आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट592 वर्षापूर्वीच्या गावात राहतात नेफ्यू रियो:इथल्या झाडांवर लटकायचे शत्रूंचे डोके, आता 5-स्टार रिसॉर्ट आणि हेलिपॅड

आशिष राय15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी अर्थात NDPP चे नेफ्यू रियो आज पाचव्यांदा नागालँडचे मुख्यमंत्री होणार आहेत. राजकारणात 49 वर्षे घालवलेल्या रियो यांनी यावेळी नॉर्दर्न अंगामी II या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि त्यांना जवळपास 93% मते मिळाली. या जागेवरून ते आठव्यांदा विजयी झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे रियो इतके लोकप्रिय का आहेत, याचे उत्तर नागालँडच्या तुओफेमा गावात सापडते.

एकेकाळी आदिवासींच्या राक्षसी वृत्तीचे साक्षीदार असलेले हे गाव आता देशातील सर्वात आधुनिक गावात समाविष्ट झाले आहे. एकेकाळी शत्रूंचे डोके या गावाच्या मुख्य गेटवर टांगले जायचे, आता तेच गाव आलिशान रिसॉर्ट्स, स्टेडियम आणि आलिशान बंगल्यांसाठी ओळखले जाते.

592 वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या या गावात 72 वर्षीय नेफ्यू रियो यांचे घर आहे. अंगामी नगा समुदायाचे असलेले नेफ्यू रियो यांचे वडील गुलहौली रियोहे स्वातंत्र्यापूर्वी या गावात आले होते. व्यवसायाने कंत्राटदार असलेले गुलहौली हे गावात पक्के घर बांधणारे पहिले व्यक्ती होते. आता त्यांचा मुलगा नेफ्यू रियो यांच्या मुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.

गावापर्यंत जाण्यासाठी एकच बस, लोकांनी स्वतःच्या पैशातून सुरू केली होती

'मुख्यमंत्र्यांचे गाव' अशी ओळख मिळवून देणाऱ्या तुओफेमाला पोहोचण्यासाठी मी दिल्लीपासून 2,225 किमी अंतरावर असलेल्या दिमापूरला पोहोचलो. येथून राजधानी कोहिमापर्यंत 70 किमीचा प्रवास करून खासगी टॅक्सी घेतली. मात्र, दुपारी एक वाजता कोहिमा येथून तुओफेमासाठी बस सुटते. ही एक सार्वजनिक बस सेवा आहे. गावातल्या लोकांनी शहरात सहज ये-जा करण्यासाठी 2006 मध्ये स्वखर्चाने याची सुरुवात केली. 2013 पासून पर्यटन वाढल्यानंतर त्याचा खर्च राज्य सरकार उचलत आहे.

जंगलात आणि डोंगरात बांधलेल्या वळणदार रस्त्यांवरून तुओफेमा मार्केटमध्ये पोहोचायला मला दोन तास लागले. नागालँडच्या बहुतांश भागात रस्ते खराब आहेत, पण कोहिमाहून मुख्यमंत्र्यांच्या गावात पोहोचताना तसे अजिबात वाटत नाही.

बाजारात गेल्यावर एक माणूस दिसला जो आपल्या गाडीत काही वस्तू ठेवत होता. त्याचा चेहरा नेफ्यू रियो सारखाच होता. म्हणूनच मी त्यांच्याकडे गेलो, बोलू लागलो आणि कळले की, ते नेफ्यू रियो यांचे धाकटे बंधू झालिओ रियो आहेत.

नेफ्यू रियो यांचा IAS भावाने निवृत्तीनंतर पक्ष सांभाळला

झालियो हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. सध्या राजकारणात सक्रिय असलेले ते कोहिमाचे उपायुक्त राहिले आहेत. निवडणुकीतील एनडीपीपीचे संपूर्ण काम ते पाहत होते. मी त्यांना गाव दाखवण्याची विनंती केली. ते म्हणाले की, 'मी सध्या बिझी आहे, मी गावात फिरू शकणार नाही, पण मी तुम्हाला एक जागा दाखवू शकतो.'

मी त्यांच्यासोबत गेलो. नेफ्यू रियो यांच्या गावासाठी आणखी 5 किमी चालावे लागले. झालियो मला त्यांच्या आईवडिलांच्या कबरीपर्यंत घेऊन गेले. झालिओ आणि नेफ्यू रियो यांचे वडील गुलहौली आणि त्यांची आई केविलहौ रिओ यांच्या कबरी गावात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरच्या बाजूला बांधलेल्या आहेत.

