा निळकंठाप्रमाणे

प्राशन करत असतो- विष आपला बचाव व्हावा विषारी हवेपासून म्हणून एवढेच नाही सूर्याच्या मदतीने पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांसाठी तो उत्साहाने बनवत असतो- अन्न रात्रीच्यावेळेस तो थकून भागून झोपी जातो गाढ मजूर,शेतकरी,क्लार्क,शिपाई, शिक्षक आणि जगातल्या अशा प्रत्येक चांगले काम करणार्‍या चांगल्या माणसांसमवेत ....तेव्हा फक्त लूटारू आणि कपटी लोक पृथ्वीच्याविरूध्द कट रचत असतात- झाड तोडण्याचे.

नदी नरभक्षक बनली आहे आजी सांगत असे- गोष्ट .....संततधार पाऊस कोसळल्यामुळे पूर पूर्वीही येत होता एखाद्यावर्षी चढत असे पाणी वित वित जसे एखादे बाळ वाढते हळू हळू होत नव्हती जिवित वा वित्त हानी वेळीच आसऱ्याला जात असत लोक कुठल्याशा मचाणावर किंवा जाऊन बसत असत

गावातल्या एखाद्या उंच घरावर नदीचा कोप होत असे जेव्हा शांत उतरत असे पाणी सावकाशपणे जसे चढत असायचे म्हणायची आजी- ज्यावर्षी यायचा पूर त्यावर्षी पीक दुप्पटीने पिकत असे पूर जितके घ्यायचा त्याच्या कितीतरीपटीने अधिक परतफेडही करायचा आता म्हणत असते आई- जेव्हापासून नदीवर बांधण्यात आलेय धरण तेव्हापासून नदी सुंदरबनातल्या वाघाप्रमाणे नरभक्षक बनली आहे रात्री-बेरात्री दबक्या पावलाने अचानक करत असते भयाण हल्ला फस्त करते जीव आणि वित्त आणि देऊन जाते जीवघेणी कळ- आपल्यांपासून दुरावल्याची आयुष्यभरासाठी

बुद्धांशी संवाद तुम्ही म्हणालात- जगात दुःख आहे दुःखाचे कारण आहे आणि त्या दुःखांवर उपाय पण आहे परंतू आयुष्यातील संघर्षातून कळले की प्रत्येक दुःखावर उपाय शक्य नाही समजावले मनाला

ज्या दुःखाचा उपाय आपल्या हातात नाही त्यासाठी का म्हणून दुःखी व्हावे खरे सांगू तथागता! ज्याक्षणी मनात हा विचार उमलला विरून गेले अवघे दुःख कापराप्रमाणे त्याक्षणी .....आणि मिळाली दुःखांपासून मुक्ती कायमची कारण, कळून चूकले होते जीवनाचे परमसत्य! तुम्ही योग्य तेच सांगितले होते तथागता, अत्त दीपो भवः

yadavbh515@gmail.com संपर्क - ९८९०१४०५००

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser