आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. त्या अनुषंगाने राज्य आराेग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी खास बातचीत.
राज्यभरात लसीकरणासाठी २८५ सेंटर उभे करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यात लसीकरण माेेहीम पार पडेल. सध्या आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी मिळाली आहे. कदाचित मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत खुल्या बाजारातही लस उपलब्ध हाेईल, अशी शक्यता असल्याचे राज्य आराेग्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व फ्रंटलाइन वर्कर्सना लस कधी मिळणार ?
केंद्र सरकारने वेळापत्रक तयार केले आहे. यात तीन गटांतील २५ ते ३० काेटी लाेकांपर्यंत प्राधान्यक्रमाने ही लस सप्टेंबरपर्यंत पाेहोचणार आहे. आराेग्य कर्मचारी, पाेलिस आणि ५० वर्षांवरील अतिजाेखमीच्या रुग्णांना आधी लस मिळेल. राज्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांची यादी आठ लाखांची आहे. त्यामुळे आपल्याला आणखी लसीचे डाेस लागणार असून, ते लवकरच मिळतील.
ग्रामीण भागातील आराेग्य कर्मचाऱ्यांना लस केव्हा मिळणार ?
प्राथमिक आराेग्य केंद्रापर्यंत लस नक्की जाणार आहे. पण प्राधान्यक्रम ठरलेला असल्यामुळे त्याला थाेडा वेळ लागेल.
लसींच्या साठवणुकीची ग्रामीण भागात अचडण असल्याचे बाेलले जाते ?
राज्यात सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये साठवणुकीची चांगली व्यवस्था आहे. ग्रामीण भागातही रेग्युलर लसीकरणासाठीची व्यवस्था आपल्याकडे आहेच. त्यामुळे साठवणुकीची काहीही अडचण नाही.
नागरिकांना लस खुल्या बाजारात केव्हा मिळेल?
मार्चपर्यंत लाेकांना खुल्या बाजारात ही लस मिळेल, अशा स्वरूपाच्या चर्चा आहेत. त्यामुळे असं वाटतं की आपत्कालीन परवानगी मिळाल्यानंतर आता लवकरच लस खुल्या बाजारातही येईल.
कर्कराेग, मधुमेह, उच्चरक्तदाब असणाऱ्यांना लस घेता येईल का ?
हाेय, अगाेदरच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी ही लस घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जाेखमीच्या रुग्णांना संसर्गाचा धाेका कमी हाेईल.
लसीबाबत लाेकांच्या मनात अनेक शंका आहेत, काेराेना झालेल्या रुग्णांना लस मिळेल का ?
लस आणि आैषध यातील फरक समजून घेण्याची गरज आहे. लस ही विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी घेणे गरजेचे आहे. मात्र, काेराेनाचा संसर्ग झालेल्यांना लगेच ही लस देता येणार नाही. त्यांच्यावर उपचारच करावे लागतील. काेराेना हाेऊन गेल्यानंतर १४ दिवसांनंतर लस घेता येईल.
लस कुणाला घेता येणार नाही ?
अठरा वर्षांखालील व्यक्तींसाठी ही लस नाही. गराेदर महिला ज्या बाळांना सध्या पाजत आहेत, त्यांनाही ही लस देेणार नाही.
लसीच्या साइड इफेक्टबद्दल चर्चा आहे?
काेविशील्ड आणि काेव्हॅक्सिन आपण इंजेक्शनद्वारे देत आहाेत. त्यात काही वेळा अंग दुखणे, सूज येणे, थकवा असे नाॅर्मल साइड इफेक्ट काही रुग्णांमध्ये जाणवलेे. पण ही लक्षणं साधी पॅरेसिटेमाॅल गाेळी घेतल्यानंतरही काहींना दिसतात. दाेन्ही लसींची गुणवत्ता पाहूनच त्यांच्या वापराची परवानगी देण्यात आली आहे.
लस सुरक्षित आहे का ?
लस अतिशय वेगात विकसित झाली आहे. त्यामुळे लाेकांच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे. पण, लसीची गुणवत्ता पाहूनच या लसीला मान्यता दिली आहे. लसीच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आज आपल्याला सांगता येणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.