गावाचा इतिहास : मुख्य वेशीवर शत्रूची मुंडके टांगलेले असायचे

तुओफेमा गावातील बहुतांश लोकसंख्या अंगामी नगा समाजाची आहे. इथे गावाची वेशी असो की, ग्राम परिषदेचे कार्यालय, वर दोन कुऱ्हाडी आहेत. अंगामी समाजाचे हे पारंपारिक चिन्ह आहे. नागालँडमध्ये 17 जमाती आहेत, प्रत्येकाची वेगळी संस्कृती आहे. त्यापैकी बहुतेकांमध्ये हेड हंटिंग करणे सामान्य होते. अंगमी नगा समाजानेही ही परंपरा पाळली.

या समुदायांची कुळाची सत्ता आणि जमीन यांच्या नियंत्रणासाठी शेजारच्या गावांशी अनेकदा भांडणे झाली. शत्रूचे कापलेले डोके घरांवर, चौकांवर किंवा झाडांवर टांगलेले असायचे. या प्रथेवर 1940 मध्ये बंदी घालण्यात आली होती.

सर्वात उंच डोंगरावर वसलेले गाव, आयोडीनशिवाय मीठ विकल्यास दंड

नेफ्यू रियो यांचे गाव परिसरातील सर्वात उंच पर्वतावर वसलेले आहे. आजूबाजूला घनदाट जंगले आहेत. नागालँडमधील सर्वात स्वच्छ गावातही या गावाचा समावेश होतो. ऑक्टोबर 2022 मध्ये ते नॉन आयोडाईज मीठमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले. म्हणजे गावात राहणारे सर्व लोक फक्त आयोडीनयुक्त मीठ खातात. विना आयोडीनयुक्त मीठ विकल्यास ग्रामपरिषद दंड आकारते.

सीएम रियो यांचा गावात आलिशान बंगला, पण कोणी राहत नाही

नेफ्यू रियो यांचे वडिलोपार्जित घर गावाच्या मध्यभागी आहे. पूर्वी ते लहान होते, पण आता तो आलिशान बंगला आहे. यात 20 हून अधिक खोल्या आहेत. घर पारंपारिक अंगामी शैलीत बांधले आहे. इथे पोहोचल्यावर मला बंगल्याच्या बाहेरच्या गेटला कुलूप दिसले. शेजारी राहणार्‍या सोहो रियो यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे कुटुंब कोहिमा येथे राहते. हे घर सहसा बंद असते. गावात एखादा मोठा सण आला की, मुख्यमंत्री इथे येतात. त्याच वेळी हा बंगला उघडला जातो.

गावाचा वारसा संग्रहालयात जतन

कौन्सिल सेंटरच्या वाटेवर तुओफेमा संग्रहालय आहे. यात अंगामी समाजातील लोकांचे दागिने, कपडे, शस्त्रे, भांडी, स्मृतिचिन्ह आणि छायाचित्रे, सीएम रियो आणि त्यांचे कुटुंबीय, गावातील प्रमुख जीबी आणि असिस्टंट जीबी यांच्या वस्तूंचा समावेश आहे. संग्रहालयात फर्निचर, पेटी, लाकडी भांडी, ब्रिटीश काळात बनवलेल्या सोंड आणि अंगमी परंपरेचे वर्णन करणारी शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. येथे रियो यांचे वडील, आजोबा आणि पणजोबा यांचा ऐतिहासिक ठेवा देखील जतन करण्यात आला आहे. सीएम रियो यांच्या आदेशानुसार निवडणुकीपूर्वी त्याची दुरुस्ती केली जात आहे, त्यामुळे मी आत जाऊ शकलो नाही.

रियो मुख्यमंत्री झाल्यानंतर गाव पूर्णपणे बदलले

मी केडूओ केन्सला विचारले की हे गाव आजूबाजूच्या गावांपेक्षा वेगळे कसे आहे. प्रत्युत्तरात केडूओ म्हणतात की, 'वडील सांगतात की, हे गाव 1431 मध्ये वसले होते. पूर्वी ते एक सामान्य गाव होते, परंतु नेफ्यू रियो हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णपणे बदलले. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर बनवण्यात आले आहे. शहरात उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा या गावात आहेत.

'येथे उत्तम रस्ते आहेत, गावाच्या बाहेरील भागात हेलिपॅडही बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री थेट कोहिमाहून येथे येतात. अनेक व्हीव्हीआयपीही येतात. येथील रुग्णालयात एमडी आणि एमएस दर्जाचे डॉक्टर आहेत. गावात दोन शाळा आहेत, एक दहावीपर्यंत आणि दुसरी बारावीपर्यंत. मुले पुढील शिक्षणासाठी कोहिमा येथे जातात. उंचावर असूनही गावात पाण्याची कमतरता नाही.

गावातील बहुतांश लोक शेतकरी किंवा सरकारी नोकरीत

एवढ्या गावात फिरूनही मला फारसे लोक दिसले नाहीत, मी केडूंना याचे कारण विचारले, उत्तरात ते म्हणतात की, 'आमच्या गावातील निम्मे लोक सरकारी नोकरीत आहेत. काही खासगी नोकऱ्यात आहेत आणि बरेच शेतकरीही आहेत. इथले लोक रोज नोकऱ्यांसाठी कोहिमाला जातात. वडील शेतीचे काम सांभाळतात. ते सकाळी शेताकडे निघतात आणि संध्याकाळी परततात. त्यामुळेच कामाच्या दिवशी येथे शांतता असते.

गावात पारंपारिक न्यायालय, यात सर्व निर्णय होतात

गावात अंगमी समाजाचे न्यायालय आहे, ज्यामध्ये सर्व लहान-मोठे वाद मिटवले जातात. नगा समाज बोरा गाव आणि त्यांच्या परिषदेच्या निर्णयाचे पालन करते. मात्र, काळानुसार या गोष्टी बदलत आहेत. लोक त्यांचे वाद या न्यायालयाबाहेरही नेत आहेत. एखादे प्रकरण समोर आले की, ग्रामसभा येथे बसून ऐकते.

रियो यांना वडिलांकडून राजकारणाचा वारसा

गावात फिरत असताना मला गावाचे प्रमुख बोरा डेजीसेंगुली हे सुर्यप्रकाशात बसलेले दिसले. 91 वर्षीय सेई ग्राम परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. ते म्हणतात की, ‘रियो यांचे वडील गुलहौली ग्राम परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. आम्ही दोघे चांगले मित्र होतो. त्यांनी गावात बरीच कामे करून घेतली. सीएम झाल्यानंतर नेफ्यू रियो यांनी तेच काम पुढे नेले आहे. राजकारणाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आहे.

सीएम रियो देखील बोरा गावाच्या आदेशाचे पालन करतात

गावचे प्रमुख बोरा देजिसेंगुली म्हणतात की, 'नेफ्यू रियो हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, तरीही ते ज्येष्ठांचा आदर विसरलेले नाहीत. कधी ते गावात येतात, तेव्हा त्यांच्या घरी नक्कीच येतात. अंगामी समाजाच्या नियमानुसार मी गावाचा प्रमुख आहे. प्रत्येक गावकऱ्याने माझ्या आदेशाचे पालन केले पाहिजे. सीएम असूनही, नेफ्यू रियो मी जे काही बोलतो ते ऐकतात. मला रियोच्या बालपणीच्या काही गोष्टी डेसिंगुलीकडून जाणून घ्यायच्या होत्या, ते म्हणाले की, 'आता मला काहीच आठवत नाही, खूप जुनी गोष्ट आहे.'

गावातील मोठा चर्च, त्यातच रिफ्यू नेयो यांचे लग्न

देजिसेंगुली स्पष्ट करतात की 'रिफ्यू नेयो यांचे गावातील चर्चमध्येच लग्न झाले होते. मोठा उत्सव होता, बाहेरून बरेच लोक आले होते. दर रविवारी चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. रिफ्यू नेयो देखील इथे अनेकदा आलेले आहेत.

10-दिवसीय 'सेक्रेनी उत्सव', मेजवानीसाठी शिकार करण्याची परंपरा

केडूओ केन्स, जे आम्हाला गाव दाखवत होते, त्यांनी सांगितले की, या स्टेडियममध्ये दरवर्षी 10 दिवसांचा सेक्रेनी उत्सव साजरा केला जातो. अंगामी योद्धे युद्धात जाण्यापूर्वी हा सण साजरा केला जात असे. उत्सवाच्या दोन दिवस आधी गावकरी जंगलातून लाकडे आणतात. पूर्वी हरीण, अस्वल किंवा इतर प्राण्यांची मेजवानीसाठी शिकार केली जात असे.

'उत्सव सुरू होण्याच्या आदल्या रात्री गावातील बॅचलर मुले विहिरी स्वच्छ करतात. सकाळी त्या पाण्याने अंग धुतात. मग ते पाणी कपड्यांवर आणि शस्त्रांवर शिंपडतात. घरातील महिलांसाठी ते त्याच विहिरीतून पाणी आणतात. विहिरीवरून परतल्यावर प्रत्येक मुलगा एक कोंबडा अर्पण करतो आणि मग उत्सव सुरू होतो.

