आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coal Supply Shortage; How Electricity Is Produced? [Koyla Se Bijali Kaise Banti Hai] | All You Need To Know

एक्सप्लेनर:कोळशापासून वीज निर्मिती कशी होते? भारत जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश असूनही परदेशातून कोळसा का आयात करावा लागतो? जाणून घ्या

आबिद खान7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाचा सविस्तर...

जगभरात कोळसा टंचाईचे संकट ओढवले आहे. भारत देखील याला अपवाद नाही. देशातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये फक्त 3 ते 5 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. परिस्थिती पाहता हे संकट आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र यासारख्या राज्यांनी कोळशाच्या संकटामुळे वीजनिर्मिती कमी होत असल्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे.

मात्र, केंद्र सरकारने कोळशाचा तुटवडा असल्याचे वृत्त नाकारले आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, कोळशाची कमतरता नक्कीच आहे, पण ती हळूहळू दूर केली जाईल. वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नाही.

कोळशाच्या साठ्याबाबत सध्या काय परिस्थिती आहे? कोळशापासून वीज कशी तयार होते? मुबलक उत्पादन असूनही भारताला इतर देशांकडून कोळसा आयात का करावा लागतो? कोळशाच्या टंचाईच्या वृत्तांवर सरकारचे काय म्हणणे आहे? आणि जगभरात कोळशाची कमतरता का निर्माण झाली आहे, हे जाणून घेऊया...

सर्वप्रथम, कोळशासंबंधी हे नवीन संकट काय आहे ते समजून घ्या

खरं तर देशभरातील कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याचे वृत्त आहे. देशात निर्माण होणारी 70 टक्के वीज औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून येते. एकूण पॉवर प्लांटपैकी 137 पॉवर प्लांट कोळशावर चालतात, त्यापैकी 72 पॉवर प्लांटमध्ये 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. 50 प्लांट्समध्ये 4 दिवसांपेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे.

आता समजून घ्या कोळशापासून वीज कशी बनते?

 • सर्वप्रथम, खाणीतून येणाऱ्या कोळशाचे छोटे तुकडे बारीक करून ते पावडरसारखे केले जाते.
 • या कोळशाचा वापर बॉयलरमधील पाणी गरम करण्यासाठी केला जातो. जेव्हा पाणी गरम होते तेव्हा ते उच्च दाबाच्या वाफेमध्ये बदलते, जे टर्बाइन फिरवण्यासाठी वापरले जाते.
 • हे टर्बाइन पाण्याच्या टर्बाइन सारखे असते. फरक एवढाच आहे की, हे टर्बाइन फिरवण्यासाठी स्टीमचा वापर केला जातो.
 • हे टर्बाइन जनरेटरला जोडलेले असतात. टर्बाइनच्या फिरण्यामुळे जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि यामुळे वीज निर्माण होते.

कोळशाचे बंपर उत्पादन असूनही भारताला आयात का करावी लागत आहे?

कोळसा उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. ग्लोबल एनर्जी स्टॅटिस्टिकल इयरबुक 2021 नुसार चीन कोळसा उत्पादनात आघाडीवर आहे. चीन दरवर्षी 3,743 मिलियन टन कोळशाचे उत्पादन करतो. त्याचबरोबर दरवर्षी 779 मिलियन टन कोळशाचे उत्पादन करून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असूनही, भारताला आपल्या गरजेच्या 20 ते 25 टक्के कोळसा इतर देशांकडून आयात करावा लागतो.

 • कोळशाची आयात थेट कोळशाच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. भारतात उत्पादित कोळशाचे उष्मांक मूल्य कमी आहे. उष्मांक मूल्य म्हणजे एक किलो कोळसा जाळून निर्माण होणारी ऊर्जा. उष्मांक मूल्य जितके जास्त असेल तितकी कोळशाची गुणवत्ता चांगली असेल.

कोळशाच्या टंचाईचे कारण काय?

 • कोरोनाच्या भयानक दुसऱ्या लाटेनंतर देश आता पुन्हा हळूहळू रुळावर येतोय. पूर्वीप्रमाणेच औद्योगिक कामांना वेग आला आहे. ज्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या वाढत्या किंमत देखील त्याच्या टंचाईमुळे आहे. कोळसा महाग झाल्यामुळे वीज प्रकल्पांनी त्याची आयात थांबवली आणि ते पूर्णपणे कोल इंडियावर अवलंबून राहिले. देशातील कोळसा उत्पादनात 80% वाटा असलेल्या कोल इंडियाचे म्हणणे आहे की, जागतिक कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आपल्याला देशांतर्गत कोळसा उत्पादनावर अवलंबून राहावे लागत आहे. मागणी आणि पुरवठा यातील दरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
 • भारतात कोळशाचा तुटवडा देखील मान्सूनशी जोडला जात आहे. मान्सून उशीराने परतत असल्याने खाणी अजूनही पाण्याने भरलेल्या आहेत. यामुळे या खाणींमधून कोळसा तयार होत नाहीये.

या संकटावर सरकारचे काय म्हणणे आहे?

 • ऊर्जा मंत्रालयाने रविवारी सांगितले की, कारखान्यांना पुरवठा करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे. कारखान्यांमध्ये सध्या 72 लाख टन कोळसा आहे, जो 4 दिवसांसाठी पुरेसा आहे. स्टॉक होल्डिंग हळूहळू वाढेल अशी अपेक्षा आहे. कोल इंडियाकडे 400 लाख टनांपेक्षा जास्त कोळसा आहे, जो वीजनिर्मिती केंद्रांना पुरवला जाणार आहे.
 • दिल्लीत विजेच्या कमतरतेच्या वृत्तांवर ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले की, दिल्लीमध्ये वीज संकट नाही. आमच्याकडे कोळशाचा मुबलक प्रमाणात साठा आहे.
 • मंत्री आर के सिंह म्हणाले की, 9 ऑक्टोबर रोजी सर्व कोळसा खाणींमधून 1.92 मिलियन टन कोळसा प्लांट्सना पाठवण्यात आला आणि त्यापैकी 1.87 मिलियन टन वापरला गेला आहे. याचा अर्थ असा की कोळशाचे उत्पादन त्याच्या वापरापेक्षा अधिक होत आहे, असा दावा सिंह यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...