आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या सर्व धमक्यांना न जुमानता, नॅन्सी पेलोसी तैवानला पोहोचल्या आणि संपूर्ण दिवस तिथे घालवून परत गेल्या. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे हैराण झालेला चीन आता तैवानवर हल्ला करू शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चिनी सैन्याने तैवानच्या आसपास लष्करी कवायती सुरू केल्या आहेत.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये युद्ध झाले तर चीनच्या मोठ्या सैन्यापासून तैवान स्वतःचे संरक्षण कसे करेल? याबद्दल जाणून घेऊ....
सर्व प्रथम, तज्ज्ञांकडून युद्धाची भीती का व्यक्त केली जात आहे याबद्दल जाणून घेऊ...
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक डोनाल्ड रॉथवेल डी डब्ल्यू से सांगतात की, नॅन्सी पेलोसीची तैवान भेट हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला आव्हान आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे यंदा 20वे अधिवेशन होणार आहे. ज्यामध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा करतील. अशा स्थितीत पेलोसींच्या भेटीमुळे शी यांच्या वाट्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते या प्रकरणाचे साडेतोड उत्तर देऊ शकतात.
पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे चीनने उत्तर, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व तैवानच्या जल क्षेत्रात आणि हवाई क्षेत्रात लष्करी कवायतींची घोषणा केली आहे. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे की, संपूर्ण आठवडा या योजनेसाठी सराव केला जाईल. PLA इस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल शी यी सांगतात की, सैन्य सरावादरम्यान लॉन्ग थेट फायर शूटिंग करेल. यासोबतच क्षेपणास्त्राचीही चाचणी केली जाणार आहे.
या तुलनेत तैवान कमकुवत दिसत असला तरी त्यावर विजय मिळवणे सोपे नसेल.युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास तैवानने 5 रणनीत्या आखल्या आहेत. जाणून घेऊ..
रणनीती 1: चीनने हल्ला केल्यास अमेरिकेकडून मदत
तैवानला केवळ ठराविक देशांनी स्वतंत्र मान्यता दिली आहे. बहुतेक देश तैवानला चीनचा भागच मानतात. अमेरिकेचे तैवानशी अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत, परंतु अमेरिकेकडून तैवान संबंध कायद्यानुसार तैवानला शस्त्रे विकण्यात येतात. या कायद्यात तैवानच्या स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे नमूद करण्यात आले आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते की, चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानचे रक्षण करेल. अमेरिकेकडून ही भूमिका नव्याने घेण्यात आली होती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिका तैवानचे रक्षण करेल का असे विचारण्यात आल्यावर होय, आम्ही तसे करण्यास वचनबद्ध आहोत असे बायडेन म्हणाले होते.
रणनीती 2: पार्कुपाइन रणनीतीने शत्रूसाठी युद्ध महाग आणि कठीण
चीन आणि तैवानमधील तणाव ऐतिहासिक आहे. 1940 च्या दशकात झालेल्या गृहयुद्धात चीन आणि तैवान वेगळे झाले. तेव्हापासून तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणवतो. तर चीन त्याला आपला प्रांत मानतो आणि गरज पडल्यास आपल्यामध्ये सामील होण्यास देखील जबरदस्ती करतो. म्हणजेच तैवानवर चीनच्या हल्ल्याचा धोका अनेक दशकांपासून आहे.
चीनसारख्या महासत्तेशी सामना करण्यासाठी तैवानने विषम युद्ध पद्धतीचा अवलंब केला आहे. याला पार्कुपाइन स्ट्रॅटेजी असेही म्हणतात. शत्रूसाठी हल्ला शक्य तितका कठीण आणि खर्चिक बनवण्याचा याचा हेतू आहे.
तैवानने हवाईविरोधी, रणगाडाविरोधी आणि जहाजविरोधी शस्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जमा केला आहे. यामध्ये ड्रोन आणि मोबाईल कोस्टल डिफेन्स क्रूझ मिसाइल (CDCM) सारख्या कमी किमतीच्या युद्धनौकांचा समावेश आहे. यामध्ये चीनची महागडी नौदलाची जहाजे आणि नौदलाची उपकरणे नष्ट करण्याची क्षमता आहे.
स्टेल्थ फास्ट-अटॅक क्राफ्ट आणि लघु क्षेपणास्त्र आक्रमण नौका स्वस्त आहेत, परंतु ते अतिशय प्रभावी लष्करी उपकरणे आहेत. हे तैवानच्या बंदरांमधील मासेमारी नौकांमध्ये पसरले जाऊ शकतात. सागरी माईन्स कोणत्याही आक्रमण करणाऱ्या नौदलाचे लँडिंग ऑपरेशन गुंतागुंतीचे करू शकतात.
रणनीती 3: बहुस्तरीय सागरी संरक्षणासह चीनच्या प्रत्येक ताफ्यावर नजर
तैवान चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. तैवानवर कब्जा करण्यासाठी, चीनला मोठ्या संख्येने सैन्य, शस्त्रे, दारूगोळा, अन्न, वैद्यकीय पुरवठा आणि इंधन समुद्र ओलांडून नेण्याची गरज भासू शकते. हे केवळ समुद्रमार्गेच शक्य आहे, कारण एअरलिफ्ट्स आणि विमानांच्या ताफ्यांची क्षमता मर्यादित आहे.
तैवानच्या भूभागावर बेटांची साखळी देखील आहे. यापैकी काही चिनी किनार्याजवळ आहेत. या बेटांवर आधीच स्थापित केलेली पाळत ठेवणारी उपकरणे चीनच्या किनार्यावरून जाणाऱ्या विमानांचा शोध घेण्यास सक्षम असतात. यामुळे बहुस्तरीय सागरी संरक्षणासाठी तैवानच्या सैन्याला पुरेसा वेळ मिळू शकतो.
PLA जवानांना तैवानच्या भूमीवर उतरण्यापूर्वी त्यांना तैवानच्या सागरी माईन्स, क्राफ्ट तसेच जमिनीवर तैनात सैन्य यांचाही सामना करावा लागेल. यामुळे PLA मोठ्या प्रमाणात कमकुवत पडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
रणनीती 4: प्रत्येक 4 पैकी एक तैवानी गनिमी युद्धासाठी तयार
बहुस्तरीय सागरी संरक्षणाचा सामना करून चिनी सैनिक तैवानपर्यंत पोहोचले, तरी तैवानने आपली शहरेही गनिमी युद्धासाठी तयार केली आहेत.
तैवान शहरी लढाईत मॅन-पोर्टेबल एअर-डिफेन्स सिस्टम (MANPADS) आणि हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम (HIMARS) सारखी मोबाइल अँटी-आर्मर शस्त्रे वापरू शकतो. तसेच, इमारतींचे रूपांतर बॅरेकमध्ये करण्यात येऊ शकते.
RAND फाउंडेशनच्या 2017 च्या अहवालानुसार, तैवानमध्ये राखीव सैन्यामध्ये 25 लाख लोक आणि 10 लाख नागरी संरक्षण स्वयंसेवक आहेत. ही संख्या तैवानच्या लोकसंख्येच्या 15% आहे, म्हणजे प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीचा याच्याशी संबंध आहे.
रशियाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तैवानमधील बंदूक प्रशिक्षणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. राजधानी तैपेतील पोलर लाईट प्रशिक्षण केंद्राचे सीईओ मॅक्स चियांग म्हणतात की, अशे लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही बंदूक पहिली नाही ते बंदुकीचा वापर करायला शिकत आहेत.
रणनीती 5: संरक्षण प्रणालीपासून बचाव
युद्धाच्या काळात,एअरक्राफ्ट आणि अँटी-बॅलिस्टिक संरक्षण प्रणाली यांसारख्या संरक्षण प्रणालींचे संरक्षण करणे तैवानची रणनीती असेल. या संरक्षण प्रणालींद्वारे तैवान चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखू शकतो आणि नष्टही करू शकतो. गेल्या काही वर्षांपासून तैवानने अमेरिकेकडून अनेक प्रगत लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. यासोबतच स्वदेशी AIDC F-CK-1 चिंग कुओ हे फायटर जेट देखील बनवले आहे.
तैवानने आपल्या एअरकार्फ्ट्सना सर्वोच्च सुरक्षा तळावर ठेवले आहे. यासोबतच विमानतळांवर बॉम्बस्फोट झाल्यास महामार्गावर विमाने उतरवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिले जात आहे.
यासोबतच अमेरिकेने युद्धाच्या प्रसंगी तैवानला संरक्षण यंत्रणा आणि गुप्तचर मदत देण्याबाबत खात्री दिली आहे. या सर्व रणनीतींचा वापर करून तैवान चीनला असे संकेत देऊ शकतो की युद्ध झाल्यास ते कठीण, महाग आणि रक्तरंजित असण्याची दाट शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.