घराबाहेर कोंबडी कापण्याची आणि लटकवण्याची परंपरा

केडूओ केन्स सांगतात की, वयाची 8 वर्षे पूर्ण केल्यानंतरच मुलगा सेक्रेनी उत्सवात सहभागी होऊ शकतो. 'कोंबडी हाताने मारून जमिनीवर सोडली जाते, कोंबडीचा उजवा पाय डाव्या पायावर आला तर तो शुभशकून' मानला जातो, असे मानले जाते. यानंतर कोंबडीचा खालचा भाग कापून घराच्या दारावर टांगला जातो.

शिकार केलेली कोंबडी महिला आणि मुली खाऊ शकत नाहीत

केडुओ केन्स म्हणतात की, 'खाण्याआधी गावातील लोक अल्कोहोलसोबत कोंबडीचे लिव्हर चढवतात. शत्रू आला तर तो मला मारण्याआधी त्याला मारण्याचे सामर्थ्य दे अशी प्रार्थना करतात. महिला आणि मुलींना हे अन्न खाण्याची परवानगी नाही.

दगडांपासून बनवलेले अ‍ॅम्फी थिएटर, दरवर्षी आयोजित होतात आदिवासींचे खेळ

गावात बांधलेल्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सर्व सण आणि वार्षिक आदिवासी खेळ होतात. यामध्ये अकी किटी (पायाच्या तळव्याचा वापर करून लाथ मारणे), केने (फ्रीस्टाईल कुस्ती), पेछेडा (एक खेळ ज्यामध्ये खेळाडूंना विशिष्ट अंतरावरून बांबूच्या काठ्या फेकायच्या असतात) आणि काही पारंपारिक नगा खेळांचा समावेश आहे.

पर्यटकांसाठी 5 स्टार रिसॉर्ट

कोहिमाला येणारे परदेशी पर्यटक तुओफेमाला नक्कीच भेट देतात. यासाठी गावात पंचतारांकित पर्यटन रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. त्यात 12 कॉटेज आहेत. प्रत्येक कॉटेजमध्ये एक बाल्कनी, एक मास्टर बेडरूम, एक नोकर रूम, वायफाय इंटरनेट, किंग साइज बेड, सोफा, डायनिंग एरिया आहे.

सीएम रियो यांच्या भाचीचे गावाबाहेर रेस्टॉरंट

गावात येणाऱ्या पर्यटकांसाठी ठिकठिकाणी विश्रामगृहे व उपाहारगृहे आहेत. सीएम नेफ्यू रियो यांची भाची अहोनियो रियो यांचेही मुख्य बाजारपेठेत एक रेस्टॉरंट आहे. ती ज्या बिल्डिंगमध्ये रेस्टॉरंट चालवते ती नेफ्यू रियो यांची आहे.

मी अहोनियो रिओ यांना भेटून निघालोच होतो, की मला केनी नावाचा एक गावकरी त्यांच्या रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला. मी त्यांना विचारले की, नेफ्यू रियो मुख्यमंत्री झाल्यानंतर गावात काय बदल झाले? उत्तर मिळाले- 'पूर्वी गावात ना रस्ता होते ना पिण्याचे पाणी. त्यांनी केवळ गावच नाही तर संपूर्ण परिसर उजळून टाकला आहे. मुख्यमंत्री जेव्हाही येथे येतात तेव्हा त्यांना भेटू शकतो, आमच्या समस्या सांगू शकतो.

अशाच आणखी बातम्या वाचा...

भाजीपाला, डाळ-मसाले, कुत्र्याचे मांस एकाच मंडीत:4 हजारांचा कुत्रा, विकल्यास 10 रुपये दंड; बंदीनंतरही विकले जातेय मांस

नागालँडमध्ये मतदान करतील म्यानमारचे मतदार:7 राण्यांसोबत राहतो राजा, गावाचा रस्ताच आंतरराष्ट्रीय सीमा

त्रिपुरात डावे आता विरोधी पक्षही नाही:2018 मध्ये सत्ता गेली, 2023 मध्ये विरोधी पक्षाचा दर्जा; BJP नव्हे महाराजांनी हिरावला दर्जा

60 वर्षांपासून स्वतंत्र, नागालँडला पहिल्या महिला आमदाराची अपेक्षा:47 वर्षीय हेकानी जाखालू यांच्याकडून आशा; मेघालयात महिलाच 'सरकार'

बातम्या आणखी आहेत...